|| संपदा सोवनी
घरात, परिसरात साप निघाला की कुणीतरी सर्पमित्राला बोलावणं आणि त्यानं साप पकडून नेणं, हे दृश्य बहुतेकांनी कधी ना कधी पाहिलेलं  असतं. पण आता सर्पमित्रांबरोबरच सर्पमैत्रिणीही लक्षणीय संख्येनं दिसू लागल्या आहेत. दरवर्षी भारतात हजारो व्यक्तींचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो, पण म्हणून त्यांना मारून टाकणं हा त्यावरचा उपाय ठरत नाही कारण निसर्गसाखळीतील तो महत्त्वाचा दुवा आहे. म्हणूनच या सर्पमैत्रिणी अत्यंत कौशल्यानं सापांना, नागांना वाचवत त्यांना त्यांच्या अधिवासात सोडत आहेत. यंदाच्या नागपंचमीच्या (१३ ऑगस्ट) निमित्तानं काही सर्पमैत्रिणींविषयी… 

‘सर्पमित्र’ हा शब्द ऐकू न तो पुरुषच असेल असं उगाच वाटतं. स्त्री सर्पमित्र- अर्थात सर्पमैत्रीण ही संकल्पना नवीन नसली, तरी ती अद्याप पचनी पडलेली नाही. स्त्रिया म्हणजे झुरळापासून पालीपर्यंत सर्वांना घाबरणाऱ्या, असा एक निष्कारण समज आपल्यात रुजलेला असतो. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र अनेक तरुणी आवडीनं या क्षेत्रात येत आहेत आणि आपल्यासारख्या इतर जणींनाही तयार करत आहेत. त्यांच्यात एक समान दुवा सापडतो, तो म्हणजे निसर्गसाखळीविषयी त्यांच्या मनात असलेला आदर. ही भावना त्यांना सतत प्रेरणा तर देतेच, पण निसर्गसंरक्षण करतानाही माणसानं पाळायच्या काही मर्यादांची जाणीव करून देते. अशा काहीजणींशी के लेल्या संवादातून सर्पमैत्रिणींचं उत्कं ठावर्धक आणि तितकं च मेहनतीचं काम उलगडलं.

पालघर येथील सर्पमैत्रीण वैशाली चव्हाण सांगतात, की त्यांची एक प्राणीप्रेमी म्हणून ओळख तयार होण्यासाठी सापच कारणीभूत ठरला. दहा वर्षांपूर्वी वैशाली एका शाळेत गेल्या असताना इमारतीत ‘व्हायपर’ जातीचा विषारी साप शिरला म्हणून धावपळ सुरू होती. जमलेले लोक सापाला मारण्याचा आग्रह करत होते. शेवटी सर्पमित्र आला. त्याच्याकडे एका बरणीत इतर ठिकाणी पकडलेला बिनविषारी ‘तस्कर’ जातीचा साप होता आणि त्याला ती बरणी

कुणाच्या तरी हातात द्यायची होती. तो तिथेच उभ्या वैशाली यांच्यापाशी आलाही आणि झटकन मागे वळला. शेजारी उभ्या असलेल्या शिपायाच्या हातात त्यानं ती बरणी सोपवली. साप पकडून तो सर्पमित्र परत जाताना वैशाली यांनी त्याला या वागण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्याचं उत्तर होतं, की ‘बायका झुरळ पाहिलं तरी घाबरतात. तुम्ही काय सापाची बरणी धरणार!’ ते शब्द वैशालींच्या लक्षात राहिले. आपणही हे काम शिकावं असं त्यांना वाटू लागलं. त्याच सर्पमित्राकडून त्या ते शिकल्याही. त्यांच्या पतीचं रुग्णालय आहे. त्याचं आणि एका रक्तपेढीचं व्यवस्थापन त्या सांभाळतात. ते करत असतानाच छंद म्हणून त्यांचं सर्पमैत्रीण म्हणून काम सुरू झालं. पाच वर्षांपूर्वी त्यांची सर्पदंशासंबंधी जनजागृतीचं काम करणाऱ्या प्रियांका कदम यांच्याशी ओळख झाली. दरवर्षी भारतात जवळपास ६० हजार व्यक्तींचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो, ही माहिती वैशालींना नवी होती. मानवी वस्तीत साप आढळल्यावर निर्माण होणाऱ्या संघर्षाचीही त्यांना प्रकर्षानं जाणीव झाली आणि माणूस आणि साप दोघांचाही जीव वाचायला हवा, हे पटलं. वैशाली सांगतात, ‘‘पकडलेला साप मुद्दाम हाताळून फोटो काढणं, व्हिडीओ काढणं योग्य नाही, हे मी तज्ज्ञांकडून शिकले. सापांना कान नसतात पण त्यांच्या संपूर्ण शरीरावर संवेदक (रीसेप्टर्स) असतात. त्यामुळे अति हाताळल्यामुळे साप गोंधळतो. अशा सापाला त्याच्या अधिवासात सोडलं तरी नंतर त्याची निसर्गात शिकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मी साप काठीनंच उचलते आणि त्याला कमीत कमी हात लावते. पकडलेल्या प्रत्येक सापाची नोंद फोटोसह वन विभागाला देते. पालघर हा आदिवासी भाग असून आता या ठिकाणी माझी मानद ‘वाइल्डलाइफ वॉर्डन’ म्हणून नेमणूक झाली आहे. या पदावरील व्यक्ती वन विभागाला विविध कामात मदत करतात. माझ्या कु टुंबाचा मला भक्कम पाठिंबा असल्यामुळे हे शक्य होतं. माझे पती आणि १८ वर्षांची मुलगीही माझ्याबरोबर राहून तयार झाले आहेत आणि आता तेही बिनविषारी साप काठीनं उचलून त्यांना वाचवू शकतात.’’

एकदा वैशालींकडे जाळीत अडकू न जखमी झालेला अजगर आणला गेला. त्याच्या जखमांमध्ये किडे झाले होते. पशुवैद्यक तज्ज्ञांनाही त्याच्या जगण्याची आशा वाटत नव्हती, पण वैशालींनी वन विभागाला कळवून या अजगराची देखभाल के ली. त्याला ऊन दाखवणं, सलाइन, औषधं, खाणं देणं, हे सर्व प्रेमानं के ल्यावर अखेर तो वाचला. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा स्थानिक मुलांचा एक चमू या कामात तयार झाला आहे. पालघरमधलीच ४० मुलं यात आहेत आणि ‘व्हॉटस्अ‍ॅप’मार्फ त सर्वजण एकमेकांच्या संपर्कात राहून काम करतात. त्यांनाही वैशालींनी या नियमांची ओळख करून दिली आहे. हे लोक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत करायलाही पुढे येतात. वैशाली अपंग वा आंधळ्या अशा ६५ कु त्र्या-मांजरांसाठी शेल्टर चालवतात. आता त्यांना वन्यप्राण्यांसाठी ‘ट्रांझिट सेंटर’ सुरू करायचं आहे. त्या सांगतात,‘‘पिकांच्या कापणीच्या वेळी अनेकांना मोठ्या प्रमाणावर सर्पदंश होतात. याबाबत आम्ही जनजागृती करतो. कापणीच्या आधी संपूर्ण शेतातून काठी फिरवण्यासारखे साधे उपाय करूनही पुढचे संभाव्य सर्पदंश टाळता येतात. मला जेव्हा साप पकडायला बोलावलं जातं, तेव्हा प्रथम लोकांच्या चेहऱ्यावर ‘बाई साप कशी पकडणार’ अशी साशंकता पाहायला मिळते. एकदा मी बोरीवली पूर्व येथे राष्ट्रीय उद्यानासमोर साप पकडला होता. तेव्हा एक बाई साप पकडायला आली आहे हे कळताच ते दृश्य पाहायला अक्षरश: वाहतूक कोंडी झाली होती! पण लोकांकडून कौतुकही होतं तेव्हा बरं वाटतं.’’

सर्पमैत्रीण म्हणून असाच काहीसा अनुभव पिंपरीच्या शीतल चव्हाण यांनीही घेतला आहे. शीतल सांगतात,‘‘दोन महिन्यांपूर्वी मला साप पकडण्यासाठी बोलावण्यात आलं. मोटार- सायकलीची पेट्रोलची टाकी आणि हँडलच्या मधल्या जागेत तो अडकला होता. बघ्यांची गर्दी जमली होती. मी  मोटारसायकलीजवळ जाऊन पाहू लागले, तर गर्दीतले काही लोक मला मागे खेचू लागले. मी सर्पमैत्रीण आहे हे कळल्यावर मात्र गोंधळ क्षणार्धात थांबला, व्हिडीओ काढण्यासाठी पटापट सगळ्यांचे मोबाइल सरसावले आणि साप पकडल्यानंतर गर्दीनं टाळ्यांचा कडकडाट के ला!’’  शीतल यांची मूळची आवड नृत्याची. पण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका दु:खद घटनेनंतर तणावपूर्ण जगताना ८ वर्षांपूर्वी त्यांची या क्षेत्राशी ओळख झाली. सर्पमित्र जीवन कारुलकर यांच्याकडून त्या साप ओळखायला आणि पकडायला शिकल्या आणि प्राण्यापक्ष्यांसाठी काम करताना त्यांचा तणाव कमी होऊ लागला. ‘वल्र्ड फॉर नेचर’ संस्थेबरोबरही त्या जोडलेल्या आहेत.  याच क्षेत्रानं आपल्याला स्वतंत्र ओळख दिली असं त्या म्हणतात. ‘‘गेल्या ८ वर्षांत मी ८०० हून अधिक साप आणि जवळपास १५०० पक्षी पकडले व वाचवले आहेत. हे काम करणारा आमचा गट आहे. मी जेव्हा बिनविषारी साप पकडते तेव्हा तिथे जमलेल्या स्त्रियांना मुद्दाम जवळ बोलावून तो दाखवते. अशानं लोकांची भीती थोडी कमी होते. सर्पमित्रांचं काम खूप जबाबदारीचं असतं. ते ‘शो-ऑफ’ न करता प्रामाणिकपणे करणं मला महत्त्वाचं वाटतं.’’असंही त्या सांगतात.

कुंभार्ली घाटात सह्याद्रीच्या पायथ्याशी राहाणाऱ्या राणी प्रभुलकर यांना आजूबाजूच्या निसर्गात दिसणारे साप इतके  सवयीचे झाले आहेत, की काही नियम पाळल्यास माणसांचं सापांबरोबर सहजीवन सहज शक्य आहे, असं त्या सांगतात. राणी यांनी सर्पमैत्रीण होण्यासाठी वेगळं प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्यांच्या गावात १०-१५ वर्षांपूर्वी आतासारखे सर्पमित्र नव्हते. राणी आणि त्यांचा भाऊ विक्रांत शाळेत असल्यापासून सापांविषयीचे माहितीपट आवडीनं पाहात. त्यात दाखवलेल्या सर्पमित्रांप्रमाणे आपणही काम करावं, असं त्यांना वाटे. गुहागर येथे ‘दिवड’ हे पाणसाप पुष्कळ दिसायचे, ते पकडायचा दोघे प्रयत्न करू लागले आणि एकदा या प्रयत्नांत राणी यांच्या भावाला साप चावला. दोघे ओळखीच्या डॉक्टरांकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा त्यांना कळलं, की हा बिनविषारी साप असतो. या डॉक्टरांनी सर्पतज्ज्ञ निलीमकु मार खैरे यांचं एक पुस्तक त्यांना दिलं आणि सर्पमित्र व्हायचं असेल तर आधी अभ्यास करा, असा सल्लाही दिला.  पुढे त्यांचा भाऊ कु णाच्या घरात साप शिरला, तर पकडू लागला. परंतु तोनसेल तेव्हा लोक राणी यांना बोलावू लागले. राणी यांनी आठवीत असताना ‘बँडेड कु करी’ हा बिनविषारी साप पकडला. सुरुवातीला ‘मुलगी साप पकडण्याचं काम का करते?’ अशी टीकाही त्यांच्या पालकांना ऐकायला लागली. आता राणी के वळ सर्पमैत्रीण नाहीत, तर ‘सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थे’द्वारे त्या सापांचं घर वाचवायला हातभार लावत आहेत. जंगलं जाळण्यास चाप लावणं, जंगलतोड न होऊ देणं, याला प्रतिसादही मिळतो आहे. राणी सांगतात,‘‘आमच्याबरोबर १०-१२ प्राणीमित्र काम करतात. साप पकडताना आणि तो जंगलात सोडताना आम्ही खबरदारी म्हणून व्हिडीओ तयार करून नोंद ठेवतो. या कामात प्रामाणिकपणा गरजेचा आहे. सापाला फार हाताळणं योग्य नसल्यामुळे शक्यतो बॅडमिंटनच्या मोकळ्या रॅके टला वेलक्रो व जाळी लावलेली पिशवी आणि काठी यांच्या सहाय्यानं काम करतो. पकडलेला साप लगेच सोडणं गरजेचं असतं. शिवाय तो पकडलेल्या जागेपासून फार लांब किं वा त्याला पूर्णत: अनोळखी असलेल्या ठिकाणी सोडणं बरोबर नाही. आमच्या भागातही सर्पदंशाचं प्रमाण अधिक आहे. परंतु माणसानंच पूर्वीपासून निसर्गावर अतिक्रमण करून त्या जमिनींचा शेती व घरांसाठी उपयोग करण्यास सुरुवात के ली आणि बदलत्या परिस्थितीनुसार साप आणि इतर प्राण्यांना बदलावं लागलं, हे लक्षात ठेवायला हवं. काही बाबतीत काळजी घेतल्यास माणूस आणि प्राणी निसर्गात एकत्र राहू शकतात, हे आम्ही स्थानिकांना आवर्जून सांगतो.’’

डॉ. प्रिया बाविस्कर या नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. गेली ११ वर्षं त्या या क्षेत्रात आहेत. ‘वाइल्ड-सीईआर- सोसायटी फॉर वाइल्डलाइफ काँझव्र्हेशन, एज्युके शन अँड रीसर्च’ या संस्थेशीही त्या जोडलेल्या आहेत. सर्पमित्र राजू (लक्ष्मीकांत) हरकरे यांनी त्यांना साप पकडण्यास शिकवलं. हरकरे व प्रिया यांचे पती डॉ. बहार बाविस्कर यांच्याबरोबर त्या साप पकडण्यासाठी जाऊ लागल्या. सुरुवातीला साप पकडल्यावर दुचाकीवरून तो घेऊन जाताना पिशवी काळजीपूर्वक हातात धरण्याचं काम त्यांच्याकडे असायचं. हळूहळू त्या बिनविषारी लहान साप पकडू लागल्या, मग ‘रॅट स्नेक’सारखे थोडे मोठे साप आणि पुरेसा आत्मविश्वास आल्यावरच ‘व्हायपर’ किं वा ‘कोब्रा’सारखे विषारी साप पकडण्यास त्यांनी सुरुवात के ली. त्या सांगतात, ‘‘मला सापांची जितकी भीती वाटते, तेवढीच त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. सर्पमित्र म्हणून हा आदर आपल्यात असेल, तर बचावकार्याच्या वेळी प्राण्यांकडूनही आपल्याला सहकार्य मिळतं, असा माझा अनुभव आहे. साप पकडणं आणि त्यांचा बचाव हा प्रमुख हेतू हवा. सापांबरोबर स्टंटबाजी टाळायलाच हवी. सर्पमित्र असं स्वत:ला म्हणवून घेताना मैत्रीत अंतर्भूत आदर विसरून चालणार नाही. बहुतेक वेळा सर्पमित्र पुरुषच असतात हे खरं असलं, तरी मला मात्र लोकांकडून खूप प्रोत्साहन मिळालं. काही भागात साप निघाल्यावर स्थानिक लोक आवर्जून मला बोलवायचे, ‘तुम्ही हे काम करत राहा, त्यामुळे स्त्रियांविषयी आणखी आदर निर्माण होतो, मुलींना प्रेरणा मिळते,’ असं सांगायचे. ते ऐकू न माझा उत्साह वाढला आणि बचावकार्याचा प्रत्येक प्रसंग अविस्मरणीय झाला.’’

पूजा पवार यांचं काम एकदमच वेगळं. रूढ अर्थानं त्या सर्पमैत्रीण नाहीत. पण २०१५ पासून त्या ‘ग्रेट हॉर्नबिल’ (धनेश) पक्ष्याचा अभ्यास करतात. साप हे धनेशाचं भक्ष्य असल्यामुळे पक्षीनिरीक्षणादरम्यान झालेल्या सापांच्या दर्शनाचे अनेक अनुभव त्यांच्यापाशी आहेत. ‘‘तमिळनाडू आणि के रळमधील अन्नामलाई पर्वतरांगेत हरित वनांमध्ये अभ्यास करताना ‘बांबू पिट व्हायपर’, ‘हंप नोज पिट व्हायपर’, ‘लार्ज स्के ल पिट व्हायपर’, ‘मलाबार पिट व्हायपर’ अशा विषारी सापांची ओळख झाली. आम्ही पक्षीनिरीक्षणासाठी मोठ्या झाडांपासून काही अंतरावर जमिनीवरच बसत असू. तिथे आजूबाजूला खूप सापांचा वावर असल्यामुळे आधी त्याची खात्री करूनच कामाला सुरुवात करावी लागे. अतिशय देखणे ‘शील्ड टेल’ साप नेहमी दर्शन द्यायचे. जमीन, झुडपं, झाडं आणि अगदी १०-२० मीटर उंच वृक्षांवरही सापांचा किती सहज संचार असतो हे पाहून आश्चर्य वाटायचं. के वळ जंगलातील अन्नसाखळीसाठीच साप महत्त्वाचे आहेत, असं नाही. ते फार जुने आणि सुंदर जीव आहेत आणि त्यामुळे त्यांचं संरक्षण महत्त्वाचं आहे.’’

नेहा पंचामिया यांची ‘रेस्क्यू’ ही संस्था १४ वर्षांपासून पुण्यात पाळीव प्राण्यांबरोबरच इतर प्राण्यांसाठीही बचावकार्य करते. पुणे आणि आजूबाजूचा परिसर जैवविविधतेनं समृद्ध असल्यामुळे त्यांच्या ‘ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’मध्ये घार, मोर, माकड, हरीण असे जखमी वा अनाथ प्राणी आणले जातात. तसंच घरात शिरलेले साप पकडण्यासाठी दर आठवड्याला ६ ते १० फोन येतात. त्या नुकताच आलेला एक अनुभव सांगतात-‘‘सध्या प्लॅस्टिकचा विळखा संपूर्ण निसर्गालाच पडला आहे आणि त्यातून सरपटणारे प्राणीही सुटलेले नाहीत. आम्ही अलीकडेच एक नाग वाचवला होता आणि त्याच्या पोटात आम्हाला मोठी प्लॅस्टिकची पिशवी आढळली. असे प्रसंग नेहमी लक्षात राहातात. साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा आहे आणि उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो गरजेचाच. आपण इतर प्राण्यांबद्दल लहानपणापासून शिकतो, तसं साप या प्राण्यालाही समजून घ्यायला हवं. कोणताही वन्यजीव वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे. मात्र हे काम वन विभाग आणि संबंधित विभागांना माहिती देऊन किं वा तज्ज्ञांच्या उपस्थितीत करायला हवं.’’

सापांचं प्रेम असणाऱ्या अशा अनेक मैत्रिणी ठिकठिकाणी आहेत. त्यातील कित्येक जणींची आपल्याला कधी ओळखही होत नाही. पण आपापली कामं सांभाळतानाच त्या प्रामाणिकपणे आपलं सर्पप्रेम जोपासत आहेत आणि तोच प्रामाणिकपणा इतरांच्यात रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

chaturang@expressindia.com