–  केतकी एकबोटे

आपण सगळेच आता समाजमाध्यमांना चांगलेच सरावलोय. अगदी तो रोजच्या जीवनाचा भाग झालाय. पण साधारण दहा वर्षांपूर्वी इतकी काही सोशल मीडियाची कुणाला सवय नव्हती. याच सोशल मीडियामुळे आमची ओळख झाली ती फेसबुकवर. मी पुण्यात, तर तो दुबईत. एक दिवस त्याची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ दिसली आणि मीदेखील ती ‘म्युच्युअल फ्रेंड्स’ बघून स्वीकारली. (तेव्हा काही प्रोफाइल लॉक करायची सोय नव्हती ना.. ते एक बरं झालं!) प्रेमविवाह म्हटला की सगळं सहज होईलच असं नाही. आमचंही काहीसं तसंच. पण म्हणतात ना, शेवट गोड तर सगळं छान. तशी २०१३ मध्ये आमची आयुष्यभरासाठीची वाटचाल सुरू झाली.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

कधीही महाराष्ट्राबाहेर पाऊलही न ठेवलेली आणि विमान आकाशात पाहिलं तरी भीती वाटणारी मी! केवळ नवऱ्यावर- सुयोगवर असलेल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे पहिल्यांदाच एकटीनं विमान प्रवास करून दुबईत पाऊल टाकलं. त्याआधी पाच वर्ष सुयोग दुबईत राहत होता. खरं तर आमच्या दोघांचं क्षेत्र पूर्ण वेगळं. तो केमिकल इंजिनीअर, मी संगीत क्षेत्रात शिक्षण घेतलेलं. तसं आमच्या स्वभावातही फार काही साम्य नाही. पण ‘ऑपॉझिटस् अ‍ॅट्रॅक्ट’ हे आमच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. सुयोग दुबईत येताना त्याच्या ओळखीचं किंवा अगदी इथली माहिती सांगणारंही कोणी नव्हतं. त्यामुळे त्यानं एकटय़ानं, जिद्दीनं इथे आपला जम बसवला. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. स्वकष्टानं पुण्यात मोठं घर घेतलं. त्याची ही जिद्द मला फार आवडली होती. एका परक्या देशात जाऊन तिथे स्थिरावणं, तिथे स्वत:ला सिद्ध करणं, ही गोष्ट सोपी नक्कीच नसते. त्यालाही असलेल्या कलेच्या आवडीमुळे आमची मत्री वाढत गेली. लग्न करून इथे आल्यानंतर त्यानंच दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला मोठय़ा गायकांसोबत गाण्याची संधी मिळाली. लग्नाला चारच महिने पूर्ण झाले आणि बाळाची चाहूल लागली. सातव्या महिन्यापर्यंत आम्ही दोघंच असल्यानं माझी सर्व काळजी त्यानं घेतली. आई-बाबा, सासू-सासरे पुण्यात होते. पण माझी काळजी घेण्यात, काय हवं-नको बघण्यात त्यानं काहीच कमी पडू दिलं नाही. खरंतर तसं नवीनच लग्न झालेलं. पण ही जबाबदारी आम्ही दोघांनीही आनंदानं स्वीकारत छान पूर्ण केली.

आठवा महिना संपतानाच अनपेक्षितपणे माझी प्रसूती झाली. तेव्हा मला पुण्यात सोडून केवळ तीन आठवडय़ांपूर्वी दुबईत गेलेला सुयोग अगदी धावत पुण्यात परत आला.कधी कधी आपण म्हणतो ना, सुख आणि दु:ख हातात हात घालूनच येतात. अगदी याचाच प्रत्यय २०१४ च्या सुरुवातीच्या काळात आला. नुकतीच नोकरी बदललेली असल्यामुळे आमचा व्हिसा लवकर येत नव्हता. तसंच त्या नोकरीत सुयोगला प्रचंड मेहनत घेऊनही काही कटू अनुभवांचा सामना एकटय़ानंच करावा लागला. कारण तेव्हा बाळ लहान असल्यामुळे मी पुण्यातच होते आणि व्हिसा लवकर येत नसल्यामुळे मीही हतबल झाले होते. सुयोग केवळ दोन-तीन तास विश्रांती घेऊन सतत कामात व्यग्र असायचा. त्यामुळेच बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या गोड क्षणांचा आनंद त्याला घेताच आला नाही. काही कारणास्तव त्यानं ती नोकरी सोडली. पुढे काही महिने खडतर नक्कीच गेले, परंतु सुयोगच्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास होता. आम्ही सर्व त्याच्या पाठीशी होतो आणि देवाचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असल्यामुळेच त्यानंही कुठेही हार न मानता पुन्हा स्वत:ला नवीन नोकरीत सिद्ध करून अधिक चांगलं यश मिळवलं.

कार्तिक- आमचा मुलगा थोडा मोठा झाल्यावर सुयोगनं मलाही सांगितलं, की रिकामी बसू नकोस, काहीतरी कर. आपल्या शिक्षणाचा उपयोग केलाच पाहिजे हे त्याचं ठाम मत. मी तितकीशी ‘करिअर ओरिएंटेड’ नाही, त्यामुळे मुलाचं संगोपन, मत्रिणी यात रमले होते. कधी कधी ‘तू वेळ का वाया घालवत आहेस?’ म्हणून तो रागावतोही. त्यावरून आमच्यात खटके उडतात. पण त्याशिवाय नात्यात मजाच नाही ना! रोजचा दिवस फक्त गोडच असेल तर त्यातला रसच निघून जाईल. मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर मी घरात गाण्याचे क्लास सुरू केले, तेव्हा त्यानं पूर्ण पाठिंबा दिला. कार्तिकच्या संगोपनातही तो कायम सोबत असतो. मुलाच्या बाबतीत चांगलं वळण लागावं म्हणून मी कायमच जरा कठोर असते. पण सुयोग कायम त्याच्याशी मत्रीच्या नात्यानं वागतो. रागावून किंवा मारून समजावू नकोस, असं त्याचं म्हणणं असतं. पण म्हणून चुकीच्या गोष्टींना तोदेखील कधीच खतपाणी घालत नाही. त्याचा स्वभाव संयमी आहे, पण माझा संयम लवकर सुटतो. मुलानं ऐकलं नाही, अभ्यास केला नाही की मी पटकन चिडते, रागावते अशा वेळी तो मात्र शांतपणे परिस्थिती हाताळतो.

आपले सणवार, देवधर्म जपला पाहिजे, याबद्दल आम्ही दोघं कायमच आग्रही असतो. वडिलांना ‘अहो बाबा’ म्हणणं, रोज देवाची प्रार्थना करणं, हे छोटे छोटे संस्कार लहान वयात होणं मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्यात सुयोगची मला नेहमीच सक्रिय साथ असते. आयुष्यात जसे मानसिक चढउतार येतात तसेच काही वेळा शारीरिक चढउतारही होतात. तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. गेल्या दोन-तीन वर्षांत आम्ही दोघांनीही याचा अनुभव घेतला. पण या काळात दोघांनी एकमेकांची जमेल तेवढी काळजी घेतली आणि कायमच घेत राहू. प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक जीवन जसं नवरसांनी परिपूर्ण असतं तसंच वैवाहिक जीवनही विविध रसांनी परिपूर्ण होतं. या नात्यात कधी प्रेम, अधिकार, हक्क असतो, तर कधी काळजी, आत्मीयता असते. आनंद, दु:ख, राग, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, संयम अशा विविध भावनांची गुंफण घालत नात्यांचा गोफ विणला जातो. हा गोफ विश्वासाच्या धाग्यांनी घट्ट होतो. ‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’.. विश्वास, प्रेम सहवासानं वाढतं असं मला वाटतं. अगदी प्रेमविवाहातही जोवर एकमेकांच्या सहवासात चोवीस तास राहात नाही, तोपर्यंत एकमेकांचे स्वभाव, रोजच्या सवयी पूर्णपणे समजत नाहीत. कदाचित त्यामुळेच प्रेमविवाहानंतरही लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्ष कडू-गोड आठवणींची असतात. वर्ष उलटतात तशी काही गोष्टींची सवय होते. तर काही गोष्टी समजून घेऊन त्या स्वीकारण्यासाठी मनाची तयारी होते.

लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल होतात. जबाबदारी वाढते. अनेक नवीन नाती बांधली जातात. त्यामुळेच सुरुवातीची वर्ष आपल्या जडणघडणीत महत्त्वाची ठरतात. पण त्या अनुभवातूनच कुठल्याही प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी आपण शारीरिक-मानसिकदृष्टय़ा सज्ज होतो. आज आम्ही दोघंही एकमेकांना प्रोत्साहन देत नवीन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय. सतत नवीन शिकत राहणं खूप महत्त्वाचं वाटतं आणि आम्हाला खात्री आहे की एकमेकांच्या सोबतीनं आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. पती-पत्नीचं नातं गुलाबासारखं असतं. त्याला मोहून टाकणारा सुगंधही असतो आणि मायेचा कोमल स्पर्शही असतो. तसंच काही वेळा कणखर होण्यासाठी काटे असणंही गरजेचं असतं. त्यातूनच गुलाबाच्या एका रोपटय़ापासून भरभरून आनंद देणारी बाग फुलत जाते. म्हणूनच आमच्या नात्याबद्दलही असंच म्हणावंसं वाटतं.. ‘नव्याची नवलाई संपली, पाहता पाहता नऊ वर्ष सरली.. सुखदुखात देऊन साथ, होऊ एकमेकांची सावली!’

ketaki31@gmail.com