-अनघा सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्तपदीनंतर माझं आयुष्य, माझं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक समृद्ध आणि आनंदी होण्यासाठी नियतीनं मला बहाल केलेली अनमोल भेट म्हणजे माझा नवरा अमर.

सप्तपदीनंतरच्या आमच्या सहजीवनाला या वर्षी नोव्हेंबरमध्ये २५ वर्ष पूर्ण होतील. आमच्या यशस्वी आणि आनंदी सहजीवनामागे आमच्या दोन्ही कुटुंबांचीही तेवढीच मोलाची साथ आहे. बहुतेक सगळय़ांनाच वाटतं की आमचा प्रेमविवाह आहे! त्यांना असं का वाटतं या प्रश्नाचं उत्तर मला तरी अजून सापडलेलं नाहीये. पण सगळय़ांना असं वाटण्यातच आमच्या आनंदी सहजीवनाचं प्रतििबब मला दिसतं.

 खरं तर आमचं ‘अरेंज मॅरेज’. अगदी टिपिकल कांदेपोह्यांचा, बघण्याचा कार्यक्रम करून केलेलं. नेहमी आधी पत्रिका आणि नंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम करतात. पण आमच्या बाबतीत मात्र उलट झालं. पसंती झाल्यानंतर माझ्या सासूबाईंनी दोघांच्या पत्रिका बघण्याचा आग्रह धरला. पत्रिका जमली तरच विवाह करायचा, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे त्यांनीच ज्योतिषाकडे जाऊन पत्रिका बघितली. मात्र आमची कुंडली मुळीच जमली नाही. ज्योतिषानं पत्रिकेवरच ठळक अक्षरात लिहून दिलं, की हा विवाह करू नये. पण शेवटी लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात याचा प्रत्यय आला. अमरच्या मावशी आधुनिक विचारांच्या, सुसंस्कृत आणि अतिशय प्रेमळ होत्या. माझ्या सासूबाईही त्यांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. बाकीच्या सगळय़ा गोष्टी मनासारख्या असल्यामुळे मावशीनं रक्तगट पाहायचं सुचवलं. माझ्या घरूनही पत्रिका जुळलीच पाहिजे असा अजिबात आग्रह नव्हता. त्यामुळे रक्तगट पाहण्याविषयी माझ्या घरूनही संमती होती. अखेर आमचा विवाह करण्यावर सर्वाचंच शिक्कामोर्तब होऊन विवाह सोहळाही साग्रसंगीत पार पडला. जन्मकुंडलीत मुळीच न जुळलेले आमच्या दोघांचे खऱ्या वैवाहिक आयुष्यात मात्र अगदी ३६ पैकी ३६ गुण जुळले! लहान वयातच परिस्थितीची जाण असल्यामुळे अगदी वयाच्या २३ व्या वर्षीच अमरनं नोकरी पत्करली. घरातला मोठा, कर्ता मुलगा म्हणून संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आणि ती उत्तमरित्या पारही पाडली. लग्नापूर्वीच स्वबळावर स्वत:चं घरही घेतलं होतं, जे भाडय़ानं दिलं होतं. मुंबईतलं राहतं घर ‘दहा बाय दहा’चं असलं तरी लग्नानंतर वेगळं न राहता आम्ही दोघांनीही स्वखुशीनं एकत्र राहणंच पसंत केलं. माझ्या सासूबाईंनी खूप कष्ट करून आपल्या मुलांना वाढवलं होतं, शिक्षण दिलं होतं. स्वत: अशा बिकट परिस्थितीतून गेल्यामुळे मुलाच्या संसाराला आर्थिक हातभार लागावा म्हणून सून नोकरी करणारीच असावी, अशी त्यांची आणि अमरचीही अट होती. काहीही झालं तरी नोकरी सोडायची नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आमच्या लग्नाच्या वेळी मी एका वृत्तपत्रात कार्यरत होते. त्या काळाप्रमाणे मला चांगला पगारही होता.

लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनं माझ्या मुलीचा जन्म झाला. तीन-चार महिने बाळंतपणाची सुट्टी घेतली. बाळ लहान असल्यामुळे वारंवार सुट्टय़ा होऊ लागल्या. वृत्तपत्रातल्या नोकरीचं स्वरूप लक्षात घेता मला सतत सुट्टय़ा घेणं जमत नव्हतं आणि नोकरी सोडायची तर सगळय़ात जास्त सासूबाईंचं ‘टेन्शन’ आलं होतं. मात्र माझी ही द्विधा मनस्थिती लक्षात आल्यावर अमर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. पत्नी नोकरी करणारीच असावी, अशी लग्नाच्या वेळी अट असणाऱ्या अमरनं ‘मी आहे ना, तू बिनधास्त नोकरी सोड. मुलगी थोडी मोठी झाली की मग पुन्हा नोकरी कर.’ असा खंबीर पाठिंबा दिला आणि मी नोकरी सोडली. आपल्या आईलाही त्यानं हे पटवून दिलं. मुलगी दीड-दोन वर्षांची झाल्यावर मी पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. एका जाहिरात कंपनीत मला चांगल्या पगाराची ‘ग्राफिक डिझायनर’ची नोकरी मिळाली. कालांतरानं माझ्या दिराच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. ‘दहा बाय दहा’च्या घरात सासू-सासरे, आम्ही दोघं, आमची मुलगी आणि नवदाम्पत्य राहायचं म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या दृष्टीनं सोयीचं नव्हतं. त्यामुळे मग आम्ही स्वत:च्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि सर्वानुमते आनंदानं वेगळे झालो. आमचं घर सासरच्या घराच्या एकदम जवळ होतं. आम्ही दोघंही नोकरी करत असल्यामुळे माझ्या मुलीला दिवसभर सासू-सासरे सांभाळायचे आणि रात्री आम्ही तिला घरी आणायचो.

  स्वत:च्या हक्काच्या घरी आलो खरं, पण आता खरी कसोटी होती. संपूर्ण जबाबदारी पेलायची होती. सकाळी सात वाजता येणारं पाणी, डबा, मुलीची शाळा, ऑफिसला वेळेवर पोहोचणं, अशी माझी तारेवरची कसरत सुरू झाली. या टप्प्यावरही अमरची मोलाची साथ मला मिळाली. समजुतीनं सगळय़ा कामांत त्यानं कधीही कसलीही कटकट न करता मला मदत केली.

संसाराला पत्नीचा आर्थिक हातभार असावा म्हणून नोकरीची अट असणाऱ्या अमरनं प्रत्यक्षात मात्र मला मिळणाऱ्या पगाराचं मी काय करते, हा प्रश्न कधीही विचारला नाही, की पैशांची मागणी केली नाही. २००५ मध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला. या वेळी माझ्या आजेसासूबाई माझ्या मदतीला असल्या, तरी मुलीची शाळा, मुलाचं करणं, वेळेवर ऑफिसला जाणं, या सगळय़ा गोष्टी पुढे मला जड जाऊ लागल्यावर अमरनं मला ‘तुला नोकरी सोडायची असेल बिनधास्त सोड आणि तुला दुसरं जे काही आवडतं ते कर’ असा पुन्हा एकदा विश्वास दिला आणि मी कायमस्वरूपी नोकरीला रामराम ठोकला. याच दरम्यान ठाण्याला आम्ही फ्लॅट घेतला होता, त्याच्या कर्जाचे हप्ते जात होते. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा संपूर्णपणे त्याच्यावर भार पडणं माझ्या मनाला पटणारं नव्हतं. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर मी घरी सगळं युनिट घेऊन जवळजवळ तीन वर्ष मल्टिनॅशनल कंपनीसाठी डिझायिनगची कामं केली. जेव्हा र्अजट काम असे तेव्हा मी कॉम्प्युटरवरून उठतही नसे. रात्री दोन-दोन वाजेपर्यंतही काम करत असे. मात्र अमरनं कधीच कटकट केली नाही. स्वत: दिवसभर प्रचंड मेहनत करूनही मला नेहमीच मदतीचा हात दिला. नंतर सतत कॉम्प्युटरवर असल्यामुळे डोळय़ांना आणि मानेला त्रास होऊ लागल्यावर मी डिझायिनगची कामं करणं बंद केलं. त्यानंतर मी माझ्या आवडीनं हँडबॅगचा छोटासा व्यवसाय सुरू केला, तेव्हाही त्यानं मला साथ दिली. आजही माझा हा व्यवसाय उत्तमरीत्या चालू आहे. तसेच फिरणं, लिखाण, समाजकार्य, वेगवेगळे कोर्सेस करणं या माझ्या सगळय़ा आवडीच्या गोष्टी करण्यासाठीही त्यानं मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. ‘प्रत्येक गोष्ट अ‍ॅडजस्ट करणारी तुझ्यासारखी अर्धागिनी मिळाली, हे माझं भाग्य आहे,’ असंही कित्येक वेळा तो बोलून दाखवतो तेव्हा मलाही खूप सुखद वाटतं.

लग्नानंतर ते आजतागायत मी व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा अमरनं नेहमीच पूर्ण केली आहे. संसार म्हटला की मतभेद, वाद आलेच. पण आमच्यात ते फारच कमी वेळा होतात. आमच्यातली ‘टेलिपथी’ तर जबरदस्त आहे! कित्येक वेळा आमच्या दोघांच्याही मनात एकाच वेळी सारखेच विचार येतात तेव्हा आश्चर्य वाटतं. आमच्या सहजीवनाच्या या पंचवीस वर्षांत पती-पत्नीच्या नात्यापेक्षाही आमच्यातलं नातं बहरलंय ते निखळ मैत्रीचं, अतूट विश्वासाचं. आता आयुष्याच्या या वळणावर मुलं मोठी झालीत. आमच्या छायेखालून बाहेर पडून त्यांच्या वेगळय़ा विश्वात रमलीत. पुन्हा आम्ही दोघंच सप्तपदीच्या वेळी एकमेकांच्या हातात दिलेला हात अधिकाधिक घट्ट करून आयुष्याची संध्याकाळ जास्तीत जास्त सुंदर जगण्याचा प्रयत्न करतोय.

अजून एक सांगायचं राहिलंच, आमचा विवाह नक्की झाल्यावरही मला माझ्या सासूबाईंनी फोन करून विचारलं होतं, ‘तू एवढी गोरी आहेस, माझा मुलगा काळासावळा आहे. तुला नक्की चालेल ना?’ माझं उत्तर माझ्या निर्णयातून मी त्यांना दिलंच. माझ्या नजरेतच कधी रंगभेद नव्हता आणि नाहीये तर तो मला दिसेलच कसा? प्रचंड मेहनती, अतिशय बुद्धिमान, प्रामाणिक आणि समजूतदार असलेला माझा सहचर आज, एवढय़ा वर्षांनंतरही माझ्या आयुष्यातच नव्हे तर माझ्या रोजच्या जगण्यातही विविध रंगांची भरभरून उधळण करतोय..

anaghasawant30@rediffmail.com 

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saptapadinantar author angha sawant life rich happy husband success coexistence families ysh
First published on: 14-05-2022 at 00:02 IST