डॉ. प्रदीप पाटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण जेव्हा ‘पालक’ असतो, तेव्हा रूढ समजुतींनुसार फक्त आपल्या मुलांचे पालक असतो. समाजातल्या इतर मुलांशी किंवा एकूण समाजाशी पालक या नात्यानं आपला काही संबंध नाही, ही खूणगाठ मनात पक्की असते. अनेक सामाजिक रेटय़ांमधून ही वृत्ती घडत जाते आणि ते साहजिकही आहे. पण मनुष्याच्या आजवरच्या वाटचालीत जेव्हा जेव्हा समूहानं एकत्र येऊन पालकत्वाची भूमिका घेतली, तेव्हा निश्चित काही बदल घडला असं दिसून आलं. आजच्या अनिश्चित, डळमळीत सामाजिक स्थितीत सामाजिक पालकत्वाची ही संकल्पना पुन्हा जिवंत करता येईल का ?..

मूल जन्माला येतं तेव्हा पित्याला आनंद होतो, पण बाळ व आई यांच्या प्रकृतीबाबत प्रारंभी आणि नंतर भविष्याबाबत त्याच्या मनात नवीन चिंता जन्म घेते. पुढे अनेक वर्ष ही चिंता वाढत जाते. आईला वेदनामिश्रित आनंद होत असतो. मूल पहिला श्वास घेतं आणि सोडतं, तेव्हा ते रडतं. ती भावी आयुष्यातील अडीअडचणींची, सुखदु:खाच्या नात्याची पडदा वर गेल्यावर सुरू होणारी नांदी असते. जन्मत: असहाय्य, दुर्बल, परावलंबी मूल जेवढं स्वतंत्र, सशक्त, स्वावलंबी आणि यशस्वी बनेल, तेवढं पालकत्व यशस्वी मानलं जातं. इतर बऱ्याच प्राण्यांपेक्षा माणसाचं पिल्लू जास्त वर्ष परावलंबित्वात घालवतं. पहिली १५ ते २० वर्ष आपल्याकडचं मूल परावलंबनात व्यतीत करतं. माणसाचं पालकत्व म्हणून बरीच वर्ष लांबतं, टिकून राहतं. (खरं सांगायचं तर पूर्वी पालकत्व दीर्घकाळ टिकून राहायचं, हल्ली ते मुलांकडून लवकर गुंडाळलं जातं!) आताची मुलं पालकांचं ऐकत नसतील, पण ती त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवतात, असं मला नेहमी वाटतं. वय वर्ष १२ नंतर मात्र बहुतांशी मुलं मित्र, समवयस्क मुलं, चित्रपट, मालिका, यू-टय़ूब, फेसबुक यांचंच ‘मार्गदर्शन’ स्वीकारतात असं दिसतं! ‘मूल मोठं करणं’ म्हणजे त्याच्या नसíगक वाढीला मदत करत राहणं एवढंच पालकत्वाचं काम होतं, तेव्हा ते सोपं होतं. ‘मुलाला मोठेपणी कोण बनवाल?’ हा प्रश्न आजूबाजूचे लोक पालकांना विचारू लागले (किंवा त्यांच्या नजरेत तसा प्रश्न आहे, असं पालकांना स्वत:लाच वाटू लागलं), तसं पालकत्व कठीण होत गेलं. ‘मुलाला कोण बनवायचं?’ हा प्रश्न जिव्हाळ्यातून सुरू झाला आणि अस्मिता- अभिमानापासून दुराग्रहापर्यंत पोहोचला. पालक आपल्या सुप्त महत्त्वाकांक्षा पालकत्वात मिसळू लागले. मूल मातीचा गोळा समजून त्यावर व्यवहारी जीवनाचे संस्कार करताना गडबडीत नीती व मूल्यसंस्कारांची माती होऊ लागली. त्यातच बाजारातील प्रभावी प्रचारानं आक्रमण करून पालकांच्या मनावर कब्जा मिळवला. या प्रचारानं आयोजिलेल्या ‘गाइडेड टूर’ मध्ये फिरून आलं की पालकत्वाची व्याख्याच बदलून जाते. बाजाराचा ‘प्रोपगंडा’ खूपच प्रभावी व सर्वव्यापी होऊ लागला आहे यात शंकाच नाही.

मूल हे माणसाचं म्हणून वाढवायचं, की बाजारवादाच्या प्रभावाखाली त्याला एक उपयुक्त, उपभोग्य, विक्रीयोग्य वस्तू होऊ द्यायचं? उत्तर स्पष्ट आहे, पण उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं तेच समजत नाही. ते समजलं तरी तिथपर्यंतचा प्रवास खडतर असतो. मुलांना समजावून (वा पूर्वीच्या पद्धतीनं लहान मुलांना फरफटत?) सोबत नेणं तर दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. आजकालच्या मुलांबाबत मनात अनेक प्रश्न उभे राहतात. मुलं आक्रमक होताहेत ती अतिरिक्त ताणतणावामुळे, की सध्याच्या अटीतटीच्या स्पर्धायुगात ती त्यांची गरज होत चालली आहे? पालकांशी मतभेद वाढताहेत, की मायेचा ओलावा संपून जातोय आणि नाती कोरडी, निव्वळ व्यावहारिक होत चालली आहेत? कृतज्ञता हरवतेय, की कृतघ्नता चाणाक्ष व्यवहार म्हणून समोर येत आहे? जीवन हावरटपणे जगण्यामागे भविष्यातील अनिश्चितता हे कारण आहे का? उतावीळता आणि आक्रमक आत्मकेंद्रितता आयुष्य अतिशय गतीमान झाल्यामुळे वाढत आहे, की चंगळवादी जीवनशैली मनात भिनल्यामुळे?

माझ्या मुलांव्यतिरिक्त समाजातील इतर मुलांशी मला काही देणंघेणं नाही, ही असंवेदनशील अलिप्तता असते, अथवा इतरांच्या भानगडीत पडायचं तरी कशासाठी?, हा सर्वसंमत व्यावहारिक दृष्टिकोन त्यामागे असू शकतो. समाजाप्रती बांधिलकी जपून मुलांमध्ये समाजकार्य करणाऱ्या कितीतरी व्यक्ती वा संस्थांची ‘लष्करच्या भाकऱ्या भाजणारे’ अशी संभावना करणं, हा पूर्वीपासून लोकमान्य ‘स्मार्टनेस’ व गप्पांतील टाइमपास ठरत आला आहे. ‘आपल्याला जेवायला मिळालं म्हणजे झालं, शेतकऱ्याचं काही का होईना’ ही भूमिका मुलं, माणसं सहज स्वीकारतात. अशा काळात मुलांचं पालकत्व केवळ त्या त्या पालकांचं उरत नाही. ती जबाबदारी सर्व समाजानं उचलायला हवी. आधीच स्वत:च्या प्रपंचात मेटाकुटीला आलेल्या समाजानं हे सारं करण्यासाठी अधिक ऊर्जा कुठून आणायची? ही ऊर्जा सामूहिक ऊर्जेच्या स्वरूपात मदतीला धावून येऊ शकते. समाज आणि देश अशा सामूहिक ऊर्जेच्या आधारे अनेक प्रतिकूल परिस्थितीतून सावरला आहे हे इतिहासात दिसून येतं. अशा वेळी माणसांमधून समर्थ, सामूहिक नेतृत्व उभं राहतं. काही काळानं त्यातील परमार्थ लयास जातो, स्वार्थ वाढू लागतो, असंही दिसून येतं! शरीराचं पालनपोषण जेवढं महत्त्वाचं, तेवढंच ते मनाचंही व्हायला हवं. हे लक्षात घेतलं तर विविध रूपांनी, अंगांनी पालकत्व सामोरं येतं. केवळ जन्म दिला म्हणून तेच आई-बाप पालक, इतरांना या मुलाशी काय देणंघेणं, असा संकुचित विचार जागतिकीकरणानं, इंटरनेटनं जवळ आलेल्या आजच्या जगाला करताच येणार नाही.

सामाजिक पालकत्वाबाबत सर्वसामान्य माणसांमध्ये अजून अनभिज्ञता दिसून येते. सामूहिक पालकत्व ही कल्पना प्लेटोनं मांडली. व्यक्तिगत पालकत्व तेवढय़ाच कुटुंबापुरतं मर्यादित होत स्वार्थी बनत जातं. शासन आणि समूह दोघांनी मिळून पालकत्वाची जबाबदारी उचलली, तर स्वार्थ विस्तारित होत जनकल्याण साधू शकेल असं तेव्हा त्याला वाटलं असेल. उत्क्रांतीत अशा सामूहिक पालकत्वाचा टोळ्यांना फायदा झाला. त्यातून संस्कृती पुढे विकसित झाली. समाजात नीती व विवेकाचा प्रसार झाला. मग धर्म आणि त्यासोबत धर्मसत्ता तयार झाली. एव्हाना टोळीप्रमुखांमध्ये सत्ताकारण शिरलं होतंच. राज्यसत्ता व धर्मसत्ता यांच्यात कधी समन्वय, कधी संघर्ष सुरू झाला. आपल्या देशात जातीभेदांमुळे माणसं पिडली, समाज दुभंगला, मोठय़ा प्रमाणात समाजाची वाताहत झाली. वर्ग-वर्ण संघर्ष तीव्र झाला. मानसिक गुलामगिरी वाढली. लोकशाहीनं कल्याणकारी लोकराज्याची संभाव्यता, आशा निर्माण केली. अनेक आशांप्रमाणे ही आशाही अल्पायुषी ठरणार की काय अशी शंका मध्येच कधी येऊ लागते. वैयक्तिक आयुष्यात एकत्रित कुटुंब पालकत्व सांभाळत होतं (?) पण जगण्याचे, शिक्षणाचे, अर्थार्जनाचे प्रश्न सोडवताना एकत्र कुटुंब तुटत गेलं. सामूहिक पालकत्व लयास गेलं आणि सामाजिक पालकत्वाचा विचार मागे पडला. ज्या शासनकर्त्यांनी सामूहिक पालकत्व जपायचं, त्यांना वैयक्तिक स्वार्थापुढे काही सुचेनासं झालं. आज जनकल्याणाची जबाबदारी टाळून, विश्वामित्री पवित्रा घेत, शासन फक्त व्यवस्थापनाचं काम करू पाहत आहे. तेही काम आता तथाकथित विकासाच्या नावाखाली जगभरातील बहुतेक सरकारं खासगीकरणाद्वारे खासगी उद्योगपतींकडे सोपवत आहेत आणि फक्त काही निवडक धनाढय़ उद्योजकांच्या हिताकडे लक्ष दिलं जात आहे, अशी भावना कष्टकरी, सर्वहारा, पददलित समूहात रुजली आहे. आता सर्वसाधारण मानवतावादी माणसंच सामाजिक पालकत्व सांभाळतील, अशी परिस्थिती दिसत आहे. लोकशाहीत संविधानानं दिलेले अधिकार आणि कर्तव्यं लक्षात घेऊन, नागरिकांनीच आता ठिकठिकाणी झोपेचं सोंग घेतलेल्या शासनकर्त्यांना जागं करून कल्याणकारी व्यवस्था उभारली पाहिजे.

परिस्थितीच्या रेटय़ामुळे वा अविवेकी विचारपद्धतीमुळे येणारं वाढतं वैफल्य, जीवनातील अर्थशून्यता, स्वनाशाची ओढ, आत्मघातक निष्क्रियता, व्यसनाधीनता, अतिरिक्त संचय (परिग्रह), अवाजवी अविवेकी जीवनशैली- एक ना अनेक प्रश्न केवळ अविचारी, अविवेकी, असंतुलित, अनियंत्रित भावनोद्रेकामुळे उद्भवत असतील, तर विवेकी विचार पद्धत, भावना नियंत्रण शिकून घेऊन, संयम, सहनशक्ती वाढवत समृद्ध, अर्थपूर्ण जगता आलं पाहिजे. हे सारं आता शहरांमध्ये प्रत्यक्ष वा ऑनलाइन शिकता येतं. गावागावांतून रोजच्या ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करता येईल, यासाठी उपयुक्त ते शिकलं व समजावलं पाहिजे. योग्य वैज्ञानिक मूल्यमापन करून, वेगवेगळ्या उपचारपद्धतींद्वारे संतुलित मानसिकतेचे फायदे जनमानसाला मिळवून देता आले पाहिजेत. अशा काळात आपण essentialism- अनिवार्य, अत्यावश्यक तेवढंच, minimalism- किमानवाद, आर्थिक साक्षरता, सायबर सुरक्षितता, ग्राहक जागृती, संविधानानं दिलेले हक्क आणि देशाप्रती, समाजाप्रती नमूद केलेली नागरिकांची कर्तव्यं, यांची परिपूर्ण ओळख करून घ्यायला हवी. धर्म, श्रद्धा, देवभक्तीतील विवेक आणि वास्तव, प्रेम, विवाह, सेक्स, लिंगभेद, याबाबत कालसापेक्ष- ज्ञानसापेक्ष पुनरावलोकन व्हायला हवं. समाजात रुजलेल्या नतिक मूल्यांचा, रुळलेल्या आर्थिक- धार्मिक- राजकीय कल्पनांचा, मानसशास्त्रातील सिद्धांतांचा नव्यानं अभ्यास व्हायला हवा (हे ‘लोकसत्ता’ वृत्तपत्र सतत करत आलं आहे). परत एकदा प्रथा, कर्मकांडं, पूर्वग्रहांचं (आणि पश्चिमेविषयीच्या पूर्वग्रहांचंही) खरं-खोटंपण, कालसापेक्षता तपासली पाहिजे. इथे सत्यशोधनाच्या मार्गातलं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्त्वपूर्ण योगदान समजून घ्यायला हवं. सुखं तीच ती राहतात, सधन वर्गात तर सुखाच्या चेहऱ्याचा ‘मेकअप’ प्रचलित सिनेमानुसार बाजाराच्या गरजांप्रमाणे बदलतो, हे आजवरच्या मत्री, प्रेम, रोमान्स, प्रस्ताव व नंतर लग्नादी समारंभांत दिसून येतं. कर्मकांडं तीच, त्यामागचा अर्थ समजला नाही तरी अतिविस्तारित मालिकेप्रमाणे त्यांचं प्रदर्शनीकरण अट्टहासानं विस्तारत राहतं. भावनांचं आविष्करण, सुखोपभोगाच्या कल्पना विशेष न बदलता त्याच त्या पारंपरिक राहिल्या आहेत. पुरुष सत्ता अजूनही कायम आहे. ‘रिच्युअल्स’ आधुनिकतेचा मुखवटा घालून सामोरी येत आहेत. कल्पनेतील स्वर्ग विशेष बदलला नाही, पृथ्वीवरील नरकातील छळपद्धती मात्र आधुनिक झाल्या आहेत. शोषित, दुर्बल, निर्धनांवरील संकटांची आव्हानं तीव्र व क्लिष्ट होत आहेत. सुखाच्या कल्पनेत नसेल इतकं नावीन्य दु:खात आढळून येतं!

आरोग्यविषयक अंधश्रद्धा वाढल्या आहेत, शासकीय आरोग्यव्यवस्थेवरील भार वाढत आहे, अर्थसंकल्प आरोग्य विषयाला न्याय देत नाहीत, त्यात करोनानं नवं आव्हान दिलं आहे. या विषाणूंनी आपल्या आरोग्य व्यवस्थेसमोर अचानक आव्हान उभं केलं. त्याचबरोबर अशा काळात सर्वानी एकत्र येऊन, सार्वजनिक आरोग्यातला आपला सहभाग उचलला पाहिजे हे सत्य अधोरेखित केलं. ‘सामाजिक पालकत्व’, ‘मानस मित्र’ आदी कल्पना जनमानसात नवीन नाहीत. अशी कामं आजवर होत आली आहेत. तुमच्या-आमच्या संवादातूनच अशा कल्पना उदयास येतात आणि रुजतात. आता त्यांचं सुसूत्रीकरण व्हायला हवं. व्यवस्थेला अधिक समाजाभिमुख करण्यासाठी अशा जनसंघटना प्रभावी भूमिका बजावू शकतात. हे लेखन कशासाठी?, असा प्रश्न मनाशी विचारत, आपल्यासमोर म्हणाल तर एक कैफियत मांडत येथवर आलो. प्रशासनासह एकंदर समाजाला विविध प्रश्नांबाबत (विशेषत: मानसिक आरोग्याबाबत) सजग करणं आणि कार्यप्रवण बनवणं, यात सर्वानी आपला सहभाग दिला पाहिजे. एकटेपणे ज्ञानाची पहाट होण्याची वाट न पाहता अनेकांशी हात मिळवून सामूहिक कृतीनं अज्ञानाच्या अंधाराचा भेद करत आपल्या आरोग्याची पहाट आपल्यालाच घडवावी लागेल.

१९७८ ते १९८३ या वर्षांत मुंबईत अभ्यासलेली, प्रश्न निर्माण करणारी, अध्ययन समस्या असलेली, शिक्षणातून बाहेर फेकली गेलेली, वर्तन समस्या असलेली मुलं, १९८२-८४ च्या आसपास रायगडमधील कोळसाभट्टी वेठबिगारी विरुद्धचा लढा, रायगड आणि पनवेलमधील १९८९ आणि २००५ ला आलेले महापूर, १९९२ ची ‘शोध भुताचा- बोध मनाचा’ ही मोहीम, १९९३ चा लातूर- सास्तूरला झालेला भूकंप, २००७ चा पेणचा ‘एसईझेड’विरूद्धचा लढा, बीड- उस्मानाबादमधील २०१४ च्या गारपीटग्रस्त शेतकरी बंधूभगिनींच्या आत्महत्या, २०१८ या वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आदिवासी समाजातील काम, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य, यात मला प्रत्यक्ष सहभाग घेता आला. त्या प्रत्येक ठिकाणी लोकसहभागाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला व कार्यकर्त्यांना अफाट उमेद देत आला आहे. त्यापुढे कृतज्ञतेनं नतमस्तक होत असतानाच, अशा कामात यापुढेही जनमानसाच्या सहभागाची आवश्यकता प्रखरतेनं जाणवत राहते.

मी, माझं, मला, माझी माणसं, या विचारांपासून जनमानसाचा प्रवास सुरू होतो, तो थेट सर्व जीव-निर्जविांच्या पालकत्वाएवढय़ा व्यापक वैश्विक जाणिवेपर्यंत पोहोचतो..

patkar.pradeep@gmail.com  

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samashti samaj author pradip patkar social parenting children ysh
First published on: 22-01-2022 at 00:02 IST