scorecardresearch

सप्तपदीनंतर.. : दोघांचं ‘टीमवर्क’!

‘सप्तपदीनंतर..’ हा शब्द वाचला आणि मागची पंधरा वर्ष डोळ्यांसमोरून एखाद्या कॅलिडोस्कोपप्रमाणे झरझर निघून गेली.

शीतल दरंदळे

‘सप्तपदीनंतर..’ हा शब्द वाचला आणि मागची पंधरा वर्ष डोळ्यांसमोरून एखाद्या कॅलिडोस्कोपप्रमाणे झरझर निघून गेली. अजय आणि मी दोघंही इंजिनीअर. लग्नानंतरही दोघांची नोकरी सुरू होती. तो मेकॅनिकल इंजिनीअर आणि मी सॉफ्टवेअर इंजिनीअर. मी ‘एचआर’ क्षेत्रात काम करत होते. आमचा दोघांचा स्वभाव तसा बराच वेगळा आहे. म्हणजे मी बडबडी आणि तो मोजून मापून बोलणारा. तो पहाटे उठून आवरणार, तर मी रात्री जागून काम करणारी. ऑफिसमधून आले की झालेल्या गमतीजमती सांगायची मला खूप आवड, तर त्याच्याकडे काहीही सांगायला नसायचं. कुठल्याही कठीण प्रसंगात तो शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेणारा, तर मी पटकन ‘रीअ‍ॅक्ट’ होणारी. मला रागही पटकन येतो आणि तितकाच पटकन जातोही, हे त्याला चांगलं माहीत असल्यानं सकाळचं वादळ संध्याकाळपर्यंत घरात कधी राहिलं नाही! आमचे भिन्न स्वभावच आम्हा दोघांना खूप मदत करतात. कधी मी गोंधळून जाते किंवा हळवी होते, पण अजय अगदी तटस्थपणे विचार करतो. मला कुठलाही नवा विषय मिळाला की मी अगदी खोलवर जाऊन अभ्यास करते, तो मात्र फारसा ताण न घेता निवांत झोपतो.

इतक्या वेगळ्या आवडी असूनही आमच्यात एक समान आवड आहे ती म्हणजे वाचनाची. पुस्तकं आम्ही झपाटल्यासारखी वाचतो. शनिवार-रविवारी सगळे मराठी पेपर घेतो आणि वाचून काढतो. तसंच नवनवीन ठिकाणी फिरणंही खूप आवडतं. मुलं झाल्यावरही आम्ही भरपूर फिरलो आहोत. कोकणातील सर्व समुद्रकिनारे पालथे घातलेत. माझी गाडी चालवण्याची हौसही पूर्ण झाली. अजयनं मला नवी कार चालवू नको, असं म्हणून कधी अडवलं नाही. ‘गाडीला काही झालं तरी चालेल, पण तुला काही होऊ देऊ नको’ असा त्याचा काळजीयुक्त पाठिंबा होता. लग्नानंतर पाच वर्ष नोकरी केल्यावर पहिला मुलगा झाला तेव्हा मी नोकरी सोडली. मला तेव्हा अजिबात वाईट वाटलं नाही, कारण नोकरीतून ब्रेक मिळणार होता. खरंतर ‘आयटी’ क्षेत्रात रमणारी मी नव्हतेच. मला लहानपणापासून लिहायची खूप आवड होती. मी इंजिनीअर झाले नसते, तर मराठी भाषेत ‘पीएच.डी.’ करून छान प्रोफेसर किंवा लेखक झाले असते. त्यामुळे नोकरीचं टेन्शन सोडून मुलाच्या संगोपनात छान रमले. नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अजयनं मला पूर्ण साथ दिली. नोकरी सोडली म्हणून कधी बोल लावला नाही किंवा हिणवलं नाही. नंतर दुसरा मुलगा झाला. मुलं हळूहळू मोठी झाल्यावर मला परत नोकरी करायचा विचार आला. त्यासाठी मुलाखती देणं सुरू केलं. पण अजयनं समजावलं, की तू घरूनच काहीतरी कर. लिहायची आवड आहेच, तर त्यातच काहीतरी कर. मला दिशा मिळाली आणि शोध सुरू झाला.आज ‘कंटेंट रायटिंग’ क्षेत्रात माझं छान काम सुरू आहे. वर्तमानपत्रात लेख आले, की तो आवर्जून मुलांना वाचून दाखवतो. माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्यानंच केलं आहे. आज या क्षेत्रात येणाऱ्या अनेक नव्या स्त्रिया आहेत. त्यांच्यासमोर कार्यशाळा घेताना जे आत्मबळ मिळतं, ते फक्त अजयची साथ आहे म्हणूनच. नुकतंच आमचं नवं घर झालं आणि आम्ही तिथे राहायला आलो. नव्या घराचा विचार करताना मी प्रचंड उत्साहात होते. बुकिंग झाल्यावर करोनामुळे ताबा मिळणं लांबत होतं. तेव्हा चिडचिड व्हायची, पण आहे त्या परिस्थितीला स्वीकारल्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हाच मत्रिणींचा अलिबागला जायचा बेत ठरला. अजयनं लगेच जा म्हणून सांगितलं. आजपर्यंत मुलांना कधीही सोडून मी एकटी अशी फिरायला गेले नव्हते. पण अजयनं निश्चिंतपणे जा म्हणून सांगितलं. एवढंच नाही, तर दोन दिवसासाठी आवश्यक ती खरेदीही करून दिली! ते दोन-तीन दिवस मत्रिणींबरोबर धमाल केली. मुलांनाही मी नव्हते तर पप्पांबरोबर मजा आली. हळूहळू मी कोशातून बाहेर पडत होते, स्वत:ला नव्यानं ओळखायला लागले.

अशीच गंमत वजन कमी करताना आली. प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायला प्रयोग सुरू केले. नेहमीसारखा अभ्यास सुरू केला. मार्ग सापडला तेव्हा अजयच्याही मागे लागले. पण तो फारसा तयार नव्हता. मग त्याला म्हटलं, पुढच्या तीन महिन्यांत मी वजन कमी करून दाखवते, मगच तू कर. आणि खरोखर व्यायाम, डाएट करत माझं वजन दोन महिन्यांत कमी झालं. माझ्यात झालेला बदल पाहून त्यालाही उत्साह आला. पुढच्या सहा महिन्यांत आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करत योग्य ते वजन गाठलं. दोघांचं ‘टीमवर्क’ कसं छान काम करतं याचा प्रत्यय आला. मागची दोन वर्ष खूप शिकवून गेली. एकंदर करोनामुळे शाळा, ऑफिस सगळंच घरी चालू होतं. वातावरणात भीती, ताण होता. जवळच्या बऱ्याच नातेवाईकांना गमावलं. काहींशी शेवटचं बोलणंही झालं नाही. घरी बसून दुखं करण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा त्यांच्या आठवणी सांगत मोकळे झालो. मुलांना या वातावरणात तणावमुक्त ठेवणं मोठी कसरत होती. पण त्यांच्याबरोबर खेळलो, टीव्हीला काही काळ लांब ठेवलं. काहीतरी कल्पक करून हा वेळ सत्कारणी लावू असा विचार केला. माझं लिखाण वाढलं आणि अजयचा अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. रोज बोलायला आणि अभ्यासाला चांगला विषय मिळाला. नकारात्मकता दूर व्हायला त्यामुळे खूप मदत झाली. अर्थार्जनाचा नवा मार्ग सापडला. या विषयातले नवे मित्र मिळाले, त्यांच्याकडूनही नवी माहिती मिळाली. आता यासंबंधी काहीही नवी माहिती मिळाली की लगेच एकमेकांना पाठवतो. त्यावर एकमेकांचे विचार घेतो. खरंतर कुठलीही जोडी परिपूर्ण नसते. दोघांच्यात काही

उणिवा असतातच. पत्रिकेत भले कितीही गुण जुळले, तरी जोडीदाराबरोबर आयुष्य वेगवेगळ्या स्तरांवर वेगळे अनुभव देऊन जातं. त्यात काही चांगले-वाईट अनुभव येतात. पण कडू अनुभव आले म्हणून नात्यातला गोडवा कमी होऊ द्यायचा नाही. एकमेकांना कायम आदर दिला की प्रेम राहतंच. पंधरा वर्षांपूर्वी केलेली सप्तपदी ही आजीवन चालू ठेवायची आहे. आतापर्यंत पाहिलेली स्वप्नं आम्ही एकत्र पूर्ण केली आहेत, अजूनही बराच मोठा प्रवास करायचा आहे.

writersheetal@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saptapadi author shital darandale husband wife teamwork both ysh

ताज्या बातम्या