शिकवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणार्‍या शिंदे मॅडम सध्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्येही लोकप्रिय आहेत ते त्यांच्या हसतखेळत शिकवण्याच्या पद्धतीमुळे. वेगवेगळी कोडी घालत, मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणार्‍या, त्यांच्या विचाराला चालना देणार्‍या शिंदे मॅडम यांच्या कृतिशीलतेमुळे पुण्याजवळील जांबे जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी शिक्षण म्हणजे आनंददायी प्रयोगशाळा ठरली आहे. गाव-खेड्यातील मुलांना एकजुटीने, एकात्मिक भावाने शिकवणार्‍या सर्जनशील शिक्षिका सीमा शिंदे अर्थात शिंदे मॅडम यांच्या कामाविषयीचा लेख आजच्या (५ सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्ताने…

३ ३ ३ = यामध्ये कोणतेही चिन्ह वापरा, मात्र त्याचे उत्तर १ यायला हवे.

  • २४ ने विभाज्य असलेली खालीलपैकी सर्वांत मोठी संख्या कोणती? (चार पर्याय)
  • आयताकृती कागदाचे क्षेत्रफळ न बदलता चौरसकृती करून दाखवा.
  • चार ठिपक्यांपासून एक त्रिकोण कसा तयार कराल?
  • कागदावरील चार रेषा रबर, पेन्सील न वापरता त्याच्या ३ रेषा करा.
    कालगणना मापन कसं कराल?
  • ७ खंड आणि ५ महासागर लक्षात ठेवायची युक्ती कोणती?
  • वर्ष – लीप वर्ष कसं तयार होतं?
  • ‘टेल’ आणि ‘से’ या इंग्रजी शब्दांतील फरक काय?
  • इंग्रजी व्याकरण गाण्यातून कसं लक्षात ठेवायचं?

असे एक ना अनेक प्रश्न विचारत, कोडी घालत सीमा शिंदे अर्थात सगळ्यांच्या शिंदे मॅडम मुलांना अभ्यासात रमवतात तेव्हा पुस्तकातलं आणि पुस्तकापलीकडचं शिक्षण आनंददायी होतं आणि अनेक विद्यार्थी दर महिन्याला एकही दिवस अनुपस्थित न राहण्याचं बक्षीस घेऊन जातात. शिक्षण, परीक्षा हे ओझं न होता माहितीचं भांडार खुलं करणारं विस्मयकारी जग होतं.

पुण्यातल्या जांबे गावातील जिल्हा परिषद शाळेतल्या पहिली ते पाचवी इयत्तेला सलगपणे शिकवणार्‍या शिंदे मॅडम आणि त्यांचे विद्यार्थी सध्या जगभर पोहोचले आहेत ते समाज माध्यमांमुळे. वर्गात शिकवतानाचे त्यांचे हे व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचे ‘इन्स्टाग्राम’वर ८ लाख ८ हजार तर ‘यूट्यूब’वर ५ लाख ८९ हजार ‘फॉलोअर्स’ आहेत. त्यात जगभरातले विद्यार्थी आहेत आणि जवळजवळ ४० टक्के शिक्षकही.

अर्थात या समाजमाध्यमांतून शिकवण्याची सुरुवात झाली ते करोना साथीच्या काळात. तेव्हा सगळ्याच शाळा बंद होत्या आणि नंतर शाळा ऑनलाइन भरायला लागल्या. त्याची अजिबात सवय नसलेल्या मुलांना ‘स्क्रीन’समोर खिळवून ठेवायचं तर काही वेगळं करावं लागणार होतं. त्यातूनच नवनवीन प्रयोग होऊ लागले. लहान मुलांना जर हसतखेळत, गंमत करत, कोडी घालत, युक्त्या सांगत शिकवलं तर कठीणातील कठीण विषयही सहज आत्मसात करता येतो हे गुपित शिंदे मॅडमना कळलं आणि त्यांनी त्याचाच वापर करत गणितच नव्हे तर विज्ञान, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र अशा सगळ्याच विषयांतील कुतूहल निर्माण करणारी छोटी छोटी कोडी तयार केली आणि वर्गात विचारायला सुरुवात केली. साथीचा काळ संपल्यावर शाळा पूर्ववत सुरू झाल्यावर हाच प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष वर्गात सुरू केला. आणि त्याचा अपेक्षित परिणाम तर होऊ लागलाच परंतु त्यातल्या व्हिडीओंमुळे अनोळखी लोकांपर्यंतही हा प्रयोग पोहोचला.

वर्गात कोडं समोर आलं की, त्यांचे विद्यार्थी काही वेळा विचारात पडतात, काही वेळा पुढे येऊन फळ्यावरचं ते कोडं सोडवायचा प्रयत्न करतात. त्यातल्या काहींचं कोडं सुटतं, काहींचं नाही. पण एवढ्या वर्षांत ही मुलं इतकी तयार झालीत की त्यातलं एक तरी पुढे येऊन ते सोडवतंच. त्याचबरोबरीने गोष्टीत लपलेली म्हण शोधा असेल किंवा कविता, गाणी म्हणण्यातून मुलांना भाषेचीसुद्धा वेगळ्या पद्धतीने ओळख होते. त्यांचा एक विद्यार्थी अनिरुद्ध तर फारच छान गातो. स्नेहसंमेलनात तर प्रत्येक मुलाने भाग घ्यायचाच हा शिंदे मॅडमचा आग्रह असतो. त्यामुळे रंगमंचावर येऊन बोलण्याचं भय नाहीसं होतं. शिवाय इतर स्पर्धांमध्येही मुलं भाग घेत असल्याने अवांतर वाचनही होत असतंच. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक उत्साहाचा दिवस म्हणजे शासनाचा उपक्रम, आनंददायी शनिवार अर्थात दप्तराविना शाळा. त्यामुळे दर शनिवारी ही मुलं शाळेच्या मैदानात व्यायामाचे, शरीर संतुलनाचे प्रकार शिकत असतात. खुल्या मैदानातील खेळातून जे जे माणसाला मिळतं ते सगळं ही मुलं घेत असतात.

गेली १९ वर्षं शिक्षिकेचं व्रत पाळणार्‍या सीमा मॅडमचं लग्न झालं तेव्हा त्याचं पदवीपर्यंतही शिक्षण झालं नव्हतं. पण लहानपणीच आत्याच्या मुलाशी ठरलेलं त्यांचं लग्न ‘ठरवलेलं’ असलं तरी प्रेमविवाहात बदललं आणि राजेंद्र शिंदे यांनीही आपल्या बायकोची शिक्षक होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला, इतका की डी.एड., बी.एड., एम.एड., एम.ए. तर त्यांनी पूर्ण केलंच, आता पीएच.डी. करण्याचाही विचार सुरू आहे.

अर्थात प्रत्येक स्त्रीला घरात काम करावं लागतंच. त्याचं एकत्र कुटुंबं, परंतु सहकार्य करणारं. पहाटे ५ वाजता उठून सीमाताई कामाला लागतात. सकाळचं जेवण सीमाताई करणार आणि रात्रीचं जाऊबाई अशी सरळसोट विभागणी असल्याने संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना व्हिडीओ एडिट करायला वेळ मिळतो. शिवाय मुलांना वाढवणं, त्यांचं शिक्षण, संसार याबरोबरीने नवर्‍याचं आजारपण (त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे) यामुळे येणारा ताण या मुलांमध्ये विसरला जातो, हा त्यांना मिळणारा फायदा. पण त्यांना शिकवण्यात खूपच आनंद मिळतो हे त्यांच्या व्हिडीओंवरून सहज दिसतं.

लहानपणापासून शिक्षकच व्हायचं हे ठरवलेल्या शिंदे मॅडम सुरुवातीला, २००८ पासून कोंढावळे गावातल्या शाळेत शिकवत होत्या. दोन महिन्यांचं बाळ आणि पतीचं आजारपण यातून मार्ग काढत शिकवत राहिल्या. सुरुवातीची शाळा चार शिक्षकी होती म्हणजे दोन वर्गाला एक शिक्षक असायचा. एका वर्गाला शिकवत असताना दुसर्‍या वर्गाला सरावासाठी काही तरी द्यायचं, यातूनच त्यांची सर्जकता आणि कल्पकता वाढीस लागली आणि तिथूनच मुलांना शिक्षणात रमवण्यासाठीचे खास प्रयत्न सुरू झाले. मुलांनी शिकलं पाहिजे हे त्यांना आतून वाटत होतं. कारण त्या समाज बघत होत्या, लोक बघत होत्या, आजूबाजूची परिस्थिती पाहत होत्या. गावात फारच कमी मुलं शिक्षण पूर्ण करताना दिसत होती, मुलीचं तर लवकर लग्न केलं जायचं. गावात एखादाच डॉक्टर, इंजिनीयर व्हायचा. सरकारी नोकरीतही फार कमी मुलं जायची. कारण शेती जास्त. आपण काही तरी करायला हवं हे सीमा मॅडमच्या लक्षात आलं. त्या सांगतात, ‘‘आपल्याला समाज खूप काही देत असतो. समाजाचे पांग फेडायचे असतात हे माझ्या डोक्यात पक्कं असल्याने मी शिक्षणाच्या वाटेकडे वळले. हाडाची शिक्षक असल्याने मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्या पोटात शिरून शिकवायला हवं हे माझ्या लक्षात आलं. मग मी कोडी घालायला लागले. उत्तर देणार्‍याला बक्षीस द्यायला लागले. कधी बिस्किट, चॉकलेट तर कधी अगदी दोन रुपयांच्या पेनाचं मोलही मुलांसाठी खूप असतं. अनेकदा मुलांमध्ये मूल होऊन शिकवायला लागलं. अनेकदा तर मला उत्तर माहीत नाही किंवा चुकीचं उत्तर देऊन बाईंनाही काही गोष्टी येत नाहीत याचा मुलांना मिळणारा आनंद घेऊ दिला. त्यामुळे मुलं अधिक मोकळी झाली.’’ त्याच्या शिकवण्याचं सार हे असं त्यांच्या कृतीतून दिसतं.

त्यांची आताची जांबेतील शाळा ही जिल्हा परिषदेची – लोकप्रिय भाषेत, झेडपीची. त्यामुळे कोणत्याही आर्थिक, शैक्षणिक स्तरातील मुलं येतात. मजुरांची, वीटभट्टीतल्या पालकांची मुलं येतात. अनेक मुलं तर एकल पालकांची असतात. कुणाच्या बाबांनी आत्महत्या केलेली असते, कुणाला आईच नसते. एकाची तर आजीच त्याला सांभाळते. त्यामुळे अनेक मुलं उपाशीच शाळेत येतात. मध्यान्ह जेवण असतं, परंतु तोपर्यंत मन तर स्थिर राहायला हवं. मग बाई मुलांना विचारतात, ‘‘काय रे काही खाऊन आलास -आलीस का?’’ मुलांची मान खाली गेली की, लक्षात येतं की ते उपाशी आहेत. मग घरून येताना पर्समधून आणलेला बिस्किटचा पुडा किंवा असंच काही त्यांना खायला देतात. ‘‘कसं रागावणार या मुलांवर काही चुकलं तरी? मस्ती केली तरी?’’ असा प्रश्न त्या आपल्यालाच विचारतात. अर्थात म्हणून चुकीच्या गोष्टीला सहज माफी नाही. त्यातलीच एक वाईट गोष्ट शिव्या देणं. एकदा एका नवीन आलेल्या मुलाने फार घाणेरडी शिवी दिली. झालं, मुलं बाईंकडे आली. बाईंनी शिक्षा दिली. त्याच्या हातात पांढरी रिबीन बांधली गेली. दिवसभर ती रिबीन त्याच्या हातात होती. मुलांचं त्याच्याकडे लक्ष होतं. आपल्या चुकीची जाणीव इतक्या तीव्रपणे त्या मुलाला झाली की दुसर्‍या दिवसापासून त्याची शिवी गायबच झाली. पण सीमा मॅडमच्या हे लक्षात आलंय, ही मुलं मित्रांमध्ये -मैत्रिणींमध्ये जास्त रमतात, मोकळी होतात. त्यांच्या वर्गात ५५ मुलं आहेत. त्यांनी पाच-पाच मुलांचे गट तयार केलेत. हुशार ते आकलनास कमी असणार्‍या मुलांचा. मुलगे आणि मुली एकत्र. मुली गट अधिक चांगल्या प्रकारे हाताळतात असं त्यांचं निरीक्षण आहे. ही मुलं एकमेकांच्या सोबतीने शिकतात. त्यांच्यात मैत्रीभाव निर्माण करणं, एकात्मतेसाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही, हे त्यांना अनुभवावरून पटलं आहे.

आठवीपर्यंत असणार्‍या त्यांच्या या शाळेत आज ३७५ मुलं आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच, स्कॉलरशिप परीक्षा, इतर परीक्षा यासाठी मुलांना तयार करावं लागतं. शिवाय सरकारी शाळा म्हणजे शासनाच्या योजना पूर्ण करण्यासाठीही त्यांना जावंच लागतं. त्यातूनही सीमा मॅडम असे विविध प्रयोग करत असतात. मात्र एक गोष्ट आहे, त्या पहिली ते पाचवीपर्यंत एकाच तुकडीला शिकवत आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताखाली गेली चार वर्षं ही मुलं चांगली तयार झाली आहेत. अर्थात यंदा ८-१० नवीन मुलं आली आहेत. त्यांना या मुलांबरोबर आणायचं तर मेहनत करावी लागणार आहेच. पण एकमेका सहाय्य करू, असं म्हणत मुलांनीही ते स्वीकारलंय.

आज त्यांची ही जिल्हा परिषद शाळा आधुनिक होते आहे, सरकारी शिक्षण योजनेतील कौशल्यावर आधारित अनेक उपक्रम इथंही राबवले जात आहेत. परसबागेत छोटेखानी शेती पिकवली जातेय, ‘रोबोटिक लॅब’मधलं कृत्रिम बुद्धमत्ता (एआय)चं प्रस्थ मुलांमध्येही वाढतंय. शिवाय कम्पुटर लॅब आहेच. त्याचा योग्य वापर मुलांकडून करून घेणं हे आव्हान हे शिक्षक स्वीकारत आहेत. अर्थात ही लॅब अजून अर्धवट आहे, त्यासाठी लागणारा अडीच लाख रुपयांचा अर्धा खर्च शाळेला उभा करायचा आहे. तो कुणाच्या तरी मदतीने पूर्ण करणार हा प्रश्न आहे; परंतु मुलांचं हेही स्वप्न लवकर पूर्ण होईलच. आज शिंदे मॅडम यांच्या हाताखालून गेलेल्या अनेक मुली कुणी पोलीस भरती झालंय, कुणी रेल्वेत भरती झालंय, कुणी बँकेत आहेत, हे ही एक यशच.

उपक्रमशील असलेला जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे अशा पुणे जिल्हा परिषदेच्या दर महिन्याला होणार्‍या शिक्षण परिषदेमध्ये गणित विषयासाठी शिंदे मॅडम सुलभक म्हणून जबाबदारी पार पाडतात. त्या आपल्या या यशाचं श्रेय सगळ्यांना देताना सांगतात, ‘‘आमचे मुख्याध्यापक नरेंद्र अमृतराव बाळसराफ व शाळेतील सहकारी शिक्षक, जांबे गावातील ग्रामस्थ तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकारी या माझ्या कामासाठी मला नेहमी पाठिंबा देतात.’’

विनोबा भावे यांचं प्रसिद्ध वचन, ‘मुलांमध्ये मूल होऊन शिकणं आणि शिकवणं’, हा सीमा शिंदे मॅडम यांचा जीवनाधार आहे. त्या तत्वावर घट्ट रुजलेल्या त्यांच्या विचारांची मुळं अनेकांच्या आयुष्यात खोलवर झिरपत जावोत, हीच आजच्या शिक्षकदिनी प्रार्थना.
arati.kadam@expressindia.com