रुचिरा सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संशोधनाच्या माध्यमातून मानवी शरीराच्या अज्ञात जगात प्रवेश करून नवनवीन प्रयोग करणाऱ्या डॉ. स्टेसी. थॅलेसेमिया आजारानं बाधित नसणाऱ्यांच्या अपत्यांनाही थॅलेसेमिया आजार होण्यास कारणीभूत ठरणारी जनुकातली विकृती शोधणं, ‘वाय क्रोमोझोम मायक्रोडिलेशन’ या विशिष्ट परिस्थितीमुळे वंध्यत्व आलेल्या पुरुषांमध्ये ‘आयव्हीएफ’ उपचारांची संभाव्य यशस्विता तपासणं, हृदय, मेंदू अशा अवयवांमध्ये असलेलं ‘वाय गुणसूत्रा’चं योगदान तपासणं.. आपण फारसं न ऐकलेलं हे संशोधन. या क्षेत्रात काम करणाऱ्या देशातल्या सध्याच्या महत्त्वाच्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत डॉ. स्टेसी कोलासो.

गोव्याच्या निसर्गरम्य परिसरातला डोंगरातून जाणारा रस्ता. त्यावरून सुट्टीत आपल्या आजोळी आलेली छोटी स्टेसी तिच्या वडिलांबरोबर स्कूटरवरून भटकंतीला निघायची. जवळपास तीन वर्षांची असल्यापासूनच तिची निरीक्षणशक्ती अफाट होती. ‘आकाशाचा रंग निळा का?’ इथपासून ‘रस्त्यावर पेट्रोलचा एखादा थेंब पडलेला दिसला तर त्यात इंद्रधनुष्य का दिसतं?’ इथपर्यंत अनेक प्रश्न तिला पडायचे. त्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत ती आपल्या वडिलांना सातत्यानं ‘का?’ हा प्रश्न विचारून भंडावून सोडायची.

  परदेशात नोकरी करणारे आणि आपल्या लाडक्या लेकीला सुट्टीदरम्यान वर्षांकाठी एकदाच भेटणारे तिचे वडील पीटर कोलासो तिच्या या ‘का?’च्या भडिमाराला कधीच वैतागले नाहीत. त्या दिशेनं विचार करण्यासाठी ते तिला कायम प्रोत्साहन द्यायचे. सर्वागीण विचाराची तिला ओळख करून देण्यासाठी तिलाही ते प्रश्न विचारायचे आणि तिच्या पद्धतीनं स्पष्टीकरण द्यायला सांगायचे. हीच मुलगी पुढे प्रजनन आरोग्य (रीप्रॉडक्टिव्ह हेल्थ) या क्षेत्रात मोठं काम करेल, असं कदाचित त्या दोघांनाही तेव्हा वाटलं नसावं. या क्षेत्रातल्या देशातल्या सध्याच्या महत्त्वाच्या वैज्ञानिकांपैकी एक डॉ. स्टेसी कोलासो यांची ही गोष्ट.

 आपली आई ब्रिजिट कोलासो, मोठी मावशी आणि आजी यांच्याबरोबर स्टेसी मुंबईत राहायच्या. कुलाब्याच्या ‘सेंट अ‍ॅन्स हायस्कूल’ मध्ये शिकायच्या. त्यांची आई नोकरी करायच्या, तर वडील पीटर कोलासो परदेशात नोकरी करत असल्यामुळे ते दरवर्षी नाताळच्या सुट्टय़ांमध्ये महिनाभर इथे येत. सुट्टय़ा असल्यामुळे या काळात बराचसा वेळ गोव्यात आपल्या मूळ गावी, आजोळी निसर्गाच्या सान्निध्यात घालवला जाई. समुद्रकिनारी सापडलेल्या पाइन कोनांची रचना अशी वैशिष्टय़पूर्णच का असावी, याविषयीचं कुतूहल स्टेसी चार वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मनात निर्माण केलं. त्या त्याविषयी नेहमी विचार करत. खूप पुढे ‘गोल्डन सीक्वेन्स’, ‘फिबोनाची सीक्वेन्स’ची ओळख झाल्यावर त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर गवसलं, पण सातत्यानं मागोवा घेण्याचा स्वभाव अंगी रुजला तो असा.

जेव्हा जेव्हा आपल्या क्षमता व मर्यादा याविषयी स्टेसी यांना शंका निर्माण व्हायची, तेव्हा ‘तुला सगळं शक्य आहे,’ असं म्हणत त्यांची आईही त्या गोष्टी सोप्या करून मांडत असे. पदवीच्या शिक्षणासाठी स्टेसी यांनी मुंबईच्या ‘झेविअर्स’ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्या सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास करत होत्या. अकरावी-बारावीमध्ये फारसा न आवडलेला रसायनशास्त्रासारखा विषय जीवरसायनशास्त्र या शाखेमुळे पेशींच्या अनुषंगानं अभ्यासायला सुरुवात केली तेव्हा त्यांना फार आवडू लागला. ही आवड निर्माण होण्यामध्ये आणखी एक कारण होतं, ते म्हणजे जीवरसायनशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. नंदिता. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे स्टेसी यांना हा विषय त्यांना इतका आवडू लागला, की शेवटच्या वर्षांला सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विद्यापीठामध्ये लेखी व प्रात्यक्षिक अशा दोन्ही परीक्षांत पहिला क्रमांक पटकावूनसुद्धा त्यांनी पुढील शिक्षणासाठी जीवरसायनशास्त्र हाच विषय निवडला.

 नायर रुग्णालयातून जीवरसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यास करत असताना शेवटच्या वर्षी डॉ. विनय पटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक संशोधन प्रकल्प केला. पोषण या विषयावर संशोधन प्रकल्प करत असताना विषय दिसायला सोपा असला तरी योग्य पद्धतीनं संशोधन करून महत्त्वाचे निष्कर्ष मिळवता येतात, हे डॉ. विनय यांनी त्यांच्यात रुजवलं. संशोधनासाठी आवश्यक योग्य प्रश्न कसे विचारायचे हे शिकवलं. हा संशोधन प्रकल्प करत असतानाच आपण ‘पीएच.डी.’ करायला हवी, संशोधन करायला हवं, हा त्यांचा विचार दृढ होत गेला. कर्करोग किंवा पेनिसिलीनसारख्या विषयात आपण काम करायचं असं त्यांनी तेव्हा मनोमन ठरवलं.

केईएम रुग्णालयाच्या आवारातल्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनोहिमॅटॉलॉजी’ या संस्थेमध्ये डॉ. अनिता नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी.’साठी त्यांना प्रवेश मिळाला. तिथे अभ्यासाला सुरुवात केल्यावर ‘बीटा थॅलेसेमिया’ या आजाराविषयी दीर्घ वाचन करण्याची, खोलात जाऊन जाणून घेण्याची संधी मिळाली. देशातले जवळपास चार टक्के लोक हे या आजाराचे वाहक आहेत हे जाणल्यानंतर त्याविषयी आणखी अभ्यास करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी या विषयात संशोधन सुरू केलं. या काळात ‘थॅलेसेमिया’ आणि ‘सिकल सेल’ या आजारांनी बाधित रुग्णांबरोबर  विविध पद्धतींनी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यापैकी महत्त्वाचा संशोधनाचा भाग होता भावनगर येथील डॉ. अमी त्रिवेदी यांच्याबरोबर केलेल्या अभ्यासाचा. सौराष्ट्र भागातल्या एका आदिवासी जमातीत थॅलेसेमियानं बाधित नसणाऱ्या जोडप्यांची मुलंही ‘थॅलेसेमिया मेजर’ या आजारानं बाधित होत होती. या जमातीतल्या नव्या पिढय़ा या आजारानं बाधित का असाव्यात याचा अभ्यास डॉ. अमी यांच्याबरोबर स्टेसी, त्यांच्या मार्गदर्शक डॉ. अनिता नाडकर्णी आणि विभागप्रमुख डॉ. रोशन कोलाह यांनी केला. तेव्हा काही ‘अ‍ॅबनॉर्मल हिमोग्लोबिन्स’च्या जोडीनं याआधी केवळ इस्रायली लोकांमध्ये सापडलेला एक ‘बीटाग्लोबिन जीन डिफेक्ट’ त्यांना सापडला. याव्यतिरिक्त ‘डेल्टा ग्लोबिन जीन डिफेक्ट’ हा एक नव्या प्रकारचा जीन डिफेक्टही या जमातीच्या लोकांमध्ये सापडला. स्टेसी यांनी त्यांचं वर्गीकरण केलं आणि या जीन डीफेक्टला ‘एचबीए २ सौराष्ट्र’ (HbA 2  Saurashtra) असं नाव देण्यात आलं. या संशोधनाच्या आधारे डॉ. अमी यांनी हा डिफेक्ट असणाऱ्या दोन लोकांचे विवाह टाळण्यासाठी एक पद्धत तिथल्या जमातीत सुरू केली. आज या जमातीमधील नवी पिढी ‘थॅलेसेमिया मेजर’पासून मुक्त आहे. तसं पाहायला गेलं, तर ही एक लहानशी भासणारी पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. ‘पीएच.डी.’च्या सहा वर्षांत जवळपास पाचशे वेगवेगळय़ा रुग्णांच्या तपासण्या आणि अभ्यास केल्यानंतर ‘एचबीए २’ ची पातळी कमी होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास त्यांनी केला.

‘पीएच.डी.’नंतर लागलीच त्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रीसर्च इन रीप्रॉडक्टिव्ह हेल्थ’ इथे एका सहा महिन्यांच्या प्रकल्पासाठी डॉ. दीपक मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रुजू झाल्या. ‘एन्डोमेट्रिओसिस’ या एका आजारासाठी ‘बायोमार्कर्स’ शोधणं हा तो प्रकल्प होता. एन्डोमेट्रिओसिस हा आजार मासिक पाळीशी संबंधित असून इतर काही कारणांसाठी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असतानाच त्याचं निदान होऊ शकतं. म्हणूनच या आजाराचं निदान करण्यासाठी रक्तातले काही मार्कर्स शोधता येतात का, याविषयी हे संशोधन होतं. याच दरम्यान डॉ. दीपक मोदी यांना ‘वाय क्रोमोझोम मायक्रोडिलेशन’ या डिसऑर्डरविषयी रीव्ह्यू लिहिण्याचं आमंत्रण आलं. त्यांनी डॉ. स्टेसी यांना या विषयामध्ये काम करण्याची इच्छा आहे का, विचारलं आणि स्टेसी यांनी विषय समजून घेण्यासाठी अभ्यास आणि वाचनास सुरुवात केली. ‘वाय’ गुणसूत्र हे केवळ पुरुषांमध्ये आढळणारं गुणसूत्र असून त्यावर शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक असणारी अनेक जनुकं असतात. पुरुषांच्या शरीरात वीर्य व शुक्राणूंची निर्मिती करण्यासाठी कारणीभूत असणारी गहाळ जनुकं शोधण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल. त्यासाठी त्या एक चाचणी तयार करत असून ही चाचणी ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञान वापरून बाळ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी आहे. पुरुषांमधलं वंध्यत्व एक जनुकीय विकारही असल्यामुळे याविषयी योग्य माहिती व जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. हे संशोधन करत असताना त्यांना जाणवलं, की युरोपात ज्या सहा मार्कर्सचा उपयोग पुरुषांमधलं वंध्यत्व ओळखण्यासाठी केला जातो, ते सहा मार्कर्स ‘वाय क्रोमोझोम मायक्रोडिलेशन’मुळे वंध्यत्व आलेल्या सगळय़ा भारतीय पुरुषांना ‘डीटेक्ट’ करत नाहीत. त्यामुळे त्या अशा भारतीय लोकसंख्येसाठी योग्य १६ मार्कर्सवर काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक ‘अ‍ॅसे’ तयार केलं असून लवकरच व्यावसायिक तत्त्वावर ते बाजारात उपलब्ध होईल. त्यांनी डॉ. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अमिटी विद्यापीठा’तील

डॉ. अभिषेक सेनगुप्ता आणि डॉ. प्रियांका नारद यांच्या जोडीनं ‘मशीन लर्निग’चा वापर करून एका भविष्यसूचक अल्गोरिदमची निर्मिती केली आहे. डॉक्टरांनी चाचणीमधून मिळालेली ‘वाय क्रोमोझोम मायक्रोडिलेशन’ संदर्भातली माहिती त्या अल्गोरिदममध्ये भरली, की अल्गोरिदम सगळय़ा गोष्टी ध्यानात घेऊन ‘आयव्हीएफ’च्या ‘सक्सेस रेट’विषयी (संभाव्य यशस्वितेविषयी) अंदाज वर्तवेल. यामुळे अशा जोडप्याला मानसिक तयारी करणं, आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा की नाही, हे ठरवणं सोपं जाईल. रुग्णांच्या समुपदेशनासाठीसुद्धा त्याचा वापर करता येईल.

अनेक वर्ष वाय गुणसूत्र हे केवळ शुक्राणू निर्मितीमध्ये सहभागी आहे असा समज होता. पण नव्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की हृदय, मेंदू अशा इतर अवयवांमध्येसुद्धा वाय गुणसूत्राचं ‘एक्स्प्रेशन’ आढळतं. याचा अर्थ इतर अवयवांमध्येसुद्धा त्याचं काही योगदान व कार्य असण्याची शक्यता आहे. त्याचा इतर अवयवांवर होणारा परिणाम आपल्यासमोर अनेक नव्या गोष्टी उलगडू शकेल. त्यासंबंधी अधिकाधिक संशोधन करण्यासाठी डॉ. स्टेसी कोलासो आणि इतर अनेक वैज्ञानिक कार्यरत आहेत.

‘आवश्यक व योग्य तयारी करण्याला पर्याय नाही’ हे डॉ. स्टेसी नव्या पिढीला अधोरेखित करून सांगतात. तसंच आशावादी राहाण्याचं महत्त्व समजावून सांगतात. संशोधन क्षेत्रात काम करत असताना संयमाची गरज नमूद करतात. या प्रवासात प्रयोगशाळा आणि घरातून मिळालेल्या पाठिंब्यासाठी, सहकार्यासाठी कृतज्ञ असणाऱ्या डॉ. स्टेसी यांना एका फारशा चर्चिल्या न जाणाऱ्या संशोधन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी सदिच्छा!

postcardsfromruchira@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanshodhika author ruchira sawant research human of the body dr stacey thalassemia ysh
First published on: 05-11-2022 at 00:02 IST