scorecardresearch

सप्तपदीनंतर..: आपुलकीच्या धाग्यानं बांधलेलं नातं!

‘इकडे काही आपला योग नाही’ हे माझं त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरचं पहिलं वाक्य होतं. माझं लग्न अगदी टिपिकल ‘चहा-पोहे’ पद्धतीनं ठरलं.

सप्तपदीनंतर..: आपुलकीच्या धाग्यानं बांधलेलं नातं!
सप्तपदीनंतर..: आपुलकीच्या धाग्यानं बांधलेलं नातं!

– अनुया गरवारे-धारप

‘इकडे काही आपला योग नाही’ हे माझं त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरचं पहिलं वाक्य होतं. माझं लग्न अगदी टिपिकल ‘चहा-पोहे’ पद्धतीनं ठरलं. फरक इतकाच, की हा कार्यक्रम मुलाच्या मोठय़ा भावाच्या घरी झाला होता आणि पोहे त्याच्या वहिनीनं केले होते.

आपल्याकडे मुलगी ‘पाहाताना’ बऱ्याचदा ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ हे शब्द फारच गांभीर्यानं घेतले जातात. म्हणूनच मी ते वाक्य त्यांच्या घरातून बाहेर पडताक्षणी उच्चारलं होतं.  पण दोन दिवसांनी ‘तिकडून’ होकाराचा फोन आला आणि आम्ही अक्षरश: संभ्रमात पडलो. पण नंतर आम्ही नीट चर्चा करून होकार कळवला. आणि नोव्हेंबर २००९ मध्ये मी मिलिंदशी लग्न करून ‘अनुया गरवारे-धारप’ झाले. होकाराच्या फोननंतर मी मिलिंदला पहिल्यांदाच विचारलेला प्रश्न हा होता, की ‘वर्णानं तुझ्यापेक्षा सावळय़ा असलेल्या मुलीला तू होकार कसा दिलास?’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर असं होतं, की ‘रंग जुळण्यापेक्षा स्वभाव, आवडीनिवडी जुळणं महत्त्वाचं वाटलं मला’. लग्न होऊन एक तप उलटल्यानंतर आता हे लक्षात आलंय, की आवडीनिवडी थोडय़ाफार जुळत असल्या तरी आमचे स्वभाव अगदी विरुद्ध आहेत. अगदी उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. तो अगदी शांत, समजूतदार. मी जास्तच बडबडी, जरा भडक डोक्याची. तो घरात रमणारा, तर मी मित्र-मैत्रिणींमध्ये जास्त रमणारी. शॉपिंग, हॉटेलिंग, ट्रेकिंग, फिरणं यात त्याला विशेष रस नाही, पण मला या सगळय़ाचा उदंड उत्साह. एखादी गोष्ट पटली नाही तरी तो शांत राहाणं पसंत करेल. मी मात्र थेट बोलून वाईटपणा घेणारी.

जुळणाऱ्या आवडीनिवडी किंवा छंदांच्या बाबतीत सांगायचं, तरी एक वाचन सोडता दुसरं काहीच सांगता येणार नाही. त्यातही पु. ल. हे आम्हा दोघांचं कॉमन दैवत. कविता हा माझ्या आवडीचा विषय. त्या वाचणं, सादर करणं, त्यांचा अभ्यास करणं मला आवडतं, तर मिलिंद कवितेच्या वाऱ्यालाही उभा न राहाणारा. नाटक त्याला फक्त बघायला आवडतं, मी राज्य नाटय़ स्पर्धेत बक्षीस मिळवणारी. नाटकासाठी ‘जान भी हाजिर’ असणारी!

  ‘मला स्वयंपाकाची खूप आवड नाही’ हे मी आमच्या चहा-पोहे कार्यक्रमाच्या वेळीच मिलिंदला सांगितलं होतं. वास्तविक धारप लोक चांगले खवय्ये आहेत; गोड पदार्थाच्या बाबतीत तर विशेष. पण मला ते सगळे पदार्थ करता आलेच पाहिजेत, असा दुराग्रह त्यानं कधीच धरला नाही. आजही मला घरात यावरून कोणीही काही वावगं ऐकवत नाही. मी उत्साहानं स्वत:हून एखादा वेगळा पदार्थ केला तर त्याचं कौतुक होतं, पण नाही केला म्हणून मला कोणी नावं ठेवत नाही. मला जे येत नाही, ज्याची मला फारशी आवड नाही, त्यावरून बोलण्याऐवजी मला जे उत्तम जमतं, आवडतं त्याचं कौतुक मिलिंदला जास्त वाटतं.

लग्नाच्या आधीपासूनच मी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, निवेदन करत होते. अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत होते. आजही माझी ही आवड मी अगदी सहज जोपासू शकते, यात मिलिंदचा सहभाग खूप मोठा आहे. या गोष्टी करायच्या म्हणजे मुळात वेळ द्यावा लागतो. प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी तर लागतोच, पण त्याआधी त्याची तयारीसुद्धा काही कमी नसते. त्यातही खूप वेळ जातो. मुळात यावरूनच जर घरात कटकटी, भांडणं झाली असती तर एक तर मला माझ्या या आवडीला तिलांजली द्यावी लागली असती किंवा मग घरात सतत धुसफुस होत राहिली असती. पण नापसंती तर सोडाच, उलट मिलिंद मला त्याच्या परीनं होईल तितकी मदतच करत असतो. मग ती मदत माझ्या निवेदनात काही संदर्भ देण्याबद्दल असो किंवा मग मी लिखाणात व्यग्र आहे असं बघून घरातली  कामं करून टाकणं असो. माझ्या या कामात व्यत्यय येऊ नये याची काळजी तो घेत आला आहे. कामावरून आल्यावर मिलिंद किंवा माझ्या सासूबाई कधीही मी लगेच ओटय़ाशी उभं राहावं अशी अपेक्षा करत नाहीत. मला गरमागरम चहासुद्धा बऱ्याचदा हातात मिळतो. माझी नोकरी महाविद्यालयातली आहे, त्यामुळे बोर्ड परीक्षा, पेपर तपासणी, अकरावी प्रवेश प्रक्रिया, कॉलेजमधील कार्यक्रम, यात जायची-यायची वेळ काहीही ठरलेली नसते. अशा वेळी मला घरच्यांची साथ खूप मोलाची वाटते. 

 मिलिंद स्वभावानं खूप हळवा आहे. पण असे काही प्रसंग आले, जेव्हा त्यानं त्याच्या या हळव्या स्वभावाशी संघर्ष करत त्या कठीण वेळेला तोंड दिलं. अपत्याची चाहूल ही प्रत्येक जोडप्यासाठी अत्यानंदाची गोष्ट असते. लग्नानंतर दीड वर्षांनं आम्हालाही ही चाहूल लागली; परंतु दुर्दैवानं हा आनंद केवळ तीन महिने टिकला. एक ‘आई’ म्हणून मला जो शारीरिक, मानसिक त्रास झाला, त्याहीपेक्षा कितीतरी जास्त मानसिक पडझड त्याची झाली आहे, हे मला कळत होतं. पण ते दु:ख चेहऱ्यावर आणू न देता मला सांभाळण्याची तारेवरची कसरत त्यानं तेव्हा केली. काही काळानंतर पुन्हा जेव्हा हे सुख पदरात पडलं, तेव्हाही तो संपूर्ण काळ म्हणजे एक परीक्षाच होती. माझ्या तब्येतीत अनेक चढउतार आले. या अवघड काळात मिलिंद खंबीरपणे माझ्याबरोबर होता. सासूबाईंनीसुद्धा प्रचंड काळजी घेतली.

२०१३ मध्ये जानेवारीच्या २ तारखेला आमच्या घरी मनुश्री आली. मिलिंद तेव्हा अंधेरीला नोकरी करत होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम, ट्रेनचा भयंकर गर्दीचा प्रवास यानं तोही थकत असे, पण त्यानं मनुश्रीच्या बाबतीत काही करायला लागतंय म्हणून कधी तक्रारीचा सूर काढला नाही. ती अगदी सहा-सात महिन्यांची असतानाची गोष्ट. मला एक दिवस पुण्याला कार्यक्रमासाठी जायचं होतं. पहाटे लवकर उठून आवरलं. मनुश्री झोपली होती. निघताना तिला जवळ घेतलं, तर तिचं अंग कोमट लागलं. पुण्याला जाणं रद्द करायचा विचार करत होते. पण मिलिंद म्हणाला, ‘बिनधास्त जा! आम्ही आहोत. ताप जास्त वाटला तर नेऊ दवाखान्यात.’ आईंनीही त्या विचारास होकार दिला. मग मी निघाले, अर्थात संपूर्ण दिवसभर र्अध लक्ष घराकडे लागलं होतं! 

नाटक हे माझं वेड आहे. या वर्षी डोंबिवलीच्या नावाजलेल्या ‘वेध’ नाटय़ संस्थेकडून राज्य नाटय़ स्पर्धेत सहभागी व्हायची संधी मिळाली. दोन पैकी एक प्रमुख भूमिका मला दिली जाणार होती त्यामुळे मला खूप आनंद झाला. दीड महिना तालीम असणार होती आणि मी संध्याकाळी कॉलेजहून आले की जेमतेम चहा पिऊन तालमीसाठी पळावं लागणार होतं. रविवारीही ४-५ तास द्यावे लागणार होते. मिलिंद आणि आईंनी मला अगदी आनंदानं प्रोत्साहन दिलं. कितीतरी वर्षांनी मला माझ्या प्रचंड आवडीचं काही करायला मिळत होतं, तो आनंद त्यांनी माझ्या चेहऱ्यावर वाचला. 

करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी एक दिवस अचानक माझ्या तोंडाची चव गेली, वासही येईनात. आम्ही घाबरलो, करोनाचा शिरकाव घरात झाला की काय, अशी शंका आली. फॅमिली डॉक्टरांच्या मते दोन दिवसांपूर्वी पाठीत उसण भरल्याबद्दल दिलेल्या औषधांचा हा परिणाम असावा, पण त्यांनी मला खबरदारीसाठी विलगीकरणात राहायला सांगितलं. मी शेजाऱ्यांच्या तेव्हा रिकाम्या असलेल्या फ्लॅटमध्ये १३ दिवस राहिले. या सगळय़ा दिवसांत मला सकाळ-संध्याकाळ चहा, नाष्टा, दोन्ही वेळा जेवण आणून देणं, त्यासाठी स्वत:चं ऑनलाइन ऑफिस, माझ्या लेक्चर्सच्या वेळा सांभाळणं, हे मिलिंदनं न कंटाळता केलं. आईंनी सर्व काम त्यांना करावं लागतं म्हणून चिडचिड केली नाही. 

करोनाच्या काळात मिलिंद आणि इतर काही सीनिअर्सची नोकरी शाबूत होती, पण पगार कमी कमी होत गेला. एकीकडे त्याचं इतर कंपन्यांमध्ये अर्ज देणं, मुलाखती देणं चालू होतंच, पण त्या काळात सगळं अवघड होतं. अशा वेळी त्यानं खूप धीरानं या सगळय़ाला तोंड दिलं. माझ्या परीनं मी त्याला ‘मोटिव्हेशनल’ भाषणांच्या लिंक पाठवून, सकारात्मक दृष्टिकोन वाढवणारी पुस्तकं वाचायला देऊन त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवानं माझी नोकरी आणि पगार व्यवस्थित चालू होता. नंतर त्यालाही नवी, चांगली नोकरी मिळाली.

 ‘घर म्हटल्यावर भांडय़ाला भांडं लागणारच’ तोही अनुभव येतो; नाही असं नाही. परंतु त्या भांडय़ांचा आवाज मर्यादेत राहील आणि लवकर विरून जाईल याची काळजी आम्हा प्रत्येकाकडून घेतली जाते. House आणि Home मध्ये फरक आहे. एकमेकांना आपुलकीच्या धाग्यानं बांधून घेतलेली माणसं जिथे गुण्यागोविंदानं नांदतात, ते  Home. मी अभिमानानं असं म्हणू शकते, की जिथे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकत्र आनंदानं नांदतात ते माझं घर आहे!

dharap.anuya@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रजनी!rajani dandekar
ताज्या बातम्या