अपर्णा देशपांडे
आपल्या वडिलांच्या इच्छेखातर सेहमत खान पाकिस्तानात दाखल झाल्या ते भारतीय गुप्तहेर म्हणून… पाकिस्तान लष्करात काम करणार्या अधिकार्यांच्या घरात राहून एकीकडे पत्नी, सून अशा भूमिका बजावतानाच भारतीय सैन्यासाठी त्यांनी मोठ्या धाडसाने आणि चातुर्याने गुप्तहेरगिरी केली. अपार देशप्रेमापोटी जिवाची बाजी लावून त्यांनी ही गुप्तहेरगिरी केलीच, पण आपल्या आनंदी आयुष्याचा त्यागही केला…
भारतीय नौदलातील निवृत्त लेफ्टनंट कमांडर हरिंदर सिक्का यांची त्यांच्या कामानिमित्त भारतीय सैन्यातील कॅप्टन समर खान यांच्याशी भेट झाली. बोलता बोलता कॅप्टन समर यांनी सांगितलेली त्यांच्या आईनं देशासाठी केलेल्या कामगिरीची पुसटशी माहिती ऐकूनच हरिंदर सिक्का पुरते झपाटून गेले. त्यांनी जे ऐकलं ते विलक्षण होतं. अधिक खोलात जाणून घेण्याचा त्यांनी मग चंगच बांधला.
कॅप्टन समर यांनी त्यांची आई त्या वेळी कुठे राहत होती, ते जाणीवपूर्वक सांगितलेलं नव्हतं. हरिंदर यांनी सैन्यातील संपर्क वापरून माहिती काढली आणि ते शोधत शोधत पंजाबातील मालेरकोटला इथं पोहोचले. हरिंदर यांनी येण्याचं कारण सांगितल्याबरोबर दरवाजा धाडकन बंद झाला. कॅप्टन समर यांच्या आई काहीही बोलण्यास तयार नव्हत्या. हरिंदर त्यांच्या घरासमोर दिवसभर बसून राहिले. त्यांनी भेटण्याचा हट्ट सोडला नाही, तेव्हा त्या त्यांना फक्त दहा मिनिटांसाठी भेटल्या. त्या होत्या, भारतीय गुप्तहेर संघटना ‘रॉ’ (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग)साठी फार मोठी कामगिरी बजावलेल्या गुप्तहेर, सेहमत खान! (त्यांचं खरं नाव अद्याप गुप्त ठेवलं गेलं आहे.)
हरिंदर सिंग यांना सेहमत यांचा विश्वास संपादित करावा लागला, तेव्हा कुठं त्या थोडंफार बोलत्या झाल्या. काश्मीरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हिदायत खान आणि तेजश्वरी सिंग यांची कन्या सेहमत दिल्लीला शिक्षण घेत असताना तिला घरून निरोप आला आणि ती तातडीनं काश्मीरला पोहोचली. हिदायत यांची प्रकृती चिंताजनक होती. तेव्हाचे ‘रॉ’ प्रमुख मानव चौधरी (सांकेतिक नाव : मीर) देखील चिंताग्रस्त होते, कारण देशभक्त हिदायत खान यांनी व्यवसायाच्या निमित्ताने पाकिस्तानात चांगलं ‘नेटवर्क’ प्रस्थापित केलं होतं. त्यांचे तिथल्या मोठमोठ्या लष्करी अधिकार्यांशी संबंध होते. ते पाकिस्तानी लष्करातील अनेक आतल्या गोटातल्या बातम्या सहजपणे ‘रॉ’ ला पुरवत असत. आपल्या पश्चात आता आपलं इतकं मोठं काम कोण करणार? इतकं मोठं जाळं तयार केलेलं आहे, त्यासाठी तितकीच विश्वासू व्यक्ती हवी या विचारानं त्यांनी आणि ‘रॉ’ने सेहमतकडे एक प्रस्ताव ठेवला. कामगिरी मोठी होती. त्यांना त्यांच्या महाविद्यालयातील प्रियकरावरील प्रेमाचा कठोर मनानं त्याग करावा लागणार होता, शिवाय पुढील आयुष्यात प्रचंड मोठी जोखीमही होती.
पाकिस्तान लष्करातील ब्रिगेडियर शेख सईद हे हिदायत यांचे चांगले मित्र होते. नितळ गोर्या रूपवान सेहमतला त्यांची सून करून घेण्याचा प्रस्ताव त्यांना खूपच भावला. हिदायत यांच्या इतक्या मोठ्या व्यवसायाच्या सेहमत या एकुलत्या एक वारस होत्या हेही एक मोठं कारण त्यामागे होतं. सईद यांचा शांत वृत्तीचा मुलगा कॅप्टन इक्बाल यांची पत्नी बनून सेहमत १९७१ च्या सुरुवातीला पाकिस्तानात दाखल झाल्या. (लग्नानंतर काही दिवसांतच वडील हिदायत खान यांचं निधन झालं.) त्यावेळी त्यांच्यासोबत होता ‘रॉ’ च्या काही महिन्यांच्या अत्यंत कठोर प्रशिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास, त्यांचं प्रखर देशप्रेम आणि आई-वडिलांचा आशीर्वाद!
पाकिस्तानच्या लष्करी हालचाली समजून घेण्यासाठी सेहमतनं त्यांच्या बालेकिल्ल्यातच प्रवेश केला होता. ‘रॉ’साठी काम करणारे काही प्रशिक्षित प्रतिनिधी त्यांच्या घरापासून काही अंतरावर विखरून लक्ष ठेवून असतील याची दक्षता घेतली गेली होती. सेहमत यांनी तिथल्या प्रचंड मोठ्या आलिशान बंगल्याची आणि भवतालच्या जागेची आधी नीट माहिती करून घेतली. कुटुंबाच्या मसाल्याच्या व्यवसायात लक्ष घालून विश्वास संपादन केल्यावर त्यांनी आपल्या मूळ उद्दिष्टांकडे मोर्चा वळवला. दुपारच्या शांत वेळी सासरे ब्रिगेडियर सईद यांच्या खोलीतील दोन मोठ्या फोटोफ्रेमच्या मागे, त्यांच्या कार्यालयातील अगदी बारीक आवाजातील बोलणंही ऐकू येईल, असे मायक्रोफोन बसवले. त्यांच्या स्वत:च्या स्वच्छतागृहात ‘मोर्स कोड’ यंत्र आणि संदेश वाहनाचे रेडिओ यंत्र लपवले. ‘रॉ’ प्रमुख मीर यांनी ‘मोर्स कोड’ मशीन न बसवण्याबद्दल निक्षून सांगितलं होतं, तरीही त्यांनी ती जोखीम उचलली होती. सुरुवातीचे काही दिवस छोटेमोठे संदेश अगदी सहज पाठवण्यात त्यांना यश मिळालं. त्यांच्या लष्कराच्या हालचाली, खरेदी-विक्री, त्यांच्या चर्चा याबद्दल त्या कळवत राहिल्या. सगळं सुरळीत चालू होतं, पण सईद यांचा जुना विश्वासू नोकर अब्दुल याला सेहमतवर जराही विश्वास नव्हता. ही बाई वरून दाखवते तितकी सरळ नाही, हे त्याचं मत होतं.
घरात कुणी नसताना सेहमत यांच्या हालचाली त्याला संशयास्पद वाटत होत्या. त्याने एकदा ब्रिगेडियर साहेबांना तसं सांगण्याचा प्रयत्न केला हे लक्षात आल्याबरोबर सहमत कमालीच्या सावध झाल्या. सासरेबुवांचा विश्वास संपादन करण्याची एक मोठी संधी त्यांना गवसली. त्यांच्या हाताखाली काम करणार्या सैन्यदलाच्या सगळ्या तुकड्यांची तपासणी करण्यासाठी अत्यंत निर्दय असे जनरल ऑफिस कमांडिंग (जीओसी) आमिर खान जातीनं येणार होते. त्यांच्याकडून सगळ्या तुकड्यांना सर्वोच्च दर्जा प्राप्त झालाच पाहिजे यासाठी सेहमत यांनी भारतात फोन करून आमिर खान यांची इत्थंभूत माहिती मिळवली. त्यांची इतकी जबरदस्त खातिरदारी केली, की आमिर खान खूश होऊन गेले. लवकरच सईद यांना पदोन्नती मिळाली.
एक दिवस घरात इतर कुणीही नसताना जनरल सईद यांच्या घरच्या कार्यालयातील एक अत्यंत गोपनीय दस्तऐवज सहमत यांंच्या हाती लागला. पाकिस्तानी पाणबुड्यांनी भारतीय युद्धनौका ‘विक्रांत’ला हल्ल्याच्या टप्प्यात ठेवण्यासंदर्भात नकाशे आणि ‘विक्रांत’ची बरीच छायाचित्रे, त्याची रचना, त्यावरील मनुष्यबळ अशी तपशीलवार माहिती होती. ते सगळं बघून सेहमत यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पाकिस्तान लवकरच भारतावर हल्ला करणार या संदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. ही सगळी माहिती ताबडतोब भारतात कळवण्यासाठी त्या धावतच स्नानगृहात गेल्या, धडधडत्या हृदयानं त्यांनी ‘मोर्स मशीन’ सुरू केली. संदेश पाठवला – ‘खोल पाण्यातून जाणार्या बोट विक्रांतवर हल्ला करणार आहेत. पाक सैन्य चंबळकडे रवाना.’ संदेश पाठवल्यावर त्यांनी पुन्हा त्या कार्यालयात येऊन सगळी कागदपत्रे पुन्हा जागच्या जागी ठेवली आणि तेवढ्यात दारावर जोरात थाप पडली. दारात अब्दुल होता…! जनरल साहेबांना ताबडतोब काही कागदपत्रं हवी आहेत, त्यांनी तुमची मदत मागितली आहे, असं सांगताना त्याची शोधक नजर आत स्नानगृहापर्यंत खोलवर गेलेली सेहमत यांना जाणवली पण बाहेर येऊन कागदपत्रं शोधण्याचं नाटक करत त्यांनी ती वेळ मारून नेली. हा अब्दुल मोहिमेत मोठा अडसर होता. कागदपत्रं घेऊन जनरल साहेब निघून गेले, तशा त्या पुन्हा बाथरूमकडे धावल्या. दरवाजा सताड उघडा होता आणि ‘मोर्स कोड’ मशीन उपटण्यात आलेली होती. हे फार भयानक झालं होतं! त्यांनी खिडकीबाहेर बघितलं, अब्दुल हातात ‘मॉर्स मशीन’ घेऊन लगबगीनं चालला होता.
लष्कराचा एक ट्रक बाहेर उभा होता. त्यांनी बाहेर धाव घेतली. कुणी बघत नाही याची खात्री करून त्या ट्रकमध्ये चढल्या. डोक्यावर टोपी घालून चेहरा लपवला आणि ट्रक सुरू केला. अब्दुल हा मेजर मेहबूब यांच्या हवेलीच्या दिशेनं गेल्याचं त्यांनी बघितलं होतं. त्या दिशेने त्या निघाल्या. रस्त्यात त्यांना अब्दुल दिसला आणि त्यांनी ट्रक सरळ त्याच्या अंगावर घातला. पुढे समोरच लष्करी चालकांच्या सदनिका होत्या, तिथंच ट्रक सोडून तिथूनच एक बुरखा घेऊन त्यांनी तो अंगावर चढवला आणि निग्रहानं मनावर ताबा ठेवून घरी परत आल्या. संवेदनशील मनाच्या सेहमत यांना त्या प्रसंगानं पुरतं हलवून सोडलं होतं. त्यांनी स्नानगृहातील उरलेल्या तुटक्या वायर्स उपटून काढल्या आणि बुरख्यासोबत सगळी बाकी उपकरणं जाळून टाकली. ‘आय.एन.एस. विक्रांत’ या युद्धनौकेच्या सुरक्षेसाठी भारतात समुद्रतटावर त्वरित हालचाली सुरू झाल्या…
अब्दुलनं शेवटच्या क्षणी मेजर मेहबूब (जनरल सईद यांचे मोठे चिरंजीव) यांना काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या हातात कसल्या तरी धातूचे तुकडे सापडले होते ही बाब सेहमत यांच्यासाठी धोकादायक होती. मेजर नक्कीच विषयाच्या मुळाशी जाणार होते. एका गुप्तहेरासाठी ओळख उघडी न होऊ देणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. निग्रहानं त्या जामा मशिदीत जाण्याच्या बहाण्यानं बाहेर पडल्या. गुपचूप एका ठिकाणी फोनने संपर्क साधला आणि कारमध्ये येऊन बसल्या. काही मिनिटांत एक छत्री विकणारी गरीब स्त्री तिथं आली. त्यांनी भाव न करता पटकन ती छत्री ताब्यात घेतली याचं त्यांच्या चालकाला आश्चर्य वाटलं. घरी आल्याबरोबर त्यांनी छत्रीच्या टोकाशी असलेल्या सुळकीतून चिठ्ठी काढली, ‘छत्रीच्या टोकाशी पारा सोडणारी सुई आहे…’ असा निरोप त्यात होता. त्यांनी चिठ्ठी गायब करून छत्री सुरक्षित ठेवली. त्यानंतर त्यांना एक फोन आला, ज्यात पुढील योजना सांगण्यात आली. दोनच दिवसांनी त्या बुरखा घालून आणि सुई लावलेली ती छत्री घेऊन मेजर मेहबूब यांच्या मागावर गेल्या… थोड्याच वेळात त्या छत्रीच्या सुईनं जादू दाखवली होती. मेहबूब यांच्या नकळत त्या सुईने त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि सहाफुटी मेजर मेहबूब कोसळले. तिथून त्वरित बाहेर पडून सेहमत यांनी अब्दुलच्या आत्म्यासाठी जामा मशिदीच्या बाहेर गरिबांना कपडे आणि अन्न वाटलं. त्या वेळी त्यांनी आवर्जून कारचालकाला सोबत घेतलं होतं.
मुलाच्या मृत्यूमुळे कोलमडलेल्या जनरल साहेबांचं लक्ष चुकवून सेहमत यांनी तिथली आणखी काही कागदपत्रं आणि लिफाफे तपासले. त्यात दिल्लीतून ‘आय.एस.आय.’ ला माहिती पुरवणार्या गुप्तहेरांचे तपशील होते. त्यांना सुरक्षा देणार्या यंत्रणेचीही माहिती होती. तिथल्या भारतीय वकिलातीला ही माहिती पुरवणं अशक्य होतं, कारण पाकिस्तानी गुप्तचर संघटना प्रचंड सक्रिय झाल्या होत्या. त्यांनी गर्दीच्या रस्त्यावरील एका दुकानदाराकडून दोन फोन केले. सांकेतिक भाषेत संदेश पोचवून त्या घरी आल्या. काही वेळातच मेजर मेहबूब यांच्या पत्नी मुनिरा यांनी विचारलं, ‘‘तू पानवाल्याच्या दुकानातून कुणाला फोन केला होतास का? त्याला अटक झाली आहे बरं का?’’ ते ऐकून सेहमत यांच्या छातीत हलकीशी कळ आली. ‘‘मला दिवस गेले आहेत, त्या संदर्भात डॉक्टरला फोन केला होता,’’ असं सांगून त्यांनी मुनिरा यांचं समाधान केलं.
आता पुढील हालचाली करणं आवश्यक होतं. सेहमत यांना सरफराज नावाच्या एका दुकानदार व्यक्तीचा फोटो दाखवण्यात आला होता. मोठं संकट आलं तर त्यांना सांकेतिक शब्द सांगून संपर्क करण्याची सूचना होती. किराणा आणण्याच्या निमित्तानं त्यांनी सरफराज यांना गाठलं. पिशवीत सामानाच्या तळाशी कागदपत्र ठेवले आणि अचानक शेजारी एक बुरखाधारी स्त्री येऊन उभी राहिली. तिनं ती पिशवी ताब्यात घेताना अत्यंत हळू आवाजात सांगितलं, ‘‘इथून परत जाण्याची वेळ आली आहे. सगळीकडे त्यांची माणसं आहेत. आज तयार असशील तर मध्यरात्री तुझ्या स्नानगृहाचा दिवा सुरू ठेव…’’ आणि ती स्त्री तिथून निघून गेली. (त्या पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील सचिवांच्या पत्नी असाव्यात, असा अंदाज आहे.) सेहमत यांनी बघितलं की, पुढच्या चौकात भारतीय वकिलातीमधील सचिव गौरव घई यांच्या गाडीला पोलिसांनी घेरलं होतं आणि ते सफाई देत होते. त्या घरी पोहोचल्या तर तिथं आणखी एक संकट उभं होतं. जनरल साहेबांच्या टेबलासमोर मायक्रोफोन आणि इतर साधनांचे अवशेष घेऊन अधिकारी उभे होते.
सगळीकडून फास आवळला जात होता.
आता लवकरच आपण इथून निघण्याची गरज आहे, हे त्यांनी मनाशी ठरवलं. त्याच वेळी बाहेर हवेलीच्या पलीकडे झुडपात पाहणी करणारी एक छोटीशी कार येऊन थांबली होती. आत बसलेले मीर आता सेहमत यांच्या सुटकेसाठी नियोजन करत होते.
प्रचंड घडामोडींनंतर अखेर सेहमत सुखरूप भारतात पोहोचल्या. स्वत:च्या काश्मिरी हवेलीत न राहता सईद यांच्या निष्ठावान नोकराच्या गावी म्हणजे मालेरकोटला इथं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अब्दुलला ट्रकखाली चिरडावं लागलं, आणि मेजर मेहबूब यांच्या मृत्यूचं दु:ख त्यांना शेवटपर्यंत बोचत होतं.
देशासाठी आपलं आयुष्य देणार्या निडर मातेचे सुपुत्र समर यांनीही अनेक वर्षं भारतीय लष्करात सेवा करून मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. पुढे हरिंदर सिक्का यांनी सेहमत यांच्या परवानगीने ‘कॉलिंग सेहमत’ हे पुस्तक लिहिलं. त्यातील अनेक बारकावे हे काल्पनिक असल्याचं जाहीर केलं, कारण सेहमत यांनी फारच थोडी माहिती सांगितली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलिया भट – विकी कौशल अभिनीत ‘राजी’ हा अत्यंत गाजलेला हिंदी चित्रपट त्याच पुस्तकावर आधारित आहे. भारतीय गुप्तचर संघटना त्यांच्यासाठी काम करणार्या हेरांबाबत आणि योजनांबाबत कमालीची गुप्तता राखत असल्यानं हे पुस्तक हाच एकमेव माहितीस्रोत आहे हे लक्षात घ्यावं लागेल.
१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या तोंडाशी अत्यंत मोलाची माहिती पुरवून देशाला अपरिमित हानीपासून वाचवणार्या सेहमत यांना मानाचा मुजरा…
adaparnadeshpande@gmail.com
