scorecardresearch

Premium

सप्तपदीनंतर.. : एकत्र कुटुंबात बहरला संसार आणि करिअरही!

सप्तपदीनंतर मुलींचं आयुष्य सहज सोपं नसतंच मुळी. ती सप्तपदी त्या दोघांपुरती नसते, तर दोघांच्याही संपूर्ण कुटुंबासोबतची असते.

सप्तपदीनंतर.. : एकत्र कुटुंबात बहरला संसार आणि करिअरही!

–  अ‍ॅड. दीपा दोडमणी चौंदीकर

सप्तपदीनंतर मुलींचं आयुष्य सहज सोपं नसतंच मुळी. ती सप्तपदी त्या दोघांपुरती नसते, तर दोघांच्याही संपूर्ण कुटुंबासोबतची असते. त्या नवीन घरात तिचा वावर, त्याची माणसं सांभाळणं, त्याच्याकडच्या रीतीभाती समजून घेणं, याबरोबर तिला स्वत:चं असं विश्वसुद्धा उभं करायचं असतं, या सगळय़ाचा ताळमेळ साधून सगळय़ांना सोबत घेऊन पुढे जाणं म्हणजे तारेवरची कसरतच असते. पण ही कसरत जिथे लीलया जमली ती सप्तपदी यशस्वी  ठरते.

pune married woman suicide, pune woman commits suicide, suicide due to torture of in laws
सासरच्या छळामुळे उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
transgenders attack in akola, transgender attack on tailor, tailor attacked for 500 rupees
तृतीयपंथीयांनी टेलरवर केला हल्ला; कारण वाचून बसेल धक्का…
Sameeran, Bulandshahr, Uttar Pradesh, khan chachi
९२ वर्षांची ‘साक्षर’ खान आजी!
parents care assets, responsibility children, Section 23 Indian Penal Code
मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!

   येत्या २६ फेब्रुवारीला गणेश (चौंदीकर) आणि माझ्या लग्नाला १४ वर्ष होतील. पण इतका मोठा काळ मध्ये गेला असं वाटतच नाही. आजही असंच वाटतं, की अजूनही त्या ‘चैतन्य गार्डन’मध्ये संध्याकाळच्या मंद वाऱ्यात, सुमधुर संगीतात, सग्यासोयऱ्यांच्या गोतावळय़ात रिसेप्शनसाठी आम्ही स्टेजवर उभे आहोत! वरवर हसरा चेहरा आणि आता आई-बाबांपासून आपण लांब जाणार म्हणून मनात चाललेली घालमेल. लग्न ठरलं तेव्हाच बाबांनी आणि सासऱ्यांनी निक्षून सांगितलं होतं, ‘लग्नात अजिबात रडायचं नाही!’ म्हटलं, ‘ हो!’ आईबाबांकडे पुन्हा गेलो की त्यांच्या कुशीत ते विरहाचे अश्रू ढाळून घेऊ शिस्तीत. घाई काय आहे? पण २०१८ मध्ये बाबा अनपेक्षितपणे गेले आणि लख्खपणे जाणवलं, अरे बाबांच्या कुशीत शिरण्याचं राहूनच गेलं. माझं माहेर इचलकरंजी, तर सासर मिरज. माहेरच्या घरी माणसांचा सतत राबता असायचा. आई, बाबा, आजोबांनी माणसं फक्त जोडलीच नाहीत, तर त्या नात्यांची वीण घट्ट बांधूनदेखील ठेवली होती आणि आता भाऊ शिवानंद आणि वहिनी श्रेयासुद्धा ती वीण मजबूत करताहेत. त्यामुळे लग्न होऊन सासरी आल्यानंतर माणसं समजून घेणं फारसं अवघड गेलं नाही. माझं सासरचं कुटुंबही मोठं. आज माझ्या घरी पंचाहत्तर वर्ष वयाच्या मोठय़ा सासूबाई, सासू-सासरे, माझी लेक तनू, नवरा गणेश, तिघी नणंदांपैकी मोठय़ा नणंद कावेरी ताई, त्यांची दोन मुलं आर्यन, सिद्धार्थ  राहतो. घरची शेती आणि औषधांचं दुकान असल्यानं गणेशनी ‘बी-फार्मसी’ केलं. गणेश सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत कामात व्यग्र असतो. माझा व्यवसाय वकिलीचा. त्याबरोबर घर, लेकीचा डबा, घरातली कामं, कायदेविषयक विषयांवर विविध माध्यमांतून लेखन, आणि आमच्या दुसऱ्या औषधांच्या दुकानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे दोघंही आपापल्या व्यापात इतके व्यग्र असतो, की एकदम रात्रीच घरी आल्यानंतर भेटतो. आमचं एकमेकांबरोबर जमण्याचं मुख्य कारण म्हणजे एकमेकांना समजून घेणं. गणेश कधीही माझ्या कामात ढवळाढवळ करत नाही. त्याच्याबरोबर घरच्यांचाही पाठिंबा असल्यानं मी माझी कामं व्यवस्थित करू शकते. मला घर सांभाळून करिअर करायचंय, तर माझ्या जबाबदाऱ्या मला प्रथम समजायला हव्यात आणि त्या पेलता यायला हव्यात. त्यामुळे कामासाठी बाहेर पडताना मी नेहमीच घरच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्यक्रम देत आले. मोठय़ा सासूबाईंना दोन्ही वेळेस इन्शुलिन देणं, त्यांची काळजी घेणं असेल, घरातल्या मुलांबरोबर दंगामस्ती करणं असेल, या सगळय़ात मी मनसोक्त रमलेली असते. बरं याचा अर्थ मी एकटीच सगळी कामं करते असा अजिबातच नाही. मी आणि सासूबाई अशा दोघी मिळून घरातली खिंड लढवत असतो.

 बाहेर फिरायला जाणं असेल, सिनेमाला जाणं असेल, मुलांचे वाढदिवस, लग्नाच्या अ‍ॅनिव्हर्सरी, या सगळय़ा गोष्टी घरचे सगळे मिळून साजरं करतो. परवाच ‘झिम्मा’ सिनेमा पाहिला. कुणीतरी विचारलं, ‘कोण कोण गेला होतात गं?’ म्हटलं, ‘दोन सासूबाई, दोन नणंदा, मुलं, नवरा असे सगळे मिळून मस्त सिनेमा एन्जॉय केला.’ या सगळय़ा अनुभवामुळेच करिअरचा पायाच मुळात घर असतो असं माझं मत आहे. आजवरचं आयुष्य सहजसोपं नव्हतं. या चौदा वर्षांत बरेच असे प्रसंग आले, ज्यातून आयुष्य ढवळून निघालं. पण त्यातून तरलो, शिकलो, अनुभवाचं गाठोडं बरोबर घेता आलं.

हे सगळं लिहीत असताना एक प्रसंग आठवला. माझी लेक तनू पाच वर्षांची होती. तिच्या शाळेत तिला कुटुंबाचा फोटो घेऊन या, असं सांगितलं होतं. तिनं घरी आल्यावर आजीला (माझ्या सासूबाईंना) ते सांगितलं. त्यावर आजी म्हणाली, ‘घेऊन जा तुझा बाबाचा, मम्माचा.’ त्यावर तिनं पटकन सांगितलं, ‘अगं माझा बाबाचा-मम्माचा नाही गं, कुटुंबाचा. त्यात तू, मी, आजोबा, आत्या, बाबा, मम्मा सगळे पाहिजेत गं. त्याला कुटुंब म्हणतात ना!’ ते मी ऐकलं आणि त्या क्षणी जाणवलं, की घर आता स्थिरावलंय, तेव्हा करिअरवर लक्ष केंद्रित करायला हरकत नाही!

dichoundikar@gmail.Com 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saptapadinantar author adv dipa dodmani chondikar family career flourish together family ysh

First published on: 05-02-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×