आरोग्यसाक्षर सरपंच

सरपंच!

(संग्रहित छायाचित्र)

साधना तिप्पनाकजे

डॉ. रिया सांगळे नुसत्याच शिकलेल्या सरपंच नाहीत तर डॉक्टर आहेत.  आपल्या या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करत त्यांनी गावाला आरोग्यसाक्षर केलं. आरोग्यविषयक गोष्टींना प्राधान्य दिलं पण त्याचबरोबरीने तीर्थक्षेत्र असलेल्या आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, अभ्यास केला. त्यातून कचरा प्रश्न, पाणी प्रश्न धसास लावले. शाळेची दोन मजली इमारत झाली. कोल्हापूरमधल्या पन्हाळा तालुक्यातील जोतिबाचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडी-रत्नागिरी गावच्या सरपंच डॉ. रिया सांगळे यांच्याविषयी.

‘या शिकल्यात चांगल्या, डॉक्टर आहेत, पण सरपंच म्हणून वर्षभर तरी टिकतील का?’, ‘ग्रामपंचायत चालवणं एवढं सोप्पं वाटलं का?’, गावातल्या काही लोकांची कुजबुज सुरू झाली. डॉ. रिया सांगळे यांना सरपंचपदी येऊन जेमतेम वीस-पंचवीस दिवस झालेले आणि गावात आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट सुरू होता.. पण साक्षर असल्याचा फायदा गावाला देत त्यांनी लोकांच्या शंकांना संधीमध्ये बदलवत बदल घडवून आणला.

जोतिबाचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडी-रत्नागिरी गावच्या सरपंचपदी मार्च २०१४ मध्ये डॉ. रिया सांगळे निवडून आल्या. कोल्हापूर मधल्या पन्हाळा तालुक्यातील जोतिबा देवस्थान हे अनेकांचं श्रद्धास्थान. दरवर्षी एकादशी ते चत्र पौर्णिमा या काळात जोतिबाची यात्रा भरते. साधारण आठ ते दहा लाख भाविक राज्यभरासह कर्नाटक, गोव्यातूनही येतात. त्यामुळे गावात नेहमीच भाविकांचा ओघ असतो. १५ किलोमीटर अंतरावरील नदीतून जलवाहिनीद्वारे गावाला पाणीपुरवठा होतो. साडेपाच हजार लोकवस्तीचं हे गाव डोंगरात वसलेलं आहे. त्यामुळे मोटर्स लावून नदीतून जलवाहिनीद्वारे पाणी उपसून, तीन टप्प्यांवर पाणी साठवून नंतर गावातल्या पाण्याच्या टाकीत जमा करण्यात येतं. यात्रा उत्साहात पार पडली आणि गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिनीच्या मोटर्स जळल्या. डॉ. रियांसमोर मोठा कठीण प्रसंग आला.. वारणा कारखाना, कोल्हापूर महानगरपालिका आणि काहींनी वैयक्तिक पातळीवर टँकर्स आणून गावच्या टाकीत पाणी भरलं. नळ पाणीपुरवठय़ासाठी जास्तीत-जास्त प्रयत्न करावे लागणार असल्याचं डॉ. रियांनी जाणलं. डॉ. रियांनी अभ्यासाला सुरुवात केली. सरपंचपदी आल्यावर एका वर्षांने त्यांचं प्रशिक्षण झालं. पण वाडी रत्नागिरीचे ग्रामविकास अधिकारी कर्तव्यदक्ष होते. त्यांनी

डॉ. रियांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पुस्तिकेचा अभ्यास करायला सांगितलं. जेणेकरून डॉ. रियांना सरपंचपदासोबत ग्रामपंचायतीच्या कामांविषयी, त्यांच्या अधिकारांविषयी माहिती होईल. अभ्यासाला सुरुवात झाली. यात ५६ महिन्यांचा काळ गेला.

गावात ग्रामसभा नियमित होत असे, पण महिला सभांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंपरा आणि पुरुषसत्ताक पद्धतीचा पगडा म्हणा पण बाया सभांना फिरकायच्या नाहीत. डॉ. रियांनी या परंपरेच्याच मदतीने स्त्रियांना ‘घराबाहेर’ आणण्याचं ठरवलं. २६ जानेवारीच्या आधी त्यांनी हळदीकुंकू समारंभाचं आयोजन केलं. नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सहा स्त्रियाच होत्या. गावातल्या सगळ्या स्त्रिया या कार्यक्रमात सहभागी झाल्या. चार तास ही सभा चालली. समस्या एकच, पाणी! गावात ८० टक्के गुरव समाज. वेगवेगळ्या भागांतून कुलाचाराकरता येणारे भाविक पूर्वापार ठरवलेल्या गुरवांच्या घरात राहतात. धार्मिक कार्य उरकून आपल्या गावी परत जातात. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांसोबतच नियमितपणे या अतिरिक्त लोकांकरताही पाण्याची आवश्यकता असते. दर चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने याचा प्रचंड त्रास स्त्रियांना व्हायचा. २०१४ मध्येच गावासाठी साडेपाच कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. डॉ. रियांनी सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन योजनेच्या त्वरित अंमलबजावणीकरता कंबर कसली. प्रशासकीय पाठपुरावा करून योजनेचं काम त्वरित सुरू करून घेतलं. जलवाहिनीच्या ६० एचपी मोटर्स बदलून ८० एच पी मोटर्स बसवल्या. ग्रामपंचायतीचं उत्पन्न मर्यादित आणि त्यातला ८० टक्के खर्च हा पाणीपुरवठय़ाकरता लागणाऱ्या मोटर्सच्या वीज बिलावरच होत होता. गावातून रोज पाणीपुरवठय़ाची मागणी होती. पण चार दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठय़ामुळे येणाऱ्या वीज बिलाचा प्रचंड भार ग्रामपंचायतीवर येत होता. वीज बिलाचे २६ लाख रुपये देणे थकले होते. त्यामुळे वीज कापण्यात आली. लोकवर्गणीतून १० लाख भरण्यात आले आणि वीजपुरवठा सुरू करून घेण्यात आला. डॉ. रियांनी मग पाणीपुरवठय़ाचे पंप रात्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची डय़ुटी त्याप्रमाणे लावण्यात येऊ लागली. रात्री युनिट कमी पडत असल्याचा फायदा सहा महिन्यांत दिसून आला. यामुळे महिन्याला १५ हजार रुपयांची बचत होऊ लागली. जिल्हा परिषदेनेही याची दखल घेतली. आजूबाजूच्या गावांमध्येही मग रात्री पंप लावून पाणी टाकीत जमा करण्यास सुरुवात झाली. आता ही पेयजल योजना ८५ टक्के पूर्ण झाली असून गावाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता घरांमध्ये पाण्याचे मीटरही बसवण्यात येणार आहेत. योजना पूर्ण झाल्यावर रोज पाणीपुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे.

गावात आणखी एक मोठी समस्या होती, कचऱ्याची. गाव तीर्थक्षेत्र असल्याने गावात कायम बाहेरच्या लोकांचा राबता असतो. जागोजागी कचऱ्याचे ढीग आढळायचे. गाव डोंगरावर असल्याने रस्ते अरुंद आहेत. कचरा गोळा करायला केवळ एकच ट्रॅक्टर ट्रॉली होती. त्या एकाच गाडीवर खूप ताण यायचा. परिणामी गावातला सर्व कचरा उचलला जात नसे.

डॉ. रियांनी आणखी स्त्री कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. चौदाव्या वित्त आयोगातून गावाकरता दोन ट्रॅक्टर ट्रॉली बनवून घेतल्या. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा उचलण्यात येतो. दानशूर व्यक्ती आणि लोकसहभागातून आणखी एक ट्रॅक्टर ट्रॉली बनवण्यात आली. आमदार आदर्श ग्राम दत्तक योजनेअंतर्गत गावात विकासाची कामं झाली. या योजनेतूनही एक ट्रॅक्टर ट्रॉली घेण्यात आली. या ट्रॉली गावात चौकांमध्ये असतात. तिथे कचरा गोळा होतो. कचरा गोळा करून त्याच्या व्यवस्थापनाकरता आणखीही ट्रॅक्टर ट्रॉलींची गावाला गरज आहेच. दलित वस्तीतील समाज मंदिराची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली. दत्तक ग्राम योजनेतून गावात रस्त्यांची कामं झाली.

श्री क्षेत्र जोतिबा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येतं. तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचा लाभ संपूर्ण गावाला मिळवून द्यायचं डॉ. रियांनी ठरवलं. त्यांनी सहकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गावाला आवश्यक सोयीसुविधांची यादी बनवली. या आराखडय़ाला मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. त्यांच्या डॉक्टर असण्याचा याकरता त्यांना चांगलाच उपयोग झाला. मार्च २०१७ मध्ये श्री जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला. याद्वारे १५४ कोटी रुपये मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात गावाकरता २५ कोटी रुपये देण्यात आले. यातून मंदिरात दर्शन मंडप, शौचालय संकुल, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, भूमिगत विद्युतवाहिनी, पेयजल व्यवस्था ही कामं पूर्ण करण्यात आली. सरकारदरबारी जिल्हा प्रशासन आणि तीर्थक्षेत्र विभाग हे वेगवेगळे आहेत. डॉ. रियांनी दोन्ही विभागांकडे पाठपुरावा केला आणि पाणीपुरवठा हा विषयही आराखडय़ात समाविष्ट करून घेतला.

डॉ. रियांनी सरपंचपदाचा कार्यभार हाती घेतल्यावर त्यांना काही दिवसांतच लक्षात आलं की, त्यांची ग्रामपंचायत आर्थिकदृष्टय़ा कमकुवत आहे. ग्रामपंचायत उत्पन्नातील ८० टक्के खर्च पाणीपुरवठय़ाच्या वीज बिलावरच होतो. उरलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगाराकरता लागते. त्यामुळे विकासकामांकरता निधीच शिल्लक राहत नाही. तीर्थक्षेत्र असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांना स्थानिक सुविधांच्या वापराकरता कर द्यावा लागतो. डॉ. रियांनी प्रशासनाची मंजुरी घेऊन हा कर एक रुपयांवरून दोन रुपये केला. यामुळे ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं. या वाढीव उत्पन्नातून गावात रस्त्यांची कामं झाली. आणखीही विकासाच्या कामांकरता निधी उपलब्ध होऊ लागला. २०१५ मध्ये जलशिवार योजनेंतर्गत गावातील दोन विहिरी आणि दोन तलावांतील गाळ उपसण्यात आला. त्यातील पाणी शेती आणि जनावरांच्या वापराकरता उपयोगात आणण्यात येत आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात कर्पूरेश्वर तलाव आहे. या गावात ग्रामपंचायत झाल्यापासून तरी यातील गाळ काढल्याचा उल्लेख नाही. डॉ. रियांनी कर्पूरेश्वर सरोवर संवर्धन आराखडा तयार केला. प्राचीन सरोवर संवर्धन योजनेतून या तलावाकरता दोन कोटी रुपये मंजूर झाले. यातील पाणी पिण्यायोग्य करणे, तलाव सुशोभीकरण, पर्यटनासंबंधी कामं ९० टक्के पूर्ण झाली आहेत. या तलावाचं पाणी पिण्याकरता वापरल्यास नदीतून आणाव्या लागणाऱ्या पाण्याचा तीस टक्के भार कमी होईल.

गावात पूर्वी ३० बचतगट होते पण ते फारसे सक्रिय नव्हते. डॉ. रियांनी या सर्व स्त्रियांशी संवाद साधला. त्यांना बचतगट सक्रिय करायला प्रोत्साहन दिलं. त्यांच्याकरता विविध शिबिरं घेतली. आज गावात ४० बचतगट सक्रिय आहेत. डॉ. रिया सरपंच झाल्या तरी त्यांची डॉक्टरी व्यवसाय सुरू आहेच. दिवसभर ग्रामपंचायतीची कामं  करून  संध्याकाळी त्या दवाखान्यात व्यग्र असतात. अर्थातच त्यांच्या डॉक्टर असण्याचा फायदा गावाला विशेषत: स्त्रियांना झालाच. डॉ. रिया दर सहा महिन्यांनी स्त्रियांकरता आरोग्य शिबिरं घेतात. स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची तपासणी करून त्याची पातळी नियमित ठेवण्याकरता गोळ्या देतात. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक सुविधा आणल्यात. गावामध्ये १०८ क्रमांक रुग्णवाहिका कायमस्वरूपी आणली. गावकऱ्यांसोबतच यात्राकाळात भाविकांना तात्काळ आरोग्यसेवा पुरवण्याकरता, पुढील उपचारांकरता रुग्णालयात जाण्याकरता सोयीचं ठरत आहे.

गावातल्या प्राथमिक शाळेची इमारत १८७२ मध्ये बांधण्यात आली होती. पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे खूप हाल होत असत. मुंबईच्या ‘एम्पथी फाऊंडेशन’च्या मदतीने डॉ. रियांनी शालेय इमारत पुनर्बाधणी आणि विकासाचा प्रकल्प उत्तम प्रकारे तयार केला. एकूण १ कोटी २५ लाख रुपयांच्या या प्रकल्पाकरता गावातील लोकांनीही मदत केली. गावकरी आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून १३ लाख रुपये जमवण्यात आले.

ई-लर्निग, एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर लॅब अशी सुसज्ज व्यवस्था असलेली शाळेची दोन मजली इमारत तयार झाली. २३ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन इमारतीत वर्ग भरू लागले.

डॉ. रिया सांगतात, त्या सरपंचपदी आल्यापासून स्त्रिया त्यांचे आरोग्य प्रश्न मांडू लागल्या. पुरुषप्रधान मानसिकतेमुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आसपासही न फिरकणाऱ्या स्त्रिया आता महिला सभेत त्यांचे प्रश्न मांडू लागल्या, सूचना देऊ लागल्या आहेत. त्यांच्यात आता  आत्मविश्वास आला आहे.

डॉ. रिया यांच्या या कामाची दखल घेत २०१८ मध्ये जिल्हा प्रशासनातर्फे तालुका पातळीवरील ‘यशवंत सरपंच पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला. पन्हाळा पत्रकार संघांतर्फेही ‘उत्कृष्ट महिला सरपंच’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं आहे. ‘बाई टिकतील का?’ या कुजबुजीने सुरू झालेली त्यांची कारकीर्द. मात्र त्या नुसत्या टिकल्या नाही, तर त्यांच्या नेतृत्वानं गावात आत्मविश्वासाची, गावविकासाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sarpanch female sarpanch success stories

ताज्या बातम्या