नीरजा

सत्तर-ऐंशीच्या दशकात वाढलेली आणि विज्ञानवादी बनायचा ध्यास घेतलेली आमची पिढी मोठी झाली ती या साऱ्या कर्मकांडांवर, अंधश्रद्धांवर आघात करून. त्या काळात बुद्धिप्रामाण्यवाद आणि समाजजागृती याच्या मार्गावरून चालत निघालो आम्ही. पण असं चालता चालता मी, माझा  मित्र आणि परिवर्तनाचा विचार करणारे काही लोक, या वाटेवर पुढे चालत राहिले आणि बाकीचे मागेच राहिले हे लक्षातच आलं नाही आमच्या. माझ्या या पिढीतल्या कित्येक स्त्रिया आणि पुरुषही केवळ मागेच राहिले नाहीत तर ‘यू टर्न’ घेऊन आज पुन्हा अठराव्या शतकात शिरलेत..

एका तळ्याकडे बोट दाखवून माझा मित्र म्हणत होता, ‘‘ही तीच जागा, इथंच, इथंच त्यांनी माझ्या मुलीला विधवा केली. इथंच ते मडकं फोडलं. या नदीच्या काठाशी. तिला डोक्यावर वाहून आणायला लावलं ते आणि फोडून टाकलं. काय झालं असेल माझं त्या क्षणाला तू कल्पना नाही करू शकत.’’ मी गप्प झाले होते..

गाडी त्या तथाकथित पवित्र, पण अत्यंत गलिच्छ पाणी असलेल्या नदीजवळून वळली तरी ती नदी, त्या नदीच्या काठाला असलेल्या कुंडाकडे जाणाऱ्या त्या पायऱ्या आणि त्या पायऱ्यांवरची ती जागा माझा पाठलाग करत होती. खरं तर तो प्रसंग मी पाहिला नव्हता पण ज्याच्या डोळ्यांसमोर तो घडला होता त्याच्या चेहऱ्यावरची वेदना मला जाणवत होती. लग्न करून आलो होतो आम्ही त्याच्या मुलीचं. रीतसर सासरी रवानगी केली होती मंगल कार्यालयातून आणि परतत होतो. परतताना त्याच्या नजरेला ती नदी, तो परिसर पडला आणि एवढे दिवस दाबून ठेवलेली त्याची वेदना तिरीमिरीत बाहेर पडली..

लग्न ठरलं मुलीचं तेव्हा सांगितलं होतं त्याने मला. प्रेमात होते त्याची मुलगी आणि जावई! हा आमचा मित्र कोणत्याही प्रकारची कर्मकांडं न मानणारा. जातपात, धर्मापलीकडे असलेला. परिवर्तनवादी विचारांचा. त्यामुळे मुलीनं प्रेम असल्याचं सांगितल्याबरोबर होकार देऊन मोकळा झालेला. मुलगा तसा ठाम होता त्याच्या निर्णयावर. घरी सांगितलं त्यानं तेव्हा त्यांचाही नकार नव्हताच. फक्त पत्रिका पाहायची होती त्यांना. माझ्या मित्रानं नव्हत्या काढल्या पत्रिका. मग त्यांनी जन्मवेळ मागून घेतली आणि पत्रिका तयार केली. तर मुलीला मंगळ निघाला. मुलाचे आई-बाप बावरले. मुलगा हट्टाला पेटलेला, ‘लग्न करेन तर याच मुलीशी.’ तेव्हा त्याच्या आईनं धाव घेतली ब्राह्मणाकडे. ब्राह्मणानं लगेच उपाय सांगितला. मुलावरचं संकट टळू शकतं. एक विधी करावा लागेल. हा विधी केला तर घरचे शांत होतील, काय बिघडणार आहे? ‘आपल्याला काही फरक पडणार नाही.’ असं मुलानं समजावलं माझ्या या मित्राच्या मुलीला. या मित्राला आणि त्याच्या बायकोला कळलं तेव्हा दोघंही अस्वस्थ झाले. कोणत्याही कर्मकांडात न रमलेला माझा मित्र तयार नव्हताच. शेवटी मुलीनं गळ घातली. ‘माझ्यासाठी करा नाही तर त्याचे आई-वडील तयार होणार नाहीत.’ त्यानं विचारलं तिला, ‘‘तुला चालेल?’’ तर ती म्हणाली, ‘‘आम्हाला दोघांना केलं किंवा नाही केलं तरी काही फरक पडत नाही. त्यांच्या समाधानासाठी करू या.’’ शेवटी तयार झाला माझा मित्र. केवळ लेकीवर असलेल्या प्रेमाखातर.

त्या दिवशी मुलाच्या आईनं सांगितलेलं सामान आणि मुलीला घेऊन दोघं या नदीजवळच्या मंदिरात गेले. मुलाचे आई-वडील त्या देवळात आलेले. मुलगा नव्हता सोबत. त्याच्या आईच्या मते, हे केवळ त्यांच्या मुलावरचं संकट टळावं म्हणून केलेलं कार्य असणार होतं. मग तिथं कसली-कसली पूजा केली. मंत्र म्हटले गेले. मुलीला बाशिंग बांधलं आणि झाडाबरोबर की सुपारीबरोबर मुलीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर तिला रीतसर विधवा केलं. पिंड मांडले आणि मग ते पिंड कुंडावर नेऊन सोडले आणि मडकंही फोडलं. मुलीचा मंगळ त्या झाडाच्या राशीला गेला आणि त्यांचा मुलगा ‘मोकळा’ झाला. माझा हा मित्र आणि त्याची बायको घरी परत आले ते अत्यंत वाईट मनस्थितीत. मडकं फुटल्याच्या सुतकाचं दु:ख नव्हतं ते. आपण आयुष्यभर ज्या विचारांना मानलं त्या विचारांचा विधी करून आल्याचं दु:ख होतं ते. त्यानंतर लग्न लागलं रीतसर. काहीही न बोलता मुलाकडच्या लोकांनी जे विधी सांगितले ते यंत्राप्रमाणे केले त्यांनी आणि आज त्या नदीजवळून जाताना त्याच्या तोंडून निघून गेलं सारं.

खरं तर नदी म्हणजे सर्जनाचा स्रोत असते आपल्यासाठी, पण त्याच्यासाठी ती नदी त्याच्या विचारांच्या मरणाचं कारण बनली होती कायमची. लहानपणापासून ज्या नदीवर खेळला बागडला, ज्या नदीच्या काठावर त्याला पुरोगामी विचारांची शिदोरी मिळाली, आज ती नदी त्याच्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नाचा भाग बनली होती. या प्रकारामुळे माझा मित्र जेवढा अस्वस्थ झाला होता तेवढीच मीही झाले होते. इतरांना सांगतो आपण सगळं आणि आपल्यालाच काही करता आलं नाही याचं त्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं दु:ख माझ्याही मनात गडद होत गेलं.

खरंच कुठून आले हे मंगळ आणि शनी? कुठून आल्या या प्रथा आणि कुठून आली ही परंपरांच्या नावाखाली चाललेली कर्मकांडं? निसर्गाचे विभ्रम कळत नसलेल्या माणसाच्या मनात दाटलेलं भय दूर करण्यासाठी त्यानंच शोधून काढले विविध उपाय. सुरुवातीला अग्नी, वारा, पाऊस अशा पंचमहाभूतांची पूजा केली त्यानं आणि या अनाकलनीय संकटातून स्वत:ला सोडवण्याची सोय केली. हळूहळू माणसं छोटय़ा छोटय़ा समूहात राहायला लागली. यज्ञयाग करायला लागली. वर्णव्यवस्था जन्माला आली आणि एका वर्णानं या साऱ्या कर्मकांडात स्वत:ला आणि इतर वर्णानाही गुंतवलं. माणसाच्या मनातल्या श्रद्धेचा जसा फायदा घेतला गेला तसा त्याच्या मनातल्या भयाचाही फायदा घेतला गेला. अनेक चुकीच्या परंपरा आणि ग्रहताऱ्यांच्या जंजाळात त्याला अडकवून टाकलं. समाधानाचे आणि आनंद मिळवण्याचे हजारो उपाय सांगितले आणि स्वत:चा व्यवसाय वाढवला.

आज विज्ञानानं माणसाच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उकल केली आहे. चंद्रावर माणूस जाऊन आला हे कळलं तेव्हा माझ्या म्हाताऱ्या आणि अशिक्षित आजीनं संकष्टीचा उपवास सोडून दिला होता. कोणी विचारलं तर सांगायची ती विज्ञानाच्या चार गोष्टी. माझ्या त्या अशिक्षित आजीला कळलेल्या या गोष्टी आज विज्ञान शिकलेल्या लोकांना कशा काय कळत नाहीत, असा प्रश्न पडतो मला. विज्ञान शिकलेली डॉक्टर, अभियंता मुलंदेखील आज कुंडली, वास्तुशास्त्र आणि कशा कशावर विश्वास ठेवून सतत भयाच्या छायेत जगताहेत.

गेली कित्येक वर्ष या अशा किती तरी चुकीच्या परंपरा आणि कर्मकांडातून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आपले विचारवंत आणि सुधारक करताहेत. त्यासाठी त्यांना स्वत:चा जीवही गमवावा लागला आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत वाढलेली आणि विज्ञानवादी बनायचा ध्यास घेतलेली आमची पिढी मोठी झाली ती या साऱ्या कर्मकांडांवर, अंधश्रद्धांवर आघात करून. त्या काळात बुद्धिप्रामाण्यवाद आणि समाजजागृती याच्या मार्गावरून चालत निघालो आम्ही. पण असं चालता चालता मी, माझा हा मित्र आणि परिवर्तनाचा विचार करणारे काही लोक, या वाटेवर पुढे चालत राहिले आणि बाकीचे मागेच राहिले हे लक्षातच आलं नाही आमच्या. माझ्या या पिढीतल्या कित्येक स्त्रिया आणि पुरुषही केवळ मागेच राहिले नाहीत तर ‘यू टर्न’ घेऊन आज पुन्हा अठराव्या शतकात शिरलेत. एवढंच नाही तर आपल्या मुलाबाळांच्या हातीही त्याच कर्मकांडाच्या सूरनळ्या सोपावल्या आहेत त्यांनी.

हे कसलं भय मनात घेऊन जगतो आहोत आपण? या कसल्या श्रद्धा जोपासतो आहोत? कर्मकांड म्हणजे संस्कृती मानणाऱ्यांना आपण करतो त्या कृतीचा अर्थ कळत नाही का? ते मडकं फोडून विधवा करण्याचं दु:ख त्या मुलीला देण्याचा अधिकार कोणी दिला यांना? आणि हा मंगळ मुलाला असता तर? त्याचं कोणत्या झाडाशी लग्न लावून दिलं असतं? की मुलाला असलेल्या मंगळाच्या प्रभावानं मुलगी मेली तर विशेष काही फरक पडत नाही लोकांना? की ती गेली तर दुसरी सहज मिळू शकते हे माहीत आहे त्यांना? एक बायको मेली तर तिचं दहावं झाल्यावर लग्नाचा विचार करणारे पुरुष आपल्या या देशात आता कदाचित कमी झाले असतील पण पूर्वी होतेच की. म्हणून तर ‘स्त्री-पुरुष तुलना’ या त्यांच्या निबंधातून ताराबाई शिंदे यांनी अशा पुरुषांचे कान उपटले आहेत.

एकूणच काय, आजही स्त्रीपेक्षा पुरुषांचा विचारच आपल्याकडे जास्त केला जातो आणि त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या बरकतीसाठी सारी व्रतवैकल्यं स्त्रियांनी करावीत अशी अपेक्षा केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या कर्मकांडात अडकवले जाते.

या अशा कर्मकांडांचे आणि समजगैरसमजांचे बळी केवळ खेडय़ापाडय़ातले अशिक्षित लोक नाहीत तर उच्चशिक्षित असलेले अनेक लोक आहेत. माझ्या मित्राच्या या उच्चशिक्षित मुलीनं जेव्हा हे सारं केलं तेव्हा तिच्या भावना नेमक्या काय होत्या? ज्या आई-वडिलांच्या तालमीत ती वाढली होती त्या आई-वडिलांनी हे करावं असं तिलाही वाटत नव्हतं. पण या परिस्थितीत तिच्या प्रेमाचं पारडं वर गेलं. कदाचित त्यांच्या विचारांपेक्षाही जास्त. ‘ठीक आहे त्यात काय एवढं? बाकी सगळं चांगलं असताना या एका कारणासाठी कशासाठी घालायचे वाद?’ अशा भावनेतूनच तिनं सगळं केलं.

आणि मित्र स्वत: या अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा नसला तरी सतत कोणत्या तरी भयाच्या अमलाखाली असलेल्या आणि कायम देव पाण्यात घालून बसणाऱ्या व कार्मकांडांच्या आहारी गेलेल्या आपल्या तथाकथित उच्चशिक्षित आईवडिलांना दुखावणं शक्य न झाल्यानं मुलानंही त्यांना हे करू दिलं. कशासाठी वाद घालायचे आणि नाती तोडायची असं वाटल्यानंच ती सहज म्हणून गेली बापाला, ‘‘जाऊ दे रे विसरून जा ते. चिल मार आता.’’ पण ‘चिल मारता’ येत नव्हतं ते माझ्या मित्राला आणि त्याच्यासारख्या अशा प्रकारच्या कैचीत सापडलेल्या अनेक विचारी पालकांना.

आज एकविसाव्या शतकाची एकोणीस वर्ष गेली आहेत. तंत्रज्ञानानं सारं जग जवळ आलं आहे. माणूस केवळ चंद्राचाच नाही तर वेगवेगळ्या ग्रहांचा अभ्यास करतो आहे. तिथं जीवसृष्टी असण्याच्या शक्यता तपासतो आहे आणि तरीही आपण ग्रहताऱ्यांच्या जंजाळात अडकून पडलो आहोत. ज्या विविध माध्यमांतून आपल्याला अवकाशातील विविध ग्रहांवर असलेल्या वातावरणाची माहिती मिळते आहे त्याच माध्यमांवर कुंडलीशास्त्र, राशिभविष्य दाखवलं जातं आहे. आजही अनेक विवाहांत मुला-मुलींची मनं जुळतात का हे पाहण्यापेक्षा कुंडली जुळते आहे का याचा विचार केला जातो आहे. मुला-मुलींचे रक्तगट तपासणं गरजेचं असण्याच्या दिवसात कुठे तरी बसलेला चंद्र, शनी, मंगळ आपल्याला अस्वस्थ करतो आहे. आज अनेक मुलींच्या राशीला बसलेल्या या मंगळानं त्यांच्या आई-वडिलांची आणि त्यांचीही झोप उडवली आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांचे त्यांचे ‘गुरुजी’ त्यांना सुटकेचे उपाय सांगत आहेत आणि चांगलीशी दक्षिणाही मिळवत आहेत. डॉक्टर, इंजिनीअर झालेल्या मुली आणि मुलंही, ‘काय फरक पडतोय, आई-बाबांच्या समाधानासाठी करू या.’ म्हणत या कुंडलीच्या चौकटीत अडकून पडताहेत आणि मंगळयान मोहीम यशस्वी झाल्यावर आणि त्यावर आलेले चित्रपट पाहिल्यानंतरही या राशीला बसलेल्या मंगळाभोवती फेऱ्या मारताहेत.

गेली तीस वर्ष ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या अशा अंधश्रद्धांच्या फेऱ्यांतून माणसांना सोडवून त्यांना विवेकी विचारांच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते आहे. तरीही मुलींना झाडांच्या हवाली केलं जातंय आणि त्या झाडांना मारलं जातंय. त्यांचे पिंड मांडले जाताहेत आणि मडकी फुटताहेत आणि त्याबरोबरच या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडताहेत. त्या अशाच उडत राहतील जर आपण सुशिक्षित असण्याच्या आपल्या व्याख्या बदलल्या नाहीत तर. मुलांना पंधरा-वीस लाख रुपयांचं किंवा एखाद कोटीचं पॅकेज मिळवण्यासाठी सक्षम करणं म्हणजे त्यांना सुशिक्षित करणं नाही तर आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तर्कशुद्ध पद्धतीनं पाहायला शिकवणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुशिक्षित करणं. हे ध्यानात घेतलं तर कदाचित आपण या ग्रहताऱ्यांच्या आभासी भयातून आपली सुटका करून घेऊ आणि चंद्र अथवा मंगळावर पाय ठेवण्याच्या लायकीचे होऊ.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com