‘‘या घरात मी परकीच’’

अजूनही त्या कचऱ्याच्या पायघडय़ा फेकून देणं तुझ्याच हातात आहे.

‘‘मी’ आणि ‘ते’ अशा पद्धतीनं जेव्हा तुझं मन विचार करतं, तेव्हा तुझ्याही मनात सासर परकंच असतं. मग परिणाम काय घडतायत? काय घडायला हवेत? ते बाजूला पडून, ‘वरचढ कोण?’ एवढाच मुद्दा उरतो. त्यासाठी ‘मला परकी मानतात’ हे तुझं गृहीतक सिद्ध करणारे प्रसंग तुला लक्षात ठेवावे लागतात आणि ‘माझंच बरोबर, मीच का नमतं घ्यायचं? अशा तथाकथित स्वाभिमानाच्या सापळ्यात अडकलं की पुढची वाटचाल कठीण होते.’’ मानसीनं कविताला वास्तवाची जाणीव करून दिली..

‘‘मला सासरच्यांनी कधीच आपलं मानलं नाही. ‘आम्हाला मुलगी मिळाली’ असं लग्न ठरवताना सासूबाई म्हणाल्या असल्या, तरी शेवटी मुलगाच आपला असतो. माझी चूक झाली तर बदाबदा बोलतील, पण तेच मुलानं केलं तर अवाक्षर नाही. सुनेकडून सगळ्या अपेक्षा, पण एखाद्या निर्णयात तिचं मत कधी विचारात घ्यायचं नाही. सुनांचं नशीबच असं. कितीही जुन्या झाल्या तरी शेवटी परक्याच.’’ बऱ्याच वर्षांनी मानसी भेटल्यावर कविता बोलतच सुटली होती.

‘‘अगं, एकदम ‘सगळ्या सुना परक्याच’ एवढय़ा जागतिक भाष्यापर्यंत कुठे पोहोचतेस?’’

‘‘तसं आहेच ते. लग्नापासून पाहतेय, त्यांच्या घरातल्या कशाबद्दल तरी सतत धुसफूस चालू असायची, मी आले की सगळे एकदम गप्प व्हायचे किंवा विषय बदलायचे. तेव्हा नवी सून होते, काही बोलू/विचारू शकले नाही. पण एवढय़ा वर्षांनीही तेच. ‘तुझ्या वागण्यानं सर्वाना आपलंसं कर’ अशी आईची शिकवण होती. मी आजपर्यंत सासरच्या सर्वाचं मनापासून केलं, करेन. पण माझी मदत हक्कानं गृहीत धरतात, त्यांचे प्रॉब्लेम विचारल्याशिवाय सांगत नाहीत, सांगितल्यावर मी काही सुचवलं तरी दुर्लक्ष, नेहमी त्यांचंच खरं करतात. नवरासुद्धा तसाच.’’

‘‘काय लपवतात तुझ्यापासून?’’

‘‘पूर्वी नणंदेच्या सासरच्या अडचणी असायच्या, आता दिराचा बुडीत व्यवसाय. पूर्वी मी गप्प असायचे, पण राहवेना तेव्हा हळूहळू बोलायला लागले. दिराला मदत करायला हरकत नसते, पण माझ्या माहेरच्या व्यवसायाच्या अनुभवातून सांगते. दिराच्या धंद्याला भवितव्य नाही, तो बंद करायला पाहिजे, असं म्हटलं की चिडतातच सगळे. त्यांचं शेतकरी कुटुंब, पुरुषांचा वरचष्मा. धंद्याचा अनुभव नाही. माझा नवरा एकटाच खूप शिकून नोकरीला लागला. दीर फसवा नाही, पण स्वप्नात रमणारा. भावाकडून पैसे येतायत म्हटल्यावर आर्थिक शिस्त पाळत नाही. ते सुधारावं म्हणून आपलेपणानं बोलते, पण मी परकी. माझं कोण ऐकेल? भावाला पैसे दिल्याचा पत्ता लागू देत नाही माझा नवरा, पण मी शोधून काढतेच. यांच्या घरातल्या अडाण्यांपेक्षा खूप जास्त शिकलेली आहे मी. पण अशा वेळी फार एकटं वाटतं त्या घरात.’’

‘‘आणि ‘मी परकीच’वाल्या प्रसंगांची माळ वाढत राहते.’’

‘‘हो. माझ्यासाठी नेहमी वेगळा न्याय असतो. मी एखादी उपयोगी वस्तू हौसेनं आणली तर मी ‘उधळी’. आख्खं घरदार मला टोमणे मारणार. नवऱ्यानं-दिरानं मात्र काहीही महागडं आणलं की कौतुक. अगदी अनावश्यक, फालतू वस्तू असेल तरी एका शब्दानं बोलणार नाहीत. खूप र्वष सहन केलं, पण हल्ली चिडले की मला भान राहात नाही, वाट्टेल ते बोलते. ’’

‘‘असं सतत होतं?आनंदाच्या वेळा नसतातच ?’’

‘‘तसं नाही गं, नॉर्मल असतोच ना आम्ही. पण असे प्रसंग मला पटकन विसरता येत नाहीत. ’’

‘‘तुला असं नाही वाटत की, लग्नानंतर आल्याआल्या नव्या सुनेला घरातल्या कटकटी सांगणं सासरच्यांनी त्यावेळी टाळलं असेल आणि नंतर तुझा विरोध, आरडओरडा नको म्हणून टाळत असतील?’’

‘‘म्हणजे त्यांचं परकेपणाचं वागणं बरोबर का?’’

‘‘मला वाटतं कविता, तुझ्या आणि त्यांच्या मनातल्या आपलेपणाच्या व्याख्येत फरक असावा. तुझ्या माहेरी ज्या सहजपणे तू ‘आपली’ असतेस त्याच्या जवळपासच्या वातावरणाची तुझ्या मनात सासरकडूनही अपेक्षा असणार. तुझ्या माहेरी तू सर्वाची लाडकी, विचारी, स्पष्टवक्ती. तुझ्या मताचाही विश्वासाने, गांभीर्याने विचार होतो. या पाश्र्वभूमीतून माहेरसारखा ‘कम्फर्ट झोन’ मिळाला तरच सासरच्यांनी मला आपलं मानलं अशी काहीशी ‘आपलेपणाची’ व्याख्या तुझ्या मनात असावी. मात्र सासरी परिस्थिती उलट. निर्णयात पुरुषप्रधानता, तुझ्या शिक्षणाचा, आधुनिकपणाचा थोडा न्यूनगंड, आकसही असू शकतो. त्यामुळे नवीन असताना माहेरच्या व्यक्ती सन्मानाच्या तुलनेत सासरच्या घरात आपल्याला स्थानच नाही असं तुला वाटलं असणार. त्यामुळे ‘मला परकी मानतात’ हे मत तू आपलंसं केलंस. तसं पाहिलं तर त्यांच्या घरचा खेडवळ, मागासलेपणा, दिराबद्दलची नाराजी यामुळे तूही माहेरच्यांसारखं  त्यांना ‘आपलं’ कुठे मानलंस? सुरुवातीला खूप गप्प बसलीस, नंतर खूप त्रागा केलास. यामुळे तुझ्या वागण्यावर टीकेचा फोकस सोपा गेला.’’

‘‘कुणी ऐकून घेणारच नाहीत अशा खात्रीमुळे जास्त जोरात सांगितलं जातं.’’

‘‘तरीही ओरडून सांगितल्यामुळे तुझं ऐकावंसं वाटेल की मुद्देसूदपणे सांगितल्याने? तू तुझ्याकडून नीट संवाद केलास, दिराचा व्यवसाय बंद करण्याचा कारण-परिणामांसह डाटा देऊन, वस्तुनिष्ठपणे मांडलंस, नवऱ्यासोबत खर्चाच्या प्राधान्यक्रमांची चर्चा केलीस, तर किमान विचार तरी करतील. तरीही त्यांना नसेलच ऐकायचं, तर तू चिडचिडीपलीकडे असंही काही करू शकत नाहीस.’’

‘‘हं. तू उलगडून सांगितल्यावर पटतंय थोडं, पण यांच्याकडे मला टोमणे फार मारतात गं.’’

‘‘तू कधीच परतफेड करत नाहीस?’’

‘‘ हल्ली परतफेड करते. छुपं युद्धच चालू राहतं.’’

‘‘टोमण्यांच्या खेळाची एक गंमत असते कविता. टोमण्यांची शक्ती ही नेहमी समोरचा प्रतिस्पर्धी ते मनाला किती लावून घेतो यावर असते. एखाद्याने मनाला लावून घेऊन रडका किंवा चिडका प्रतिसाद दिला की मारणाऱ्याला प्रतिस्पध्र्याचं वर्म नेमकं समजतं. समोरच्याचा लगामच हातात येतो. याउलट टोमणे जर कळलेच नाहीत, जिव्हारी लागलेच नाहीत तर टोमण्यांची शक्तीच संपते. टोमण्यांचा त्रास मुळापासून संपवायचा असेल तर शब्दांचा अर्थ कसाही लावता येतो हे लक्षात घ्यायचं. ‘त्यांना तसंच म्हणायचं होतं’ऐवजी ‘तसं नसेल म्हणायचं’ असं समजायचं. ’’

‘‘म्हणजे  हार मानायची. मीच का पडतं घ्यायचं?’’

‘‘मग त्यांनी तरी का तुझं ऐकायचं?’’

‘‘कारण माझं बरोबर आहे.’’

‘‘त्यांच्या मते त्यांचं पण बरोबरच आहे. तू त्यांच्यापेक्षा जास्त शिकलीयस त्यामुळे ‘जादा शहाणपणा दाखवतेस’ असं त्यांचं मत असणार.’’

‘‘अगं, तू कुणाच्या बाजूनं आहेस?’’

‘‘मी कुणाच्याच बाजूची नाहीये, फक्त तुला दुसरी बाजू दाखवतेय. ‘मी’ आणि ‘ते’ अशा पद्धतीनं जेव्हा तुझं मन विचार करतं, तेव्हा तुझ्याही मनात सासर परकंच असतं. मग परिणाम काय घडतायत? काय घडायला हवेत? ते बाजूला पडून, ‘वरचढ कोण?’ एवढाच मुद्दा उरतो. त्यासाठी ‘मला परकी मानतात’ हे तुझं गृहीतक सिद्ध करणारे प्रसंग तुला लक्षात ठेवावे लागतात. कुठल्याही शब्दातून हवे ते अर्थ काढावे लागतात. अर्थात सासरचेसुद्धा ‘तू जादा शहाणी आहेस’ हे सिद्ध करणारे प्रसंग शोधतात. पूर्वीच्या सर्व प्रसंगांच्या संदर्भाचा, दारूगोळ्यासारखा साठा दोघांकडूनही केला जातो. आनंदानं जगण्याच्या मध्ये येणारा कचराच असतो तो दारूगोळा. पण ‘माझंच बरोबर, मीच का नमतं घ्यायचं? अशा तथाकथित स्वाभिमानाच्या सापळ्यात अडकलं की पुढची वाटचाल अशा साठवलेल्या कचऱ्याच्या पायघडय़ांवरूनच करावी लागणार हे निश्चित.’’

‘‘..पण मग करायचं काय?’’

‘‘तुमच्या एकत्र येण्याचा मकसद हा युद्ध करून जिंकणं होता, की बारीकसारीक प्रसंगांना मोठं करून दु:खी राहायचं होतं? की प्रत्येकाला आपापली स्पेस मिळून आनंदानं जगायचं होतं? हा प्रश्न एकदा विचार स्वत:ला. सर्वात महत्त्वाचं काय आहे ते ठरवता नाही आलं, तर आणखी १५ वर्षांनीसुद्धा ‘मी परकीच’मध्ये असशील आणि कदाचित ४० वर्षांनी पांढऱ्या केसांची, भकास चेहऱ्याची तू ‘सुना मला आपलं मानत नाहीत’मध्ये गुरफटलेली असशील. मनाला व्यापणारी तेवढी गृहीतकं नसती तर खूप आयुष्यात मजा आली असती असं तुला शेवटच्या क्षणी वाटलं तर गं?’’

‘‘एवढा टोकाचा विचार? घाबरवू नको गं.’’

‘‘टोकाला गेल्याशिवाय विषयाची तीव्रता पोहोचतच नाही. अजूनही त्या कचऱ्याच्या पायघडय़ा फेकून देणं तुझ्याच हातात आहे. ‘मी परकी’च्या पूर्वग्रहाचा पिवळा चष्मा काढून पाहिलंस तर त्या त्या प्रसंगांतल्या इतर अनेक छटा दिसतील. तुझ्याच मनातल्या पूर्वग्रहांनी तूच घायाळ होतेयस हे दिसेल. तुझ्या व्याख्येप्रमाणे सासरच्यांनी तुला आपलं मानलं नसेल, पण तुला वाटतंय तसं १०० टक्के परकंही मानलेलं नाही, त्या त्या वेळच्या त्यांच्या वागण्याची इतरही कारणं होती हे जाणवल्यावर बराच आकस कमी होईल. तक्रार सोडून स्वीकाराच्या आनंदी आयुष्याचं चित्र ठळकपणे पाहिलंस तर तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ताही नक्की दिसेल. फक्त तू निर्धारानं ठरवायला हवंस.’’ कविताच्या चेहऱ्यावरचं उमजलेपण मानसीला स्पष्ट जाणवलं.

neelima.kirane1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Conversation in family

ताज्या बातम्या