दुसऱ्या लग्नापूर्वी..

तुझं लाडाचं पूर्वायुष्य, एकटेपणातून तुझी चिडचिड त्यानंही समजून घ्यायला हवीच होती.

पहिल्या लग्नाच्या वेळी झालं तेच पुनर्विवाहातही होणार ही भीती आणि जुन्याशी तुलना हे पुनर्विवाहातले मोठे अडथळे असतात. भूतकाळात अडकून अपराधी भाव बाळगला तर पुढचंही आयुष्य त्या सावलीत जाऊ शकतं. भीतीपेक्षा त्या अनुभवातून मिळालेली परिपक्वता, भान घ्यायचं. दुसऱ्याची बाजू समजून घेऊन, स्वत:च्या अपेक्षांकडे त्रयस्थपणे पाहायला शिकायचं.

‘‘माझं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं, गेल्या वर्षी आम्ही विभक्त झालो. आता पुन्हा लग्न ठरतंय, त्याचाही पुनर्विवाहच असल्यामुळे आमचं जमेल असंही वाटतं आणि पुन्हा पहिल्या लग्नासारखंच होईल अशी भीतीही वाटते. घरच्यांच्या कॉमेंट्सचा कधी राग येतो, कधी माझंच चुकलं असं अपराधीही वाटतं. सतत उलटसुलट तेच विचार आणि घरातल्या त्याच त्या चर्चेनं गोंधळायला होतं. आत्मविश्वासच संपतोय. तटस्थपणे काही सांगाल म्हणून तुमच्याकडे आले.’’ हसरी, स्मार्ट, पण डोळ्यांत एक उदास, असुरक्षित छटा असणारी प्राची सांगत होती.

‘‘कशामुळे बिनसलं तुमचं?’’

‘‘माझा एक्स-नवरा लंडनमध्ये पीएच.डी. करणारा, मध्यमवर्गीय घरातला. त्यांच्यापेक्षा माझं माहेर खूपच सुस्थितीत. देखणा, एनआरआय नवरा हे माझं स्वप्न होतं. त्यामुळे ओळखीतून हे स्थळ आल्यावर उत्तम नोकरी खुशीनं सोडून मी लग्न केलं. तिथे पोहोचल्यावर मात्र दारुण अपेक्षाभंग. अतिशय ढगाळ, उदासवाणं हवामान, बारीकसारीक गोष्टींसाठी नवऱ्यावर अवलंबून रहावं लागणं. तो गेल्या गेल्या त्याच्या फायनल सबमिशनमध्ये बुडाला. माझ्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नव्हता.  एकटी पडले हो मी.’’

‘‘बाहेर गेलाच नाहीत कधी?’’

‘‘एकदा हनिमूनला आणि नंतर वीकेंडला बऱ्यापैकी बाहेर जायचो, पण माझ्या डोळ्यासमोरची युरोपातली हॉटेल्स, रोमँटिक वातावरण यातलं काहीच प्रत्यक्षात नव्हतं. आम्ही बहुतेक वेळा त्याच्या मित्रांकडे, नातलगांकडेच राहिलो. मला बोअर व्हायचं. लग्नानंतरचा नवलाईचा काळ एकदाच मिळतो हे न समजणाऱ्या अरसिक, कंजूष माणसाशी लग्न करून फसले असं वाटायचं.’’ प्राची सांगत होती.

तिनं आपलं बोलणं सुरूच ठेवलं, ‘‘नोकऱ्यांमध्ये मंदी. मन रमवण्यासाठी स्वयंपाक शिकावा तर त्याच्याकडचं सामान मोजकं, त्याचीच पाककला माझ्यापेक्षा बरी होती. घर सजवावं तरी बजेट कमी आणि तो फक्त वीकेंडलाच मोकळा. ‘तुझी तू बसने जा ना? सबमिशनच्या ऐन शेवटच्या भरात मी कशाला एवढा वेळ घालवू? तेही बेचव जेवणासाठी?’ अशी त्याची कॉमेंट. फार दुखावले जायचे मी. त्याच्या कामापलीकडे कशालाच महत्त्व नाही. माझ्या प्रयत्नांना नाही, मलाही नाही. एकटेपणा समजून घेणं नाही. या आयुष्यासाठी सोडली का मी माझी माणसं आणि उत्तम जॉब? याच्या अरसिक, कंजूषपणामुळे हे सगळं घडतंय या विचारात दिवसभर एकटं राहून डोकं फिरायचं, एवढय़ा-तेवढय़ावरून चिडचिड व्हायची. एकत्र असलो तरीही वाद आणि भांडणंच. मग रात्रीही तशाच. यातून नातंच विटत गेलं आमचं. कधी एकदा यातून सुटते असं शेवटी वाटायला लागलं, निघून आले, आरोप-प्रत्यारोप झाले, पण अखेरीस घटस्फोट झाला. यात माझं कुठे चुकलं?’’

‘‘चूक की बरोबर ठरवण्यापेक्षा जे घडलं ते कशामुळे घडलं, त्याला काय पर्याय शोधता आले असते? असं पाहू या आपण? तुझ्या मनातल्या संसाराच्या कल्पना आणि अपेक्षांप्रमाणेच सगळं असणार असं तू ठाम गृहीत धरलंस बहुधा. एनआरआय असला तरी तुझा नवरा अजून स्टुडंटच होता. एकटय़ा विद्यार्थ्यांच्या आणि दोघांच्या कुटुंबाच्या खर्चात खूपच फरक पडला असणार. माहेरची सुबत्ता आणि स्वकमाईच्या सवयीमुळे तू त्याच्यापेक्षा खर्चीक असशील. काटकसर माहीतच नसेल तर ‘एवढेही पैसे कसे नाहीत याच्याकडे?’ असं वाटून नवऱ्याबद्दलचा आदर कमी होऊन त्याचं काहीच आवडेनासं झालं असणार.’’

‘‘..असेल तसंही. पण नवीन लग्नानंतर रोमँटिक अपेक्षा चूक आहेत का?’’

‘‘चूक नाहीत, पण पाहून केलेल्या लग्नात एकमेकांचा स्वभाव कळण्यासाठी थोडी सबुरी हवी ना? तुझं शिक्षण, एक्स्पोजर पाहता लंडनचं हवामान, मंदीची परिस्थिती, मर्यादित स्टायपेंडचा विचार करून तू लग्न करतेयस असं त्याला वाटू शकतं. त्याच्या परीनं, शक्य तेवढं तुला रिझवण्याचा, कंपनी देण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. पण तुझ्या आणि त्याच्या रोमँटिसिझमच्या कल्पनांमध्येच मुळात फरक असल्यावर काहीही केलं तरी दोघांकडूनही अपेक्षाभंगाची शक्यताच जास्त.’’

‘‘तसंच झालं. त्याचं लहानपण गरिबीत गेल्यामुळे आनंदाच्या कल्पनाही तशाच अरसिक. दर वेळी ‘हे आवश्यक आहे का?’ तरच करायचं. बोअरच व्हायचं मला.’’

‘‘परिस्थितीमधला फरक तर दोघांना लग्नाआधीही माहीत होता. रोमान्स आणि सुबत्तेच्या तुझ्या अपेक्षेत कल्पनारम्यता जास्त असल्यामुळे अपेक्षाभंग खूप मोठा झाला असणार. त्यात दोघांनीही ‘माझ्याच घरचं बरोबर, त्याप्रमाणे अमुकच करायचं’ हा दुराग्रह कळत-नकळत वागण्यात, संवादात धरला असणार. तुझ्या घरच्या पद्धती, संस्कार जर तुझ्यासाठी ब्रह्मवाक्य असतील, तर त्याच्या संस्कारांबाबत तो आग्रही असण्यात चूक काय? पंचवीस वर्षांच्या सवयी बदलायला दोघांनाही वेळ लागणारच हे समजून कुणाचाच सन्मान न दुखावता मधला मार्ग शोधायला हवा होता.’’

‘‘आमच्यातल्या फरकाचा प्रत्यक्षात एवढा पदोपदी त्रास होणं अनपेक्षित होतं. शिवाय दिवसभर एकटी.’’

‘‘तुझं लाडाचं पूर्वायुष्य, एकटेपणातून तुझी चिडचिड त्यानंही समजून घ्यायला हवीच होती. पण टोकाचा एकटेपणा तू ओढवून घेतलास. तुझ्यासारखी स्मार्ट मुलगी एकटं फिरण्यात एवढी परावलंबी असेल असं त्याला वाटलंच नसेल. त्यानं तुला जमेल तेवढा वेळ दिला, त्याच्या काटकसरी पद्धतीनं का असेना, शक्य तेवढं फिरवलं. पदवी मिळवण्यावर त्याचा फोकस स्वाभाविक होता, कारण त्याची जबाबदारी वाढली होती. त्याचं कामात गुंतणं समजून घेऊन स्वतंत्र होण्याची संधी असं त्याकडे तुला पाहता आलं असतं, पण तू त्याला नावं ठेवत चिडचिड करण्याचा पर्याय निवडलास. त्यामुळे जॉबसाठीही तुला पुरेशा फोकसनं धडपड करता आली नसणार. लंडन इतकं नकोसं होण्याचं कारण भारतातल्या तुझ्या कम्फर्ट झोनपेक्षा तिथली जगण्याची धडपड तुला अवघड वाटली, आत्मविश्वास डळमळीत झाला, हेही असेल.’’

‘‘आत्मविश्वास?’’

‘‘तुझ्यासारखी भारतातली स्मार्ट मुलगी तिथे एवढी असहाय, एकटी झालेली पाहून तुझी ‘सेल्फ इमेज’च डळमळीत झाली. स्वत:वरच्या रागाचं खापरही सोयीस्करपणे त्याच्या कंजुषीवर आणि अरसिकपणावर फोडलंस. स्वत:च्या अपेक्षा आणि त्याची या सगळ्यातली खरी जबाबदारी तपासून पाहण्याचा पर्याय होता तेव्हा तुझ्याकडे, पण वाट पाहण्याची तुझी तयारी नव्हती. नोकरी, घर-संसार, समृद्धी सगळं तुला ताबडतोब हवं होतं. ‘मला अधूनमधून नातलगांऐवजी चांगल्या हॉटेलात राहायचंय, माझ्या स्वयंपाकावर, लंडनमध्ये बुजण्यावर थोडे दिवस कॉमेंट्स नको ना करू’ असं काही तू प्रेमानं त्या त्या वेळी त्याला स्पष्टपणे सांगितलंस का?’’

‘‘मी कशाला सांगू? त्याला कळायला नको?’’

‘‘म्हणजे मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येणार नाही, स्पष्टपणे सांगणारही नाही, पण माझ्या इच्छा मला हव्यात त्याच पद्धतीनं त्यानं पूर्ण केल्या पाहिजेत असं झालं. तुझ्या मनातल्या कल्पनाचित्रासारखं सगळं असलं पाहिजे ही अपेक्षा तुला हक्क वाटला, इथे गडबड झाली प्राची. तू तुझ्या कल्पनेतल्या नववधूप्रमाणे लाडाची आणि कौतुकाची अपेक्षा केलीस आणि त्याच पद्धतीनं तो तुझ्यात त्याच्या मनातली पत्नी गृहीत धरत राहिला. ‘थिसीस सबमिट’ झाल्यावर मजा करायला आयुष्य पडलंय हे पत्नी म्हणून तू समजून घेशील असं त्यानंही गृहीत धरलं असेल. मनातल्या अपेक्षा एकमेकांना न सांगताच ते तसंच घडलं पाहिजे हे गृहीत धरण्याची चूक दोघांनीही नक्कीच केलीत. वर ही चिडचिड घरच्यांना फोनवर सांगून आगीत तेल ओतून घेतलं असणार.’’

‘‘हो. आपापल्या मुलांच्या बाजू घेऊन आमच्या घरचे इथे एकमेकांशी भांडले.’’

‘‘या सगळ्यातून येणारा संभाषणातला तो तक्रारखोर सूर ऐकणाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. मग ऐकून, समजून घेण्याऐवजी फक्त विरोधाचा पवित्रा उरतो. हे दोघांकडूनही वारंवार घडल्यामुळे सहवासातली मजाच संपली. नव्या लग्नात हे जाणीवपूर्वक टाळायला हवं.’’

‘‘तेव्हाच कौन्सेलरकडे गेलो असतो तर कदाचित असं घडलं नसतं असं आता वाटतंय. पण पुन्हा तेच नाही ना घडणार?’’

‘‘ही भीती आणि जुन्याशी तुलना हे पुनर्विवाहातले मोठे अडथळे असतात. आता भूतकाळात अडकून अपराधी भाव बाळगलास तर पुढचंही आयुष्य त्या सावलीत जाईल. भीतीपेक्षा त्या अनुभवातून मिळालेली परिपक्वता, भान घ्यायचं. दुसऱ्याची बाजू समजून घेऊन, स्वत:च्या अपेक्षांकडे त्रयस्थपणे पाहायला शिकायचं. वेळ लागेल, पण जमेल नक्की.’’

‘‘जमेल असं वाटतंय खरं. तसं तर सबुरी धरायला हवी, एकमेकांना समजून घ्यायला वेळ, स्पेस द्यायला हवी या गोष्टी नव्या नाहीत, पण त्याचा अर्थ आता कळतोय. ते कळण्यासाठी एक लग्न ही किंमत फार मोठी झाली नाही?’’ ती उदास हसली.

‘‘खरं आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंबातल्या गोतावळ्यामुळे अनेक प्रकारचे स्वभाव, स्वत:पेक्षा वेगळा दृष्टिकोन माहीत असणं हे घरातच शिकायला मिळायचं. बाईनं तडजोड करणं कम्पलसरीच होतं.’’

‘‘हं. आजच्या काळात विवाहपूर्व किंवा वैवाहिक समुपदेशन वेळेवर घेतलं, परस्परांच्या अपेक्षा आणि गरजा समजून घेतल्या तर कदाचित थोडी मदत होईल. आता अनुभवच सांगेल.’’ प्राची म्हणाली.

नीलिमा किराणे – neelima.kirane1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Before second marriage

ताज्या बातम्या