राहीचं वागणं तिच्या पूर्वानुभवाला अनुसरून होतं आणि अनघाचं तिच्या भावनेला. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा कोणाचा चष्मा चूक आणि कोणाचा बरोबर हे कसं ठरवणार? चूक-बरोबरची लेबलं लावून निष्पन्न एवढंच, की दोघंही आपापल्या ठिकाणी ‘माझंच बरोबर’ला कुरवाळत राहतात, गैरसमज होतात. त्यातून नात्याचा प्रवाह अडण्याचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अशा वेळी ‘संवादाचा’ प्रामाणिक प्रयत्न करण्याचा पर्याय एकाने जरी निवडला तरी नातं प्रवाही होण्याची शक्यता वाढते.

राही आणि मानसी शॉपिंगसाठी बाहेर पडल्या तरी राही विचारांत गढली होती.  ‘‘कुठे हरवली आहेस राही?’’ मानसीनं विचारलं.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

‘‘अगं, माझ्याबद्दल एक व्यक्ती सगळीकडे विषारी गैरसमज पसरवतेय. त्याबद्दल तिची चांगली खरडपट्टी काढावी, हडसून खडसून विचारावं की, एकदा आपली बाजू सांगून पाहावी? की दुर्लक्ष करावं? अशा विचारांत आहे.’’

‘‘नीट सांग. कोण आहे  ही व्यक्ती?’’

‘‘अनघा. माझी नाशिकची चुलत बहीण.’’

‘‘अनघा? तुमची तर चांगली मैत्री होती.’’

‘‘मैत्री आहेच गं. एकमेकींना लागतोच आम्ही, पण काकांच्या म्हणजे अनघाच्या वडिलांच्या अँजिओप्लास्टी झाल्यापासून काही तरी खटकत होतं, त्याचा काल उलगडा झाला. दोन वर्षांपूर्वी काकांना छातीत दुखल्यासारखं झालं म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती केलं. अनघाचा रात्री नऊच्या सुमारास मला रडत रडत फोन आला, की परवा अँजिओग्राफी आणि गरज पडली तर लगेच अँजिओप्लास्टी करायला लागेल, तर तू पहाटेच निघ.’’

‘‘मला एकदम रडायला आलं. घशाला कोरड पडली, पण मी आवाजावर ताबा ठेवला. कारण चुलतभाऊ  विक्रांत परदेशी, काकूला रक्तदाब, अनघा त्या वेळी एकटी पडली होती. माझ्या रडण्यानं तिचा धीर सुटेल म्हणून माझ्या भावना आवरून मी शांतपणे बोलले, काकांची तब्येत आता स्थिर असल्याची खात्री करून घेतली, पैशांची चौकशी केली. ती अडचण नव्हती, पण कमी पडायला नको म्हणून सकाळी बँक उघडल्या-उघडल्या पैसे काढून मी नाशिकची गाडी पकडली, यात पोहोचायला दुपार झाली.’’

‘‘काकांचा माझ्यावर फार जीव. ‘राही आली का?’ असं ते पुन:पुन्हा विचारत होते. त्यामुळे ‘पहाटे पहिल्या गाडीनं का निघाली नाहीस?’ असं अनघानं आल्या आल्या विचारलं. ‘पैसे काढायला थांबले होते’ म्हणून सांगितल्यावर ती वैतागली. ‘पैसे आहेत म्हटलं होतं मी तुला, पण कुणाचं ऐकशील तर तू राही कसली? तू ठरवशील तेच खरं, इथे कुणाचा जीव का जात असे ना,’ असं फटकारून म्हणाली, मला वाईट वाटलं, पण ती वेळ वादावादीची नव्हती. ती ताणात आहे, हे मी समजून घेतलं.

अँजिओप्लास्टी होऊन काका घरी आल्यावर मी आठवडाभर सोबत थांबले, पण त्या वेळीही अनघा मोकळेपणानं बोलत नव्हती. ती पटकन दडपण घेते, त्याच त्या विचारांत फिरत कुढत राहते. हे माहीत असल्यामुळे मी दुर्लक्ष केलं.’’

‘‘मग आता दोन वर्षांनी गैरसमज कुठून उगवला?’’ मानसीला कळेना.

‘‘अगं, काल आमचा आतेभाऊ  शेखर आला होता. अनघाचा माझ्याबद्दल गैरसमज झालेला सांगून त्याने तिचे शब्द सही सही सांगितले, त्यामुळे मी विलक्षण अस्वस्थ झालेय.’’

‘‘काय म्हणाली अनघा?’’ मानसीनं विचारलं.

‘‘काकांना अ‍ॅडमिट केल्याचं सांगताना फोनवर मी एवढी रडत होते, पण राहीचा आवाज थंड होता. काहीही तपशील विचारला नाही, असं म्हणाली. इथे काकांनी राहीच्या नावाचा जप लावला होता, ही निवांत दुपारी पोहोचली. बँकेतून पैसे काढण्याची काय गरज होती? ‘मला पैशांची कमी नाही आणि काकांसाठी मी काहीही करीन’ हेच दाखवायचं असणार ना? माझे वडील आहेत, मी पाहीन ना बिलाचं.  काकांची काळजी असती तर पहिल्या गाडीनं आली असती..’ काही काही बडबडत होती म्हणे.’’

‘‘तुझा काकांवर एवढा जीव असताना बँकेत वेळ का घालवलास? मलाही खटकलं.’’

‘‘अगं, त्याला कारण पूर्वानुभव. आदल्या वर्षी माझी मावशी याच परिस्थितीतून गेली होती. त्यामुळे अनघानं जेवढं सांगितलं, त्यावरून पुढचं सगळं लख्खच दिसलं मला. तपशील विचारण्याची गरज वाटली नाही. मावशीच्या वेळी ‘अगदी ताबडतोब ऑपरेशन गरजेचं नाही, आठवडय़ाभरातली सोयीची तारीख सांगतो,’ असं डॉक्टर म्हणाले. मावशीचे यजमान, अण्णाकाका अतिशय भित्रे. आधीच आजाराचं दडपण, घर-हॉस्पिटल चकरा, मनुष्यबळ कमी त्यात एवढी मोठी रक्कम घरात नको, तारीख ठरल्यावर बँकेतून काढू, असं त्यांनी ठरवलं आणि शनिवारी दुपारी डॉक्टरांनी अचानक सांगितलं की ‘सोमवारी सकाळचा पहिला स्लॉट मोकळा झालाय, करून टाकू ऑपरेशन.’ म्हणजे रविवार संध्याकाळपर्यंत पैसे भरायलाच हवेत. बँका बंद झालेल्या. ऐन वेळेला कुणाकुणाकडे मागून, थोडं सोनं गहाण ठेवून रक्कम उभी करावी लागली. बँकेत स्वत:चे पैसे असताना निष्कारण दडपण आणि मागामागीची वेळ. बरीचशी धावाधाव मीच केली. तेव्हापासून धडा घेतला. हॉस्पिटल म्हटलं की हातात पुरेशी रोख रक्कम पाहिजेच, ऐन वेळी काहीही घडू शकतं. काकांची तब्येत स्थिर आहे याची खात्री करून घेऊनच मी थांबले. पण माझ्या वागण्याचं कारणही न विचारता अनघानं केवढा वेगळा अर्थ लावला. काकांचा माझ्याकडे ओढा आहे याच्यावर जळतेच ती पहिल्यापासून. तिनं संधी घेतली, माझ्याबद्दल नातेवाईकांमध्ये पसरवत बसलीय गेली दोन र्वष. एवढा राग येतोय, वाटतंय, नाशिकला जाऊन हडसून-खडसून विचारावं, चांगलं सुनवावं तिला.’’

‘‘त्यानं  गैरसमज संपेल? ’’

‘‘मग करू काय मी? एवढा विषारी गैरसमज.. काहीच न करता सोडून द्यायचं?..’’

‘‘शांत हो राही, हे घडून दोन र्वष झालीयत. तुला माहीत नव्हतं इतकंच. आधी तुला त्रास नक्की कशाचा होतोय ते शोधू, त्याने तुझी अस्वस्थता कमी होईल.’’

‘‘मी मावशीच्या ऑपरेशनच्या अनुभवामुळे थोडा व्यावहारिक विचार केला. अनघा घाबरेल म्हणून माझ्या भावनांचं प्रदर्शन केलं नाही, मी पैशाचा मोठेपणा दाखवणारी नाही हे अनघालाही नक्की माहितीय. तरीही  असं गृहीत धरावं?’’

‘‘खरं आहे, पण अनघा कुढी आहे, बोलून मोकळी होत नाही, धरून बसते हे तुलाही पहिल्यापासून माहीतच आहे. आता तू का घाई करते आहेस? तू तर व्यवहारी आहेस ना? त्रयस्थपणे पाहिलं तर अनघाच्या वाटण्यात तथ्य आहे. मावशीच्या आजारपणाचा संदर्भ माहीत नसेल, तर तुझं वागणं भावनाशून्य, अतिव्यावहारिक वाटूच शकतं. आठवडाभर काकांकडे असतानादेखील तू अनघाशी संवाद कुठे साधलास? नाराजीचं कारण कुठे विचारलंस? ‘ती पहिल्यापासून कुढीच आहे,’ असं म्हणून तूही दुर्लक्ष केलंसच ना? तुझीही तेवढी जबाबदारी येतेच यात.’’

‘‘त्या वेळी काकांचं करायचं की स्टोऱ्या सांगत बसायचं? शिवाय हिच्या डोक्यात असं काही तरी असेल असं तर सुचलंही नाही.’’

‘‘कारण तू नेहमीच योग्य ते निर्णय घेतेस याबद्दल घरात काकांसह सर्वाना विश्वास आहे, कौतुक आहे. वागण्याचं समर्थन देण्याची वेळ तुझ्यावर सहसा येत नाही. उलट अनघा कुढी, भित्री, इश्यू करणारी असं कुटुंबाचं मत. नेमका तिथे तुझ्यावर अनघाकडून प्रहार झाल्यामुळे तुला जास्त त्रास होतोय. हो ना?’’

‘‘आणि काकांनाही असंच वाटलं असेल तर? ’’

‘‘काका तुला ओळखतात, यावर विश्वास ठेव, पण अनघाचं दुखावलं जाणं जाणवल्यावर तू मावशीच्या अनुभवाबद्दल आणि एकूणच तिच्याशी बोलायला हवं होतंस. ते तू आताही करावंसं आणि तेही सुनवायचं नाही किंवा समर्थन दिल्यासारखंही नाही, तर वस्तुस्थिती म्हणून सांगायचं.’’

‘‘ती मान्य नाही करणार. आयतं कोलीत हातात मिळालंय माझ्याविरुद्ध. तिला पटणारच नसेल तर बोलण्याचा उपयोग काय?’’

‘‘आता तू गृहीत धरतेयस, नाही का? माझ्या मते तुझ्यापुढे तीन पर्याय आहेत. पहिला, ‘मी का बोलू? माझं बरोबरच होतं’ म्हणत, मनात खदखदत अनघाचं मत बदलण्याची कितीही र्वष वाट बघायची.

दुसरा, ‘राही व्यवहारी, भावनाशून्य, मी हळवी’ असं अनघा गेली दोन र्वष पसरवतेय, तसंच ‘अनघा कुढी, माझ्यावर जळते’ याचं गॉसिप तूही करायचंस.

आणि तिसरा, ‘बहिणीचा हात हातात घेऊन, तक्रारी बाजूला ठेवून तिच्याशी ‘समर्थन किंवा आरोपाशिवाय’ आपलेपणाचा ‘संवाद’ करायचा. एकदा प्रामाणिकपणे भूमिका सांगणं हे स्वत:साठी करायचं, कारण या प्रसंगात असलेली तुझी थोडी जबाबदारी तुला आतून अस्वस्थ ठेवील. ‘अनघानं पटवून घेतलंच पाहिजे’ हा आग्रह तू असाही धरू शकत नाहीस. ती अपेक्षा पूर्ण होईल किंवा नाही होणार, पण संवादामुळे तुझी जबाबदारी ‘पूर्ण’ होते. तू मोकळी होतेस. म्हणून तुझी निवड तू करायचीस. अनघानं तुझं म्हणणं समजून घेऊन मोकळं व्हायचं की त्यात अडकून बसायचं ही निवड तिची आहे.’’

राहीला पटल्याचं जाणवलं तसं मानसी आश्वस्थ झाली.

नीलिमा किराणे 

neelima.kirane1@gmail.com