प्रगल्भ साथसोबत

‘‘आमचं घर तसं जुन्या वळणाचं होतं. घरात लोकप्रिय वाचनाची आवड होती

‘‘आमचं घर तसं जुन्या वळणाचं होतं. घरात लोकप्रिय वाचनाची आवड होती; पण सकस, जड वाचन हा आमचा स्थायिभाव नव्हता. नीरजा मात्र येताना विचारप्रवण लेखनाचा वारसा घेऊनच घरी आली. त्याचा आणि तिच्या बाबांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. हळूहळू माझेही विचार बदलत गेले.’’ राजन हे सांगत असतानाच त्याला दुजोरा देत नीरजा सांगतात, ‘‘हळूहळू त्याच्या वाचनाच्या आवडी बदलत गेल्या. आता तर तो समीक्षकाची भाषाही बोलायला लागलाय. माझ्या पहिल्या लेखनाचा वाचक तोच असतो.’’ मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या, प्रखर स्त्रीवादी लेखिका नीरजा यांना राजन यांची गेल्या ३३ वर्षांपासून अशी प्रगल्भ साथ मिळत गेली. त्यांच्या सहजीवनाविषयी..

मी ‘आईस पत्र’ नावाची कवितामालिका लिहिली होती, साधारण १९८७-८८ च्या दरम्यान. ती वाचून अनेकांना ‘नीरजाचं बरं चाललंय ना?’ असा प्रश्न पडला होता, कारण त्या कवितेत सासरी नांदत असलेल्या मुलींच्या मनात आईशी चाललेला संवाद आलेला होता आणि तो अजिबात सुखद नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ, ‘तुझी मुलगी सुखरूप यातनांच्या महापुरात.’ अशी त्या पत्रांची सुरुवात होती. त्यामुळे कदाचित असा प्रश्न त्यांच्या मनात आला असावा. आपल्याकडे अनेकदा कोणत्याही लेखकाच्या लेखनाची चरित्रात्मक समीक्षा होते, तशी ती माझ्याही लेखनाची झाली असावी; पण मी जेव्हा असं लिहिते तेव्हा या पुरुषसत्ताक व्यवस्थेत रहाणाऱ्या माझ्यासारख्या हजारो स्त्रियांविषयी लिहीत असते आणि या जगभरातील स्त्रिया असतात. आपल्या व्यवस्थेतील रूढी, परंपरा आणि चुकीच्या प्रथांमुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर सोसावं लागणाऱ्या या स्त्रिया असतात. आम्ही जेव्हा स्त्रीवादाविषयी बोलतो तेव्हा अनेकदा त्याच्याविरोधात एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे, ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते.’ मला स्वत:ला हे मान्य नाही. या व्यवस्थेनं स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची शत्रू व्हायला भाग पाडलं आहे. सतत एक असुरक्षित वातावरण तिच्याभोवती निर्माण केलं गेलं. शील, अब्रू, पावित्र्य असे शब्द तिच्या शरीराशी जोडले गेले, वंशाचा दिवा म्हणजे मुलगा जन्माला घालण्याची सक्ती तिच्यावर केली गेली, ती कमजोर आहे आणि तिला शारीरिक किंवा आíथकदृष्टय़ा पुरुषावरच अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही, असं सतत सांगितलं गेलं. त्यामुळे अनेकदा आपल्याशिवाय पुरुषाच्या आयुष्यात असलेल्या इतर स्त्रियांशी ती सतत स्पर्धा करत राहिली, मग ती त्याची आई असो, बायको असो, की बहीण असो, की मत्रीण असो. जेव्हा स्त्री आर्थिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ाही पुरुषावर अवलंबून राहणं बंद करेल तेव्हा दुसऱ्या स्त्रियांना शत्रू मानण्याचं ती बंद करेल. स्त्री जर एखाद्या पुरुषाची या व्यवस्थेनं व्याख्या केली आहे तशी बायको होण्यापेक्षा मत्रीण झाली आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:कडे पाहायला लागली आणि पुरुषही तिचा एक जितंजागतं माणूस म्हणून सन्मान करायला लागला, तर ती खऱ्या अर्थानं स्त्री-पुरुष समानता असेल असं मला वाटतं.’’ प्रखर स्त्रीवादी म्हणून ओळख निर्माण झालेल्या कवयित्री नीरजा स्वत:ची भूमिका मांडत होत्या. या विचारांची तशी थेट ओळख नसलेल्या वातावरणात वाढलेले, पण स्त्रीचा व्यक्ती म्हणून कायम सन्मान करणारे राजन धुळेकर गेल्या ३३ वर्षांपासून नीरजा यांना साथ देत आहेत.

‘‘नीरजा आणि मी १९८३ मध्ये भेटलो. तिनं मला एका लग्नामध्ये पाहिलं होतं आणि पसंतही केलं होतं. मी मात्र तेव्हा तिला पाहिलेलं नव्हतं. नंतर मी आणि नीरजा भेटलो. भेटण्याचा कार्यक्रम माझ्याच घरी झाला. दोघांचीही पसंती झाली आणि त्यानंतर एक छोटंसं घरगुती नाटय़ उद्भवलं. नीरजाच्या घरामध्ये कोणाच्याच पत्रिका नव्हत्या, पण माझ्या घरात पारंपरिक वातावरण होतं. लग्न करायचं म्हणजे मुलीची पत्रिका पाहिली पाहिजे, म्हणून वडिलांनी नीरजाची पत्रिका मागवली. तेव्हा तिच्या वडिलांनी नीरजाची जन्मवेळ कळवली. त्यानुसार घरच्यांनी पत्रिका तयार करून घेतली आणि माझ्या पत्रिकेशी जुळवून पाहिली. त्या वेळी आमच्या पत्रिकेतला एकही गुण जुळला नाही. या दोघांचं लग्न झालं तर पाच वर्षांमध्ये घटस्फोट होईल, असं सांगण्यात आलं. घरच्यांसाठी स्वाभाविकच हा धक्का मोठा होता आणि त्यांनी हे लग्न होऊ नये, अशी भूमिका घेतली; पण मी निर्णयावर ठाम होतो, पत्रिका बघायचीच होती तर आधी बघायची. आता पसंती झाल्यावर पत्रिका कशाला बघायची, असा माझा प्रश्न होता. त्यानंतर आमचं दोघांचं बोलणं झालं. पत्रिकेवर आपला विश्वास नसल्याचं नीरजानं स्पष्ट केलं. अखेर आम्ही दोघांनी स्वत:च्या जबाबदारीवर लग्नाचा निर्णय घेतला.’’

नीरजाच्या घरी नेहमीच बुद्धिवादी आणि मुक्त वातावरण होतं. लग्नासाठी घरच्यांच्या काही अटी नव्हत्या. ‘तू तुझं पाहा,’ असंही आईवडिलांनी सांगितलं होतं; पण राजनच्या घरी पारंपरिक वातावरण असतानाही त्यांनी हा निर्णय घेणं ही बाब महत्त्वाची होती. हा सगळा मिळून दीड महिन्याचा कालावधी होता; पण तो खळबळजनक ठरला. अखेर १९८४ च्या फेब्रुवारी महिन्यात साध्या पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं.

नीरजाला विचारांचा वारसा आईवडिलांकडून मिळाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सुप्रसिद्ध समीक्षक म.सु. पाटील हे नीरजा यांचे वडील. ते मनमाड कॉलेजमध्ये प्राचार्य होते. तेव्हा नोकरीनिमित्त वडील मनमाडला आणि आईची नोकरी व मुलींचं शिक्षण यामुळे आईसह मुली मुंबईला अशी घराची रचना झाली होती. मुली सुट्टय़ांमध्ये वडिलांकडे मनमाडला जायच्या. त्या वेळी मनमाडच्या घरामध्ये नामवंत साहित्यिकांची ऊठबस होती. पुरोगामी विचारसरणीच्या लोकांचा वावर होता. त्याचा प्रभाव नीरजांवर पडत होता. एमए करत असतानाच नीरजांचं लेखन, विशेषत: कवितालेखन सुरू झालं होतं. स्त्रीवाद हा नीरजांच्या कवितेचा मुख्य गाभा. ‘‘लग्नानंतर परिस्थिती थोडीशी बदलली,’’ राजन सांगतात. ‘‘कारण आमचं घर तसं जुन्या वळणाचं होतं. वडील जगन्नाथ धुळेकर यांना नाटक/चित्रपटाचा वारसा होता. वाचनाचीही घरात आवड होती; पण ती लोकप्रिय वाचनाची. सकस, जड वाचन हा आमचा स्थायिभाव नव्हता. नीरजा मात्र येताना विचारप्रवण लेखनाचा वारसा घेऊन आली. त्याचा आणि तिच्या बाबांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. हळूहळू माझेही विचार बदलत गेले.’’

तोच धागा पकडून नीरजा म्हणाल्या, ‘‘मी आणि राजन दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झालो. माझे सासरच्यांशी चांगले कौटुंबिक संबंध निर्माण झाले, पण आमचं विश्व मात्र जोडलं गेलं नाही. लेखन, मित्रमंडळी, त्यांचं घरी येणं-जाणं, त्यासाठी आवश्यक असलेला मुक्त अवकाश, या सर्व बाबी माझ्यासाठी आवश्यक होत्या, पण माझी लेखनाची निकड सासरच्या कोणाच्या लक्षात येत नव्हती. मी त्यांना दोष देत नाही. मुळात दोन्ही विश्वे वेगवेगळी होती. लग्नानंतर पहिली २ वष्रे आम्ही एकत्र कुटुंबातच राहिलो. सासरी नवीन आहोत, तर इथल्या रूढींबरोबर जुळवून घेण्याचा माझा प्रयत्न होता; पण त्यामुळे लेखनासाठी आवश्यक अवकाश मिळत नव्हता. यातून होणारी घुसमट राजनच्या लक्षात येत होती. यातूनच मग त्यानं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विरोध झाला, थोडीफार टीकाही झाली; पण लग्नाचा निर्णय घेताना त्यानं जसा ठामपणा दाखवला होता, तसाच याही वेळेला तो ठाम राहिला.’’

राजन इंजिनीयर आहेत आणि लग्न झालं तेव्हा ‘मिहद्रा अँड मिहद्रा’मध्ये नोकरीला होते. ‘‘मी इंजिनीयर असलो तरी मला शारीरिक कष्टाची सवय होती, कारण मी उत्पादन विभागात होतो. त्या वेळी कामाचा व्याप वाढत होता. कामगारांचे प्रश्न उग्र व्हायला लागले होते. त्यातून ताणही वाढत होता. या सगळ्या विषयांबद्दल मी नीरजाशी बोलायचो, त्यातून माझा ताण कमी व्हायचा. नीरजाच्या आई-वडिलांमध्ये कायम संवाद होता. त्याच प्रकारचं नातं आमच्यामध्येही निर्माण झालं. दोघांनी एकमेकांचं विश्व जाणून घेतलं,’’ राजन दोघांच्या फुलत जाणाऱ्या नात्याचा काळ उलगडतात. तर या काळात राजनमध्ये झालेल्या बदलांबद्दल नीरजा सांगतात की, ‘‘एके काळी त्यालाही फक्त लोकप्रिय वाचनाची सवय होती. हळूहळू त्याच्या वाचनाच्या आवडी बदलत गेल्या. आता तर तो समीक्षकाची भाषाही बोलायला लागलाय. आज तो माझा चांगला समीक्षक आहे. माझ्या लेखनाचा पहिला वाचक तोच असतो.’’ राजन सांगतात की, ‘‘दोघांचा एकमेकांशी सतत संवाद असण्याचा फायदा जसा नीरजाला झाला, तसाच मलाही झाला. विशेषत: कामाचा भाग म्हणून मला खूप माणसांना सांभाळावं लागायचं. त्यांच्या समस्या हाताळाव्या लागायच्या. त्यांच्या समस्यांकडे मानवी दृष्टिकोनातून बघण्याची सवय मला होतीच, पण नीरजा आणि बाबांमुळे माणसं अधिक चांगली कळायला लागली. एखादा मजूर/कर्मचारी मुद्दाम वाईट वागत नसतो, त्याच्या घरी काही समस्या असू शकतात हे माझ्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे काही कठोर निर्णय घेतानाही बॉसच्या भूमिकेतून न घेता, माणुसकीच्या भूमिकेतून घेण्याची सवय लागली,’’ राजन त्या धडपडींच्या दिवसांबद्दल सांगतात.

कदाचित म्हणूनच आज निवृत्तीनंतरही राजनचे अनेक सहकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्याच्याकडे मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ते पाहातातच, पण गुरुपौर्णिमेलाही त्याची आवर्जून आठवण काढतात. नीरजा माटुंगा येथील पोदार महाविद्यालयात, ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका आहेत. अध्यापनाबरोबरच त्यांचं लेखनही सुरू आहे.

१९९१ च्या रत्नागिरी साहित्य संमेलनानंतर नीरजा वाचकांपर्यंत पोहोचल्या. अनेक कवी संमेलनाची आणि साहित्य संमेलनाची आमंत्रणं येऊ लागली. गेल्या पंचवीस वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह आणि तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. ललित लेखन आणि संपादित साहित्यही प्रकाशित झालं. त्यांच्या पुस्तकांना पंचवीसच्या वरपुरस्कार मिळाले. सध्या त्या माणगावला ‘साने गुरुजी स्मारक ट्रस्ट’च्या अध्यक्ष म्हणून काम पाहतात. तिथं अनुवादासंबंधी भरपूर काम सुरू आहे. नोकरी, सदर लेखन, इतर लेखन, बाहेर जाणं या सर्वासाठी नीरजांना भरपूर वेळ हवा होता आणि त्यांना तो मिळत गेला. ‘‘मला कधीही माझ्या कामासाठी आवर्जून वेळ मागून घ्यावा लागला नाही. राजनच्या कामाचा व्यापही वाढता होता. तो सकाळी ७ला जनरल शिफ्टला जात असे. मात्र, ८ तासांमध्ये त्याची शिफ्ट कधीच संपत नसे. त्याला घरी यायला अनेकदा रात्रीचे ८ वाजायचे तरीही कधी मला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं, तर मुलीला शाळेत पाठवणं, तिचा डबा करणं, वेणी घालणं ही सगळी कामं राजन आनंदानं करत असे.’’

याचबद्दल बोलताना राजन सांगतात की, ‘‘यामध्ये आपण काही विशेष करत आहोत असं मला कधीच वाटलं नाही. हे प्रत्येक जोडीदारानं करायलाच हवं. माझा क्वालिटी टाइमवर विश्वास आहे. आईवडिलांनी मुलांना भरपूर वेळ देण्यापेक्षा जो काही थोडा वेळ ते देत असतील तो कशा प्रकारचा असतो हे महत्त्वाचं आहे.’’

नीरजा म्हणाल्या, ‘‘मी घरात नसले तरी राजन मुलीसोबत राहत असे. तिच्या आजारपणात तर तिला बाबाच लागायचा. ती लहान असताना एकदा वार्षकि परीक्षेत तिला खूप कमी गुण मिळाले होते. अनीहा रडवेली झाली होती. आता बाबा ओरडणार अशी भीती तिला वाटत होती. मी तेव्हा मुंबईबाहेर होते; पण त्या दिवशी राजन तिला आणि तिच्या एका मत्रिणीला सरळ मुंबई दर्शन करायला घेऊन गेला. मी नसताना अनीहा कधीच एकटी राहणार नाही याची काळजी त्यानं घेतली. आम्ही दोघंही घरी नसू तर माझे आई-वडील तिच्यासोबत असायचे. अनीहा खूप लवकर स्वतंत्र विचारांची झाली. तिला समाजकार्याची आवड होती. तिने एमएसडब्लू केलं आहे आणि आता स्वत:च्या पसंतीनं लग्न करून मजेत आहे.’’

एका प्रसिद्ध स्त्रीचा पती असणं हे जितकं अभिमानाचं असतं, तितकंच अडचणीचंही ठरू शकतं. विशेषत: नातेवाईक आणि मित्रमंडळींनी ते स्वीकारलं नाही तर. राजन यांना याच संदर्भात प्रश्न विचारले जातात आणि त्याला ते समर्पक उत्तरही देतात. नीरजा सांगतात की, ‘‘राजन आईवेडा होता. तिच्या सोसण्याविषयी तो नेहमीच बोलत असतो. कदाचित त्यामुळेच तो नेहमीच स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. माझ्या प्रसिद्धीचं त्याला कौतुक तर आहेच; पण स्त्रीवादी असण्याचंही आहे. कधीकधी मला तो माझ्यापेक्षा जास्त कट्टर स्त्रीवादी वाटतो. माझ्या सासूबाई एक साध्यासुध्या प्रेमळ स्त्री होत्या. चालत आलेल्या परंपरा पुढे नेत होत्या. त्याउलट मला मात्र लहानपणापासून परंपरांनाच प्रश्न विचारायची सवय होती. त्यातूनच मी हळूहळू निरीश्वरवादी होत गेले. मी देवाधर्माचं काही करत नाही, कर्मकांडं करत नाही. त्यामुळे नातेवाईकही आता मला या गोष्टींमध्ये गृहीत धरत नाहीत. मुलीच्या लग्नातही आम्ही धार्मिक विधी केले नाही; पण प्रेमाच्या सगळ्या माणसांचं गेट टुगेदर केलं. आजही आम्ही दिवाळीच्या निमित्तानं असंच गेट टुगेदर करत असतो. माझ्या सासूबाईंनीही मला समजून घेतलं. त्यांच्याशी माझा खूप चांगला संवाद होत असे. त्यांना माझ्या अनेक गोष्टी पटत होत्या, पण जुन्याचा त्याग करवत नव्हता. मी माझे ‘जे दर्पणी िबबले’ हे पुस्तकही माझ्या सासूबाईंना अर्पण केलं आहे.’’ नीरजा यांच्या आईने लग्नानंतर एम.एड.पर्यंतचं शिक्षण घर, मुली आणि नोकरी सांभाळून पूर्ण केलं. वाटेल तितके कष्ट करण्याची आईची तयारी, वडिलांचा प्रखर बुद्धिवाद आणि राजन यांची लग्नानंतर भरभक्कम साथ या सगळ्यांमुळे नीरजा यांचं आयुष्य समृद्ध आहे; पण अजून त्यांच्या हातून मलाचा दगड ठरेल, असं काम झालेलं नाही, असं राजन यांना वाटतं. एखादी ताकदीची कादंबरी किंवा नाटक त्यांच्या हातून कधी लिहून होतंय याची राजन वाट बघताहेत आणि त्यासाठी हवी तशी साथ देण्याची त्यांची तयारी आहेच.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The story of neerja and rajan

ताज्या बातम्या