डॉ. प्रदीप पाटकर

‘मानसिक आजारांवरच्या उपचारांचं गांभीर्य अद्याप आपल्याला नीटसं लक्षात आलेलं नाही, असंच रोजच्या ‘ओपीडी’तल्या अनुभवांमधून दिसतं. गैरसमजुतींमुळे उपचार न घेणं किंवा अशास्त्रीय उपचार करण्यापासून औषधं नीट न घेण्यापर्यंतचं दुर्लक्ष वारंवार दिसून येतं. याचा प्रचंड त्रास रुग्णांना होतोच, पण त्यांचे कुटुंबीयही त्यातून वेगळे राहू शकत नाहीत.’ उद्यापासून (२ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या ‘मानसिक आरोग्य आठवडय़ा’च्या निमित्तानं या विषयावरील लेखाचा हा भाग पहिला. 

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

तीव्र आणि दीर्घ मनोविकारांबाबत विचार करताना ‘काफ्का’नं १९१५ मध्ये लिहिलेली ‘Metamorphosis’ ही गोष्ट मला आठवते. सेल्समन म्हणून सतत प्रवास करत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट घेणारा, सतत राबणारा एक कथानायक. एके दिवशी सकाळी जागा होऊन तो पाहातो तर काय? त्या रात्रीत त्याचं रूपांतर एका कुरूप, अस्वच्छ, नकोशा वाटणाऱ्या कीटकात झालेलं असतं. मदतीशिवाय या विद्रूप कीटकाला चालणंही कठीण असतं. घरचे सारे निराश होतात, दु:खी होतात. पण सगळेजण दु:ख बाजूला ठेवून त्याचा सांभाळ करू लागतात. जीवापाड प्रेमानं. हळूहळू वर्ष जातात. कीटक काही पुन्हा माणूसपण प्राप्त करू शकत नाही. घरचे आता टेकीला आलेले असतात. त्यांचा वैताग, धुसफूस आता वाढलेली असते. असाच एक दिवस येतो. कथानायक कीटक त्या दिवशी मृत आढळतो. घरातलं वातावरण बदलतं. एरवी गप्प असणारी माणसं हळूहळू मोकळेपणानं गप्पा मारू लागतात. गप्पांमध्ये ते सर्वजण भविष्यात काय काय करायचं याच्या योजना उत्साहानं, जोरजोरात करू लागतात..

ही गोष्ट तरुणपणी वाचली, तेव्हा कळली नाही, इतकी ती ३७ वर्षांपूर्वी मनोविकार- शास्त्राचा अभ्यास करत असताना ‘स्किझोफ्रेनिया’चे (छिन्नमानसिकता) रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना कळू लागली, जाणवली. त्या काळी विशेष उपचारपद्धती, आधुनिक औषधं नसल्यामुळे काही तीव्र मनोविकारांच्या- विशेषत: स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांत मनासारखी सुधारणा व्हायची नाही. त्यांचा ऱ्हास थांबवता येत नसे. शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, संसार, मुलंबाळं या सर्व बाबतींत अडचणी येत. भविष्य अंधारलेलं असे. कुटुंबापासूनही तो मनानं केव्हाच दुरावलेला असे, तो नकोसा होत जाई.. ‘Metamorphosis’ मधल्या विद्रूप कीटकासारखा!

आज आधुनिक मनोविकारशास्त्रात अशी स्थिती राहिलेली नाही याचा आम्हा सगळय़ांनाच खूप आनंद होतो. दैववादी शब्दांत सांगायचं, तर वैज्ञानिक ही देवमाणसं, त्यांचे आजचे प्रयत्न, हे खरं तर उद्याच्या विश्वाचं नशीब असतं. मनोविकारांतल्या दर १०० पैकी १ रुग्ण स्किझोफ्रेनियाचा असतो हे लक्षात घ्या.

मनोविकारग्रस्तांना कोणत्या त्रासांना सामोरं जावं लागतं?  मूलभूत मानवी हक्क आणि स्वातंत्र्य यांवर आघात नागरी, राजकीय, आर्थिक, आणि सामाजिक हक्कांचा संकोच शारीरिक, लैंगिक, मानसिक त्रास/ छळ

 नागरी सुविधा, सन्मानानं सर्वाबरोबर जगण्याची संधी, रोजगार, इतरांप्रमाणे आरोग्यविमा, निवास, याबाबतीत भेदाभेद, दुर्लक्ष वाटय़ाला येतं. अशास्त्रीय उपचारांची सक्ती केली जाते, निर्णयस्वातंत्र्य काही परिस्थितीत नाकारलं जातं.

 रोगास अशास्त्रीय कारणं जोडली जातात- उदा. वाईट नशीब, दैवी कोप, पूर्वजन्मातली पापं, निकृष्ट संस्कार इत्यादी.

 हा आजार कलंक समजला जातो. पूर्वग्रह, भीती, लाज, तिरस्कार, टाळाटाळ वाटय़ाला येते. हा कलंक आजारापेक्षा जास्त नुकसान करतो.

सायकियाट्री व मनोविकारतज्ज्ञ यांच्या बाबतीतही चुकीचे ग्रह आहेत. मनोविकार हा ‘medical’ आजारच नाही, असं समजणाऱ्यांचं प्रमाण वैद्यकीय व्यावसायिकांत जवळजवळ ३० टक्के आहे असं एक संशोधन सांगतं!  स्किझोफ्रेनियाबाबत ‘गूढ, रूढ आणि मूढ’ कथा खूप प्रचलित आहेत. म्हणून आता विज्ञानाची प्रयोगसिद्ध उत्तरं समोर मांडण्याशिवाय व स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.

सर्वात पहिलं सत्य म्हणजे स्किझोफ्रेनिया आणि बहुतेक सगळे मनोविकार हे शरीर, मेंदूचे आजार आहेत आणि त्यांचं प्रकटीकरण मानसिक लक्षणांद्वारे होत असतं, हे सर्वानी लक्षात घ्यायला हवं अशी माझी कळकळीची विनंती आहे. आज जेनेटिक्स, न्युरोकेमिस्ट्री, मेंदूचं ‘CT’, ‘MRI’, ‘PET’, ‘SPECT’ स्कॅन neurophysiology,  हे सारे अशी ग्वाही देत आहेत, की मनोविकार ही केवळ कल्पनाधारित गोष्ट नसून इतर शारीरिक रोगाइतकीच ती एक ‘वैद्यकीय सत्यता’ आहे.

याबरोबर आनुवंशिक प्रभावाचे परिणाम लक्षात घेता, अशा अनेक शोधांमुळे स्किझोफ्रेनिया हा मुळात सोपा मानसिक आजार नसून क्लिष्ट ‘neuropsychiatric’ आजार आहे हे आता सिद्ध झालं आहे. यातली क्लिष्टता संशोधकांकडे सोपवून मी आता वर्तमानकाळातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. एकंदर मनोविकाराबद्दल मानसोपचारात येणारे काही अडथळे, रोजच्या ‘ओपीडी’त मला आढळणारी काही कारणं सांगणं आवश्यक वाटतं म्हणून ती इथे सांगू इच्छितो. त्याचा उपयोग होऊ शकेल. 

मनोविकारतज्ज्ञांच्या कन्सिल्टग रूममध्ये सतत वाढत जाणाऱ्या गर्दीची विविध कारणं सांगितली जातात. मनोविकारांविषयी अधिक सजगता हे त्यातलं एक मुख्य कारण सांगितलं जातं. माहिती वाढली, तशी जागृती वाढली. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारं मनोविकारांचं स्वरूप जसजसं लक्षात येऊ लागलं, तसतसा हा त्रास आपल्याला, आपल्या मुलाबाळांना, नातेवाईकांना तर नाही ना, अशी चिंता आणि भीती वाटू लागली. उपचारांनी रुग्णात सुधारणा दिसू लागल्यानंतर लोक या शास्त्राला अधिकाधिक स्वीकारू लागले. गेल्या १५ वर्षांत तर मानसोपचारात संशोधनामुळे घडून आलेल्या वेगवान प्रगतीमुळे आता बरं वाटणं, बरं राहाणं, बरं होणं सोपं, कमी त्रासाचं झालं आहे. मात्र आज त्यातल्या समजांबरोबर अजूनही दृढ असलेल्या गैरसमजांपोटी आणि अनाकलनीय दुर्लक्षामुळे मनोरुग्णांचं कितीतरी नुकसान होत आहे, असं मला खेदानं सांगावंसं वाटतं. हे नुकसान/ हे अडथळे सहज टाळता येण्यासारखे आहेत.

माझ्या ओपीडीत रोज येणाऱ्या रुग्णांमध्ये साधारण दहा केसेसपैकी दोन केसेस नवीन असतात, तर तीन केसेस वेळ ठरवून नियमित ‘फॉलोअप’ करणाऱ्या असतात. उरलेल्या पाच केसेस मात्र औषधोपचार चुकवल्यामुळे, उपचार मध्येच सोडून दिल्यानं, स्वत:च औषधांचं प्रमाण चुकीचं घेतल्यानं पुन्हा रोगलक्षणं उद्भवल्यानं आलेल्या असतात. म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के रुग्ण केवळ उपचारांची नियमितता आणि शिस्त न पाळल्यामुळे स्वत:चं नुकसान करून घेत असतात. लक्षणं आणि आजार मान्यच नसल्यानं उपचारासाठी न येणं असा प्रकार अनेक रुग्ण करतात. उपचारांचा खर्च झेपत नसल्यानं, अनेक कारणांनी उपचार खंडित झाल्यानं न येणाऱ्या केसेस तर अगणित असतात. ‘Early Alarming Signals’- अर्थात सुरुवातीची विचार, भावना, वर्तन यातली खटकणारी वेगळी, विचित्र लक्षणं मानसतज्ज्ञांच्या सहाय्यानं समजून घेऊन तपास आणि उपचार करणं उपयुक्त ठरतं.

पुढील निरीक्षणांकडे दुर्लक्ष करू नये- एकांतप्रियता, कुटुंबात इतर कुणी तीव्र मनोविकाराचा रुग्ण असणं (आनुवंशिकता), साध्या कारणांवरून धुसफूस, साध्या संभाषणातून विचित्र अर्थ काढणे, एकाग्रतेत अडचणी, तापटपणा, संशयी स्वभाव, व्यसनाकडे कल, स्वत:शी पुटपुटणं, हातवारे करणं, अभ्यासात मागे पडणं, नोकरी-व्यवसाय बदलत राहाणं. हे प्रगतीतले ‘स्पीड ब्रेकर्स’ (अडथळे) सावधानतेचे इशारे देतात.

नातेवाईकांकडून रोगाचा लवकर स्वीकार होणं इष्ट, तर उपचारात दिरंगाई करणं अनिष्ट ठरतं. व्यसनं (दारू, सिगारेट, इतर अमली द्रव्यं), एकांतप्रियता, परिस्थिती वा राहाण्याच्या जागेत बदल, ध्येय/अभ्यास/ व्यवसाय सोडून देणं, नातेसंबंध टाळणं, लग्न- हे मार्ग कदाचित तात्पुरता ताण कमी करत आहेत, आराम देत आहेत असं वाटेल, पण नंतर हे मार्ग ताण वाढवतात आणि रोग बळावतो असं दिसतं. रुग्णाशी अशा वेळी संपर्क/ संवाद तोडू अथवा थांबवू नये. वितंडवाद/ राग सतत व्यक्त करू नये. त्यानं रुग्ण आणि काळजीवाहक दोघांची सुटका होत नाही, रोग चिघळतो. काही काळ लक्षणं सौम्य/ बंद झाली, तरी बंद झालेले उपचार वैद्यकीय सल्ल्यानं चालू करावेत. जरुरीनुसार काही तपास, इतर वैद्यकीय तज्ज्ञांचं मत घेणं रुग्णासाठी उपयुक्त ठरू शकतं. त्यात हयगय करू नये. महत्त्वाचा वेळ दवडू नये. आपले डॉक्टर त्यांच्याकडील माहितीपत्रं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देऊ शकतात. मराठीत आता मानसशास्त्र आणि मनोविकार शास्त्राबाबत माहितीपूर्ण पुस्तकं उपलब्ध आहेत.

संशोधनात औषधानं दाखवलेले चांगले परिणाम प्रत्यक्ष उपचारांत दिसून येत नाहीत, याचं एक कारण संशोधनात अनेक घटक नियंत्रित ठेवलेले आणि नियमित असतात हे आहे. प्रत्यक्ष व्यवहारात तसं सातत्य नसतं. रुग्णाचं उपचारांकडे होणारं/ केलं जाणारं दुर्लक्ष हे एक महत्त्वाचं कारण असतं. तसं पाहता, रुग्णाला  कठीण मेहनत घेऊन उपचार करावे लागतात असं नाही. नियमित वेळी अर्धा ग्लास पाणी घेऊन त्याबरोबर दोन-चार गोळय़ा साधारण दहा सेकंदात गिळल्या, की दिवसभराच्या उपचाराचं एक महत्त्वाचं काम संपतं. २५ सूर्यनमस्कार घाला, विशिष्ट अवस्थेत बसून स्नायू जोरदार पिळा, नियमित दीर्घ श्वसन करा, उपाशी राहा, तळपत्या उन्हात पायपीट करा, असं काही त्रासदायक करावं लागत नसतानाही मानसिक रुग्ण गोळय़ा नीट घेत नाहीत. त्याबाबत लपवाछपवी व टाळाटाळ करतात, गोळय़ा घेण्यास सांगितलं, की नाराज, दु:खी, त्रस्त वा संतप्त होतात. गोळय़ा हे सोपं उत्तर त्यांना संदेह देतं, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देतं, शरीराला नुकसान होईल असं वाटत राहातं. सुरुवातीस असं वाटणं शक्य आहे, पण अनेक दिवस रोगाशी झगडून रोग आटोक्यात आणलेला असतानाही हा गोळय़ांचा फायदा विसरून हे रुग्ण गोळय़ा घेणं टाळतात. गोळय़ा सोडल्यावर पुन्हा त्रास होतो, हे वारंवार दिसूनही त्यांना उपचाराच्या नियमिततेचं महत्त्व का मान्य होत नसावं? रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना आणि जगातल्या तमाम मनोविकारशास्त्राच्या अभ्यासकांना हे प्रश्न छळत राहातात. औषधं चुकवल्यानं रुग्ण पैसे, वेळ, मानसिक (व शारीरिकही) ताकद उगीचच खर्च करतो, पदरी नुकसान पाडून घेतो. त्यामुळे आजार बळावू शकतो. व्यवसाय, नोकरी, नातेसंबंध या साऱ्या क्षेत्रात त्याचं बरंच नुकसान होतं. सर्वानी मेहनत करून रुग्णाची गाडी पुन्हा रुळावर आणली आणि हुश्श म्हणत जरा विसावा घेतला, की पुन्हा गोंधळ होताना दिसतो. बरं, रुग्ण अशिक्षित असो वा सुशिक्षित, श्रीमंत असो वा गरीब, मूल असो वा प्रौढ, शहरी असो वा ग्रामीण. चुकीच्या पद्धतीनं उपचार घेण्यात कुणी कमी पडत नाही. अज्ञानापेक्षा अपूर्ण ज्ञान, अंध:विश्वास, चुकीचं मार्गदर्शन, अनाहूत सल्ले, ठाम गैरसमज यांनी नुकसान जास्त होतं. 

वैद्यकीय सल्ला नीट न पाळला जाण्याची कारणं अनेक आहेत. त्यातली काही वरवरची, सहज टाळता येण्यासारखी आहेत- उदा. शिस्तीचा अभाव, गोळय़ांचा कंटाळा, साइड इफेक्टस्, उपचारांवरचा वाढता खर्च  इत्यादी. पण काही कारणं मात्र समाजात खोलवर रुजलेल्या अविवेकी विचारपद्धतीमुळेही आहेत. वैज्ञानिक मनोवृत्ती, कार्यकारणभाव व संशोधनाबाबत सखोल अभ्यास करण्याची वृत्ती यांचा अभाव, एकंदर ‘जे नवं’ त्याबद्दल संशय आणि भीती, विवेकी तर्कवादापेक्षा ‘भावनिक उसळी’वर आधारून निर्णय घेण्याकडे कल, अशीही अनेक कारणं उपचारातला तोल व सातत्य धोक्यात आणतात.

आजाराविषयी व औषधांविषयी कितपत शास्त्रशुद्ध माहिती आपल्यापाशी आहे, हा प्रश्न वैद्यकशास्त्रातल्या उपचारांमध्ये महत्त्वाचा ठरतो. वेळेचा अभाव असल्यानं वैद्यकीय तज्ज्ञांकडून ही माहिती मिळणं कठीण जातं. इंटरनेटसारख्या माध्यमातही मिळणारी माहिती योग्य, शास्त्रीय, अधिकृत आहे ना याची खात्री करून घ्यावी लागते. मानसिक आजारांविषयीच्या ‘गूढ, रूढ आणि मूढ’ गोष्टींची ही केवळ झलक आहे. मात्र या गोष्टी अंतिमत: रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रासदायक ठरतात. या विषयाबद्दल अधिक विस्तारानं माहिती घेऊ या १५ ऑक्टोबरच्या लेखात.

    (क्रमश:)

patkar.pradeep@gmail.com