scorecardresearch

Premium

समष्टी समज: आनंदाचे डोही!

लहान मूल स्वत:च्या निर्मितीबद्दल फार उत्सुक असतं. आपण जे निर्मिलं आहे

समष्टी समज: आनंदाचे डोही!

डॉ. प्रदीप पाटकर
लहान मूल स्वत:च्या निर्मितीबद्दल फार उत्सुक असतं. आपण जे निर्मिलं आहे, त्याबद्दल त्याला अनाकलनीय कुतूहल असतं. आनंदाचे डोही रमण्याचं स्वनिर्मितीतलं समाधान आणि त्यातून येणारा आत्मविश्वास हे आपण मोठे झाल्यावर क्वचितच अनुभवतो. हा निरागस आनंद मोठेपणी का हरवतो? मुख्य म्हणजे हा अनुभव एका दोघांचा नसतो, तर तोसार्वत्रिक आहे. म्हणूनच यावर एकत्रित उपाय शोधायला हवा.

कागदावर चिक्कार रेघोटय़ा ओढून रूही आणि रिहान (दोन्ही वय वर्ष दोन) त्या आपल्या स्वतंत्र कलाकृतीकडे प्रचंड कौतुकानं डोळे विस्फारून पाहातात. मग त्यावर उत्साहानं नवे रंगीत फराटे ओढतात. मग विजयी मुद्रेनं आमच्याकडे (आजी-आजोबा आणि आई-बाबा) पाहातात. अपेक्षा असते की त्यांना झालेल्या आनंदाइतकेच हेही आनंदी झालेले असतील! पाहातात तर काय? आजी-आजोबांच्या डोळय़ांत कौतुक ओसंडून वाहात असतं. कौतुक बोलून दाखवायला त्यांना शब्द सापडत नसतात. मग अधिकच खूश होऊन, चीत्कारत, किलकाऱ्या मारत ते ममी-पपांकडे पाहातात. तर त्या दोघांच्या चेहऱ्यावर ठळक प्रश्नचिन्ह असतं, ‘हे काय काढलंय?’, ‘काल शिकवलेलं आज हे बाळ विसरलं कसं?’ अशी चिंता असते. चित्र काढायला सांगताना त्यांना असलेला उत्साह पार निघून गेलेला असतो. आई-बाबा एकमेकांकडे पाहात असतात, डोळय़ात प्रश्न असतो, ‘कसं तू हे चुकीचं शिकवलंस!’ दोघांच्या मनात अतितीव्र गतीनं फिल्म सरकावी तसे धडाधड प्रश्न मन:पटलावर झळकून जात शेवटी कोणाच्या घराण्यातून हे कच्चे गुण या बाळात प्रवाहित झाले असावेत इथपर्यंत येऊन थांबतात!

the other eden
बुकरायण: ‘चित्रदर्शी’ विस्थापन कहाणी..
Gajkesari 2023
गजकेसरी योग बनताच ‘या’ राशींचे लोक होणार प्रचंड श्रीमंत? धनलाभासह व्यवसायात यश मिळण्याची शक्यता
marathi book ibru review by author yashodhara katkar
आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..
tsunami
UPSC-MPSC : त्सुनामीची निर्मिती कशी होते? त्याची नेमकी कारणे कोणती?

खरं तर गेल्याच आठवडय़ात या दोघांनी- आईबाबांनी- ‘जहाँगीर आर्ट गॅलरी’ला भेट दिली होती. (असे प्रतिष्ठित इव्हेंट्स ‘you know,’ ग्रुपमध्ये प्रतिष्ठा वाढवायला खूप उपयोगी पडतात!). तिथे काही कळत नसतानाही बरंच काही कळल्याचा आव आणून पिकासो आणि इतर अशाच आत्मशोध घेणाऱ्या चित्रकारांची चित्रं सर्वाबरोबर पाहाताना याच आईबाबांनी त्या चित्रांची खूपच स्तुतीही केली होती. अनेक संगीत मैफिलीतही असं अनेकांना करावं लागतं. हे नाटक आपण कुठून शिकलो? सामाजिक स्वीकाराच्या आंतरिक गरजेनं ते शिकवलं का? निरागस अज्ञानाला आपल्या सार्वजनिक जीवनातून असं कठोरपणे आपण हद्दपार का केलं आहे? ते विचार आता मनात इतके भिनले आहेत, की अज्ञानी माणसाचं अस्तित्व आपल्याला खुपतं आणि अजाण बाळाचं अज्ञान अस्वस्थ करू लागतं. (विज्ञान सतत ‘आतापुरतं हे ज्ञान, उद्या नवी माहिती, नवे सिद्धान्त पुढे आले, की आजचं हे ज्ञान कदाचित अज्ञान ठरू शकेल’ अशी प्रामाणिक भूमिका घेतं तेव्हा अनेकांना हा सरळपणा पटत नाही, पचत नाही).

रसिक श्रोते चित्त प्रफुल्लित करणारा रसास्वाद घेत राहातात. त्यातल्या ज्ञानी श्रोत्यांना निश्चितच सखोल, मन ‘भारून’ टाकणारा आनंद मिळत असतो. पण शास्त्रीय बाजू न कळणाऱ्या साध्यासुध्या संवेदनशील माणसालाही मन ‘भरून’ टाकणारा आनंद मिळत असतोच! इतरांनी आणि त्यानंही तो कमी दर्जाचा समजण्याची काहीच जरूर नसावी. निखळ आनंदात श्रेष्ठ-कनिष्ठ, डावं-उजवं, उच्च-नीच असं का केलं जातं? माणसं समजून घेताना ही कृत्रिम अडचण मनात का टोचत राहाते? हे असं बालमैत्रीत आपण बहुधा करत नाही आणि त्यामुळे त्या भेटी एक निर्मळ आनंद देत राहतात. एक बरं आहे, की सर्जक कलावंत एखाद्या लहान मुलासारखा आपल्या कलाकृतीकडे कौतुकानं पाहातो. ‘मला मनात आत खोलवर काय दिसलं ते मी मांडणार, ते मांडल्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही’ अशा विचारातून या कलाकृती प्रकटत असाव्यात. ते प्रकटन त्या जनकाला, कलावंतालाही आवरता येत नसतं. या आतल्या ऊर्मी त्या कलावंतांना प्रसववेदना देत राहातात आणि जागृत आणि सुप्त मनाचा हा संयोग मग एखाद्या प्रपातासारखा वास्तवात उतरतो. कधी ते चित्र, कधी काव्य, लेख, शिल्प, संगीत, नाटक, नृत्य असतं, तर कधी तो सृष्टीला उन्नत करणारा वैज्ञानिक शोध असतो.

ही सर्जकता, हे आंतरिक ऊर्मीचं लोभस प्रकटन जवळजवळ प्रत्येकात आहे आणि ते कसलंही बाह्य सृष्टीचं, माणसांचं दडपण न घेता बालपणापासून प्रकट होण्याची संधी शोधत असतं. मला रूही, रिहानच्या चित्रात, त्यांच्या स्वत:भोवतीच्या गिरक्यांत, नाचात, वस्तू/ खेळणी हाताळण्याच्या प्रयत्नात, अगदी पदार्थ खाण्याच्या, शब्द वापरण्याच्या शैलीत ते जाणवतं. ते दडपण घेत नाहीत आपलं वागणं-बोलणं बरोबर की चूक याचं! जे शिकतो ते वापरून पाहायचं, हा शिरस्ता. त्यांना दडपण येत असावं ते त्यांच्या प्रेक्षकांना नीट काही समजतं आहे का याचं, त्यापासून त्यांना आनंद मिळतोय का त्याचं! हे प्रकटणं असतं अंतर्मनाचं. त्याला नियमांचे, सामाजिक शिरस्त्यांचे, यशापयशाचे निर्बंध नसतात. त्यात नसते निकड लोकप्रियतेची, सदैव अचूक असण्याची, जे कराल ते उपयुक्तच असलं पाहिजे याची. असं अंतर्मनाचं व्यक्त होणं ही संपूर्णपणे स्वत:ची स्वतंत्र कलाकृती असते, त्यामुळे ती अचूक नक्कल असायला हवी असं दडपणही त्या बालमनावर असण्याची जरूर नाही. मोठं झाल्यावर आपण इतरांना आपल्या मनात डोकावू देणं तर सोडाच, स्वत:ही आपल्या अंतर्सृष्टीला भेट देण्याचं कटाक्षानं टाळतो. सदैव बरोबर असण्याच्या सक्तीपोटी आपलं स्व-रूप झाकतो आणि कुणाची नक्कल चांगली जमू शकेल, जी रूढ संकेतांनुसार आपल्याला यशस्वी बनवू शकेल, या शोधात स्वत:ला आयुष्यभर ‘बनवत’ राहातो. अस्सल नेहमीच नकलीपासून फटकारून वागत असल्यानं खरं समाधान मिळत नाही. सदैव इतरांच्या डोळय़ात आपलं कौतुक शोधण्याची सवय सतत निराशा देत राहाते, कारण कौतुक कशाचं करावं, अस्सल कसं ओळखावं ही काही सोपी कौशल्यं नाहीत. त्यासाठी मुळात कौतुक करणाऱ्या माणसाला नकलीचा मोह स्वत:ला सोडावा लागतो.

नवं काही निर्माण करण्याची हौस बाळांना जन्मत:च असते. पण त्या नवनिर्माणाच्या प्रक्रियेचं निर्मळ मनानं कौतुकही करावं लागतं. खेळात, नाचात, गोष्टीत बाळ काही वेगळं करत असेल, तर अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही, उलट नवं काही करण्याच्या या ऊर्मीचा शोध घेता आला, तर आपलं बाळ अधिकाधिक व्यक्त होत राहील आणि त्यामुळे बाळाला अधिक समजून घेता येईल. विज्ञान जर फक्त यशस्वितेची नक्कल करत राहिलं असतं, तर ना नवीन काही प्रगती झाली असती, ना सुधारणा झाल्या असत्या. जग गतानुगतिकांचं बनून अपकर्षांकडे जात ऱ्हास पावलं असतं. मुलांमधली सर्जकता ओळखून ती वृद्धिंगत करावी हाच खरं तर शिक्षणाचा मुख्य हेतू असायला हवा. सर्जकता दाखवणाऱ्या मुलांचं वेळोवेळी योग्य कौतुक होणं, त्यांना प्रयोगशील होण्यासाठी उत्तेजन मिळणं, यासाठी अभ्यासक्रमात, वेळापत्रकात विशेष प्रयत्नांचा समावेश व्हायला हवा. मुख्य म्हणजे सर्जकतेचा घरीदारी, शाळेत, व्यवसाय क्षेत्रात जो पाणउतारा होतो तो जागरूक राहून आपण थांबवायला हवा.

विशेषकरून ताल, लय, नाद आपण आयुष्यात मिळवावा लागतो आणि तो मिळाला की जपावा लागतो. काही काळ बाह्य सृष्टी विसरायला लावण्याचं सामथ्र्य त्यात असतं. ताल अंतर्मनाशी संपर्क करून देऊ शकतो. आताची ‘एंटरटेनमेंट इंडस्ट्री’ उगीच एवढी लोकप्रिय नाही, तिचं जगव्यापी स्वरूपही त्यामुळे दिवसेदिवस वाढत आहे. कला, कविता, साहित्य, संगीत, नृत्य, यात ताल आणि लय सापडली की एक सुखद मोहिनी थकलेल्या, त्रासलेल्या मनाला कवळून घेते, थोपटते आणि स्वप्ननगरीत नेते. आजबाजूचं सतत दडपणाखाली टिकवलेलं भान हरपतं, मीपणाशी ओळख होतानाच मीपण अस्तित्वात विरघळून जातं, स्वत:शी नव्यानं ओळख होते. दीड वर्षांचा असताना माझा नातू रिहान गाण्याची लय पकडून कंबर तालात हलवत नाच करू लागतो, रूही (वय वर्ष २), अनया (३), सायू (५) स्वत:शी गिरक्या घेत नाचू लागतात, तेव्हा त्यांना सापडलेली लय जाणवून मी भारावून जातो. डॉक्टर प्रणव (वय वर्ष ३२) कुशल दंतशस्त्रक्रिया करत असताना त्या ‘ऱ्हिदम’मध्ये रंगून जातो, ते दृश्य विलोभनीय असतं. समोरच्या बागेत आपल्या जवळिकीच्या विश्वात प्रेमाचं वरदान सापडलेले प्रेमीजन एकमेकांत विरघळून बाह्य जगापासून काही काळ लुप्त होतात आणि सहवासाच्या अवर्णनीय आनंदाचा अनुभव घेतात. इतका आपल्या आजूबाजूला विविध रूपानं सहज सोपा आनंद वावरत असतो आणि वास्तवानं दिलेले चटके सुसह्य करत असतो.

इतिहास, गणित, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, विविध भाषा, कला, क्रीडा, संगीत, चित्रकला, स्वयंपाक, पर्यटन, आंतरजाल, असे कितीतरी विषय माणसाच्या जिज्ञासेतून, अथक परिश्रमातून, भ्रमंतीतून त्यानं निर्माण केले. कुतूहल, त्यातून शोधाची ओढ, त्यात मिळणारा आनंद, जोडीला विस्मय असे विविध आनंद घेत माणसानं जग अधिक आकर्षक बनवलं. सतत सृष्टीतल्या दैनंदिन आनंदाचा शोध घेणारं कुतूहल टिकवावं लागतं. उत्सुकतेनं, जिज्ञासेनं नव्या समोर येणाऱ्या क्षणांकडे, सजीव-निर्जीवांकडे, नात्यांकडे पाहायला हवं, त्यांचं स्वागत करायला हवं. अन्यथा मनातलं लहान मूल कोमेजतं आणि आपलं मन शुष्क होत जातं..

यथावकाश मुलं आपल्यासारखी मोठी होतात, ‘स्व’पासून दूर दूर जाऊ लागतात, खिन्नता वाढत जाते. जगाचं भान जराही जाऊ न देता नेहमीचे यशस्वी (बरेचसे अयशस्वी) म्हणून जगून मानमरातब मिळवतात. तसं मार्केटच्या दडपणाखाली करावंच लागतं हेही मान्य, पण जमेल तेव्हा नकाब उतरून स्वत:च्या अंतर्मनाचं काय, कसं चाललं आहे, हेही वेळ काढून, जरा उसंत घेऊन पाहायला हवं. स्वत:त थोडी डुबकी मारली पाहिजे, आतलं अकृत्रिम निसर्गदत्त सौंदर्य जपलं पाहिजे. वास्तवाचे धारदार निकष न लावता बाळांसारखं, फुलपाखरासारखं, सनबर्डसारखं, सदाफुली, प्राजक्तासारखं निखळ आनंदी व्हायला हवं..
patkar.pradeep@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samashti samaj dohi of happiness curious confidence amy

First published on: 11-06-2022 at 00:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×