साक्षात्कारी क्षण

गेलं वर्षभर राधा एकटीच होती.

‘‘स्तनाच्या कर्करोगामुळे राधाच्या मनात उलथापालथ झाली. पण, उद्या आपला एक सुंदर अवयव आपल्या शरीराला कायमचं अपूर्ण करून जाणार आहे. पण तोच जिवंत राहायला मदत करणार आहे. त्याला प्रेमानं निरोप द्यायला हवा, हे जाणवल्यानंतर प्रत्येक क्षण जाणिवेनं जगणं म्हणजे काय? ते तिला लख्ख उलगडलं. विलक्षण अंतज्र्ञान देणारे ते साक्षात्कारी क्षण तिला जगणं शिकवून गेले..’’ ऑक्टोबर महिना हा जगभर ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ’ म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने.. अनेक राधांच्या आयुष्यातील या साक्षात्कारी क्षणांविषयी.

‘राधाच्या शस्त्रक्रियेला महिना उलटून गेलाय. आज जायचंच तिला भेटायला.’ मानसीनं ठरवून टाकलं. गेलं वर्षभर राधा एकटीच होती. नवरा कामासाठी आणि मुलगा शिकण्यासाठी बाहेर. पण भरपूर काम, मित्र-मैत्रिणी आणि मधूनमधून येणारे आई-वडील यात गुंतलेली असायची. शस्त्रक्रियेबद्दल जवळच्या सर्वाना फोन करून कळवताना मात्र, ‘मी ठीक होईपर्यंत कुणी भेटायला येऊ नका बरं का. तुम्ही मला अंथरुणावर पाहिलेलं मला आजिबात आवडणार नाही.’ असंही तिनं आवर्जून सांगितलं होतं. त्यामुळे फोनवर संपर्क असला तरी मानसी आज तिला प्रथमच भेटणार होती.

‘‘कशी आहेस? फ्रेश दिसतेयस.’’

‘‘छान आहे. बॅक टू लाइफ.’’ राधा म्हणाली.

‘‘एवढं मोठं दुखणं.. भेटायला पण नको म्हणालीस..’’

‘‘अगं, ते काळजीचे संवाद, दयेच्या नजरा नकोशा वाटतात. नवरा आणि मुलगा दोन आठवडे होते आणि आई-बाबांची सोबत तर आहेच. आणखीही होती कुणाचीतरी सोबत. तेच सांगायचंय तुला.’’ राधा म्हणाली.

‘‘कुणाची सोबत?’’

‘‘सांगते. साधारण दीड महिन्यांपूर्वी माझ्या हाताला छातीत गाठीसारखं काहीतरी जाणवलं. त्याबद्दल कुणापाशी बोलण्यापूर्वी मी एकदा नेहमीच्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी मोठय़ा रुग्णालयामधून मॅमोग्राफी, चेक-अप करून घ्यायला सांगितलं. तिथे सोनोग्राफी आणि नंतर बायोप्सी करायला सांगितली.’’

‘‘हे सगळं एकटीनंच केलंस? कौतुक आहे तुझ्या हिमतीचं.’’

‘‘अगं, चेक-अपसाठी सर्वाना टेन्शन कशाला? म्हणून आईलाही नव्हतं सांगितलं. त्यावेळी आई ‘चिकन सूप’ मालिकेमधलं एक पुस्तक वाचून प्रभावित झाली होती आणि ‘तूही वाच’ म्हणून माझ्या मागे लागली होती. मला वाचायचा मूडच नव्हता. तरीही तिच्या आग्रहामुळे इच्छा नसतानाही मी कुठलंतरी एक पान उघडून चाळायला सुरुवात केली. योगायोग असा, की सुझन नावाच्या स्तनाचा कर्करोग झालेल्या एका रुग्णाचा तो अनुभव होता. तूच वाच.’’ म्हणत राधानं पुस्तकातलं पान उघडून मानसीकडे दिलं. त्यात सुझननं लिहिलं होतं, ‘‘..शस्त्रक्रिया होऊन पंधरा दिवस झाले. आज सकाळीच बँडेज काढलं होतं. पण ‘त्या’ जागी हात लावायचं धाडस मला होत नव्हतं. संध्याकाळी रात्रपाळीची नर्स.. मार्गारेट आली. ‘‘काढलं बँडेज? हलकं वाटतंय ना आता?’’ तिनं हसून विचारलं.

मी होकारार्थी मान हलवली.

‘‘तू अजून स्पर्श केला नसशील ना तिथे?’’ तिनं विचारलं.

माझे डोळे भरून आले, मी मान फिरवली.

मार्गारेट माझ्या जवळ आली. माझा हात हातात घेऊन म्हणाली,

‘‘तो तुझाच भाग आहे सुझन. असं नाकारायचं नाही त्याला.’’

मी तिची नजर चुकवली. हातात घेतलेला माझा हात तिनं अलगदपणे त्या ‘रिकाम्या’ जागी ठेवला. तिचा हातही माझ्या हातावर तसाच धरून ठेवला, सोबत दिल्यासारखा. पाणावलेले डोळे मी क्षणभर मिटून घेतले. उघडले तेव्हा मार्गारेट माझ्याकडे प्रेमानं पाहात होती. माझ्याच हळव्या भावनांचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यांत दिसलं आणि मनावरचं अनामिक ओझं उतरल्यासारखं.. हलकं वाटलं मला.. त्या क्षणासाठी मार्गारेटला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी परमेश्वराची कायम ऋणी राहीन..’’

अनुभव वाचता वाचता मानसीच्या अंगावर सरसरून काटा आला.

‘‘अगदी असाच काटा आला मानसी माझ्याही अंगावर. डोळ्यांत टचकन पाणी भरलं आणि प्रचंड भीती वाटली. उद्या बायोप्सीचा रिपोर्ट काय येईल? कशाला नेमकं हेच पान उघडलं मी? आईनं तरी इतकं मागे का लागावं? खूप चिडचिड झाली.’’

‘‘किती विलक्षण योगायोग गं.’’

‘‘हो, ना. नंतर ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. बायोप्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता घरच्यांना सांगताना भावना अनावर व्हायला नकोत म्हणून थोडा स्वत:चा वेळ हवा होता तरी एकटंही राहावंसं वाटत नव्हतं. मी एका मित्राला फोन करून सांगितलं. तोही सुन्न झाला. पण म्हणाला, ‘आज एक महत्त्वाची मीटिंग आहे, सोबत येतेस का? मीटिंग संपेपर्यंत गाडीत बसशील.’ आम्ही जवळजवळ दिवसभर सोबत होतो, गाडीत गाणं ऐकत होतो, पण त्यानं काही विचारलं नाही, दिलासाही दिला नाही. मला दया दाखवून हळवं केलं नाही किंवा पॅनिक होऊन माझी भीतीही वाढवली नाही, फक्त सोबत दिली. त्या नि:शब्द सोबतीमुळे उलटसुलट विचारांच्या भोवऱ्यातलं गरगरणं थांबून मी स्थिरावले, मनाची तयारी पूर्ण झाली.

शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी खोलीत एकटीच बसले होते. ‘उद्या आपला एक सुंदर अवयव आपल्या शरीराला कायमचं अपूर्ण करून जाणार आहे. पण त्याच्या जाण्यामुळे आपण कदाचित जिवंत राहू शकतो. त्याचा तिरस्कार करून चालणार नाही, त्याचे आभार मानायला हवेत, प्रेमानं निरोप द्यायला हवा.’ असं काहीतरी वाटून मी आरशासमोर उभी राहिले.

त्या स्तनाग्राचा आकार बदलला होता, ते आत गेलं होतं, निस्तेज झालं होतं. स्तनाग्र असं आत जाणं ही कर्करोगाची खूण असू शकते असं मी नंतर नेटवर वाचलं.

‘‘अरेरे, आधी माहीत असतं तर कदाचित आणखी लवकर उपचार झाले असते.’’ मानसी हळहळली.

‘‘मलाही रुखरुख वाटली, पण चाळिशीनंतर स्त्रियांनी दर वर्षी संपूर्ण चेक-अप केलं पाहिजे हे माहीत असूनही कुठे करतो आपण? नंतर हळहळून काय उपयोग?’’

‘‘खरंय.’’

‘‘तर अशा निरोपाच्या विचारांत मी त्या स्तनाग्राला हळुवार स्पर्श केला. एकाग्रपणे स्पंदनं ऐकत राहिले. आभार आणि निरोपाचा एक अबोल संवाद माझ्या मनात अनावरपणे उमटला आणि ते स्तनाग्र एकदम थरथरलं असं मला वाटलं. असं दोन-तीनदा झालं. जसं काही त्या भागाला शरीरापेक्षा वेगळं अस्तित्व होतं. ते काहीतरी सांगू पाहात होतं. मी त्याला पुन्हा

एकदा प्रेमानं कुरवाळलं आणि शांतपणे निरोप घेतला.’’

‘‘मन आणि शरीराची विलक्षण एकरूपता अनुभवलीस गं राधा तू.’’ मानसीला भरून आलं.

‘‘खरंच. याचं काहीतरी शरीरशास्त्रीय स्पष्टीकरण असेलच, पण तो अनुभव विलक्षण होता. शस्त्रक्रियेनंतरचे दिवस शरीराच्या सेवेत कसे गेले कळलंच नाही. पण सुझनची आठवण यायची. बँडेज काढण्याच्या वेळी हातापायाच्या एखाद्या जखमेकडे पाहावं इतक्या शांत, निर्विकारपणे कशी पाहू शकले मी? याचं अजूनही नवल वाटतंय. जराही कुठे मन हललं नाही की डोळे पाणावले नाहीत.’’

‘‘मला नाही नवल वाटत राधा. कारण विरूपता झेलण्याचा तो क्षण तुझ्यासाठी नवा नव्हताच. जाणाऱ्या भागाला तू शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी शांतपणे निरोप दिला होतास.. आणि तो लेख वाचताना सुझनचा ‘तो’ अनुभव प्रत्यक्षात घेतल्यासारखा तू मनानं तंतोतंत जगली होतीस. त्यामुळे खरोखरीच घडलं तेव्हा शरीर आणि मन, दोघांनाही ते पचून गेलं होतं. एखादा अवघड प्रसंग तुम्ही कल्पनेत तीव्रपणे जगलात तर प्रत्यक्षात त्याची धार बोथट होऊ  शकते, तसं योगायोगानं घडलं. मनाच्या शक्तीची जादू अनुभवलीस तू.’’

‘‘खरं आहे, तुम्हाला सर्वाना माझ्यातली हिंमत दिसली. पण ती मला दिली होती कधी न पाहिलेल्या सातासमुद्रापलीकडल्या सुझन आणि मार्गारेटनं. सुझननं तिचा अनुभव मोकळेपणी छापून शेअर केला नसता तर कदाचित माझ्या मनाची अशी तयारी झाली नसती. तुम्ही सगळे जिवलग सोबत असलात, तरी ‘ती’ घालमेल जगलेल्या व्यक्तीच्या संवादाची सोबत, ताकद वेगळीच..’’

‘‘तू इतकं सहज सांगतेयस हे. भीती नाही वाटली?’’

‘‘वाटली ना. पुढे केमोथेरपी, रेडिएशन सगळे सोपस्कार आहेत, केस जाणं, पुन्हा गाठ येण्याची भीती.. अर्धवट राहणारा संसार. असंख्य भीती, अजून आहे, कदाचित कायम असेल. पण त्यापेक्षाही तेव्हा, ‘उद्या आपण असू की नसू? या विचारात काम, संवाद, वाचन, टीव्ही सगळंच निर्थक वाटायचं. जिवंत असून नसल्यासारख्या त्या अधांतरीपणात रोज जगणं जास्त त्रासदायक होतं. त्यात खोल बुडालेले असताना एकदा अचानक मनात आलं, ‘आपण लवकरच जाणार’ अशा गृहीतकात दिवस काढतोय, पण समजा आणखी पंचवीस र्वष जिवंतच राहिलो तर? मृत्यूच्या भीतीत आणि निर्थकपणात बुडून आयुष्य उगीचंच वाया गेलं असं मरताना वाटलं तर? तेव्हा हातात काहीच नसेल.’’ त्या विचारानंतर मानसी, प्रत्येक क्षण जाणिवेनं जगणं म्हणजे काय? ते मला लख्ख उलगडलं गं.’’

‘‘एवढय़ा जीवघेण्या आजारपणातही जाणीव जागी ठेवता आली म्हणून श्रीमंत झालीस तू. किती विलक्षण अंतज्र्ञान!’’

‘‘खरं आहे. आणि हे साक्षात्कारी क्षण मी इतक्या तपशिलात तुझ्याशी शेअर करतेय, ते तू याबद्दल लिहावंस म्हणून. असंख्य मैत्रिणींपर्यंत हा जाणिवेचा वेगळा दृष्टिकोन पोहोचवणं हीच सुझनच्या ऋणाची परतफेड वाटते मला.’’ राधा म्हणाली.

नीलिमा किराणे

neelima.kirane1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Realized the moment