डॉ. प्रदीप पाटकर

‘सगळय़ांना जमतं ते मलाच का जमत नाही?’, ‘सर्वजण आयुष्यात पुढे चालले आहेत, मी मात्र होतो तिथंच राहिलो.’, ‘मी सर्वार्थानं कुचकामी आहे’, ‘मी असाच रडत जगणार आणि एके दिवशी मरून जाणार,’ असे अतिशय नकारात्मक विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येऊन जातात. पण ती स्थिती जर दीर्घकाळ राहिली तर मात्र मन नैराश्यग्रस्त होऊ शकतं. या तिमिराचा भेद करायला शिकायलाच हवं.. 

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

आपली मानसिकता दु:खाकडे, निराशेकडे झुकणारी आहे का? शतकानुशतके पिचलेले समाज वस्तुत: दु:खी असल्यानं त्यांचा निराशावाद समजण्यासारखा आहे. पण ज्यांचं सुखवस्तू जीवन सुखदायी गोष्टींनी भरून जात आहे, तेही दु:खी, निराश होऊन देवापाशी सुखाची याचना करत असताना दिसतात याचं अनेकांना नवल वाटतं. वस्तू त्यांच्या आशावादात भर टाकत असल्या तरी निराशा त्यांची पाठ सोडत नाही. संवेदनशीलता अतिप्रमाणात वाढली तरी दु:खी भावना मनाचा ताबा घेतात आणि ती माणसं असलेल्या सुखाकडे दुर्लक्ष करतात.

  सुखाची चव फार काळ रेंगाळताना दिसत नाही. व्यथा, अपमान मात्र दीर्घायुषी ठरतात. दु:खाचे व्रणही ठणकत राहातात. मागील शतकांच्या तुलनेत आपण जीवनातली खूपच दु:खं, त्रास, क्लेश विज्ञानाच्या मदतीनं कमी केले आहेत. आपलं सरासरी आयुष्यमान वाढलं आहे. अनेक रोगांवर आपण विजय वा नियंत्रण मिळवलं आहे. नुकतंच आपण वैश्विक पातळीवर करोनाशी युद्ध करून काही प्रमाणात नियंत्रण मिळवलं आहे. हल्ली आपला प्रवास अधिक वेगवान, पूर्वीच्या तुलनेत स्वस्त आणि सुखकर झाला आहे. तंत्रज्ञानानं दळणवळण, संपर्क, विचारांची देवाणघेवाण सोपी झाली आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक यांनी अनेकांना मेसेजस्फूर्ती दिली आहे. अनेक जण लेखक, सल्लागार, सुभाषितकार, ज्ञानदायी गुरू, तत्त्वज्ञानी, राजकीय समालोचक होऊ शकले आहेत. जोडीला गूगलसारखा सर्वव्यापी मार्गदर्शक आहे. सामाजिक पर्यावरणीय प्रश्नांबाबत जागृती वाढली आहे. रोज नवनव्या खाद्यपदार्थाची, ट्रेंडी गोष्टींची माहिती मिळते आहे. फोन करण्यातल्या पूर्वीच्या अडचणी राहिलेल्या नाहीत, वर हे सारं मूलभूत तत्त्वज्ञान स्वस्त झालं आहे. (थांबा, घाईघाईत पेन उचलून प्रतिवाद करू नका.) हेच तंत्रज्ञान वापरून हुशार, शोषक बाजारानं ग्राहकांचं शोषण केलं आहे, समाजकंटकांनी साध्यासरळ माणसांच्या जीवनात भरपूर दु:खनिर्मिती केली आहे. हे मान्य करूनही मी यातल्या सुखदायक गोष्टी नमूद करत आहे.

पृथ्वीवर माणसं वाढत आहेत, संख्येनं, वयानं. माणसं तेवढी विचारानं परिपक्व, भावनेनं संतुलित, वर्तनानं विवेकी आणि एकंदरीत आनंदी होताना दिसत आहेत का? हा प्रश्न आयुष्याच्या समजेच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर वेगवेगळे उपप्रश्न सोबत घेऊन येताना दिसतो. त्या सर्व प्रश्न-उपप्रश्नांना समर्पक उत्तरं मिळू शकत नाहीत. कारण जगातली परिस्थिती सतत आणि जलद बदलत राहाते, माणसं शरीर-मनानं बदलत राहातात. त्यामुळे प्रश्नांचं स्वरूपही बदलतं. बहुतेकांचं या जीवनातलं अंतिम ध्येय सर्वासह निरामय, आनंदी, अर्थपूर्ण जगणं हे असतं; असायला हवं. शरीरमनानं निरोगी व्यक्ती सतत प्रगत होत पुढे जात असते. थांबला तो संपला, हे अनुभवसिद्ध सत्य आहे. सभोवतालच्या लोकांशी, परिस्थितीशी समायोजन साधत माणसं पुढे जात असतात. यासाठी प्रयत्नांचं सातत्य, वस्तुनिष्ठ आशावाद आणि विवेकाचं दिशादर्शक होकायंत्र स्वत:पाशी असणं आवश्यक असतं. ताणतणावानं खचून न जाता स्वत:चं सामर्थ्य वाढवत अडचणीतून मार्ग काढत जगावं लागतं. खचून गेल्यास, थांबल्यास प्रगती खुंटते, गात्रं शिथिल होतात, ऊर्मी मंदावते व शक्तीनाश शरीरमनाचा ताबा घेण्यास सुरुवात होते. मग माणसं शरीरमनानं वृद्ध होऊ लागतात. वैचारिक गोंधळ व अव्यवहार्य निराशावाद माणसांची ऊर्जा शोषून त्यांना अकाली वृद्ध, निवृत्त करतो.

निराशा केवळ स्वप्रतिमा बिघडवत नाही, ती कटू भूतकाळाचं मळभ वर्तमानावर फासते आणि भविष्य अंधारमय भासवते. निराशेचा हा मनाशी चाललेला संवाद रोगट असतो, घातक ठरू शकतो. वास्तवातल्या सत्याकडे डोळेझाक करायला लावून निराशावाद मनात विसंवाद उभा करतो. आपल्या सर्जक कल्पनाशक्तीच्या जोरावर अफाट प्रगती साधणारा माणूस निराश कल्पनांपुढे हतबल होत खचतो. काही तरी वाईट घडेल, ही आशंका ठळक होत तसं वाईट घडणारच आहे, नव्हे घडतंच आहे असं भासवते. वेळीच हे स्वगत थांबवणं, या तिमिराचा भेद करणं आवश्यक असतं. त्यासाठी वास्तवात नेमकं काय घडत आहे त्याचा आढावा घेणं जरुरीचं असतं. रोमांचक भावनिकतेत व्यवहार्यता बाजूला पडते आणि अपयशाला शिरकाव्याची संधी मिळते.

एक उदाहरण घेऊ, अनिल नव्या व्यवसायाची सुरुवात करताना खूप उत्साही, आशावादी होता. त्याला नवीन दुकान सुरू करायचं होतं. उत्साहानं त्यानं आई-वडिलांच्या निवृत्ती फंडातून पैसे घेतले. आतापर्यंत त्यानं अनेक दुकानांत कामं केलेली होती. त्यामुळे दुकानातल्या नोकरीचा (मालकीचा नव्हे) अनुभव गाठीशी होता. त्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवून त्यानं स्वत:चं दुकान काढलं होतं. पैसे खर्चून दुकान आकर्षक बनवलेलं होतं. तीन-चार कर्मचारी हाताखाली काम करायला ठेवले होते. अनेक ग्राहक आजवर ओळखीचे झालेले असल्यानं ते ग्राहक आता आपल्या दुकानाकडेच येतील अशी त्याची दाट अपेक्षा होती. ही अपेक्षा आत्मविश्वास प्रज्वलित करत होती. त्याचा उत्साह पाहून घरचेही सुखावले होते. हळूहळू काही दिवस, मग आठवडे जाऊ लागले. नवे ग्राहक राहू द्या, ओळखीची माणसंदेखील दुकानाकडे फिरकली नाहीत. नफा राहू द्या, खर्चही निघेनासा झाला. आता आशावाद मागे पडू लागला. प्रथम चिंता, मग शंका आणि नंतर निराशा मनात सतत डोकावू लागली. ‘सेल’ जाहीर करूनही फारसं कुणी आलं नाही, येणारे पुन्हा परत आले नाहीत. आईवडिलांचे पैसे शिरस्त्याप्रमाणे थकवले होतेच, पण बाजारातून उचललेली र्कज व्याजासहित विस्तारत गेली. मुद्दल आ वासून जागेपणी आणि स्वप्नात दचकवू लागलं. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतशी उमेद खचत गेली, नैराश्य मनाचा ताबा घेऊ लागलं. प्रत्यक्षात अडचणी ठळक दिसत होत्या, मनातही निराश स्वगत परतपरत ऐकू येऊ लागले, त्याची तीव्रता वाढत जाऊ लागली. माणसं घसरणारा शेअर जसा भविष्याच्या आशेत वेळीच विकणं टाळतात, त्यात भावनिक गुंतवणूक करतात आणि त्यात होणारं नुकसान थांबवत नाहीत, तसंच काहीसं इथं होत होतं. धंदा यश देत नसेल तर त्यातल्या अपयशाचं व्यावहारिक मूल्यमापन वेळोवेळी करत प्रयत्न कसे वाढवायचे, किंवा नुकसान कसं थांबवायचं हे ठरवून त्याप्रमाणे कृती करावी लागते. अनिलच्या लक्षात हे येत होतं, पण मागचे दोर कापले गेले आहेत, असं समजून तो दुकान रेटत राहिला. दुकानाच्या अपयशाला अनेक घटक कारण होते, पण तो एकटाच कारण आहे असं आजूबाजूचे तथाकथित विश्लेषक, हितचिंतक आणि मित्र अप्रत्यक्ष कुजबुजत होते. तरी ते मनाला लावून घेऊन निराश होण्याची गरज नव्हती. पण दुकानाच्या यशापयशाशी त्या व्यक्तीचा आत्मसन्मान, प्रतिष्ठा जोडण्याचा समष्टीचा प्रघात असल्यानं अनिलच्या मनातल्या उमेदीचं खच्चीकरण होऊ लागलं होतं. ‘मला दुकान चालवता येत नाही..’, ‘मला धंदा-व्यवसायच काय, काहीच करणं जमत नाही’ अशी स्वगतं अनिलच्या मनात घोळू लागली. निराशावादाचा त्यापुढचा टप्पा असतो. ‘मला आयुष्यात कधीच काही धड करणं जमणार नाही. मी कुचकामी आहे, माझ्यात काही अर्थ नाही’ आणि त्यानंतर येणारं वैफल्य ‘माझं जगणंच अर्थशून्य आहे’ असं पटवून देऊ लागतं.  अनिलचं वैफल्य आणि निराश स्वगत अनिलच्या समवयस्क, व्यवधानी चुलतभावाच्या- प्रसादच्या वेळीच लक्षात आलं. त्यानं अनिलशी संवाद साधला, प्रश्न समजून घेतले. त्यावर उत्तरं शोधली, अनिलची धंद्यातली समज वाढवली, त्याच्या अपेक्षा वास्तवाशी जोडून दिल्या, अंधश्रद्ध कर्मकांडं टाळून, योग्य प्रयत्न काय, कुठे, कसे, किती, कोणत्या दिशेनं करायला हवेत ते दोघांनी ठरवलं. यातून अनिलची उमेद टिकली, कृतिशीलता वाढली. त्यानंतर हळूहळू अनिलची निराशा दूर झाली, यश दृष्टिक्षेपात येऊ लागलं, योग्य त्या दिशेनं प्रयत्न झाल्यानं नफ्यातोटय़ाचं गणित अनिलला जमत गेलं. करोनाकाळात तर इतर अनेकांच्या तुलनेत अनिलनं भरीव यश मिळवून दाखवलं. त्याच्या मनातली विधानं प्रसादबरोबरच्या संभाषणात बदलून गेली. ‘मी काही कारणांमुळे सध्या केवळ या कामात अपयशी ठरलो असेन, पण त्याचा अर्थ मी कुचकामी आहे आणि पुढेही असाच असेन असं अजिबात नाही. माझं जगणं अर्थहीन आहे असं समजण्याची काहीच गरज नाही. अपयशाला कारण घटकांचं व्यवस्थित विश्लेषण करून, माझ्यातल्या त्रुटी सुधारून प्रयत्न करण्यानंच प्रगती साधता येईल. त्यात कष्ट करावे लागतील, क्लेश सहन करावे लागतील, कधी यश, कधी अपयश येऊ शकेल. आजवरच्या आयुष्यात असं घडत आलेलं मी अनुभवलं आहे. इतरांच्या आयुष्यात तसं घडताना मी पाहिलं आहे. माझी व्यवसायातली समज वाढवून, निराशेत मन:शक्ती व्यर्थ खर्च न करता, वास्तवाशी समायोजन साधत मी प्रगती करत राहीन,’ असा आशावाद अनिलनं जोपासला. प्रसाद आणि घरच्यांच्या मदतीनं यश मिळवलं.  आपल्या व्यवसायात, नोकरीत, नातेसंबंधांत, प्रेमसंबंधांत, रोगाशी झुंजताना, प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत असताना आपलं मन आपली सर्वात मोठी ताकद ठरू शकतं. मात्र तिथं परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करत अथक प्रयत्न करत राहावं लागतं. ती ताकद वस्तुनिष्ठ आशावाद आणि विवेकी कृती कार्यक्रम आपल्याला देत राहातात.

आशावाद विवेकी असावा लागतो. टप्प्यांनुसार ध्येय निवडावं लागतं, अन्यथा गोंधळ होतो. प्रेमभंग झाला, तर लगेच नवीन प्रयत्न करायला हरकत नाही, पण निदान नवीन प्रेमिकाची निवड नीट वेळ घेऊन करावी. जर तीन-चार प्रेमभंग सटासट होत असतील, तर प्रयत्नांची दिशा आत्मपरीक्षणाकडे वळवलेली बरी! ‘किक’ बसत नसेल, तर निराश न होता माणसं प्रयत्नपूर्वक अधिक पिऊ लागतात. अपयशानं निराश न होता जुगारी पुढचे डाव खेळत खिसा किंवा महिन्याचा अख्खा पगार घालवून बसतात. असे प्रयत्न आणि असं ध्येय विवेकी समजून कसं चालेल?

आशावाद केवळ मनात ठेवून चालत नाही, त्याला प्रयत्नांची जोड द्यावीच लागते. व्यसनमुक्तीचा संकल्प रोज नुसता करून चालत नाही, त्या संकल्पपूर्तीसाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. परीक्षेत यश मिळवायचं असेल, तर योग्य दिशेनं अभ्यास करावा लागतो. संसार सुखाचा करण्यासाठी सतत एकमेकांत प्रेम टिकवावं लागतं, आदर जपावा आणि विश्वास वाढवावा लागतो. व्यवसायात चढउतार असतात, स्पर्धा असते, नवी आव्हानं सामोरी येत असतात. तिथे आशावाद आणि प्रयत्न यांची जोड असावी लागते.

 निराशेच्या जाळय़ात गुरफटून गेल्यास जीवनातली घसरण वाढत जाते. निराशेला वेळीच आवर घालावा लागतो. निराशा ऊर्जा खेचून मनाला अशक्त करत जाते. आपण निराशेच्या जाळय़ात सापडत आहोत, हे वेळीच ओळखण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे मनात घोळणारं स्वगत काय आहे, त्याकडे नीट लक्ष देणं. ते उगीच स्वत:वर दोषारोप करत व्यक्तिगत मानहानी करणारं, आत्मसन्मान खच्ची करणारं असेल, तर त्याचा योग्य प्रतिवाद करून समाचार घेतला पाहिजे. ते स्वगत उगीच आपल्यावर ‘मूर्ख’, ‘कुचकामी’ असे शिक्के मारत असेल, तर ते नाकारायला हवं. ते स्वगत भविष्यवेध घेत तुम्ही सदैव अपयशी ठरणार आहात असं सांगत असेल, तर सरळ ते विधान धुडकावून लावलं पाहिजे. अजूनही जगात कुठेही, कुणीही माणसाच्या आयुष्यविषयक व सृष्टीविषयक भविष्य जाणू शकत नाही हे आपण जाणतोच. माणसं फक्त अंदाज वर्तवत असतात आणि एकही अंदाज अख्ख्या आयुष्यात खरा ठरल्यास तेवढय़ावरच खूश होऊन स्वत:ला भविष्यवेधी समजू लागतात. त्यांचे चुकलेले अंदाज जनमानसाला सांगण्याचं काम मग प्रसंगोपात इतरांना करावं लागतं. स्त्रिया, दलित, आदिवासी, त्याही पलीकडे विदेशी या व अशा अनेक समाजघटकांना प्रगत होताना पाहूनही त्यांना अनेक जण इतकी वर्ष दुय्यम दर्जाचे समजत आले आणि वस्तुस्थिती नाकारून अजूनही तसं समजतात की! तेव्हा आपलं काय होईल हे कुणी सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवून निराश न होता प्रयत्नांची दिशा सुधारावी, अधिक प्रयत्न करत राहावं. नशीब वगैरे दैववादी संकल्पनांवर विश्वास ठेवण्यापेक्षा, फारच पगडा असेल तर, त्या शब्दांतच समजायचं झालं तर फक्त ‘आजचे प्रयत्न म्हणजे उद्याचं नशीब’ असं समजणं हिताचं राहील.

 आपल्यातल्या अनिलला (नावातच ‘टॅलेंट’ असलेला) प्रसाद लवकर भेटावा ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मात्र कुठलीही अपेक्षा विस्तारत जाऊन आग्रहात आणि नंतर हट्टात बदलणार नाही एवढी दक्षता घ्यावी. दिवसेंदिवस प्रगत होत चाललेलं जग आपल्याला जगणं अधिक समृद्ध, सुखमय करता येईल ही उमेद देत आहे!

patkar.pradeep@gmail.com