जाता जाता चार शब्द

वाचकहो, या सदराला आपण सर्वानी उदंड प्रतिसाद दिलात.

वाचकहो, या सदराला आपण सर्वानी उदंड प्रतिसाद दिलात. ई-मेल, फोनद्वारे देशभरातल्या आणि परदेशस्थ असंख्य मराठी वाचकांनी लेखमाला आवडत असल्याचं, समस्येतून बाहेर पडण्यासाठी दिशा मिळाल्याचं कळवलं. आपली जगाच्या पाठीवर कुणाला तरी, कुठेतरी मदत झाली याचं खूप समाधान मिळालं. अर्थात कौतुकासोबत काही आक्षेपही होते. ‘तुम्ही दोन्ही बाजूंनी लिहिता, कुठलंच ठोस मत, उपाय देत नाही’ किंवा ‘तुम्ही बरं लिहिता, पण स्त्रियांच्या बाजूनं लिहिता’ अशी नाराजी काहींनी व्यक्त केली. त्यांच्यासाठी जाता जाता चार शब्द.

नमस्कार. ‘संवादाने रचला पाया’ सदरातला हा शेवटचा लेख. आज मानसीच्या माध्यमाऐवजी तुम्हा वाचकांशी थेट संवाद करून वर्षभरातल्या प्रवासाबद्दल, भूमिकेबद्दल संवाद करते आहे.

‘माणसांमधली बिघडती नाती आणि ती आनंददायी होण्यासाठी विचारांत किंवा संवादात कसा बदल करायला हवा’ हेच सूत्र हे सदर लिहिताना समोर होतं. शिवाय वाचकांना वाचावंसं आणि उपयोगी वाटलं पाहिजे, थेट समुपदेशनाची पद्धत कंटाळवाणी होणार, या विचाराने वर्षभरातल्या २६ लेखांचं दडपण आलं होतं. पण संपादकांच्या सूचनेनुसार ‘फॉर्म’च्या दडपणातून बाहेर पडले अन् विचारांना दिशा मिळाली.

एखाद्या त्रासदायक इश्यूमध्ये आपण खूप काळ अडकून का बसतो? तर ‘मला वाटलं तसंच ते आहे आणि समोरच्या  व्यक्तीनं ते मान्य करावं’ यात आपण गरगरत असतो. ‘माझं कसं बरोबर आहे’ त्यापलीकडे दुसरा विचार, शक्यता आपल्याला सुचत नाही. आपल्या शब्द आणि देहबोलीतून जाणाऱ्या संदेशांकडेही आपण सहसा बघत नाही. स्वत:च्या त्या ‘वाटण्या’ला थोडा वेळ बाजूला ठेवून ‘समस्येची दुसरी बाजू दिसणं’ ही समस्या सुटण्याची सुरुवात असते. कारण त्यातून ‘जाणीव’ जागी होते. कथेतल्या पात्रांशी आपला कुठला तरी अनुभव, वेदना, भावना जुळतात तेव्हा कुठेतरी आंतर्दृष्टी (इनसाइट) मिळते, त्यानिमित्तानं स्वत:त डोकावणं घडतं. एखाद्या बिघडलेल्या नात्यात नेमकं काय घडलं होतं याचा त्रयस्थपणे उमज पडतो. मनातली गाठ सुटते म्हणून या सदरासाठी कथेच्या अंगानं केसस्टडी सांगण्याची पद्धत वापरून, संवादाच्या माध्यमातून इनसाइटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. एक-दोन लेखांनंतर वाचकांना ही पद्धत आवडतेय असा प्रतिसाद आला आणि संवादाचा फॉर्मही हातात आला.

‘समुपदेशक हा वाईट शब्द नाही’ हे सांगण्याचा एक उद्देशही खोलवर होताच. मध्यंतरी माझ्या कन्सल्टिंगच्या स्थलांतरानिमित्त चहापानाच्या कार्यक्रमासाठी सर्व निमंत्रित नातलग आणि मित्रपरिवार आला, मात्र प्रत्येकाशी इतकं जवळचं वैयक्तिक नातं असूनदेखील माझा एकही क्लाएंट फिरकला नव्हता. काहींना अडचणी असतील असं मान्य करूनही हा अघोषित बहिष्कार बरंच काही सांगून, अस्वस्थ करून गेला. ‘समुपदेशकाकडे तथाकथित ‘वेडे’ लोक जातात’ हा गैरसमज आजही समाजात घट्ट रुजलेला आहे. त्या भीतीमुळे ताण, निराशा आणणारी मनाची छोटीमोठी दुखणी लोक वर्षांनुवर्षे अंगावर (मनावर) काढतात. या दुर्लक्षामुळे जिथे वेळीच संवादातून मोकळं झालं असतं तिथे पुढे औषधं घेण्याची वेळ येऊ  शकते. समुपदेशकाकडे जाण्याबाबत टाळाटाळ आणि गुप्ततेची मानसिकता बदलून ती सहज घेण्यासारखी गोष्ट वाटली पाहिजे. त्यासाठी ‘मनोविकार’ नव्हे, ‘मनोविकास’ हा दृष्टिकोन रुजला पाहिजे. समुपदेशक म्हणजे गुप्तहेर, वकील किंवा न्यायाधीश किंवा परग्रहावरचा प्राणीही नसतो, फक्त मनाच्या घडामोडी त्रयस्थ आणि तटस्थपणे पाहायला शिकलेला, सर्वाचा मित्र असतो. हे स्पष्ट होण्यासाठी समुपदेशकाच्या भूमिकेसोबत कथेच्या गरजेनुसार जवळची मैत्रीण, मित्र, (मानस/मानसी) बहीण, मावशी अशाही भूमिका मी घेतल्या. या सदरातल्या कथा पूर्णपणे कुणा एकाच्या नव्हत्या पण सगळ्या खऱ्या होत्या. माझ्या रोजच्या कामात जास्तवेळा येणाऱ्या प्रश्नांचे, स्वभावांचे जे कॉमन पटर्न जाणवले ते मी जाणीवपूर्वक मांडत गेले.

वाचकहो, या सदराला आपण सर्वानी उदंड प्रतिसाद दिलात. इमेल, फोनद्वारे देशभरातल्या आणि परदेशस्थ असंख्य मराठी वाचकांनी लेखमाला आवडत असल्याचं, समस्येतून बाहेर पडण्यासाठी दिशा मिळाल्याचं कळवलं. (अनेकांना उत्तरं  पाठवण्याचं काम अजून बाकी आहे.) आपली जगाच्या पाठीवर कुणाला तरी, कुठे तरी मदत झाली याचं खूप समाधान मिळालं. अर्थात कौतुकासोबत काही आक्षेपही होते. ‘तुम्ही दोन्ही बाजूंनी लिहिता, कुठलंच ठोस मत, उपाय देत नाही’ किंवा ‘तुम्ही बरं लिहिता, पण स्त्रियांच्या बाजूनं लिहिता’ अशी नाराजी काहींनी व्यक्त केली.

याबाबत लेखांमध्ये शक्य तिथे मांडलेली भूमिका पुन्हा थोडक्यात मांडते. एकदोन लेख सोडल्यास मी विशिष्ट बाजू (स्त्रियांचीसुद्धा) घेतल्यासारखं वाटत नाही. कारण गणितासारखं एकमेव ठोस उत्तर कशाचंच नसतं, सगळं सापेक्ष असतं. व्यक्ती, स्वभाव, परिस्थिती आणि मतं, पूर्वग्रह, अपेक्षा अनेक घटक त्यामध्ये असतात. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून घटनेचे अर्थ लावतो. त्यानुसार चूक-बरोबरमध्ये उत्तर शोधून कुणातरी एकावर दोष टाकला की प्रश्न सुटला असं समजण्याची आपल्याला सवय असते. प्रत्यक्षात त्यामुळे तात्पुरतं समाधान झालं, तरी प्रश्न सुटत नाहीत. चिघळतात किंवा काही काळ दबले जाऊन दुप्पट जोमानं उलटतात. त्यामुळे योग्य की अयोग्य हे परिणामांच्या शक्यता तपासूनच ठरवायला हवं.

‘तुमचं म्हणणं पटलं तरी समस्या इतक्या पटकन थोडीच सुटतात? लेख वाचून सगळं सोपं वाटतं पण प्रत्यक्षात तुम्ही म्हणता तसा विचार करता येतो का?’ अशाही प्रतिक्रिया होत्या. ‘काहीच बदलू शकत नाही’ यावर ठाम विश्वास असेल तर नाहीच बदलू शकत काही. तो ‘इश्यू’ सोडवण्याची प्रामाणिक इच्छा आणि त्यासाठी स्वत:ला बदलण्याची तयारी नसते, आपल्या वागण्याची जबाबदारी घेण्याची भीती वाटते म्हणून तर वर्षांनुवर्षे गोष्टी साकळलेल्या राहतात. ते भूतकाळाचं बॅगेज, ओरखडे, गृहीतकं, समज सतत सोबत वागवण्याची जुनीपुराणी सवय सुटण्यासाठी आणि नव्या सवयी, दृष्टिकोन आपलेसे होण्यासाठी काही दिवसांचे तरी प्रयत्न हवेत! आपल्या समस्येच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आणि त्यातून सुटणं अशक्य वाटणाऱ्या माणसाला दुसरी बाजू दाखवून सकारात्मक शक्यता उमजण्यापर्यंत पोहोचवणं एवढाच प्रयत्न या लेखांच्या शब्दमर्यादेत शक्य होता.

‘तुमची मानसी उपाय सांगते, पण कधी कधी फक्त ऐकायला माणूस हवं असतं.’ अशीही एक खूप मनापासून आलेली प्रतिक्रिया होती. संवाद हवाच, पण त्यालाही अनेक कोन आहेत. आपण कुठल्या बोलण्याला ‘संवाद’ समजतो ते तपासायला हवं. कधीतरी पडलेल्या चऱ्यापाशी रेकॉर्ड वर्षांनुवर्षे अडकून तेवढीच वाजत असेल तर त्याला संवाद समजणं इथेच गडबड असते. ‘मला अमक्याशी संवाद करायचाय’ असं मनातल्या मनात म्हणत वाट पाहात राहणं किंवा प्रत्यक्ष संवाद न करता संवादाच्या गरजेबद्दलच वारेमाप शब्दांत बोलत राहणं दोन्ही निरुपयोगीच. समोरची व्यक्ती ऐकूनच घेत नाही असं वाटत असेल तर संवादाची पद्धत बदलावी आणि  अपेक्षा वस्तुनिष्ठ आहे ना? हे तपासायला हवं.

जाता जाता, आपल्या समस्येवर काम करताना काही तत्त्वं मनात पक्की हवीत. आपल्याला समस्या सोडवायची असेल तर प्रयत्न करण्याची, कृतीची जबाबदारी आपलीच असते, हेतू आणि प्रयत्न दोन्ही प्रामाणिक हवेत. लहानमोठय़ा प्रसंगांमधून मनातल्या विचारांच्या वावटळीमुळे अस्वस्थ, निष्क्रिय होणं,  भावना अनावर होणं हे समस्येचं मूळ दाखवणारे इंडिकेटर्स असतात. तिथलं स्वत:चं ‘वाटणं’ तपासून विचारांची दिशा बदलली पाहिजे. स्वत:चं समर्थन आणि दोषारोप दोन्हींना ‘ब्लॉक’ करून त्रयस्थपणे डाटा तपासला तर त्यातून निघणाऱ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला ‘सच और सही’ निर्णय देतात. स्वत:ला प्रश्न विचारण्याचं हे तंत्र प्रयत्नपूर्वक विकसित करता येतं. उदाहरणार्थ ‘मी बदलणार नाही, कारण माझं बरोबरच असतं. दुसऱ्यानं स्वत:ला ‘सुधारलं’ तरच माझी समस्या संपेल’ असं असू शकतं का?’ या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर नवा प्रश्न विचारतं, ‘म्हणजे दुसरा नाही सुधारला तर तुम्ही आयुष्यभर दु:खातच राहणार, म्हणजेच तुमच्या आनंदात किंवा दु:खात राहण्याचा निर्णय दुसऱ्याच्या हातात असणार का?’ हा नवा प्रश्न स्वत:ची भूमिका तपासायला भाग पाडतो. थोडंफार तथ्य दोन्ही बाजूंमध्ये असतं. पण आपलंच म्हणणं खरं समजून ‘तुझं कसं चुकतंय?’ ते ठासून सांगणं हा बोलण्या-वागण्यातला दृष्टिकोन विरोधाची मानसिकताच तयार करतो.

कुठल्याही गरगरत्या प्रश्नातून बाहेर येण्यासाठी लक्षात ठेवावीत अशी ही काही मूलभूत तत्त्वं जाता जाता सांगून नव्या वर्षांच्या शुभेच्छा देऊन तुमचा निरोप घेते. या लेखनामुळे मिळालेल्या भावनिक, वैचारिक समृद्धी आणि समाधानासाठी ‘लोकसत्ता’ परिवार आणि वाचकांची मी कृतज्ञ आहे.

 सदर समाप्त

 

नीलिमा किराणे

neelima.kirane1@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neelima kirane comment on lokrang articles experience

ताज्या बातम्या