– डॉ. प्रदीप पाटकर

माणूस संकटात सापडतो तेव्हा त्याला अनेकदा आर्थिक मदतीची नव्हे, तर मानसिक मदतीची सर्वाधिक गरज भासते. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित विपत्तीत मानवी समूह एकत्र येऊन मदतकार्यात उतरतात, तेव्हा माणसं किती परोपकारी आहेत ते ठळकपणे दिसून येतं. स्वार्थी जगाकडे बघून निराश झालेल्या मनांना अशी निरोगी साहचर्याचं मदतकरय ‘माणुसकी अजून संपली नसल्याचा’ दिलासा देतात. इतर अनेक मदतगटांबरोबरच वैद्यकीय आधार गट, मादक पदार्थ आणि दारूचं व्यसन सोडवणारे कार्यक्रम, अनाथ बाळं सांभाळणाऱ्या संस्था चालवणारे मदतगट, अशा प्रकारचे विविध विषयांवर प्रामाणिकपणे काम करणारे अधिकाधिक मदतगट तयार होणं ही समष्टीची गरज आहे.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण
police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल

‘समष्टी समज’ सदरातल्या एका जरी लेखात मदतीची अपेक्षा दिसली, तर उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या अनेकांचे संदेश व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलवर येऊन थडकतात ते पाहून मन भरून येतं. मदतीला धावून जाण्याबाबत इतक्या मोठय़ा संख्येनं माणसं संवेदनशील आहेत हे जाणवतं आणि निराशा दूर पळून जाते. जग चांगलं आहे, ते अधिक चांगलं करता येईल, हा विश्वास दृढ होतो. सामान्य समजली जाणारी माणसं प्रत्यक्षात असामान्य असतात, ती स्वार्थ बाजूला सारून कठीण वाटणारी सामाजिक कामं तडीस नेतात, तेही निस्पृहतेनं, प्रामाणिकपणे!

‘लोकसत्ता’नं आजवर मदतीच्या केलेल्या आवाहनांना जनसामान्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आपण पाहिला आहेच. लोकांना फक्त अपेक्षा असते सचोटीची आणि कार्य सिद्धीस जाईल याच्या खात्रीची! कार्य सिद्धीस नेण्यास ही माणसं स्वत:च समर्थ असतात. मदतगट म्हणजे समान ध्येय असलेल्या माणसांचा गट; जे आपल्या आस्था आणि अनुभवांची देवाणघेवाण करतात. हे गट एकमेकांच्या प्रश्नांवर मदत करण्यासाठी, सल्लामसलत करण्यासाठी, दिलासा, प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी नियमित भेटत असतात. महाराष्ट्रात स्वयंप्रेरित मदतगट प्रचंड संख्येनं निर्माण होतात. त्यात तात्कालिक मदत उभी करणारे मदतगट सामाजिक कार्य संपन्न झालं, त्वरित लागणारी मदत पुरेशी झाली, की पुन्हा आपापल्या जागी समूहात विरघळून जातात, समाजकारणाचं स्वार्थी राजकारणात रूपांतर होण्याआधी विखरून जातात.

  प्रश्न जुनाट आणि परत परत उत्पन्न होणारे, नवे प्रश्न जन्माला घालणारे असतील, तर मदतगट विस्तारतो, तोही दीर्घायुषी होतो. त्यातले काही मदतगट जनआंदोलन वा चळवळीत रूपांतरित होतात. चळवळींना उत्तरांसाठी प्रश्नांपाठी धावत राहावं लागतं. प्रश्न आणि उत्तरं दोघांनाही दीर्घायुष्य लाभतं, जनसामान्यांना प्रश्न सहन करत संघर्ष उभारावा लागतो. पर्यावरण रक्षण, आरोग्य आणि अर्थसाक्षरता, ग्राहक संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान प्रसार, संविधानाविषयक जनजागरण, व्यसनमुक्ती, आदिवासींचे जंगल-जमीन हक्क, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांत प्रथम शोषणाच्या विरोधासाठी तात्कालिक मदत, नंतर प्रबोधन, वेळप्रसंगी संघर्ष, असा प्रवास करत अनेक मदतगट चळवळ म्हणून विस्तारित झालेले आपण पाहिले. आजही या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक नाहीत किंवा ती फक्त कागदावर संदिग्ध स्वरूपात अडकून राहिलेली, वास्तवात न उतरलेली अशी दिसतात. ज्या प्रश्नांत धर्मादायी (charitable) मदत फक्त जखमेवर तात्कालिक मलम लावणारी ठरते, तिथे संविधानाच्या चौकटीत, लोकशाही मार्गानं प्रत्यक्ष संघर्ष-सत्याग्रह-आंदोलन करणाऱ्या, प्रश्नांचा सरकारदरबारी पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे (activist) मदतगट आवश्यक असतात.

  व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात महाराष्ट्रात ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ (Alcoholic Anonymous), सरकारी रुग्णालयातले मनोविकार विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ‘आयपीएच’ (ठाणे) (इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ), मुक्तांगण (पुणे), हॅलो फाउंडेशन (अणदूर), परिवर्तन (सातारा), नशाबंदी मंडळ आणि अशा कितीतरी संस्था, अंगणवाडी चळवळी आणि अनेक मनोविकारतज्ज्ञ आपापल्या ठिकाणी मदतगट उभारून मदत करताना दिसतात. सामाजिक कार्यात ‘रोटरी’, ‘लायन्स’, ‘जायंट्स’सारखे क्लब कित्येक वर्ष लोकोपयोगी प्रकल्प चालवत आहेत. प्रसंगोत्पात सामाजिक कामात नैसर्गिक विपत्तीनंतरच्या पुनर्वसनाच्या कामात अनेक राजकीय पक्ष, राष्ट्र सेवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या संघटना, काही उद्योजक, कर्मचारी संघटना मदतकार्यात उतरताना दिसतात.

  मुळात सामाजिक आधार रुग्णांच्या मानसिक, शारीरिक ताणतणावाची तीव्रता कमी करून पुढील उपयुक्त कृतीसाठी प्रेरणा देण्याचं काम करतो. परस्परसंबंधातला जिव्हाळा, त्रासलेल्या माणसाला हार मानू न देता मन आणि जीवन सावरण्याच्या प्रयत्नात ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह टिकवण्याचं काम करतो. आपल्या रोजच्या जीवनात इतरही कामांमध्ये हे वेळोवेळी दिसून येतं. घरात कुणी आजारी असेल, तर भेट देऊन ख्यालीखुशाली विचारल्यानंही रुग्णाच्या मनाला तरतरी येते. बरं होण्याची इच्छा त्यांच्या मनात रुजते, वाढते. डॉक्टरांकडे जायचा कंटाळा आला असेल तरीही सोबत मिळाल्यास रुग्ण दवाखान्यात जाण्यास तयार होतो. सणासुदीला तयारीच्या दडपणानं घरातल्या स्त्रीच्या मनात ताण वाढतो. पण हाताशी मदतीला कुणी जवळचं येणार असेल तर उलट तिचा उत्साह वाढतो, अधिक काय करता येईल, असेही विचार तिला सुचू लागतात. ऑफिस वा कारखान्यात टीम जमली की एकत्र काम करण्यात मजा येते. व्यसनं सोडवताना समदु:खितांची ग्रुप (गट) थेरपी वैयक्तिक उपचारांपेक्षा जास्त उपयुक्त ठरते असं संशोधनात आढळलं आहे. समूहानं धूम्रपान करण्यात मजा येत असेल, तर ते व्यसन सोडवण्यासाठीही एकमेकांची सोबत/ मदत उपयोगी ठरते. ध्येय एक असेल, दिशा निश्चित असेल, तर एकत्र येण्यानं यशप्राप्ती सोपी जाते. एकमेकांना सोबत, सहानुभूती आणि प्रेरणा देण्याचं काम अशा वेळी मदतगटांकडून होत असतं. खरं तर कितीतरी माणसं रोज कुणाला न कुणाला अशी मदत करताना आपल्याला दिसत असतात. साधी सरळ माणसं ही मदत जगजाहीर करत नाहीत, म्हणून ती वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित ठरते/ वाटते. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित विपत्तीत मानवी समूह एकत्र येऊन मदतकार्यात उतरतात, तेव्हा माणसं किती परोपकारी आहेत ते ठळकपणे दिसून येतं. स्वार्थी जगाकडे बघून निराश झालेल्या मनांना अशी मदतकरय ‘माणुसकी अजून संपली नसल्याचा’ दिलासा देतात. वैद्यकीय आधार गट, मादक पदार्थ आणि दारूचं व्यसन सोडवणारे कार्यक्रम, अनाथ बाळं सांभाळणाऱ्या संस्था चालवणारे मदतगट अशा निरनिराळय़ा आधार गटांत भाग घेण्याचे स्वत:लाही अनेक फायदे असतात. असे मदतगट सामाजिक आधार तर देतातच, शिवाय प्रश्नांशी लढायला आवश्यक असलेली नवी कौशल्यं शिकण्यासाठीही मदत करतात, निराश अवस्थेतून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात.

 असे मदतगट दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक वा मानसिक आजारातून बरं होण्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी, काही उपचार/ व्यायाम नियमितपणे, शिस्तशीर करण्यासाठी, आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. मात्र आधुनिक वैद्यकीय तज्ञांनीच फक्त करावेत असे उपचार हे गट स्वत:च ठरवू/ करू शकत नाहीत. तसं त्यांनी करूही नये ही अपेक्षा/ नियम असतो. ते मुख्य उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत, परंतु बरं होण्यासाठी उपचारादरम्यान लागणारी पूरक मदत ते करू शकतात.

गटांच्या चर्चा, बैठकींमध्ये माहितीचं आदानप्रदान करणं, सभासदांना मानसिक आधार देणं, त्यांना आपल्या आजाराची कथा, शंका, अडचणी, अनुभव यांची देवाणघेवाण करण्याची संधी देणं, एकमेकांच्या प्रगतीबद्दल प्रशंसा करणं, उत्तेजन देणं आणि त्याचबरोबर पुढील आयुष्यात उपयोगी पडतील अशा कौशल्यांची चर्चा करणं, यावर त्यांचा एकंदर भर राहतो.

रोगमुक्ततेच्या दिशेनं वाटचाल करताना कुटुंब आणि मित्रांचे आधार हे महत्त्वाचे असतात. पण ती व्यक्ती ज्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून जातेय याबाबत पूर्वानुभव आणि माहिती नसेल, तर त्यांना काय मदत, किती, कशी आणि किती काळ करावी हे कळेल असं नाही. मदत करण्याचा पूर्वानुभव असलेला मदतगट ही उणीव भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. असे गट सामाजिक आधार देतात, उपचार घेताना सोबत करू शकतात, बरं होण्यासाठी योग्य सूचना देऊ शकतात, वेगवेगळय़ा मदती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्या त्या विशिष्ट आजाराचा अनुभव असलेल्या माणसाबरोबर व्यक्त होण्यास रुग्णाला वाव मिळाला, तर त्याच्या आजाराविषयीच्या चिंतायुक्त भीतीच्या भावनांना वाट मिळते. शंका आणि प्रश्नांना योग्य उत्तरं मिळाल्यास ताण कमी होतो. आजाराचा स्वीकार करणं सोपं जातं. आपण एकटे पडलो आहोत अशा भावनेनं येणारं वैफल्य दूर होऊ शकतं. त्या आजाराबाबत योग्य वैज्ञानिक ज्ञान मिळवून गैरसमज आणि नैराश्य दूर करून, अंधश्रद्ध वृत्ती बाळगण्यापासून सुरक्षित ठेवतात.

मदतगटांमधील सहभागाविषयी काही महत्त्वाच्या सूचना द्याव्याशा वाटतात- 

मदतगटात काम करण्याअगोदरच्या चर्चेत आपले प्रश्न वेळीच विचारून शंकानिरसन करून घेणं बरं असतं. कधी मुद्दय़ाचं काही कळलं नाही, अथवा मान्य नसेल तर तिथे प्रश्न विचारणं आणि उत्तर नीट समजून घेणं चांगलं. शंका विचारायला मनात भीती, संकोच ठेवू नये. नाहीतर सुरुवातीला आपल्याला मदतगटाचं काय स्वरूप आहे असं वाटत होतं आणि काही काळ गेल्यानंतर प्रत्यक्षात मदतगटाचं स्वरूप कसं आहे, त्याची कार्यपद्धती कशी आहे ते समजू लागतं, विचारांमध्ये विसंगती जाणवते आणि भ्रमनिरास होऊ शकतो. असा भ्रमनिरास मनाला कडवट करतो आणि ती कडू चव अनेक वर्ष मनात रेंगाळत राहते, मन सावरता सावरत नाही. पुन्हा या कामात पडू नये, असं वाटून कार्यकर्ता/ मदतगटाचा सभासद दूर होतो.

 म्हणूनच एखाद्या मदतगटात सामील होताना सहभागाचं दडपण घेऊ नये. सुरुवातीच्या काळात मन मानत नसेल, तर दडपणाखाली येऊन बोललंच पाहिजे, स्वत:विषयी सांगितलंच पाहिजे, असं अजिबात समजू नये. इतर सभासदांबद्दल विश्वास निर्माण होईपर्यंत व्यक्त झाला नाहीत तरी चालेल. ती सहज सावध वृत्ती आहे, त्याबद्दल मनात न्यूनगंड येऊ देऊ नका. मदतगटाची विश्वासार्हता जपायला हवी. मदतगटात कुणी आपली कथा, व्यथा, अनुभव सांगत असेल, तर त्याचं खासगी स्वरूप लक्षात घेऊन, व्यक्तीविषयी आदर बाळगून, तिची संमती नसल्यास मदतगटाबाहेर इतरांकडे त्या संभाषणाची वाच्यता करू नये. तशी वाच्यता केल्यास गटाची आणि तुमची विश्वासार्हता धोक्यात येते हे लक्षात घ्यायला हवं. मात्र गटाच्या धोरणात/ कामात हिंसक आक्रमकता, जात-वर्ण-प्रांत-धर्म असे भेद शिरत असतील, दडपशाही वापरली जात असेल, तर त्याबाबत स्पष्ट भूमिका त्वरित घेणं आवश्यक असतं.

मानसिक किंवा शारीरिक आजारांमध्ये भक्कम सामाजिक नातेसंबंधांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. हे मानसिक आधाराचे महत्त्वाचे आधारस्तंभ मानले जातात. आजारांबाबत काम करणारा सामाजिक आधारगट हा साहजिकच रुग्णाच्या जवळच्या/ ज्यांच्याकडे रुग्ण नेहमीच आधारासाठी, मदतीसाठी जाऊ शकतो अशा नातेवाईक आणि मित्रांचा मिळून बनलेला दिसून येतो. तुमच्यावर व्यक्तिगत संकट कोसळलं असेल, तुम्हाला तात्काळ मदतीची गरज असेल किंवा कधी फक्त मन मोकळं करण्यासाठी तुम्हाला प्रेमळ, समजूतदार व्यक्तींची गरज असते, तेव्हा हे मदतगट तुमच्या दैनंदिन जीवनात/ कार्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. 

मदतगट ताणमय परिस्थितीत माणसांना भक्कम आधार देऊन हतबल होण्यापासून वाचवू शकतात. आजारी माणसासाठी घरी किंवा रुग्णालयात जेवणाचा डबा पाठवणं, जरूर तिथे स्वत:ची आर्थिक सुरक्षितता सांभाळून अडचणीत सापडलेल्या माणसांना आर्थिक मदत देणं, गरीब मेहनती विद्यार्थ्यांना शिक्षणाची, अनाथांना अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय करून देणं, अशा कितीतरी प्रकारची मदत करणारी परोपकारी माणसं आपण आजूबाजूला पाहतो. ‘मला काय त्याचं?’ अशी आजकाल माणसांची वृत्ती झाली आहे असं जर सर्रास बोललं जातं, तर या परोपकारी वृत्तीचंही तितकंच कौतुक व्हायला हवं. सामाजिक आधारगट हा एकतर्फी मार्ग नसून निरोगी साहचर्य असतं. सावरलेल्या व्यक्तीलाही सामाजिक कार्यात शक्य तेवढा सहभाग देत कधी इतरांचा आधार बनावं लागतं. तशी संधी त्यांना मिळाली, तर त्यांचा आत्मसन्मान जपला जातो, आत्मविश्वास वाढतो. आजवरच्या शास्त्रीय संशोधनात असं दिसून आलं आहे, की मानसिक, शारीरिक आजारांमध्ये, त्यातून बरे होण्यासाठी सामाजिक आधाराची मोठी मदत होऊ शकते. अडचणीच्या वेळी तुमची केवळ उपस्थितीही प्रेरणादायी ठरते, मदत घेणाऱ्या आणि मदत करणाऱ्यांनाही हुरूप आणि दिलासा देते. रुग्णांच्या मनात नैराश्य, एकटेपण आणि आधारहीनतेची भावना निर्माण झाली, तर तिचा त्यांच्या मेंदूच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. प्रसंगी ते वेगवेगळी व्यसनं, हृदयरोग, नैराश्य, आत्महत्या इत्यादी आजारांची शिकार होण्याची शक्यता वाढते. मध्यमवयीन माणसांवर केल्या गेलेल्या काही अभ्यासांत संशोधकांना आढळून आलं, की ज्यांना भक्कम सामाजिक आणि मानसिक आधार होता, अशी माणसं अवेळी मृत्यू पावण्याच्या शक्यता कमी दिसून आल्या. काही पुरुषांचे पत्नी असेतोवर नियंत्रणाखाली असलेले आजारही पत्नीवियोगानंतर नजीकच्या काळात बळावल्याचं आढळून येतं.  

आपल्या सामाजिक परिस्थितीचे दोन महत्त्वाचे घटक समूहमनाचं आरोग्य चांगलं राखतात.

१. सामाजिक आधार आणि २. सामाजिक ऐक्य. हा आपला रोजचा अनुभव आहे, की ज्या मित्रमंडळीत, नातेसंबंधांत मैत्री, स्नेह, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जपला जातो, तिथे त्या समूहाचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आपापसात मतांतरं निर्माण होणं साहजिक आहे, पण भावनिक बुद्धिमत्ता वापरुन समन्वय साधण्यानं मतभेदाचं रूपांतर मनभेद आणि स्नेहभेदात होणं टाळता येतं. आजकाल जी गृहसंकुलं उभारली जात आहेत, तिथे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सभासदांना ही तारेवरची कसरत करावी लागते आणि सर्वमान्य उत्तर न मिळाल्यास नाइलाजानं तिथे कायद्याची मदत घ्यावी लागते. यात दुखावल्या जाणाऱ्या व्यक्तींनी खरंतर, स्वार्थाला कायद्यावर कुरघोडी करू न देता, सुरुवातीपासूनच कायदा नीट पाळला, तर अनावश्यक भावनिक संघर्ष टाळता येतो. हेच पथ्य कुटुंब, व्यावसायिक भागीदारी, धार्मिकता, सामाजिक कार्य, निवडणुका, सार्वजनिक आरोग्य आणि सुव्यवस्था या आणि अशा विविध क्षेत्रांत (जिथे माणसं एकत्र येतात तिथे पाळल्यास) आपलं मानसिक आरोग्य जपलं जाईल यात शंकाच नाही.

खूप आवश्यकता आहे जागोजागी मदतगट उभे राहण्याची! नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटं वाढत असताना सामाजिक पर्यावरणही जपणं निकडीचं आहे. घरोघरी हे परिस्थितीचं आव्हान आणि विवेकाचं आवाहन नीट पोहोचलं पाहिजे. तीव्र उन्हाच्या झळा, धुवाधार पावसात कोसळणाऱ्या दरडी, नित्यनेमानं येणारे महापूर आणि झुंडींचे उन्माद, दंगली, गुन्हे, भ्रष्टाचार, हे मानवी बुद्धीला, सर्जक वृत्तीला, विवेकाला आव्हान देत आहेत! विवेकी मानसिक आधार देणारे गट तयार करणं, ते जपणं हे समष्टीला जपणारं एक मोठं समाजकार्य आहे.

patkar.pradeep@gmail.com