scorecardresearch

Premium

सप्तपदीनंतर..: दुसऱ्याच्या मतांचा आदर हवा

‘आयुष्यात कधी चिखलातून जावं लागलं, तर घट्ट मन आणि कोरडय़ा डोळय़ांनी जावं. मात्र जाताना आपला चिखल इतरांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी..’ सुप्रसिद्ध लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘चैत्र’ या कथेतलं हे वाक्य वाचल्यापासून अक्षरश: मनात रुतून बसलं.

सप्तपदीनंतर..: दुसऱ्याच्या मतांचा आदर हवा

गौरी जंगम
‘आयुष्यात कधी चिखलातून जावं लागलं, तर घट्ट मन आणि कोरडय़ा डोळय़ांनी जावं. मात्र जाताना आपला चिखल इतरांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी..’ सुप्रसिद्ध लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘चैत्र’ या कथेतलं हे वाक्य वाचल्यापासून अक्षरश: मनात रुतून बसलं. हे इतकं जवळचं का वाटावं याचा सहज विचार मनात आला आणि मग लक्षात आलं, हा काही माणसांच्या वागण्याचा स्वभावच आहे. प्रत्येक सुजाण माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच. असेच काही प्रसंग आम्ही आमच्या सहजीवनाच्या वीस वर्षांत अनुभवले. काही सहजपणे, तर काही अगदी नकळतपणे!
वीस वर्षांपूर्वी अगदी पारंपरिक पद्धतीनं ठरवून झालेल्या लग्नगाठीनं आमच्या सहजीवनाची सुरुवात झाली. आम्ही दोघंही शिक्षक आहोत, पण लवकरच दोघांमधली साम्यस्थळं, फरक जाणवायला सुरुवात झाली. अर्थात ते नैसर्गिक होतं. सामान्य आयुष्यात येतो तसाच बराच गोंधळ होता; पण एक गोष्ट नक्की होती, परिस्थितीला वेळ दिली तर बदल घडून येईल.
नोकरीच्या निमित्तानं पती संतोष लवकर घराबाहेर पडले. चाफवडे, तालुका आजरा इथं त्यांची नोकरी जवळपास आठ र्वष झाली. मलाही एक वर्ष तिथं राहायचा अनुभव आला. त्यामुळे सहजच साध्या जीवनशैलीत राहण्याचा अनुभव मिळाला. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी कोकणासारखा पर्याय नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे अनावश्यक आणि विनाकारण गरजा वाढवण्यावर आपोआप मर्यादा आल्या. त्याच मानसिकतेवर ठाम झालो. आजही आमच्याकडे ‘टी.व्ही.’ नाही. त्यामुळे रिकाम्या वेळेचं योग्य, चांगलं नियोजन झालं. मुलांना- राजवर्धन आणि राजप्रिया यांना छंदांची, शिक्षणाची आवड निर्माण झाली. आज ते दोघंही बुद्धिबळपटू आहेत. उपलब्ध असलेला वेळ खेळांमध्ये सत्कारणी लावलेला आहे. त्यामुळे अभ्यास, छंद, खेळ यात संतुलन साधायला आम्हाला मदत झाली. याबद्दल मुलांचीही काही तक्रार नाही.
शिक्षकाची नोकरी म्हणजे मुलं, माणसं ओळखण्याची संधी. घराबाहेर जास्त राहिल्यामुळे माझ्या पतींच्या अनुभवाची शिदोरी खूपच मोठी आहे. प्रत्येक गोष्टीमागे असणारं कारण शोधून उपाय सांगणं ही त्यांची पद्धत, तर समोर येणारी परिस्थिती पाहून ‘एक घाव दोन तुकडे’ करण्याची माझी मानसिकता. मला बोलायला कोणताही विषय चालतो, मात्र त्यांचं बोलणं अगदी मोजून मापून! सुरुवातीला मला बरीच ओळखीची मंडळी विचारायची, ‘‘तुझा नवरा तुझ्याशी तरी बोलतो का ग?’’ मला खूप गंमत वाटायची. पण नंतर जसा वेळ जाऊ लागला तसे आमचे बरेच विचार जुळायला लागले. एकमेकांचा अंदाज यायला लागला. पण ज्या गोष्टींमध्ये आमचं एकमत होणारच नाही, त्या गोष्टींना आम्ही विरामच देतो. मत बदलेल तेव्हा बदलेल, पण ते बदलण्याचा अट्टहास नाही. ‘तुझे मत तुझ्या सोबत’ अशा अनेक गोष्टी आमच्यात आहेत. पण त्यामुळे आमच्यात कोणतीही टोकाची भूमिका घेतली जात नाही.
या सगळय़ामुळे जगण्यात फार मोठा वाद होतो असं नाही. याचं कारण आम्ही आमची ‘स्पेस’ नकळत ठरवलेली आहे. माझे आणि त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतील, पण कुटुंबाचं म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही मिळून करतो. आता आमची मुलं मोठी झालीत. माणसांच्या आयुष्यात येतात ते सर्व कसोटीचे प्रसंग आले. मुलांचं संगोपन, घरातच कसोटी पाहणारे प्रसंग.. एकमेकांना समजून घेण्याची समज वाढत गेल्यामुळे ते सर्व निभावून गेले. अर्थात याबरोबर कुटुंबाची साथ होती.
मी आमच्या मुलांची शाळा निवडताना पूर्ण दिवसाची शाळा निवडली. अर्थात याला दोघांचीही संमती होती. घर बांधताना त्यांच्या मताचा विचार केला आणि एकाच नजरेनं ते लवकर आणि चांगलं बांधलं गेलं. काही चांगल्या गोष्टींबरोबर वाईटही अनुभव आले. त्यांना कोणत्या पद्धतीनं सामोरं जावं याचा अंदाज येत गेला आणि प्रवास सुरळीत चालू राहिला. अजूनही सुरू आहे. आज या घडीला वैयक्तिक गोष्टींपेक्षा कुटुंबाचे प्राधान्यक्रम अधिक पाहतो. मुलं मोठी होत आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या पारंपरिक दृष्टिकोनाशी संबंधित काही विचार त्यांच्यावर लादत नाही. त्यांना त्यांच्या विचारांप्रमाणे व्यक्त होऊ देतो आणि मग एकच सामायिक पर्याय आम्ही शोधतो. ‘आम्ही असे वागलो, आमच्या पालकांचं असं वागणं होतं, म्हणून आम्हीच बरोबर’ असे ठोकताळे कधी वापरले नाहीत. आमच्या अडचणी आणि गरजेनुसार आम्ही आमचं जगणं बदलत गेलो. सण साजरे करण्याच्या पद्धती, काही रीतीरिवाज आम्ही सोयीनं सोडत गेलो किंवा नवीन काही आजमावत गेलो किंवा दोघांच्याही मधला मार्ग काढत गेलो. त्यामुळे झालं असं, की मुलांना त्यांच्या बोलण्याची, वागण्याची जबाबदारी कळू लागली.
आमच्या आतापर्यंतच्या प्रवासात एक गोष्ट जाणवली, की एकमेकांच्या स्वतंत्र अस्तित्वाची नोंद घेणं सहजीवनाची पहिली पायरी आहे. त्यामुळे आपसूकच दुसऱ्यांच्या मतांचा आदर, स्वातंत्र्याचा, विचार होत असतो. ही गोष्ट काही मोठेपणा मिरवायची नाही, ती नैसर्गिकच आहे. ती तशीच होऊ द्यावी. तर तो विचारांचा प्रवाह आपल्या मुलांपर्यंतही पोहोचतो.
मी माझं पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) २०१६ मध्ये पूर्ण केलं. इंग्रजीतून ‘सेट’ परीक्षा दिली. अर्थातच हे पती आणि मुलांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. ते सतत प्रोत्साहन देत राहिले, म्हणून मला हे यश पाहता आलं. नाहीतर शिक्षणाच्या एवढय़ा मोठय़ा विरामानंतर पुन्हा सुरुवात करणं कठीण होतं. एकमेकांसाठी जगणं, दुधात साखर पडल्याप्रमाणे संसार, या गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. ते चांगलंही आहे, तरी सध्याच्या वेगवान, प्रवाही, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची प्रखर जाण असलेल्या जगात हे काहीसं कठीण आहे. एकमेकांसाठी.. एकमेकांना पूरक जगणं ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली असावी.
भौतिक सुख-समाधानाचे विचार सगळेच करतात. त्यासाठी आवश्यक ती धडपडही करतात. मात्र एकमेकांचा अवकाश मान्य करून, कुटुंब म्हणून एक नवा विचार रुजवण्याचा विचार करणं, तो प्रवाहित करणं, मुलांच्या रूपानं सुजाण आणि सज्ञान व्यक्तिमत्त्वाचा पाया तयार करणं, हे प्राधान्यक्रम असावेत आणि आम्ही ते जमेल तसे करत आहोत. जीवनात आलेल्या सामान्य प्रसंगांची उजळणी करण्यापेक्षा त्या प्रसंगातून आपण काय शिकलो हे सांगणं मला उचित वाटलं. या लेखाच्या निमित्तानं त्या सर्वाचं अवलोकन झालं. ते सर्वानाच काही प्रमाणात ठरावीक काळानंतर आवश्यकच.
आता आमच्या सहजीवनात एकच इच्छा-
‘काहीच नवे होत नाहीये म्हणून
एखादी लकेर गुणगुणावी
आणि सूर लागता लागता
अखंड गाणेच मनातून उमटून यावे
असेही एकदा घडावे..!
आयुष्याच्या देण्याची पूर्तता झाल्यावर
आकांक्षांचे पोकळ अस्तित्व जाणवल्यावर
पैलतीराचे वेध लागलेल्या
थकलेल्या मूर्तीकडे
कासावीस होऊन पाहताना
एखाद्या लहानग्याचा खळाळता
धबधबा कोसळत यावा
आणि प्राक्तनाची क्षणभंगुरता वाहून जावी
असेही एकदा घडावे..!’
gourijangam6 @gmail.com

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-04-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×