डॉ. प्रदीप पाटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आजच्या जगात माणसाच्या डोक्यावर केवळ अर्थार्जनाचीच नव्हे, तर इतरही अनेक तलवारी टांगलेल्या आहेत. सततची स्पर्धा, प्रत्येक पातळीवर समाजाशी मिळतंजुळतं घेऊन टिकून राहाण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न.. यात माणूस ‘खराखुरा’ राहू शकेल का? अनेकदा तर मुखवटे घालून जगावं लागतं, तर काही वेळा कृत्रिमताच जगण्याचा अविभाज्य भाग होते. अशा वेळी ‘रीअल’असणं शक्य होईल? माझ्या नातवानं मला ‘तो’ प्रश्न विचारला आणि अंतर्मुख झालेल्या मला त्याच्याशी खूप बोलावंसं वाटलं..’

अमेरिकेत असलेल्या अडीच वर्षांच्या माझ्या नातवानं- रिहाननं व्हिडीओ कॉलवरून बोलताना मला अचानक प्रश्न विचारला, ‘‘बाबा, कॅन यू बी रीअल?’’ आणि मग मला पुढे बोलायला काहीच सुचेना. त्याच्याबरोबर दीड महिना राहून, रोज भरपूर खेळून मायदेशी परत निघालो, तेव्हाही परतीच्या प्रवासात डालस विमानतळावर मला त्याचा निरोप घेताना मी परत का जातोय, याचं खरं कारण सांगताच येत नव्हतं. आम्ही त्याच्यासमोरून

‘चेक इन’ करत पुढे जात राहिलो. तो दिसत होता तोपर्यंत हात हलवत निरोप घेत राहिलो. आम्ही आता दोन-तीन दिवसांतच परत येणार आहोत, असंच समजून होता तो. पुढचे काही दिवस, खेळता खेळता मध्येच खेळ थांबवून तो तिथल्या आमच्या खोलीत जाऊन येई आणि मग त्याच्या आईकडे जाऊन तिला सांगे, ‘They have not come back yet!’ (‘अजून ते आले नाहीत परत’). जरुरीचं असेल तर आपली जवळची माणसंही खोटं बोलतात, या वास्तवाशी ही त्याची पहिली ओळख असेल का? पुढच्या आयुष्यातल्या अनेक फायद्यांसाठीही हे लवकर समजलेलं बरं नव्हे का? ‘सत्यम् ब्रूयात, प्रियम् ब्रूयात, न ब्रूयात सत्यम् अप्रियम्’ याचा हा पहिला अप्रिय अनुभव त्याच्या माझ्या नात्यातला! दोघांनाही नको असलेलं सत्य.

 नंतर व्हिडीओ कॉलवरून बोलताना हा वास्तविक एक आभास आहे हे लक्षात आल्यानं, रिहाननं ‘बाबा तू प्रत्यक्ष (real) समोर खराखुरा म्हणून येऊ शकतोस का?’ असा रास्त प्रश्न केला. हा निरागस प्रश्न मात्र तिथेच थांबला नाही. तो प्रश्न माझ्या मनात रोज जगण्याची हातगाडी पुढे ढकलत असताना स्पीड ब्रेकरसारखा पुन:पुन्हा सामोरा येत राहिला. निगरगट्ट, निबर मनाला ओरबाडू लागला. वास्तव निभावणं इतकं कठीण पडतं आहे, की त्यात ‘खरंखुरं कसं व्हायचं’ हा आणखी एक महाकठीण प्रश्न उशाशी घेऊन कुठे आपली उरलीसुरलेली झोप उडवायची? खऱ्याची व्याख्या कुणी केली कोण जाणे? पण त्याला जीवन कळलं होतं असं अजिबात म्हणता येणार नाही. असं खरं वागलं तर ना नाती सांभाळता येत, ना कुठलीच सत्ता. अगदी घरातली सत्तासुद्धा. ना कुणाला काही विकता येईल, ना विकत घेता येईल. ना साधं निवडणूक चिन्ह मिळवता येईल, ना आमदार, मतदार टिकवता येतील. खराखुरा चेहरा घेऊन वावरणं म्हणजे जवळजवळ आपल्याच चेहऱ्यावर आपणच अ‍ॅसिड फेकण्याइतकं घातक ठरू शकतं. सत्य तर दिवसेंदिवस इतकं ज्वालाग्राही होत चाललं आहे, की जवळ बाळगलं तर आपल्यालाच प्रथम जाळेल. उगाच नाही मरणाच्या द्वारी शेवटच्या क्षणांमध्ये माणसं खरं बोलतात असा समज आहे (तेही हल्ली फारसं खरं नसतं असंही कुणी सांगतात).

मला त्याला कॉलवर म्हणावंसं वाटलं, की रिहानबाळा, असे इतके निर्मळ, निरागस, निव्र्याज, निष्कपटी, निर्वस्त्र, खरेखुरे, आहोत तसे समोर दिसण्याचे हेच थोडेफार दिवस तुझ्याकडे आहेत. ते आनंदात घालव. लहान मुलांना कपडे विशेष आवडत नाहीत, त्याची आम्हाला गंमत वाटते. पण अपरिग्रहाचं जणू अंतिम स्वरूप असे नग्न मुनी आम्हाला त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेता येत नाहीत. मुनीच काय, वास्तवाशी नातं तुटलेल्या आणि म्हणून निर्वस्त्र वावरणाऱ्या मनोरुग्णाला ताबडतोब दृष्टीआड, सृष्टीआड न्यावं लागतं. जनरीतीनुसार आपल्या शरीराला वस्त्रात गुंडाळणं निश्चित आवश्यक आहे यात शंका नाही (करमणुकीचा संबंध असला तर मात्र आम्ही तिथे सोयीनुसार सिनेमातील नायिकेचा अपवाद समजतो).’’

रिहान, आम्हाला सतत आमचं खरं स्वरूप बाजूला ठेवावं लागतं. वास्तवातल्या व्यवहाराचं भान ठेवून नीतीनियम तात्पुरते बदलावे लागतात. सारेच नागरिक आपले बांधव असतात आणि सारीच परमेश्वराची लेकरं असतात, पण म्हणून तसं प्रत्यक्षात वागून आम्हाला चालतच नाही लेकरा! मोठं होत असताना ‘स्व’ व ‘स्वेतर’ यात इतके भेद करावे लागतात, की नंतर आपलं आपल्यालाच आपण अनोळखी होत जातो. मी तुझ्याएवढा होतो तेव्हा कसा होतो ते आता आठवत नाही, पण दिवसेंदिवस माझं तनमन बदलत गेलं. मी असा नव्हतो एवढं मात्र जाणवतं. तुम्हाला अद्ययावत डिजिटल तंत्र आजच्या आयुष्यातल्या कित्येक गोष्टी रेकॉर्ड करून पुढे दाखवू शकेल. आमची मागची वाट काळ झपाटय़ानं पुसून टाकतो, स्मृती क्षीण होतात, आठवणं कठीण होत जातं. आजवर आम्ही वापरलेले अनेक मुखवटे वाटेतच हरवले, चेहऱ्याला फासलेले राग, लोभ, प्रेमादी भाव सुरकुत्यांनी पुसून टाकले. त्रासिक आठय़ा मात्र खोल रुतत चालल्या. अश्रू कारणाशिवाय वाहात असतात. काही सांगायचं तर शब्द मदतीला येत नाहीत. भाषाही समाज सारखी बदलायला लावतो. शिव्याही अद्ययावत असाव्या लागतात, अन्यथा त्या निष्प्रभ ठरतात. वर्ष जातात तसं आमचं खरं स्वरूप कळणं कठीण होत जातं. नुसतं आरशात पाहून आपण खरे कोण हे ओळखणं शक्यच होत नाही, कारण माझ्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वर्ण-वर्गीय अशी इतकी पुटं/ थर चोपडले गेले आहेत, की त्या साऱ्या थरांना खरवडून माझं आतलं स्वरूप उघडं करणं खूप कठीण, वेळखाऊ आणि वेदनादायक ठरेल. त्यात वेळ घालवायला शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, समाज, अर्थकारण, पारंपरिक जबाबदाऱ्या, इतरांच्या अपेक्षा इ. अनेक गोष्टी वेळच देत नाहीत. तळागाळातल्या माणसाला धड जगणंच कठीण असतं. दलदलीत नाक वर ठेवून श्वास घेण्याचीच प्राणांतिक धडपड करण्यात त्याचं आयुष्य खर्च होत जातं. मग मी खरा कोण, हे कळण्यासाठी विचार करायला वेळ नसतो. जाणिवा प्रगल्भ करण्याऐवजी त्या बोथट करण्याचं काम घर व आजूबाजूचा समाज करत राहातो. या तथाकथित उदारमतवादी मानवतावादात संघर्ष करत क्रांती करण्यासाठी संधी व अवकाश निर्माण होत नाही. मी बाहेरून कष्टकरी मजूर, गरीब, परंपरावादी, शांत, माणूस दिसतो, पण माझं आतलं विरोधी स्वरूप उलगडून दाखवणारे सुधारक माझ्या जाणिवांपर्यंत पोहोचत नाहीत. मग कसं ओळखणार मी खरा कोण ‘real me’ आहे ते? स्वत:चं मूळ स्वरूप काय होतं तेच जर आठवत नाही, तर रीअल व्हायचं कसं?

प्रश्न आजचा नाही, कित्येक शतकांचा आहे. माणसाला पुनर्जन्म नसतो, माझ्यावर अनेक थर लिंपणारे ‘संस्कृतीवर्धक’ मात्र अमर, चिरंजीव असतात. प्रतिष्ठेच्या कितीतरी खोटय़ा कल्पना आमची ऊर्जा व सर्जकता खच्ची करत राहतात. आपल्या प्रत्यक्ष दिसण्याबोलण्यापेक्षा कुणा प्रस्थापित, प्रसिद्ध, अतिश्रीमंत, रुबाबदार, आकर्षक हिरोसारखं आपण दिसायला हवं, यापायी आमची विद्यार्थीदशा खर्च झाली. अतिश्रीमंत उद्योजकांच्या जीवनशैलीची नक्कल करण्याचा आटापिटा करत तशी नाही, तर निदान सेकंड हँड हॉटेल/ टूर शैली चार दिवस का होईना मिळवण्यासाठी आमचं प्रौढत्व आटापिटा करत राहिलं. सेलिब्रिटीज्सारखं तारुण्य टिकवणारी क्रीम्स वापरण्यात, बोटॉक्स, फेस लिफ्ट करून घेण्यात आमची ‘पन्नाशी’ गुंतून पडली. मग मध्येच कधी साखरपुडे आणि लग्नसमारंभ मोठे ‘इव्हेंटस्’ होत गेले. मला काय हवं ते कळलं नाही, पण इतरांना आम्ही कसे दिसायला हवे आहोत हे समजून घेण्यातच आयुष्य खर्च झालं. नैसर्गिकतेला कृत्रिमतेनं सजवण्यास पर्याय राहिला नाही. त्या बाबतीत आम्ही मार्केट, बाजार टीव्ही जाहिरातींना मार्गदर्शक म्हणून स्वीकारत राहिलो. वल्ल१ीं’ होण्यातच सारा वेळ, ऊर्जा, पैसे खर्च होत राहिले. एवढं करून पुन्हा आरशात पाहावं तर ‘आपण’ दिसतच नाही, कुणीतरी परका आपल्याकडे रोखून पाहतोय असं वाटतं. त्याला टाळून स्वत:ला शोधावं असा प्रयत्न करताना मनाच्या तळाशी जावं लागतं आणि तिथे जीव गुदमरतो.

आम्ही हे असे का कृत्रिम जगतो याला अनेक खरीखुरी कारणं मात्र आहेत. तू हल्ली आमच्या चेहऱ्यावर अनेक मास्क पाहिले आहेस. त्यातही रंग, डिझाइन, मॅचिंग आदींचं वैविध्य असतं. समाजानं स्वीकारावं म्हणून याआधीही आजवर आम्ही मुखवटे घालूनच वावरत आलो आहोत. एकमेकांतलं प्रेम टिकावं व समाजात आपल्याला एकटेपण येऊ नये, यासाठी चेहऱ्यावरील मूळ भाव दिसून येणं अडचणीचं ठरू शकतं. सर्वामध्ये मिसळताना आत्मविश्वास वाढावा, न्यूनगंड, अस्वस्थता अथवा निराशा वाटू नये, यासाठी गर्दीतलंच एक दिसावं लागतं. आपण वेगळे असतो पण तसं दिसून चालत नाही. स्वत:चं मत दडपून निकृष्ट विनोदांना हसावं लागतं, बेसूर/ कर्कश/ नाटकी आवाजात गायलेल्या गाण्याला दाद द्यावी लागते, वेषभूषेचं, स्वयंपाकाचं कौतुक करावं लागतं. यात बऱ्याचदा खरं कौतुक असतं त्यामागच्या आनंद देण्याघेण्याच्या वृत्तीचं, त्यामागच्या भावनांचं. माणसांच्या जगात असं कौतुक करायला हवंच. अनेक ठिकाणी परस्परसंबंध टिकवण्यास ते मदत करतं. अनेकदा समोरच्या माणसाचा सामाजिक दर्जा, नातेसंबंध, श्रीमंती, ज्येष्ठत्व, पूर्वीचे उपकार, त्रास वा वेळी मदत देता येईल अशी त्याची ताकद, आपल्या गरजा, असे अनेक घटक लक्षात घेऊन आम्हाला असं वागावं लागतं.

  मोकळय़ा मनानं खरंखुरं वागण्याबोलण्यासाठी, जे मास्क न घातलेल्या मूळ चेहऱ्यांना आहेत तसं स्वीकारू शकेल असं, सुरक्षित, सुसंस्कृत माणसांचं जग तयार करावं लागेल. ते जग आपापसात असलेला फरक एकेकाचं वैशिष्टय़ म्हणून स्वीकारू शकेल. नैसर्गिक भेद निसर्गाचं वैविध्य म्हणून स्वीकारू शकेल. काळे-गोरे, उंच-ठेंगू, इथले-तिथले, वर्णवर्गीय मोजमापानं उच्च-नीच, परजातीय, परधर्मीय, परप्रांतीय, असे अनेक भेद त्यातली विविध मानसिक-सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक कारणं लक्षात घेऊन व त्यात उत्पन्न झालेल्या दोषांचं निराकरण करून आपण कमी करत आणले पाहिजेत. स्त्री-पुरुष भेद जसा समतेनं स्वीकारायला हवा, तसंच तृतीयपंथीय, समलैंगिक आदींनाही समाजात सामावून घ्यायला हवं. भेद समजून घेत आपल्यातल्या मानसिक भिंती तोडायला हव्यात. अज्ञानी, अशक्त, अपंग माणसाला न्यूनगंड न देता त्यांना प्रगतीची संधी देत उन्नत केलं पाहिजे.  

 अशा आदर्श, अकृत्रिम समाजनिर्मितीचं स्वप्न कित्येक शतकं माणसं पाहात आली आहेत. तेव्हाच तर आम्ही तू म्हणतोस तसे real एकमेकांसमोर येऊ शकू. तोपर्यंत हे जे  unreal आम्ही जगतो, ते मोठय़ा मनानं समजून घे. सध्या तरी मुखवटय़ांचाच जमाना आहे. विद्यमान जगाच्या Real to Virtual या प्रवाहाविरुद्ध पोहायला आता माझ्यापाशी तेवढी ताकद आणि तेवढा काळ राहिलेला नाही. मी काय, आज असेन, उद्या नसेन. तुमच्या पिढीपाशी वेळ, अधिक ज्ञान, ऊर्जा तिन्ही असतील रिहान. You all can be real; you all should be real.

‘फोन मध्ये नको, प्रत्यक्षात येऊन भेट’ ही तुझी मागणी शक्य तितक्या लवकर मी पूर्ण करीनच. आमच्यासाठी तुम्ही छोटी बाळं ‘रीअल’ माणूस आहात. तेव्हा तुम्हाला भेटणं हा आमच्यासारख्या आजी-आजोबांसाठी तर नेहमीच फार मोठा आनंद असतो! 

patkar.pradeep@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samshti samaj author dr pradeep patkar can you be real man in the world masks ysh
First published on: 26-11-2022 at 00:07 IST