शिल्पा परांडेकर

प्रत्येक देशाची, प्रदेशाची खास अशी खाद्यसंस्कृती असते. पूर्वजांकडून चालत आलेली. पिढी दरपिढी त्या खाद्यसंस्कृतीमध्ये भरच पडत जाते. पण काही पाककृती या काळाआड जातातच, स्वाद मात्र ते खाल्लेल्यांच्या जिभेवर रेंगाळत राहतो. अशाच काही विस्मृतीत गेलेल्या पदार्थाचा, चवींचा शोध घेण्याचा प्रयत्न दर शनिवारी.

Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री

शिल्पा परांडेकर, या पुणे येथील ‘महासंस्कृती व्हेंचर्स व महासंस्कृती फाऊंडेशन’च्या संस्थापक आणि व्यवस्थापक आहेत. विविध प्रदेशांतली खाद्यसंस्कृती समजून घेणे, त्याचा सखोल अभ्यास करणे आणि त्याची नोंद ठेवणे हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागांतील आदिवासी, अठरापगड जातींचा विविध समाज आणि समुदाय, इथली संस्कृती, वैविध्य, वारसा, हे अभ्यासण्यासाठी त्यांनी राज्यभराचा ७५,००० किलोमीटर्सचा प्रवास करून विस्मृतीत गेलेल्या किंवा विस्मरणाच्या मार्गावर असणाऱ्या शेकडो पदार्थाची कृतीसह नोंद करून ठेवली आहे. 

महाराष्ट्र राज्याला ‘महाराष्ट्र देशा’ म्हणून अनेक काव्यांमध्ये गौरवलं गेलं आहे. महाराष्ट्रातील संस्कृती, कला, परंपरा, खाद्यसंस्कृती यातील वैविध्य पाहिलं, की हे संबोधन किती सार्थ आहे, हे पटतं. साधारण पाच वर्षांपूर्वी मी एका प्रवासाला सुरुवात केली – विस्मरणात गेलेली किंवा विस्मरणाच्या मार्गावर असणारी खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी, अगदी राज्यभराची. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला खूप मोठा वारसा लाभला आहे हे आपण अनेकदा पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं आणि थोडय़ाफार प्रमाणात चाखलेलंही असतं; पण प्रत्यक्षात संपूर्णपणे कधी अनुभवलेलं असतं? आपण याआधी पाहिलेलं, ऐकलेलं जे काही होतं ती फक्त एक झलक होती, हे मला माझ्या महाराष्ट्रातील ३२ जिल्हे, २९० तालुके व ६०० हून अधिक गावांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर लक्षात आलं.

महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत भारताच्या खाद्यसंस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर आपली खाद्यसंस्कृती म्हणजे एक अमूल्य वारसा आहे. अनेक रीतिरिवाज, प्रथा-परंपरा, संस्कृती, संस्कार, आरोग्य विचार, अध्यात्म, भक्ती, कला आणि अभिव्यक्ती यांची सुरेख गुंफण आहे. त्यामुळे माझा हा प्रवास विस्मरणात गेलेल्या खाद्यसंस्कृतीच्या शोधात सुरू झाला असला तरी लोकसंस्कृती, लोककला, लोकगीते, भाषा, आणि तत्कालीन जीवनमानासारख्या महत्त्वपूर्ण माहितीवर प्रकाश टाकणाराही आहे, असं मला वाटतं. कारण अठरापगड जाती-समुदायांचा, अनेक संस्कृतींचा संगम असणारा, ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व राजकीय अशा प्रत्येक गोष्टीत वैविध्य असणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात समजून घेणं, त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे.

हे सर्व जाणून घेण्यासाठी मला महाराष्ट्रातील खेडोपाडय़ांतील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते आणि यासाठी अर्थातच मला खेडी, आदिवासी पाडे, वस्त्या, तांडे या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन, इथल्या लोकांना भेटून त्यांची संस्कृती जाणून घ्यायची होती आणि यासाठी हा प्रवास सुरू झाला. खरं तर प्रवास, संशोधन वगैरे यामागे एक निराळी गंमत आहे. हा प्रवास सुरू झाला तो माझ्या मनात दडलेल्या एका ‘काश’मुळे..

तर घडलं असं.. या माझ्या प्रवासाच्या खऱ्या प्रणेत्या म्हणजे माझ्या ‘आज्या’. माझ्या आज्या आता नाहीत, परंतु त्यांच्या हातच्या साध्या स्वयंपाकाची चव ते त्यांच्या हातच्या खास पदार्थाच्या चवी आजही माझ्या जिभेवर तशाच तरळतात. आज मला ते पारंपरिक पदार्थ कुठून तरी ‘रेसिपी’ शोधून काढून बनवावे लागतात; पण ते पदार्थ नेहमी सापडतातच असं नाही आणि सापडलं तरी ते तसेच तयार होतील याची खात्री नाही. लहानपणी किती नाकं मुरडली होती मी त्या पारंपरिक पदार्थाना! ही माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई. तिच्या स्वयंपाकात विविध ठिकाणच्या खाद्य-संस्कृतीचा सुरेख मिलाफ होता. तिनं बनवलेलं साधं तूप, मेतकूटसुद्धा किती खमंग! आंबोळय़ा, कोकणी वडे, थालीपीठ, आप्पे, विविध प्रकारची भजी, चविष्टच! आपल्या रोजच्याच शेपू, पोकळा, आंबाडी यांच्या भाज्याही किती चवदार लागायच्या आणि होत्याही किती पौष्टिक. सगळं खूपच भारी असायचं. ती खरंच ‘अन्नपूर्णा’ होती. नवनवीन पदार्थ बनवणं आणि इतरांना आवडीनं खाऊ घालणं हा तिचा छंदच होता जणू! माझी दुसरी आजी- माझ्या आईची आई. हीसुद्धा सुगरणच होती. तिचं जवळपास सगळंच ‘होममेड’ आणि ‘ऑरगॅनिक’ असायचं. तसं मला तिच्या पाककलेविषयी फारसं नाही आठवत; पण तिच्या हातच्या दोन पदार्थाची चव मी जन्मभर विसरणार नाही. एक म्हणजे श्रीखंड आणि दुसरं म्हणजे रोजच्या वापरातलं मिसळलेलं तिखट- (कांदा-लसूण मसाला). ती उखळीच्या वरच्या बाजूला एका सुती कापडात दही बांधून रात्रभर ठेवून द्यायची. मग सकाळी चक्का तयार झाल्यावर त्यात वेलची पूड, साखर, काजू वगैरे घालून श्रीखंड बनवायची. चव अप्रतिम, अवर्णनीय!   

आज अनेक जुने पदार्थ बनवताना माझ्या डोळय़ांसमोर नेहमी त्याच दोघी येतात. पदार्थ बनवतानाच्या त्या आठवतात; पण नेमकं काय, कसं केलं हे काही आठवत नाही. ‘काश’, मी त्यांचे हे पदार्थ, त्यांच्या कृती आणि त्यामागचा सांस्कृतिक ठेवा लिहून ठेवला असता तर किंवा यातील थोडं काही त्यांच्यासोबत बसून मला शिकून घेता आलं असतं तर? आज मला माझ्या आज्यांचे ते खासम्खास पदार्थ आठवतात. अशा अनेक आजी, आई असतील, की ज्यांच्या पोतडीत नक्कीच खूप रुचकर, खमंग, पौष्टिक पदार्थ असतील याची मला खात्री वाटते. म्हणून मग ठरलं, या आठवणीतल्या चवींचा शोध घ्यायचा. त्यांच्या मागच्या गोष्टी, कथा, संस्कृती जाणून घ्यायची. त्यांचा दस्तावेज करून ठेवायचा आणि हा वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा. याकरिता जे-जे करता येईल ते-ते मी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध माध्यमं व व्यासपीठांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलो आणि अधिकाधिक लोकांना यामध्ये जोडून घेतलं तर आपला हा अनमोल वारसा केवळ जतनच होणार नाही तर तो सर्वदूर पोहोचेल याची मला खात्री आहे.

आजपासून आपणदेखील माझ्या या प्रवासाचे साक्षीदार होणार आहात. या प्रवासात मला भेटलेल्या व्यक्ती, त्यांची कहाणी, पदार्थाच्या रंजक गोष्टी, काही किस्से, काही गमती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हीही अनुभवा त्या त्या चवींचा प्रवास माझ्यासह, राज्यभराचा..