वेगळं (खरंच) व्हायचंय मला?

‘‘कशावरून भांडायचात?’’

‘‘ते आणि आम्ही, हार आणि जीत असा विचार म्हणजे दोन अहंकारांमधलं युद्ध. मग तह केला तरी मनातलं युद्ध सुरूच राहतं. आपण आपल्या जवळच्याला दुखावलंय, हे जाणवून त्याला ‘मनापासून सॉरी’ म्हणायला, आपल्या वागण्याची जबाबदारी घेऊन स्वत:वरचा ताण मोकळा करायला ‘आधी कोण?’ हा प्रश्नच कशाला? आपल्याला नेमकं काय हवंय? खरंच वेगळं व्हायचंय का? हा प्रश्न आधी स्वत:लाच विचारायला हवा.’’

‘‘आमच्या लग्नाला तीन र्वष झाली, त्यातली गेली दोन र्वष मी माहेरीच आहे. ही अवस्था असह्य़ होतेय. सतत डोकं दुखतं. कशाहीमुळे प्रचंड संताप होतो. खूप आदळआपट करते. काल ऑफिसमधल्या सहकाऱ्याशी क्षुल्लक गोष्टीवरून खूप भांडले. नंतर जाणवलं की, ताण सहन करण्याची शक्ती संपलीय, म्हणून तुमच्याकडे आले.’’ तिनं प्रस्तावना केली.

‘‘मोकळेपणानं सगळं सांगशील?’’

‘‘आमचा प्रेमविवाह, माझ्या माहेरच्या दोन गल्लय़ांपलीकडे त्याचं घर. दोन-तीन वर्षांच्या मैत्रीनंतर लग्न करावंसं वाटलं. दोन्हीकडे फारसं पसंत नसलं, तरी अतिरेकी विरोधही नव्हता. त्यामुळे लग्न झालं. महिना-दोन महिने चांगले गेले; पण हळूहळू काही तरी खटकायला लागलं. माझ्याशी तासन्तास गप्पा मारणारा, न सांगताही माझी इच्छा ओळखणारा माझा प्रियकर नाहीसा होऊन स्वत:च्या घरच्यांना पहिलं प्राधान्य देणारा, माझ्याकडून सतत कामाची, प्रत्येकाची मर्जी सांभाळण्याची अपेक्षा करणारा नवरोजी दिसायला लागला. सासरचे लोक माझ्यामागे तक्रारी, कुरकुर करत असावेत. त्यांचं सगळं खरं मानून कुठल्याही क्षुल्लक कारणावरून तो भांडायचा. माझ्यावर त्याचा विश्वासच उरला नाही. त्याचं हे रूप अनपेक्षित होतं.’’

‘‘कशावरून भांडायचात?’’

‘‘कशाहीवरून. आमच्या लग्नात माझ्या माहेरच्यांनी मानपान नीट केले नाहीत हे नेहमीचं पालुपद. खरं तसं नव्हतं, आई-बाबांनी ठरल्याप्रमाणे सगळं केलं होतं. त्यामुळे सासरच्यांचे टोमणे मला सहन व्हायचे नाहीत. माझ्या स्वयंपाकाची त्यांच्यापेक्षा वेगळी चव हे एक निमित्त. मी काहीही केलं तरी कुणी तरी नाराजच असणार. न राहवून कधीकधी मी आईकडे बोलायचे. यातून दोन्ही घरी एकमेकांची उणीदुणी काढणं सुरू झालं आणि बिनसतच गेलं सगळं. मग पहिल्या दिवाळसणाची गिफ्ट फालतू दिली म्हणून रुसाफुगी, अबोला. विसंवाद वाढतच गेला.

वैतागून माहेरी यायचे, थोडय़ा दिवसांनी कोणी तरी समेट करून द्यायचं. दोन वर्षांपूर्वी अशीच एकदा कंटाळून माहेरी आले ती परत गेलेच नाही, त्यांनीही बोलावलं नाही.’’

‘‘नंतर कधीच भेटला-बोलला नाहीत तुम्ही?’’

‘‘संध्याकाळी ऑफिसातून येण्याच्या दोघांच्या वेळा साधारण सारख्याच असल्यामुळे काही दिवसांनी आम्ही दोघं कधीकधी बोलायला लागलो; पण त्याच्या घरच्यांना आम्ही बोललेलं आवडत नाही. माझा नवरा वडिलांना, मोठय़ा दिराला घाबरतो. त्यामुळे लग्नाचे नवराबायको असूनही आमचा संवाद चोरटाच.’’

‘‘एकत्र येण्यासाठी काहीच प्रयत्न नाहीत?’’

‘‘पूर्वी बैठका झाल्या, पण काहीच घडलं नाही.’’

‘‘तुझ्या घरचे काय म्हणतात?’’

‘‘ते म्हणतात, आम्ही खूप वेळा पड खाल्ली, पण आता अपमान करून घ्यायला त्यांच्या दारात पाय ठेवणार नाही. पसंत नसतानाही तुझ्यासाठी करून दिलं, मानपान केले, खूप झालं. आता तुला न्यायला आले तर पाठवू. विभक्त झालीस तरीही आम्ही तुझ्या सोबत असू. तुम्ही दोघं ठरवा.’’

‘‘तुझा नवरा का नेत नाही तुला?’’

‘‘बैठकांनंतर एक-दोनदा त्याला विचारलं तर म्हणाला, ‘आपलं जमणार नाही हे अनेकदा सिद्ध झालंय.  माझ्या घरच्यांशी तुला जमवून घेता येत नाही, मी घर सोडू शकत नाही. तुझ्या घरच्यांना तर समुपदेशनाचीच गरज आहे.’ यावर मी भडकले. मोठ्ठं भांडण झाल्यावर तो विषयच बंद झाला.’’

‘‘हं! घरच्यांच्या अपेक्षांप्रमाणे तू बदलणं हा इगो इश्यू करून घेतला त्यानं. त्यामुळे तुला आहेस तशी स्वीकारणं जमलं नसणार, हे समजून घ्यायला हवं त्यानं. दोन्ही घरं परिणाम भोगतायत.  तुमच्या दोघांच्या तारुण्यातली सुंदर र्वष वाया जातायत, याचं गांभीर्य घरच्यांनाही नाही आणि तुम्हालाही नाही हे गंभीर आहे. सगळेच जण अहंकार आणि गैरसमज कुरवाळत आहात. या अधांतरी अवस्थेचा शेवट कुठे होईल?’’

‘‘माहीत नाही. माझ्या हातात फक्त वाट पाहणं आहे.’’ तिचे डोळे भरून आले.

‘‘अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस?’’

‘‘लग्नाआधीची सुंदर र्वष आठवत राहतात. तो हरवलेला प्रियकर  परत येईल म्हणून वाट पाहतेय.’’

‘‘तुझ्याकडून काही वागायचं- बोलायचं चुकलं असेल तर तसं सासरच्यांशी बोलून जुळवून घेणार आहेस का?’’

‘‘आम्हीच का माफी मागायची?’’

‘‘ते आणि आम्ही, हार आणि जीत असा विचार म्हणजे दोन अहंकारामधलं युद्ध. मग तह केला तरी मनातलं युद्ध सुरूच राहतं. पहिल्या वर्षभरातल्या भांडणांमध्ये दोन्ही बाजूंचं भान सुटलं असणार, गैरसमज धरून ठेवले असणार, अहंकार, प्रश्न दोघांनीही मोठ्ठे केले असणार. त्याशिवाय इतकं टोकाला जाणार नाही; पण तुम्ही दोघं किती र्वष स्वत:च्या किंवा घरच्यांच्या अहंकाराभोवती फिरत तेवढंच खेळत राहाल? कुणी तरी विचारांची दिशा बदलायला हवी. आपण आपल्या जवळच्याला दुखावलंय, हे जाणवून त्याला ‘मनापासून सॉरी’ म्हणायला, आपल्या शब्दांची, वागण्याची जबाबदारी घेऊन स्वत:वरचा ताण मोकळा करायला ‘आधी कोण?’ हा प्रश्नच कशाला? आणि सासरचे तुला नाकारणारच, ही भीती मनातली की अनुभवातून आणि सारासार विचारातून आलीय?’’

‘‘….’’

‘‘हे ठरवता येत नसेल तर पुन्हा एक संधी घेऊन पाहावी लागेल. कदाचित तू स्वत:हून परत येण्याची ते वाटही पाहात असतील.’’

‘‘एक वेळ मनाची तयारी करून मी परत जाईनही, पण घरच्यांच्या विरुद्ध जायची हिंमत नवऱ्यात नाही.’’

‘‘तशी खात्री असेल तर विभक्त होण्याचा निर्णय का घेता येत नाही तुला?’’

‘‘लग्नापूर्वीचे प्रेमाचे दिवस खूप खरे होते. एवढं होऊनही माझ्या मनात दुसऱ्या कुणाचा विचार आला नाही, तोही नेहमी एकटाच दिसतो. त्यामुळे गुंतून राहिलेय कदाचित.’’

‘‘हं! प्रेमाच्या त्या दिवसांत अडकून पडलीयेस, जे नंतर कधीच परत आले नाहीत. उलट तीन र्वष अतिशय गढूळ वातावरणात गेलीत. असं आणखी किती र्वष? आता भावनेतून बाहेर पडून विचारांवर यायला हवं गं! डोळे उघडून वस्तुस्थितीला सामोरं जायला हवं. स्वत:ला प्रश्न विचारायचे. म्हणजे बघ, ‘अशी काय जादू होऊन एके दिवशी अचानक सगळं सुरळीत होईल?’, ‘आज माहेरचे तुझ्यासोबत आहेत, पण तुझी चिडचिड, कायमचा लांब चेहरा, तब्येतीच्या तक्रारी, दडपणाची परिस्थिती ते किती र्वष सहन करतील? आणि कशासाठी?’, ‘काही तरी निर्णय घ्यायला हवा’ ही तीव्रता तुला चार-पाच वर्षांनी जाणवली तर फुकट गेलेल्या उमेदीच्या वर्षांचं काय?’’

‘‘तेही कळतं, शिवाय लोक म्हणतील, प्रेमविवाह करून निभावता आला नाही.’’

‘‘लोकांच्या म्हणण्या/ न म्हणण्यामुळे तो निभावता येणार आहे का? त्यापेक्षा गंभीर आहे ते तुझं मन:स्वास्थ्य संपणं. तुझी डोकेदुखी, संताप, स्वत:वरचा ताबा सुटणं हे  इंडिकेटर्सआहेत गं! सावध व्हायला हवं. एकत्र किंवा विभक्त यापैकी कोणता तरी एक निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा. निश्चित भूमिका घ्यायला तुम्ही दोघंही घाबरताय. आता पुढाकार घेऊन एकदा शेवटचं बोल त्याच्याशी. एकत्र येण्याची तीव्र इच्छा दोघांचीही असेल, एकमेकांशिवाय जगणं अशक्य वाटत असेल तर अहंकार बाजूला ठेवता येतो. नाही तर जाणारा प्रत्येक दिवस दोघांचीही उमेद खच्ची करतो. वेगळं होण्याच्या दु:खापेक्षाही ते भयंकर असतं.’’

‘‘तेच भोगतेय रोज.’’

‘‘तुला सासरच्यांशी जमवून घेता येणारच नाही किंवा सासरचे तुला नाकारणारच आणि घरच्यांविरुद्ध जाण्याची किंवा घर सोडण्याची हिंमत आपल्यात नाही हे माहीत असल्यामुळे तुझा नवराही ओढ विसरला असेल, तर तुझ्यापुढे पर्याय काय उरतो?’’

‘‘पण.. घटस्फोट?..’’

‘‘लग्न किंवा घटस्फोट, या फक्त घटना असतात गं! घटनेत चांगलं किंवा वाईट काही नसतं. ते घटनेच्या परिणामांवर ठरतं. एक कठोर पण वस्तुनिष्ठ प्रश्न स्वत:ला विचारून पाहा, ‘त्यातल्या त्यात कुठला पर्याय सोपा आहे? सध्याच्या गोंधळलेल्या, भित्र्या, अनिर्णयक्षम, कमावती असूनही परावलंबी, ना कुमारिका ना विवाहिता अशा दिशाहीन अवस्थेत जगणं? की जुनं विसरून सासरी परतून नव्यानं सुरुवात करणं? की विभक्त होऊन दुसरा मार्ग शोधणं?’ या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे शोधलंस तर निर्णय घेण्याचं बळ मिळेल. मग निर्णय कुठलाही घेतलास तरी आज आहेस त्यापेक्षा वेगळी, खंबीर असशील तू.’’

neelima.kirane1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Husband wife relationship