07-me-shalaया शाळेने दर महिनाअखेरीस कुणी उत्तम गवंडी, कुणी चांगला सुतार, कुणी उत्तम मातीकाम करणारा, तर कुणी व्यावसायिक अशांना मुलांसमोर आणायला सुरुवात केली. ते मुलांशी गप्पा मारायचे. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे. याचा परिणामही शाळेने मोजला. ‘आम्हाला माहीतच नव्हतं की फारशी न शिकलेली माणसं असूनही त्यांना इतकं येतं.’ ‘आम्हालाही यातलं काय काय शिकता येईल बरं?’ मुलं सांगायची. एका उपक्रमातून अनेक उपक्रमांचा जन्म झाला. सतत काही ना काही करण्यात ही मुलं दंग असायची. इतकं त्यांच्या मनाला नि हाताला काम मिळालं होतं. मग कशाला मुलं टीव्हीच्या पडद्यासमोर बसतील!

‘‘काय सांगू तुला! एके काळी अंगाखांद्यावर इतकी मुलं खेळली, रमली, इथून बाहेर पडली! कवितांच्या गायनाने सगळ्या शाळेच्या खोल्या नादमय होत होत्या, समूहगीतांनी मैदानं भारावून जात होती, लावण्या-पोवाडे, भजनं-अभंग-भारुडांनी व्यासपीठ दणाणत होतं, कुणाकुणाच्या बोलण्यानं मुलं भारावून जात होती. कबड्डी-खोखो-लगोरीच्या खेळानं काय दंगा व्हायचा! सगळे वर्ग घुमून जायचे! ते सारं भारावलेपण आणि आता हे ओसाडपण, रिकामपण!. यातलं काहीच घडत नाही गं! निसर्गाचं वर्णन करणाऱ्या खेडय़ांतल्या दृश्यांना साकार करणाऱ्या कविता हरवल्यात, खेळ बदलले, गाणी बदलली.. बदल होणारच! अजून मन स्वीकारत नाही.’’

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा

एक शाळा या प्रयोगशील शाळेला सांगत होती नि तिनं नि:श्वास सोडला. ही शाळा सारं काही पाहत होती नि तिला सांगत होती- ‘हे सारं खरं असलं तरी आपण श्वास नाही का घ्यायचा? हे बघ, पुन्हा बदलेल सारं! विश्वास ठेवायला हवा. आशा ठेवू या मनात. हा बदल झाला तसा तोही होईल. आपण लहानसा दिवा लावायचा.. आपल्या जिवंतपणाचं, अस्तित्वाचं गाणं इथल्या कणाकणात गुंजत राहायला हवंच. भिंत भिंत बोलायला हवी. आपण मैदानावर जाऊन जुन्या खेळातला आनंद समजून दिला नाही तर मुलं कशी खेळतील? हे सारं मी करते. इथले शिक्षक जुने खेळ धडय़ातून शिकवत नाहीत, मैदानावर जाऊन स्वत: खेळतात. अगदी गॅदरिंगच्या वेळी मुलांबरोबर स्टेजवरही येतात. सणाच्या दिवशी म्हटली जाणारी गाणी मुलं प्रकल्पाच्या रूपानं जिवंत ठेवतात.’
आज ही शाळा आपलं मनोगत सगळय़ा शाळांपुढे मांडत होती. आणि तेही टेलीकॉन्फरन्सच्या माध्यमातून. इथल्या प्रत्येक कार्यक्रमात एक जान होती आणि दरवर्षी, प्रत्येक कार्यक्रम वेगळय़ा पद्धतीनं सादर व्हायचा. मग कंटाळा कसा येईल? आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर्व गोष्टी मुलंच करायची. स्पर्धा लागायच्या. अधिक चांगलं करण्याकडे मुलांचा ओढा असायचा.
एक दिवस तर शाळेने एका वेगळय़ा गटातल्या मुलांचे अभिनंदन केले. सगळ्यांना नवल वाटले. कारण नेहमी चतुरस्र, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास मिळवणारी मुलं स्टेजवर येतात हे काय नवीन? तेव्हा शिक्षक म्हणाले, ‘या मुलांचे खरंच कौतुक आहे. सगळय़ाच गोष्टी विरोधात असताना या मुलांनी हे यश मिळवलंय. आणि यांचं अभिनंदन. कारण पास विषयांची संख्या जास्त आहे. म्हणजे चार विषयांत ही काही मुलं उत्तीर्ण झाली, दोन विषयांत.. काही हरकत नाही. शिवाय यातल्या अनेक मुलांत वेगळा चांगुलपणा आहे. तो विशेष आहे. कारण..’ शिक्षकांच्या या कृतीचा अर्थ सगळ्यांना समजायला वेळ लागला नाही, कारण नातं वेगळं होतं, विचार वेगळे होते.
मुलांमधल्या चांगुलपणाचा शोध घेण्यासाठी या शाळेनं खूप काम केलं होतं. रिकाम्या वेळात असे खेळ आयोजित केले जात होते की अचानक खजिना सापडावा नि खूप आनंद व्हावा तसा शाळेला आनंद व्हायचा नि आजपर्यंत हे सारं तसंच सुरू आहे. एरवी सगळ्यांची ओरड एकच ‘कसलं काय? शक्य आहे हे? मग काम कोण करणार? कागद कोटा पूर्ण कोण करणार?’ पण या शाळेतल्या शिक्षकांनी कागद मागणाऱ्यांनाही आव्हान दिलं होतं, ‘‘आमचं मूल हा जिवंत कागद आहे, अशा अनेक कागदांनी तयार झालेली शाळा एक सुंदर पुस्तक आहे. कोणत्याही मुलाला काहीही नि कुठलंही विचारा. कागदावर खूपच कमी रकाने आहेत. नि अशा काही गोष्टी तुमच्या कागदावर नाहीत, ज्या मुलांमध्ये आहेत.’’ शाळेच्या या आत्मविश्वासाने कागदाचा अट्टहास करणाऱ्या वृत्तीलाही अंतर्मुख व्हायला भाग पाडलंय. मूल्यशिक्षण द्यायचं नसतंच. ही शाळा अशी रचना आहे की तिथल्या कणाकणातून मुलं ते वेचतील.
जेव्हा शाळेला मैदान नव्हते तेव्हा मुलांनी श्रमदानातून मैदान तयार केले. कोणतेही काम मुलांना सांगावं लागलं नाही, तर मुलांनी ते आपणहून केलं. म्हणूनच शाळेत शिकून गेलेली मुलं आजही या शाळेत आपल्या मुलांना घेऊन येतात तेव्हा म्हणतात, खूप आठवण येते सगळ्या क्षणांची! एक दिवस रिकाम्या वेळी शिक्षकांनी आपापल्या वर्गात मुलांना कागद दिले नि सांगितले यावर काही गोष्टींची नोंद करू या. तुमच्यामधले चांगले गुण एका बाजूला लिहू या आणि न आवडणारे दुसऱ्या बाजूला! बराच वेळ कागद कोरा राहिला. कुणीच काही लिहिना. हळूहळू एकेक गोष्ट लिहिली गेली. मदत करतो, दुसऱ्याला रडताना पाहून वाईट वाटते, पक्ष्यांना दाणे टाकतो, स्वच्छता ठेवतो, सर्व, कागद चुरगळत नाही, कचरा इकडेतिकडे टाकत नाही.. राग येतो, मारतो, कधी कधी चिडवतो.. कितीतरी!
आपल्यालाच वाचताना पाहून मुलांना गंमत वाटली आणि असं काही आपल्यात आहे या जाणिवेने अस्वस्थ झाली. एवढय़ावर सर थांबले नाहीत. आपल्या एखाद्या मित्राबद्दल इतरांना काय काय जाणवतं हेही सांगायला सांगितले. एका अर्थाने हे ‘टॅली’ झाले. शेवटी सर म्हणाले ‘आता असा प्रयत्न करता येईल का की दुसऱ्या रकान्यातल्या गोष्टी कमी कमी होतील!’ एका मुलानं दुसरी बाजू फाडून टाकली. मुलांची निरागसता नि प्रश्न सोडवण्याची रीतच वेगळी असते शेवटी! एक मुलगा म्हणाला ‘वजाबाकी होते अंकांची, पण मग वाईट गुण कसे वजा करायचे?’
यावरचे उपायही विविध उपक्रमांमधून शाळेने शोधले. यापेक्षा मूल्यशिक्षण वेगळे काय असणार? या शाळेला माहीत होतं की मुलं शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास जास्त ठेवतात. मग कशाला कोणत्याही कोपऱ्यात पिचकारी मारलेली दिसेल? शिस्त मुलांसाठी नि मोठय़ांना नियम वेगळे, असं नसतं. जे जे मुलांनी केलं पाहिजे असं शाळेला वाटे ते ते सर्व शाळा आधी करत होती, त्यामुळे पाहून अनेक गोष्टी अंगवळणी पडत होत्या. आपला वेगळेपणा इतरांच्या चेष्टेचाही विषय होतोय हे इथल्या मुलांना बाहेर पडल्यावर जाणवायचं. कधी मनात संभ्रम निर्माण व्हायचा. पण जे स्वीकारलंय ते अधिक चांगलं आहे याचा अनुभवही मुलं घेत होती. आपण आपलं स्वत:ला घडवणं घडत होतं.
शाळेनं ठरवलं होतं आपल्या आजूबाजूला असलेली साधनसामग्री वापरायची. म्हणून गावचा- शाळेचा इतिहास मुलांना माहीत होता. शाळेच्या प्रतिज्ञेचा शेवट ‘मी एक चांगला माणूस घडेन’ या वाक्याने व्हायचा आणि मुलं तसे वागण्याचा प्रयत्न करीत.
आज मुलांना गावचा नकाशा काढता येतो, शाळेचा नकाशा काढता येतो, मग राज्य-देश- जग इकडे मुलं वळतात. गोष्टी सांगायला जशी कुणी आई-आजी चालते तशी परंपरा सांगायला आजोबाही चालतात. इथली मुलं आपल्या आवडीच्या कविता अनुभवतात नि चांगली हिंदी चित्रपट गीते सर्वजण म्हणतात..
हे सारं विचारपूर्वक केलेलं होतं. या शाळेने दर महिनाअखेरीस कुणी उत्तम गवंडी, कुणी चांगला सुतार, कुणी उत्तम मातीकाम करणारा, तर कुणी व्यावसायिक अशांना मुलांसमोर आणायला सुरुवात केली. ते मुलांशी गप्पा मारायचे. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे. उत्तम स्वयंपाक करणारी आई व्यवस्थापनावर छान बोलायची. याचा परिणामही शाळेने मोजला. ‘आम्हाला माहीतच नव्हतं की फारशी न शिकलेली माणसं असूनही त्यांना इतकं येतं.’ ‘रोज आम्ही यांना इकडेतिकडे पाहायचो. काय माहीत यांना इतक्या गोष्टी येतात ते!’ ‘आम्हालाही यातलं काय काय शिकता येईल बरं?’ ‘आम्ही फक्त पुस्तकं शिकतो. यांच्यामुळे शिकण्यासारखं किती आहे हे आम्हाला समजलं’ एका उपक्रमातून अनेक उपक्रमांचा जन्म झाला. आणि शाळेबाहेरही मुलांनी कामाला सुरुवात केली. सतत काही ना काही करण्यात ही मुलं दंग असायची. इतकं त्यांचा मनाला नि हाताला काम मिळालं होतं. मग कशाला मुलं टीव्हीच्या पडद्यासमोर बसतील! इतर जण या शाळेकडे बघून म्हणतील, ‘फारच आदर्शवत आहे. व्यवहारात कुठे असं असतं का?’ तर कुणी म्हणतं, ‘ही शाळा चकचकीत नाही. पण इतक्या गोष्टी सहज करता येतात हे या शाळेनेच दाखवलंय.’ ‘शाळा मुलांच्या मनात घट्ट रूतून बसली.’
यातली कोणतीच गोष्ट शाळेच्या वेळेव्यतिरिक्त नव्हती. नेमलेल्या वेळात या गोष्टी सुचवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत होता. मुलांच्या गुणवैशिष्टय़ांची नि उणिवांची नोंद करण्यासाठी कुठलं पुस्तक लागायचं नाही नि वेगळा वेळही द्यावा लागायचा नाही. इतर शाळा, समाज या शाळेला म्हणायचे, ‘कसं सुचतं हो एवढं? कुणी आक्षेप नाही घेत?’
शाळा फक्त हसायची, या हसण्यातच खरं उत्तर लपलेलं होतं. इथे येणाऱ्याला हे उत्तर मिळायचं. इथं येणारे या शाळेचं दर्शन घ्यायचे नि मनात स्वत:ला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याने आनंदून जायचे. अशीच शाळा घडवण्याचा निश्चय करून!