हवा प्रगल्भ सखा..

जुईचं, सख्ख्या मैत्रिणीचं ई-मेलवरचं पत्र वाचून मानसीला कौतुक वाटलं.

पारावरच्या अड्डय़ांचा, कॉलेजच्या मित्रमंडळींचा प्रभाव असलेल्या बहुतेकांच्या मनावर पत्नीविषयी लोक वाईटच विचार करत असतील ही भीती कमी-अधिक प्रमाणात राज्य करत असतेच आणि त्यातूनच पत्नीविषयीची स्वामित्वभावना त्याला थेट तिच्या रक्षणकर्त्यांच्या भूमिकेत पोहोचवते, पण आजच्या स्त्रीला नवरा असा ‘रक्षणकर्ता पहारेकरी’ नकोय, उलट पत्नीच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अडचणीत तिच्या सोबत असणारा प्रगल्भ ‘सखा’ हवा आहे..

‘‘लग्नाच्या पाचव्या वाढदिवसासाठी सुट्टी काढून माहेरी येतेय. आम्हाला दोघांनाही तुझ्याशी एका विषयावर बोलायचंय. अभिमन्यूचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आमचं छान जमतं. खूप चांगला संवाद, मोकळेपणा आहे. पण त्याचं ओव्हर-प्रोटेक्टीव्ह-अतिसरंक्षक असणं हल्ली फार त्रासदायक होतंय. माझे सहकारी, त्याचे मित्र, चुलत-मावस भाऊ, शेजारी कुठल्याही पुरुषाशी मी हसूनखेळून वागले की तो अतिशय अस्वस्थ होतो. नव्या नवलाईत त्याचं ‘पझेसिव्ह’ असणं आवडायचं. मजेनं ‘मिस्टर जे’ म्हणून चिडवायचे, पण पाच र्वष झाली तरी ते संपेचना तेव्हा वैताग यायला लागला. ‘तुझा माझ्यावर विश्वास नाही का?’ म्हणून भांडणंदेखील होतात. तो म्हणतो, ‘तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुम्ही बायका बावळट असता. पुरुषांची नजर वाईट असते, ते तुमच्या मागे काय बोलत असतील याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, म्हणून फार मोकळेपणाने कुणाशी बोलायला जायचं नाही.’ एकीकडे स्त्री-स्वातंत्र्य, समानता तत्त्वत: पटते अन् दुसरीकडे त्याचं हे बोलणं त्यामुळे चिडचिड थांबत नाही. या विरोधाभासाबद्दल एकदा चर्चा करून हा विषय उलगडून घ्यावासा वाटतोय.’’

जुईचं, सख्ख्या मैत्रिणीचं ई-मेलवरचं पत्र वाचून मानसीला कौतुक वाटलं. ‘माझंच खरं’ असं धरून न बसता ताणाचा विषय चर्चेतून उलगडून घेण्याची अभिमन्यूला इच्छा आहे. जुईला त्याचं वागणं पटत नसलं तरीही त्याला समजून घेऊन मतभेदांवर मार्ग काढण्याचा दोघांचाही प्रामाणिकपणा विशेष होता. भेटल्यानंतर अभिमन्यूनेच विषयाला सुरुवात केली. ‘‘जुईच्या मोकळ्या स्वभावामुळे ती जाईल तिथे चैतन्य निर्माण करते, त्यामुळेच मी तिच्या प्रेमात पडलो होतो, तुला माहीतच आहे मानसी, पण इतरांसोबत ती मोकळी वागायला लागली की मी फार अस्वस्थ होतो. सहनच होत नाही. मला शांत वाटावं म्हणून तरी तू थोडा स्वभाव बदल असं मी सांगतो, पण तिला पटत नाही.’’
‘‘हे चैतन्य फक्त माझं, इतर वाटेकरी नकोत अशी पझेसिव्ह, स्वामित्वाची भावना वाटते का तुला?’’
‘‘थोडासा पझेसिव्हनेस असेल, पण अस्वस्थ होण्याचं कारण ते नाही. तिच्या हसण्या-खिदळण्याचा लोक काय अर्थ काढत असतील? तिच्याबद्दल मागे काय बोलत असतील या विचाराने चिडचिड होते.’’
‘‘कोण काय बोललं तुझ्यापाशी? तुझ्या कानात? जरा शोधू या का ‘इतक्या’ चिडचिडीचं मूळ?’’

अभिमन्यू आठवायला लागला. ‘‘बघ, माझ्या गावातल्या लहानपणीच्या गोष्टी आहेत. संध्याकाळी पारावर अड्डा असायचा. गावातली तरुण पोरं, काही रिकामटेकडे तिथे जमायचे. गप्पांचा विषय एकच. ‘कुठल्या बाईचं कुणाशी काय चाललंय?’ त्या वयात त्या गप्पा ऐकून काही तरी ‘भारी’ वाटायचं. गावातल्या जवळजवळ सगळ्या बायकांचं, त्यातही सुंदर बायकांचं कुणाशी तरी काही तरी चालू आहे अशी तेव्हा खात्रीच असायची. आपल्याला ‘चांगली’ बायको मिळेल का? अशी भीतीही वाटायची. अर्थात त्यातल्या बऱ्याचशा नुसत्याच थापा किंवा अफवाच असतात हे नंतर लक्षात आलं. पुढे अभ्यासाला लागलो तसं रिकामटेकडय़ांसोबत वेळ वाया घालवणं थांबलं. अड्डा सुटला, नंतर गावही सुटलं, पण त्या गावगप्पा डोक्यात पक्क्या बसल्यात. नंतर कॉलेजमध्येही मित्रांच्या गप्पा तशाच. माणसं बदलली पण विषय तेच. त्यामुळे माझ्या सुंदर बायकोबद्दल तेच लोक माझ्या कानात बोलत असतात बहुतेक.’’ मानसी आणि जुईलाही हे ऐकून हसायला आलं.
‘‘कानात नव्हे, मनात. ते लोक ‘चांगले’ वाटायचे का?’’
‘‘नाही ना, पुरुषांबद्दल तर राग आहे मनात. ते मोठय़ांदा बोलतील किंवा बोलणार नाहीत, पण बहुतेकांच्या डोक्यात सतत तेवढाच विचार असतो असंच वाटतं. आता पारावरचे अड्डे नाहीत पण सोशल मीडियावर नॉनव्हेज जोक्सचा नुसता रतीब चालू असतो, मानसिकता तीच.’’
‘‘पण ही पूर्वापार मानसिकता, जुईच्या गंभीर वागण्यामुळे बदलणार आहे का?’’
‘‘..तसं नाही, पण तिच्या मोकळेपणामुळे ती सर्वाचं लक्ष वेधून घेते, ते जरा कमी होईल.’’
‘‘म्हणजे पुरुष तसेच राहणार, बदलायचं फक्त स्त्रियांनी असंच ना? आणि तरीही पारावरचे लोक बोलणार नाहीत याची खात्री नाहीच. जुई उच्छृंखल तर नक्कीच नाही. समाजात कसं वावरावं याचं सर्वसामान्य भान तिला आहे.’’
‘‘तेही कळतंय गं. पण त्या गावगप्पा पक्क्या बसल्यात. त्यातून सुटणं अशक्य वाटतं. जुई कुठे एकटी गेली, जरा उशीर झाला की खूप काळजी वाटते. पुरुषांच्या दुष्ट जगापासून तिचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे असं वाटायला लागतं आणि फोन करत राहतो. मग ती वैतागते.’’
‘‘स्वाभाविक आहे. ती मोकळ्या वातावरणात वाढलीय. तू आयुष्यात येण्यापूर्वी तिनं २५ र्वष स्वत:च्या जिवावर काढलीच की. स्वत:चं रक्षण करणं आणि आवश्यक तिथे सावध राहणं, योग्य काळजी घेणं समजतं तिला.’’
‘‘तेच म्हणते मी,’’ जुई सांगू लागली, ‘‘याला मैत्री कळत नाही. कुणाकडे कार्यक्रमाला गेलो तर ‘तू खूप छान दिसत होतीस’ असं सांगतो, पण लगेच माझ्याकडे कोण कोण बघत होतं याचीपण यादी देतो. मी म्हणते, ‘अरे, त्यांच्यावर नजर ठेवण्यापेक्षा तू माझ्याकडे बघ ना, मला आवडेल. कुणी तरी माझ्याकडे बघतंय या भीतीनं तू स्वत:ही आनंद घेत नाहीस आणि मलाही मिटून घ्यायला सांगतोस,’’ जुईनं तक्रार मांडली.

‘‘मला इतका त्रास होतो त्याचं काय करू? नाही कंट्रोल होत,’’ अभिमन्यू वैतागत म्हणाला.
‘‘कारण तुझ्याही मनात ‘तो’ पुरुष दडलाय, ज्यामुळे तुला अपराधी वाटतं आणि स्वत:चाही राग येतो. शिवाय, ‘मी ज्या वातावरणात वाढलो, त्यामुळे असा झालो, असाच राहणार’ या गृहीतकात तू स्वत:ला कोंडून घेतलंयस, त्यामुळे तू स्वत:ला बदलू शकत नाहीस, जगभरातल्या पारावरच्या पुरुषांची मानसिकता बदलू शकत नाहीस, मग राहतं काय? जुईचा स्वभाव. कारण ती तुझी आहे, तू तिच्या भल्यासाठी सांगतोयस, त्यामुळे तिनं तुझं ऐकलंच पाहिजे म्हणजे तुझ्यातला ‘रक्षणकर्ता’ शांत होईल.’’
‘‘नवरा म्हणून तिच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरच नाही का?’’
‘‘आताच्या जीवनशैलीत कसलं रक्षण? पूर्वीच्या युद्धाबिद्धांच्या काळात एकवेळ ठीक होतं, कारण स्त्रियांना युद्धकला शिकवत नसत. तरीही संधी मिळाल्यावर झाशीची राणी घडलीच. पण आता दिवसाचे बारा तास तू तुझ्या ऑफिसात, ती तिच्या. दहशतवादी, बॉम्बस्फोट, अपघात, अतिवृष्टी कशा कशापासून रक्षण करणार आहेस तू तिचं?’’

‘‘..पुरुषांच्या वाईट नजरांपासून.’’
‘‘मुळात सगळेच पुरुष वाईट आहेत का? आणि तुझ्या मते प्रत्येक पुरुष वाईटच असेल तर नजर ठेवण्यापलीकडे तू नक्की काय करणार? आणि कुणाकुणावर नजर ठेवणार? कसं रक्षण करणार? त्यातली निर्थकता समजते म्हणून तुला असुरक्षित वाटतं, त्यातून तू जुईवर नियंत्रण आणायला बघतोस. रक्षणकर्ताच मनातून किती घाबरलेला आहे कळतंय का?’’
‘‘पण म्हणजे मी काहीच करायचं नाही?’’ अभिमन्यू गोंधळला.
‘‘नव्या काळात ‘रक्षणकर्ता पहारेकरी’ नकोय, पत्नीच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अडचणीत तिच्या सोबत असणारा प्रगल्भ ‘सखा’ हवाय रे. इतर सगळीकडे तू तिचा सखा आहेस. इथे मात्र तो १५-१६ वर्षांचा पारावरचा बावळट मुलगाच राहिलायस हे कळतंय का? चालतंय का तुला?’’
अभिमन्यूला बसलेला धक्का स्पष्ट दिसत होता.
‘‘एक गोष्ट लक्षात घे, माझी मानसिकता हा माझ्याच आतला प्रश्न असतो आणि त्यासाठी मलाच माझ्यावर काम करावं लागतं.’’
‘‘तू म्हणतेयस ते खरं आहे, पण झेलणं अवघड आहे गं. सवय झालीय, दर वेळी प्रश्न पडणार,’’ अभिमन्यू सावरत म्हणाला.
‘‘एकदा दिशा स्वीकारली की उत्तरं सापडत जातात अरे. तीस वर्षांच्या संस्कारांना पुसायला थोडा वेळ लागणारच. स्वत:ला सामोरं जाणंही नकोसं वाटेल. पण तुझ्या प्रामाणिक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरंच तुला जुन्या जंजाळातून मोकळं करू शकतील.’’
‘‘प्रयत्न करतो. जमेल हळूहळू..’’ अभिमन्यू निरोप घेताना म्हणाला.
मनातला संघर्ष आणि विरोधाभास अभिमन्यूला समजला आणि त्यातून सुटावंसं वाटलं हे विशेष, पण जुन्या संस्कारांत वाढलेल्या किंवा पारावरच्या अड्डय़ांचा प्रभाव असलेल्या बहुतेकांच्या मनावर ही भीती कमी-अधिक प्रमाणात राज्य करत असते. रक्षणकर्त्यांचं आणि पुरुषत्वाचं पारंपरिक गृहीतक सोडता न येणं ही मूळ समस्या. याच गृहीतकामध्ये अडकलेल्या स्त्रियाही सारासार विचार न करता संरक्षणासाठी पुरुषावर अवलंबून तथाकथित अबला राहतात. असुरक्षिततेतून आलेली पतीवरच्या नियंत्रणाची गरज स्त्रियांनाही वाटते. बायकोचा मित्र नको तशीच नवऱ्याची मैत्रीणही नको. अशी पूर्वापार चालत आलेली असंख्य मतं, समजुती, संस्कार स्त्री-पुरुष दोघांनीही पुन्हा नव्यानं तर्कसंगतपणे तपासली पाहिजेत. स्त्री-पुरुषांच्या स्वभावातला नैसर्गिक फरक स्वीकारला की त्याचे प्रश्न बनत नाहीत. स्वत:ला प्रश्न विचारून गृहितकांची, समजुतींची अनावश्यक टोकं कापून टाकायला शिकायला हवं. टोकं बोथट झाली की गोष्टी सोप्या होतात. अवास्तव काल्पनिक भीतीतून मुक्त झालं तर असंख्य अभिमन्यू आणि जुईचं सहजीवन किती आनंददायी, आत्मनिर्भर असेल. मानसीच्या डोळ्यासमोर चित्र तरळून गेलं.

– नीलिमा किराणे
neelima.kirane1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Want responsible and sensitive partner

ताज्या बातम्या