–  सोनाली बाणे

आम्ही दोघं अवलिया आहोत! रोहन पूर्व तर मी पश्चिम. इतके विरुद्ध टोकाचे स्वभाव आहेत आमचे, अगदी  टॉम आणि जेरीसारखे. तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशी गत. पण आता त्याची सवय झालीय. त्यामुळे कोणत्याही गोष्टींवर दुमत झालं, की पुन्हा तो विषय काढत नाही.  अगदी फुलस्टॉप! आमच्या आवडीचे विषयही वेगवेगळे आहेत, पण तेच आमचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्या वेगळेपणासह आम्ही एकत्र संसार करतो आहोत. 

   ही रेशीमगाठ खरोखरीच जुळवलेली होती याची प्रचीती आमचं लग्न ठरल्यावर आली. माझी दिव्यांग मुलांच्या शाळेतली शिक्षिकेची नोकरी, तर रोहनची खासगी क्षेत्रातली नोकरी. त्यांचं क्रिकेटवर अतोनात प्रेम. वेडच म्हणा. मी तर बऱ्याचदा म्हणते, की रोहनची पहिली बायको क्रिकेट आहे! लग्नापूर्वी मलाही क्रिकेट खूप आवडायचं. भारत-पाक सामना टीव्हीवर असला तर सामना संपेपर्यंत टीव्हीसमोरून उठायचं नाही इतकं प्रेम होतं. पण हळूहळू ते कमी झालं. आता तर मुळीच नाही! लग्नानंतर मुलगी- मार्वीचा जन्म होईपर्यंत मी रोहनबरोबर त्याचे क्रिकेट सामने पाहायला जात होते, अगदी सातव्या महिन्यापर्यंत. पण झालेल्या मॅचेस टीव्हीवर सतत पाहून क्रिकेटला सोडचिठ्ठी देऊन टाकली!

मूल होणार हे समजल्यावर खूपशा गोष्टी बाबा म्हणून रोहनला करायला लागल्या. जसं जमेल तसं दोघांनी एकत्र वेळ देता यावा यासाठी चालायला जायचं, जेवायला एकत्र बसायचं, मराठी नाटक, सिनेमा पाहायला जायचं, हे सगळं वेळापत्रक ठरवूनही त्याला दोनदा-तीनदा याची आठवण करून द्यावी लागायची. बऱ्याचदा ‘अरेरे, मी विसरलो गं’ किंवा ‘मी खूप दमलोय.. जा जा, तू एकटी जा,’ असं सांगून टाळायचा. मग माझी चिडचिड व्हायची. ‘बाळ दोघांचं आहे, वेळही दोघांनी द्यायचा,’ असा माझा हट्ट मी त्याच्याकडून पुरवून घेत होते.

लेकीचा जन्म झाल्यापासून मात्र आमचं आयुष्य ‘मार्वीमय’ झालं! कन्यारत्न दोन हातात विसावल्यावर सारा वेळ आता तिच्यासाठी होता. मार्वी आमच्या आयुष्यात आनंद घेऊनच आली! आम्हा दोघांना बढत्या मिळाल्या. कुटुंबाच्या साथीनं आम्ही आमचे कामाचे व्याप आणि पालकत्व अशा दोन्ही बाजू सांभाळत होतो. रोहनही तिच्यासाठी जमेल तेवढा वेळ काढत होता. घोडा-घोडा, काऊ-चिऊच्या गोष्टी यात रोहनही रमत होता. लहानपणापासून तिलाही क्रिकेटची आवड निर्माण करण्याचा प्रचंड प्रयत्न त्यानं केला, मात्र मार्वीला आवड संगीताची. म्हणून तिला आम्ही दादरला कथकच्या माझ्या गुरुवर्य रुपाली देसाई यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली. ‘थोडं लांब आहे, पण आपण करू मॅनेज’ हे सांगणारा रोहनच होता.

  मी ज्या दिव्यांग मुलांच्या शाळेत नोकरी करते, तिथल्या माजी विद्यार्थ्यांसाठी २०१६ मध्ये एका संस्थेची स्थापना करून आम्ही एका ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. कलेची जाण आणि कलेवर प्रेम असणाऱ्या १८ वर्षांवरील अस्थिव्यंग कलाकारांना स्वत:ची कला दाखवण्यासाठी आम्ही हा मंच सुरू केला. त्यात गायक, वादक, नर्तक असे सारे कलाकार ‘एक से बढकर एक’ आहेत. त्यांना फक्त मार्गदर्शनाची आणि पाठिंब्याची गरज होती. हे काम सुरू करताना घरच्यांची साथ मोलाची होती. घाटे (माहेर) आणि बाणे (सासर) परिवार, सारेच या कामात मदतीला होते. काही वेळेस ‘मार्वीला मोठी होऊ दे आणि मग तुझं काम सुरू कर’ अशी सूचना असतानाही रोहननं मात्र कधीच आडकाठी केली नाही. ‘तुला जमतंय ना, मग तू कर,’ अशीच साथ नेहमी दिली.

हे सारं सुरू असताना, २०१७ मध्ये आमच्या ‘स्पायडरमॅन’नं- जाग्रवनं बाणे परिवारात एंट्री घेतली! शाळा, संस्थेची कामं, घर आणि जाग्रव हे सारं चालू होतं. जाग्रवच्या येण्यानं आयुष्यात खूप नवीन संधी चालून आल्या आणि रोहनला तर त्याच्या क्रिकेटमध्ये एक हक्काचा पार्टनर मिळाला. आम्ही चौघं छान मजा-मस्ती-धमाल करतो. मी कधीच रोहनला ‘मला हे हवं आहे’, ‘मला अमुक वस्तू आणून दे’ अशी मागणी केली नाही. लहानपणापासून माझ्यावर माझी आई (सुगंधा घाटे) आणि बाबा (अनंत सदाशिव घाटे) यांचा प्रभाव आहे. माझे बाबा नोकरी करून शिवणकामात आईला मदत करायचे आणि आई घर सांभाळत, शिवणकाम करायची. त्यांनी मुंबईत स्वत:च्या हिमतीवर ‘टू-बीएचके’ फ्लॅट, स्वत:चं दुकान असं विश्व उभारलं. कायम त्यांनी आमच्यावरही हेच संस्कार केले, की ‘आपलं काम करा, आनंदी राहा, खूप मोठे व्हा! जमेल तितकी समाजसेवा करून स्वत:च्या हिमतीवर मोठी स्वप्नं पाहा आणि ती पूर्ण करा’. तेच मी माझ्या आयुष्यात वापरते आहे. आमच्या आजी-आजोबांच्या पैठणी विणण्याच्या कामाची जणू काही ‘सेकंड इिनग’च आम्ही २०१९ पासून सुरू केली आहे! त्याचा एक वेगळा आनंद आहे. मी यात रमले आहे, तर रोहन त्याच्या क्रिकेटमध्ये.

रोहननं कायम असंच आनंदी, हसूनखेळून, क्रिकेट विश्वात त्याला हवं असलेलं स्थान निर्माण करावं असं वाटतं. आम्ही दोघांनी कायम स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जोपासत, एकमेकांचा आदर करत लग्नाची दहा वर्ष पार पाडली. यापुढचंही आयुष्य असंच मुलांबरोबर आनंदमय असो हीच इच्छा!

bane.sonalir@gmail.com