स्वत:ला बदलताना : स्वतच्या संवेदना

आपल्या संवेदनांचे गाठोडे म्हणजे आपल्या प्रवृत्ती. त्याचा स्वत:वर आणि इतरांवरही काय परिणाम होतो हे ठरवण्यासाठी त्या नीट ओळखून त्यात फायद्याचे काय नुकसानीचे काय हे ठरवणे, हा जगण्यातला अग्रक्रम हवा, तरच आणि तरच आपण आनंदी होऊ शकू.

आपल्या संवेदनांचे गाठोडे म्हणजे आपल्या प्रवृत्ती. त्याचा स्वत:वर आणि इतरांवरही काय परिणाम होतो हे ठरवण्यासाठी त्या नीट ओळखून त्यात फायद्याचे काय नुकसानीचे काय हे ठरवणे, हा जगण्यातला अग्रक्रम हवा, तरच आणि तरच आपण आनंदी होऊ शकू.
मला वाटतं की आपल्या संवेदना ही आपल्या जगण्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. संवेदन म्हणजे कोणत्याही गोष्टीबाबत आपल्या ज्ञानेंद्रियांनी दिलेली प्रतिक्रिया. ती खूप आपोआप घडणारी गोष्ट असते आणि त्या संवेदनांशी आपली ओळख आपली वृत्ती दाखवते. अगदी साधे उदाहरण घेऊ या. मस्तपकी पाऊस पडत आहे आणि कुठून तरी लांबून कांदाभजी तळल्याचा वास येतो आहे. त्या वासाने आपण एकदम अस्वस्थ होऊ आणि कधी एकदा भाजी खातो आहे असे वाटू लागेल. म्हणजे बघा. संवेदनांमुळे आपण कृती करायला प्रवृत्त होतो आणि या संवेदनांचे गाठोडे म्हणजे आपली प्रवृत्ती.
प्रत्येक माणसाच्या काही अतिसंवेदनशील प्रवृत्ती असतात. त्या प्रथम ओळखता यायला हव्यात. माझेच उदाहरण सांगतो. लोकांच्या मते मी स्वतला खूप शहाणा समजतो आणि इतरांना जरा कमीच समजते अशी माझी वृत्ती आहे. वास्तव हे आहे का? मला स्वतला तसे वाटत नाही, पण इतर अनेकांना असे जर वाटत असेल तर या माझ्या संवेदना प्रांताला मी नीट तपासायला हवे. एकदा ही प्रक्रिया मी सुरू केली. मग माझ्या लक्षात हळूहळू येऊ लागले की एखादी गोष्ट एकदा सांगितली की मला समजते. तीच गोष्ट वारंवार, वेगवेगळ्या रीतीने, वेगवेगळ्या शब्दात सांगायची अजिबात गरज नसते. पण माझा हा गुण समोरच्या कित्येक माणसांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ते त्यांच्या परीने मला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. मग माझी चिडचिड होते. आता परवाचेच बघा ना. मी आमच्या कर सल्लागारासमोर बसलो होतो. त्याने  कायद्यातील एक तरतूद मला समजावून सांगितली. मला पहिल्या वेळीच ती समजली. मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितले , ‘मला समजले आता यातून मार्ग कसा काढायचा ते बोल.’ हे सांगूनसुद्धा त्याचे बोलणे संपले नव्हते. तो निरनिराळ्या रीतीने कायद्यातील बारीकसारीक तपशील मला सांगत होता. मी दहा मिनिटे त्याची बडबड ऐकून घेतली आणि त्याला शांतपणे सांगितले, ‘मला आपला  प्रश्न समजला आहे. आता हा कसा सोडवायचा ते सांग.’
माझे बोलणे त्याला बहुतेक उद्दाम वाटले असावे. किंबहुना माझा स्वर असाच होता की मला समजलंय आता बोल. माझ्या स्वरातून त्याच्या अहंकाराला थेट धक्का बसला असावा.
तो मला म्हणाला, ‘‘मि. कानिटकर, तुम्ही माझ्याकडे प्रश्न घेऊन आला आहात. तुमचा प्रश्न सर्व तपशिलाने मला समजला आहे की नाही, त्यात वस्तुस्थितीतील काही बारकावे राहिले तर नाहीत हे कळण्यासाठी मी शब्दात मांडून दाखवत होतो. प्रश्न तुमचा आहे हे मलादेखील समजते आहे. आणि त्यातून बाहेर कसे पडायचे हे समजण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला आहात. तुमची आकलन शक्ती किती आहे ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे नक्कीच आलेला नाहीत. तेव्हा कानिटकर, लक्षात ठेवा. आमच्यापेक्षा अधिक विचार करू शकणारी, तुमच्यापेक्षा अधिक वेगळ्या रीतीने विचार करणारी माणसे या जगात आहेत हे विसरू नका. तुम्हाला अन्य कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता.’’त्याचे बोलणे अनेक अर्थाने माझे डोळे उघडवणारे ठरलं.
आपण स्वतला नेमकं काय समजतो आणि दुनियेशी कसे वागतो हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासाचा विषय आहे. आणि हा अभ्यास आपण केला तर स्वतमध्ये नेमके आणि उपयुक्त बदल कसे करायचे हे अधिक स्पष्ट होते. माझी एक नातेवाईक आहे. तिला आम्ही कुरकुरी वहिनी म्हणतो. (अर्थात तिच्या अपरोक्ष). कुठल्याही गोष्टीबद्दल तिची काही न काही तक्रार असतेच. तिच्या लेखी कोणतीही गोष्ट संपूर्णपणे चांगली नसतेच. त्यामुळे होते असे की तिच्या मताची कुणी दखलच घेत नाही. कुटुंबात असूनसुद्धा ती तशी एकटी पडली आहे. चार महिन्यापूर्वीची गोष्ट. आमच्या नात्यातल्या एका मुलीचे लग्न ठरलं. मुलगा चांगला होता. घर चांगलं होतं. अर्थातच कुरकुरी वहिनीला लग्न ठरवणे या सगळ्या प्रकारात स्थान नव्हतं. पण ती गप्प थोडीच बसणार. तिने रिचाला, जिचे लग्न ठरले होते तिला एकटीला गाठलंच. मुलगा कसा आहे, फिरायला कुठे जाता, फिरायला गेल्यावर त्याला घट्ट मिठी मारून मोटारसायकलवर बसतेस का? असेही प्रश्न विचारले. अचानक रिचाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ‘वहिनी मला समजत नाही मी काय करू? कोणाशी बोलू? अगं, आम्ही फिरायला जातो तेव्हा तो कमालीचा अलिप्त असतो. फारसे बोलत नाही. आपणहून मला स्पर्श करत नाही. आम्ही परवा सिनेमाला गेलो होतो आणि मी त्याच्या कानात काहीतरी सांगत होते. पडद्यावर खूप रोमॅन्टिक सीन सुरू होता. मी हळूच त्याचा हात हातात घेतला तर हात झिडकारत हा माणूस रेस्टरूममध्ये निघून गेला. त्या दिवसापासून मला फोन केला नाही. माझे फोनही उचलत नाही. मला आतून वाटत आहे की त्याला माझ्यात रसच नाही.’’ वहिनीला तिच्या भावना समजल्या होत्या. पण ती रिचाच्या भावना सगळ्यांसमोर मांडू शकणार नव्हती. एकदा नाव कानफाटय़ा झाले की कोणी विश्वास ठेवत नाही. वहिनीने रिचाच्या आईला सुचवले कीदोघांना एकदा डॉक्टरकडे जाऊन येऊ देत म्हणून. अर्थातच कोणी मनावर घेतले नाही. लग्न झालं. दोन महिन्यानंतर रिचा माहेरी परत आली. मुलामध्ये दोष होता. आता प्रकरण कोर्टात आहे.
यातला धडा : प्रत्येक वेळी दोष काढत राहिले तर वस्तुस्थिती सांगितली तरी लोक विश्वास ठेवत नाहीत.
त्यामुळे दोष दिसला तरी प्रत्येक वेळी सांगितलाच पाहिजे असा नाही. मात्र मोठय़ा निर्णयांच्या बाबतीत योग्य वेळी, योग्य शब्दात बोलायलाच हवे. अहंकार, स्वतला शहाणे समजणे, इतरांचे दोष दाखवणे या आपल्यात जशा ठासून भरलेल्या प्रवृत्ती असतात तशी आणखी एक घातक प्रवृत्ती आपल्याकडे असू शकते, ती म्हणजे असुरक्षित वाटण्याची. अनेक पुरुष आणि महिला या वृत्तीच्या शिकार असतात. त्यांना कोणताही निर्णय घेताना आपला निर्णय चुकला आणि त्याचे विपरीत परिणाम झाले तर? हा प्रश्न सतत मनात घोंगावत असतो. त्यामुळे अनेकदा त्या निर्णय घेत नाहीत किंवा निर्णय घेतल्यावर सतत दडपणाखाली असतात. त्यांचा सहसा कुणा व्यक्तीवर विश्वास बसत नाही. परंतु त्यांच्या आसपास अशा एकदोन व्यक्ती असतात की त्या व्यक्तींच्या मतांवर आणि निर्णयशक्तीवर त्या पूर्णपणे अवलंबून असतात. अशा व्यक्ती घरात असणे विशेषत जोडीदार असणे म्हणजे दुसऱ्या जोडीदाराची सत्त्वपरीक्षाच असते
निखिल या प्रकारातला मुलगा आहे. बारावी झाल्यापासून लग्न होईपर्यंत त्याने कोणताही निर्णय स्वत घेतलेला नाही. शिक्षणासंबंधी सर्व निर्णय त्याचे उद्योगपती बाबा घेत. त्यांचे कर्तृत्व मोठे असल्याने त्यांना सगळे समजते असा त्याचा गाढ विश्वास होता. तो आईच्या संस्कारात वाढलेला होता. पापांचा आंतरजातीय विवाह. आई कोकणस्थ, वडील लिंगायत.  त्यामुळे आईचे संस्कार महत्त्वाचे. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्याने एमएस केले आणि वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले. आईने जी कोकणस्थ मुलगी निवडली ती सुंदर होती, पण फक्त पदवीपर्यंत शिकलेली होती. घरात त्याला कोणतेच स्वातंत्र्य नव्हते. हनिमूनला कुठे जायचे वगरे पपांनी ठरवले. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी घरी पसे मागावे लागत. सुनेला काही हवे असेल तर तिने पपांकडे मागायचे. हे लग्न सुखाचे ठरले का?
निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे.
सांगणे इतकेच की आपल्या संवेदनांचे गाठोडे म्हणजे आपल्या प्रवृत्ती नीट ओळखून त्यात फायद्याचे काय नुकसानीचे काय हे ठरवणे, हा जगण्यातला अग्रक्रम हवा, तरच आणि तरच आपण आनंदी होऊ शकू.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Self consciousness