भक्ती नाईक

पूर्वीच्या तुलनेत काळ आता केवढा बदलला आहे. आईवडील आता मुलींना स्वत:हून शिकवतात आणि स्वत:च्या पायावर उभी राहा म्हणतात. माझ्याही आईवडिलांचं हेच स्वप्न होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे मला घडवलं. शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी घराबाहेर पहिलं पाऊल टाकलं. आणि रमले. खूप छान दिवस होते ते. ऑफिस स्टाफ खूप छान होता. तिथेच एक व्यक्ती नजरेला आणि मनाला एकाच वेळी भावली. ती व्यक्ती म्हणजे आता माझा जीवनसाथी झालेला माझा नवरा अमित.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

मी आयुष्यात पहिल्यांदाच कुणाच्या तरी प्रेमात पडले होते. अमित आणि मी हळूहळू एकमेकांशी बोलू लागलो. फोन नंबरची देवाणघेवाण झाली, फोनवर गप्पा सुरू झाल्या. अमितलासुद्धा मी आवडत होते, पण तो काही बोलायच्या आत मीच त्याला ‘प्रपोज’ करून मोकळी झाले. त्याचा होकार किंवा नकार काहीही असू दे, मी मनाची पूर्ण तयारी केली होती. पण होकारच मिळाला. आता पुढचं लक्ष्य होतं ते माझं घर. कारण ‘आमचं लव्ह मॅरेज’. हे वाक्य जरी लहान असलं, तरी त्याचा अर्थ आणि परिणाम माझ्यासाठी खूप मोठा होता. माझ्या घरात प्रेमविवाहाला परवानगी नव्हती. आणि त्यातच माझ्यासाठी बरीच ‘स्थळं’ येत होती.

अमितविषयी घरी कसं सांगू, या चिंतेत असताना हळूहळू धीर एकवटून आईला मनातलं सारं सांगितलं. तिच्या डोळय़ात विश्वास, प्रेम, शंका, भीती या सर्व भावना एकत्रच दिसत होत्या. पण मी ठाम होते, की मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे तो नक्कीच चांगला माणूस आहे. अर्थात त्याचा स्वभाव हेच सगळय़ात मोठं कारण होतं त्याच्या प्रेमात पडायचं. रंग, रूप, पैसा, घर, या गोष्टींना मी कधी महत्त्व दिलं नाही. त्यानंतरचं आव्हान म्हणजे माझ्या वडिलांना समजावणं. आईनं त्यांना सांगितलं. त्यांच्यासाठी हा धक्काच होता, कारण मी अशा प्रकारे लग्न करेन, असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांची समजूत घालून आईनं त्यांना अमित आणि त्यांच्या घरच्यांना भेटायला सांगितलं. दोन्ही कुटुंबं भेटून सगळय़ा गोष्टी समोरासमोर बोलल्यानंतर आमचं लग्न झालं.

लग्न होऊन सासरी गेल्यानंतर मुलींना खूप जुळवून घ्यावं लागतं, पण मला माणसं इतकी छान मिळाली की मी सासरी आहे, असं कधी वाटलंच नाही. लग्नानंतर मात्र मी नोकरी सोडली कारण वर्षभर सणवार साजरे करायचे, म्हणजे सारख्या सुट्टय़ा हव्या. मग मी एक वर्ष नोकरी केली नाही. आधी वाटायचं, की घरचे काय म्हणतील! पण सासू-सासरे दोघांनी समजून घेतलं. मला त्यांनी कामाचा ताणही जाणवू दिला नाही. मी, अमित, आई, बाबा आम्ही सगळय़ांनी कामं वाटून घेऊन आमच्या सुखी संसाराची गाडी सुरू झाली.

एक वर्षांनंतर मला नोकरी लागली. घरची जबाबदारी आणि ऑफिस कसं सांभाळणार याच द्विधा मन:स्थितीत असताना सासूबाईंनी घर सांभाळलं आणि मी ऑफिस. सगळं काही आनंदात सुरू असताना अचानक अमितची नोकरी गेली. हा मोठा धक्का होता. कारण सासू-सासरे कमावते नव्हते. नशिबानं मला नोकरी होती आणि त्यात आमचं भागत होतं. मला अमितच्या चेहऱ्यावर नोकरीची चिंता रोज दिसत होती. मी घर हसतखेळत ठेवलं, अमितवर ताण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. तीन महिन्यांनंतर अमितला नोकरी लागली आणि आम्ही नव्यानं उभे राहिलो.

आता सगळं काही सुरळीत चालू आहे या विचारात असतानाच मम्मी- म्हणजे सासूबाई घसरून पडल्या आणि त्यांना असं पाहून सासऱ्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. अमित आणि मी न डगमगता एकमेकांना धीर देऊन या सगळय़ातून बाहेर पडलो. आयुष्यात खूप चढउतार पाहिले आहेत. पण आम्ही दोघं त्यातून उभे राहिलो ते फक्त एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम आणि एकमेकांच्या साथीनं. संसार वाटतो तितका सोपा नसतो हेच खरं. ती जणू एक गाडीच असते, जी दोघांमुळेच चालते. एक रागावला, तर एकानं शांत बसणं आणि एक रुसला तर दुसऱ्यानं समजूत घालणं हेच सुखी संसाराचं रहस्य आहे असं मला वाटतं. घर म्हटल्यावर भांडय़ाला भांडं लागणारच. पण ते भांडण किंवा वाद किती ताणायचे हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.

अमित एक उत्तम, कुटुंबवत्सल माणूस आहे. तो माझ्या आईवडिलांचीही तेवढीच काळजी घेतो. करोनाकाळात तर माझ्या आई-बाबांची त्यानं खूपच काळजी घेतली. त्याला समोरच्याला ‘सरप्राइज’ द्यायला खूप आवडतं. मला गुलाबाचं फूल, गजरा द्यायला त्याला प्रचंड आवडतं आणि ते तो अजूनही देतो. एका फॅशन शोमध्ये माझी इच्छा नसतानाही अमितनं मला भाग घ्यायला लावला. ‘‘तू हे करू शकतेस आणि तू हे कर’’ असा विश्वास देणारा जोडीदार खूप भाग्यानं मिळतो आणि तो मला मिळाला. माझ्या दिसण्यामुळे मला कित्येक वेळा लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. माझ्यासाठी रंग, रूप, वजन या दुय्यम गोष्टी आहेत, पण एक नक्की आहे, की आपल्याला आपल्या नवऱ्याची आणि घरच्यांची साथ असेल, तर आपण आयुष्यात कधीच मागे पडणार नाही. कुटुंब साथ देणारं असेल, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मी त्या फॅशन शोमध्ये एक ट्रॉफी जिंकली. तो खास क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. लग्न झाल्यापासून माझ्याकडे ट्रॉफीज् आणि सर्टिफिकेट्स वाढली आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे.

संसारात मिठाइतकंच भांडण असावं, त्यामुळे आयुष्यात मजा येते. तसे आम्ही भांडतोही, पण थांबायचं कुठे हे जाणून असल्यामुळे त्याचा परिणाम छानच होतो. नव्यानं झालेल्या चुका दुरुस्त होतात. लग्नाआधीची मैत्री लग्नानंतरही टिकून राहाते ना, तेव्हा नातं अजूनच खुलत जातं. कधी कधी ज्या प्रेमानं तो चहाचा कप माझ्या हातात देतो, त्या चहाला अमृताची चव असते! लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं म्हणतात. पण त्या घट्ट होण्यासाठी दोघांचं पारदर्शी आणि विश्वासपूर्ण नातं महत्त्वाचं.. आम्ही तसेच जगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच जणू रोज नव्यानं एकमेकांच्या प्रेमात पडतो!

shindebhakti30@gmail.com