गायत्री कशेळकर

स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे तिच्या शारीरिक वाढीच्या दृष्टीने महत्वाचे असतात. मुलगी, तरुणी आणि स्त्री या तीन महत्वाच्या टप्प्यांबरोबरच आजच्या आधुनिक स्त्रीची वाढती व्यवधानेही तिच्या शरीरावर परिणाम करीत असतात. म्हणूनच  या काळातला तिचा आहार खूपच महत्वाचा ठरतो. या  सदरातून आपण स्त्रीच्या प्रसवक्षम वयातील  शारीरिक वाढीचा आणि त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या पौष्टिक आहाराचा विचार करणार आहोत. आजच्या काळातल्या स्त्रीच्या आरोग्याचा,  तिच्या डाएटचा अर्थात तिच्या र्सवकष आहाराचा विचार करणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.

गायत्री कशेळकर या रजिस्टर डाएटिशियन आहेतच शिवाय क्लिनिकल न्यूट्रिशिनिस्ट आणि डाएबेटिक एज्युकेटर म्हणून कार्यरत आहेत. त्या तीन वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये डाएटिशियन म्हणून काम करत आहेत. सध्या पिडिएट्रीक डाएटिशियन म्हणून पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. गायत्री यांनी क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर रजिस्टर डाएटिशियनची परीक्षा व डाएबेटिक एज्युकेटर या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याबरोबर अनेक ठिकाणी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांत ‘डाएट’ विषयावर लिखाण केले आहे. गायत्री सध्या ‘इंडियन डाएटेटिक असोसिएशन’ आणि ‘आयएपीईएन’ (पुणे)च्या सभासद आहेत.

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये र्सवकष आहाराकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही, अशी सगळ्यांचीच तक्रार असते. प्रत्येकाच्या मनात आहाराविषयी कुतूहल, उत्सुकता, गोंधळ असतोच. काही जण समतोल आहार घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, तर काही जणांना कुठून आणि कशी सुरुवात करू, हा प्रश्न पडलेला असतो. स्त्रियांच्या बाबतीतही हेच होते. स्त्रिया संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असतात, पण काळाच्या ओघात अनेक व्यवधाने सांभाळायला लागत असल्याने स्त्रीचे आयुष्य व्यामिश्र झालेले आहे. म्हणूनच वयाच्या विविध टप्प्यांवर तिने स्वत:चे आरोग्य आणि आहार सांभाळणे गरजेचे आहे. या सदरातून आपण स्त्रीच्या एकूणच आरोग्याचा विचार करत असताना प्रसवक्षम वयातील आहाराचा विशेष विचार करणार आहोत.

किशोरवयीन मुली साधारण १६-२५ वयोगटांत मोडतात. त्या वेळी त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक बदल होत असतात. शरीरात असणाऱ्या फॅट सेलचे प्रमाण ८ टक्क्यांवरून २३ टक्क्यांपर्यंत जाते. याच काळात समतोल आहार, पुरेसा व्यायाम यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. जर या वयामध्ये चुकीच्या पद्धतीने आहार घेतला, अति प्रमाणात स्निग्ध पदार्थ, तळलेले पदार्थ खाण्यात आले तर पुढे जाऊन स्थूलता, थायरॉईड, पीसीओडी यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. आहारात जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या अभावामुळे हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होऊ शकतात तसेच अनियमित मासिक पाळी, केस गळण्याचे प्रमाण वाढणे यांसारख्या तक्रारी दिसू लागतात.

सध्याचा ट्रेंड आहे ‘झिरो फिगर’चा. झिरो फिगरच्या नावाखाली महाविद्यालयीन मुली इंटरनेटवर काहीतरी वाचून चुकीच्या पद्धतीने आहार घेतात. पौष्टिक आहार न मिळाल्याने साहजिकच त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतोच शिवाय दैनंदिन तब्येतीवरही परिणाम होतो. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे प्रत्येकाला एकाच प्रकारचं डाएट कधीही उपयोगी पडत नाही. कारण प्रत्येकाची शरीर रचना, खाण्याच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा बीएमआर (शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याची क्रिया) हा भिन्न असतो. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने, मित्राने अमुक पद्धतीने डाएट करून वजन कमी केले तर मी पण असेच करेन, ही गैरसमजूत आहे. ती मनातून काढून टाकणे गरजेचे आहे.

लग्न हा एक महत्त्वाचा टप्पा. प्रत्येक मुलीवर कुटुंबाची कमी अधिक जबाबदारी येते. पुढे ती वाढतच जाते. याच काळात कुटुंबाची जबाबदारी, घरातील दैनंदिन कामे, कार्यालयीन किंवा व्यवसाय सांभाळताना स्वत:कडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे. या टप्प्यावर तिने अपुरी विश्रांती, असमतोल आहार घेतल्यास मधुमेह, नैराश्य, रोगप्रतिकारकशक्ती मंदावणे, उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांना आमंत्रणच देण्यासारखे आहे. या काळात तिने उत्तमरीत्या आहार घेतला तर पुढे गर्भधारणेच्यावेळची गुंतागुंत टाळता येते. पूर्वी ताजे अन्नच खाल्ले जाई. आता फ्रिजमध्ये दोन-तीन दिवसांचे पदार्थ करून आपण ते अन्न खातो. शिळे अन्न आरोग्यास चांगले नाही, त्यामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी होते. शिळ्या अन्नातील पोषक मूल्ये नष्ट होतात. पूर्वी भाजी आणायला किंवा बाजारात स्त्रिया चालत जात, परंतु आता सर्रास गाडय़ा वापरल्या जातात. चालत जाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे शारीरिक व्यायाम पुरेसा होत नाही. आहार जास्त, पण व्यायाम शून्य झालाय. ऑफिसमध्ये, घरात जिन्याच्या वापराऐवजी लिफ्ट पटकन वापरतो. नाश्ता करायला आणि केला तर खायला वेळ नसल्याने अनेकदा बिस्किटे हाच नाश्ता होतो. त्यातून जेवण उशिरा झाले तर निर्माण झालेल्या अ‍ॅसिडिटीवर सर्रास औषधांच्या गोळ्या घेऊन तात्पुरती मात केली जाते. त्याचे पुढे दुष्परिणाम दिसायला लागतात. हे टाळायचे असेल तर आहारात, खाण्याच्या वेळेत बदल केल्यास आपण नक्कीच चांगले आरोग्य मिळवू शकू.

स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे गर्भावस्था. होणाऱ्या आईचा आहार सर्वात महत्त्वाचा ठरतो, कारण पुढील नऊ महिने गर्भ पूर्णपणे आईच्या पोषणावरच अवलंबून असतो. या काळामध्ये आवश्यक असलेले काबरेहायड्रेट, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे यांची गरज त्याचबरोबर मानसिक आरोग्य उत्तम राखणे गरजेचे असते. जर आईच्या आहारामध्ये पोषणमूल्यांची कमतरता असली तर त्याचा परिणाम म्हणजे बाळाची वाढ खुंटणे, कमी वजनाचे बाळ, अपुऱ्या दिवसांचे बाळ, बाळामधील शारीरिक व्यंग या शक्यता नाकारता येत नाही. स्तन्यपानाच्यावेळी देखील आईचा समतोल आहार हा बाळाच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत वाढीकरिता अत्यंत गरजेचा आहे. कारण बाळ पहिले सहा महिन्यांपर्यंत पूर्णत: आईच्या दुधावर अवलंबून असते. बऱ्याचदा गर्भवती स्त्रियांवर हे खाऊ नये, ते खाऊ नये असे बंधन घातले जाते. त्यामुळे जो पोषक आहार आईला मिळणे गरजेचा आहे तो मिळतच नाही. खूप ठिकाणी असेही आढळून येते की, भाकरी आणि साधे अळणी वरण एवढाच आहार दिला जातो. फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळण्यास सांगितले जाते. त्याच वेळी चुकीच्या माहितीमुळे अतिरिक्त प्रमाणात तूप दिल्यास आईचे वजन खूप वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तब्येतीमध्ये गुंतागुंत दिसून येते.

पुढचा टप्पा बाळाच्या वाढीचा. सहा महिन्यांनंतर बाळाला वरचे खाणे चालू करावे लागते. त्यालाच ‘सप्लिमेंटरी फूड’ म्हणतात. बाळाला काय द्यावे? किती वेळाने द्यावे? किती प्रमाणात द्यावे? वरचे दूध कधी चालू करावे? याबद्दलची सविस्तर माहितीही आपण या सदरात बघणार आहोतच.

प्रत्येक स्त्रीचा ३५ वर्षांनंतरचा काळदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. जशी चाळिशी जवळ यायला लागते तसतसे ‘पोस्ट मेनोपॉझल’ची लक्षणे दिसू लागतात. या काळात हाडांची ठिसूळता, कंबरेचे किंवा पाठीचे दुखणे, नैराश्य यांसारखी लक्षणे दिसून येतात. या वेळी हलका आहार त्यामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम, लोह तसेच उत्तम प्रतीची प्रथिने म्हणजे दूध, दही, ताक, अंडी, चिकन, मासे, यांचा समावेश करावा. व्यायामाच्या अभावामुळे या वयामध्ये कोलेस्ट्रेरॉलची वाढती पातळी, मधुमेह होण्याची शक्यता असते त्यामुळे व्यायाम तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा या वयामध्ये कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे स्निग्धपदार्थ पूर्णपणे बंद केले जातात तर असे न करता योग्य आणि शरीराला उपयोगी स्निग्ध पदार्थ कोणते तसेच त्याचे प्रमाण आहारात किती असावे याची माहिती मिळवणे तितकेच गरजेचे आहे.

स्त्रियांच्या प्रत्येक टप्प्यावरील आहाराची माहिती आपण या सदरातून घेणार आहोतच. स्त्रियांच्या आरोग्याचा सांभाळ आज संपूर्ण कुटुंबाशी निगडित आहे. चला तर आजपासून आपण त्याचा सन्मान करू या!

gkashlakr@gmail.com

chaturang@expressindia.com