मेधा कुळकर्णी
भावनिक, शारीरिक आणि आर्थिक अशा सर्वच बाजूंनी कमकुवत होत चाललेल्या जन्मदात्यांच्या म्हातारपणात त्यांचा हात घट्ट पकडण्याऐवजी त्यांचा क्रूर छळ करून कधीही भरून न निघणारी जखम अनेक पाल्य आपल्या पालकांना देत असतात. अपमानास्पद शब्दांचे घाव आणि वागणुकीतून नुसते ओरखडे नाहीत तर त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं की वृद्धापकाळ वयाने नाही, तर अतीव दु:खाने जड होत जातो… आणि समाजाची, माणसांमधल्या विकृतीची काळजी वाटू लागते.
वि. वा. शिरवाडकरांचं ‘नटसम्राट’ आणि जयवंत दळवींचं ‘संध्याछाया’ ही सत्तरीच्या दशकातली वृद्ध जोडप्यांचा शोकांत दाखवणारी, मध्यमवर्गाला आवडलेली नाटकं. ‘नटसम्राट’मधलं स्वगत ‘कुणी घर देता का घर…’ लोकप्रिय झालं होतं. मुलांकडून वृद्ध आई-बापाकडे होणारं दुर्लक्ष ही दोन्ही नाटकांची मुख्य कथा.
‘नटसम्राट’मधली मुलं इथलीच. ‘संध्याछाया’मधला मुलगा परदेशी गेलेला… मुलांनी परदेशी जाण्याचा विषय तेव्हा ताजा, हळवा होता. पोटच्या मुलाकडून विश्वासघात झाल्याचं दाखवणारा ‘एकटी’ हा मराठी चित्रपट आठवतो का? वृद्धांची मुलांकडून हेळसांड अशी उपकथानकंही त्या काळी चित्रपटांत असायची. बर्याचदा, ते सारं भावचिंब, अवास्तवदेखील वाटायचं. मुलं आई-वडिलांना घराबाहेर काढतात हे दाखवणारा ‘बागबान’ बटबटीत वाटल्याचं मी लिहिलंच होतं. मात्र, वृद्धांवर त्यांच्या मुला-मुलींकडून होत असलेल्या अत्याचाराची प्रकरणं समजून घेतली की ‘फिल्मी’ कल्पिताहूनही वास्तव क्रूर असल्याचं दिसतं आणि आपल्या समाजाची, माणसांमधल्या विकृतीची काळजी वाटू लागते.
८५ वर्षांच्या एका आजोबांशी बोलले. सात वर्षांच्या कायद्याच्या लढाईनंतर त्यांना नुकताच न्याय मिळालाय. त्यांचा भयंकर शारीरिक छळ केलेल्या मुलगा- सून- नातवंडांना उच्च न्यायालयाने आजोबांच्या हक्काच्या घरातून जायला सांगितलंय. त्यांच्या दिवंगत पत्नीचं सुनेने बळकावलेलं साडेतीन तोळं सोनं आजोबांना परत मिळालंय. ‘‘मी माझ्या घरात सुखाचा श्वास घेतला, शांत झोपलो, माझ्या पत्नीची आठवण म्हणून ते सोनं जपून ठेवलंय, मी मेल्यावर ते सुना-मुलींना मिळेलच.’’
किती ताण सोसला त्यांनी. त्यात कर्करोगानंही गाठलं. दोन मुलगे, दोन मुली असलेल्या या आजोबांनी घरच्या गणपती उत्सवाला मोठ्या लेकाला प्रेमाने बोलावलं. तो त्याच्या कुटुंबासह घरात घुसला आणि त्याने बापालाच घराबाहेर काढलं. घराबाहेरच्या व्हरांड्यात रवानगी केली. चाळीजवळ रस्त्यातल्या बाकड्यावर दिवसभर ते उपाशी बसून रडायचे. मुलाने घरातल्या त्यांच्या मोजक्या सामानाचीही मोडतोड केली. टूथब्रश वाकडा केला, अंघोळीचा टॉवेल कापला वगैरे.
एकदा रात्री ते घरी परतले. भूक अनावर झालेली. आत जाऊन चपाती खाऊ लागले, तर मुलगा मारायला धावला. दरम्यान, धाकट्या मुलाने बापासाठी बाहेरून डबा लावला. समुपदेशन केंद्राची माहिती मिळाल्यावर कायद्याची मदत मिळाली. दिलासाही मिळाला. आता धाकटा लेक त्यांची नीट काळजी घेतो आहे. कर्करोगामधूनही ते बरे झाले आहेत.
वृद्धांना तोंड द्यावं लागतं तो छळ, हिंसा, कायदा, अंमलबजावणी हे सगळं वृद्धांवरच्या अत्याचाराची प्रकरणं हाताळणारे, त्याबद्दल लिहिणारे ॲड. रोहित एरंडे, ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या, वृद्ध कायदा सल्ला-समुपदेशन केंद्राच्या अनुभवी समुपदेशक गीता जाधव, काही पोलीस अधिकारी आणि सरकारी डॉक्टर्स या सगळ्यांकडून याविषयी नीट समजून घेता आलं.
‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाला’नुसार महाराष्ट्रात ३५ टक्केपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अत्याचाराचा अनुभव घेतला आहे. यामध्ये शाब्दिक छळ ३० टक्के, आर्थिक शोषण २२.५ टक्के आणि शारीरिक हिंसा १८ टक्के असते. त्यांचे मुलगे-सुना, कुटुंबातले अन्य सदस्य किंवा शेजारी यांच्यासारख्यांकडून हे अत्याचार केले जातात. प्रत्यक्षात हे प्रमाण अधिक आहे. कारण वृद्ध पालक आपल्या पाल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करायला सहसा तयार नसतात. त्यांना मुलांची, नातलगांची, शेजार्यांची भीती वाटते.
आपल्याच मुलांच्या विरोधात जाणं भावनिकदृष्ट्या नको वाटतं. छळ सुरू झाल्यावर त्यांना कळून चुकतं, की मुलांवर विश्वास टाकून आपण चूक केली आहे. आपल्या विश्वासाला मुलं पात्र नाहीत. तरीही ते मार्ग काढायचा प्रयत्न करतात. त्यांना आशा वाटत राहते, की मुलांना चूक उमजेल. ती बदलतील. पण तसं क्वचितच घडतं. ‘‘व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत करून चालत नाही. भिडस्तपणाने नुकसान होतं,’’
ॲड.रोहित ठळकपणे सांगतात.
‘स्त्रीमुक्ती संघटना’ ही वृद्धांच्या समुपदेशनासाठी १२ केंद्र चालवते. २०१६ पासून तिथं काम करणार्या गीता जाधव कळकळीने बोलतात. ही समस्या किती गुंतागुंतीची आणि कुरूप आहे, हे गीताकडून कळलं, त्या रात्री मला झोप लागली नाही. मात्र गीताशी दोस्ती झाली. चाळिशीतल्या गीतावर तिचे आई-वडील आणि सासू-सासरे यांचा जीव आहे. केंद्राच्या प्रयत्नांमुळे छळमुक्ती लाभलेल्या वृद्धांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, अशी गीताची भावना आहे. वृद्ध स्त्री-पुरुषांच्या छळाची कारणं काय? तर पैसा आणि मालमत्ता. छळ करतात कोण? त्यांचीच मुलं. छळाचे प्रकार कोणते? तर ‘‘तू मर, अजून मरत का नाहीस, तू आम्हाला नको आहेस…’’ अशा भाषेत थेट शाब्दिक हिंसा.
उपाशी ठेवणं, नातवंडांना आजी-आजोबां-ंबद्दल वाईट-साईट सांगणं, नातवंडांकरवीही छळ होईल हे बघणं, नातलगांशी संपर्क येऊ न देणं. वृद्धावस्थेत रक्तदाब, मधुमेह, मणक्याचे आजार चिकटलेले असतात. अशा छळामुळे मानसिक आजाराचीही भर पडते. कोणत्याच आजारावर उपचार न करणं, धाक दाखवणं, सोनं-नाणं बळकावणं, जमीन, घर स्वत:च्या नावे करून घेणं, निवृत्तिवेतन ताब्यात घेणं, घरात अडगळीत राहायला लावणं, घराबाहेर हाकलणं. ही शारीरिक हिंसा आणि आर्थिक शोषण किती तरी वृद्ध अनुभवत असतात.
एकट्या ्त्रिरया (विधवा, घटस्फोटित, अविवाहित) अत्याचाराच्या सर्वाधिक बळी ठरतात. वर्ष २०२०-२१. एक विधवा बाई. त्यांनी मुलांना घरं देऊन टाकलेली. स्वत: राहायच्या छानपणे सांभाळणार्या लेकीकडे; पण जीव तीनही मुलांत- नातवंडांत अडकलेला. मुलांकडून पैशाची नाही, पण प्रेमाची अपेक्षा. भेटणं नाही, तरी फोनवर मुलांचे-नातवंडांचे आवाज ऐकावे, त्यांनी आपली विचारपूस करावी, ही आस. तिला वेडी ठरवून मोकळी झालेली मुलं आईचा फोन घेतच नसत. कायद्याचा बडगा दाखवून मुलांना भेटणं, नातवंडांचा सहवास मिळवणं शक्य होतं. पण न्यायालयाची पायरी चढायची नव्हती.
एका ७५ वर्षांच्या कर्करोगपीडित विधवा आईचा मुलाने तर तिच्या नाका-तोंडात नळ्या असण्याच्या अवस्थेत अतोनात छळ चालवला होता. अन्ननलिकेचा कर्करोग. काहीच दिवसांची सोबती होती ती. गॅसचा सिलेंडर उचलून मरणासन्न आईच्या डोक्यात मारायचा प्रयत्न मुलाने केला. अखेरीस दुसर्या मुलांनी तिची काळजी घेतली. पुढे फार दिवस जगलीच नाही ती. अशी छळाची प्रकरणं श्रीमंत, मध्यम स्थितीतल्या आणि सगळ्या जातींच्या कुटुंबांमध्ये आणि शहरांत, गावांत सगळीकडे घडतात. फक्त मुलगेच त्रास देतात असंही नाही.
एक प्रकरण मुंबई उपजिल्हाधिकारी यांच्याकडचं. तक्रार मुलीविरुद्ध होती. वृद्ध बाप मुंबई महापालिकेतून मोठ्या पदावरून निवृत्त. मुलगा परदेशी. ही घटस्फोटित मुलगी एका पुरुषाबरोबर ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होती, आई-वडिलांच्याच घरात. त्यांनी ठेवलेल्या मदतनीसाला मुलगी टिकूच द्यायची नाही. ‘‘माझ्या नावे घर करा आणि तुम्ही अमेरिकेला भावाकडे निघून जा’’, असं सांगत राहायची.
पुढे मुलीने शारीरिक छळ आरंभला. पोटावर, छातीवर बुक्के मारणं, केस ओढणं, कान उपटणं. अशा स्थितीत हे जोडपं दादरच्या रुग्णालयात दाखल होत असे. त्यांनी अमेरिकेतल्या मुलाला हे कळवलं. पण त्याचा प्रतिसाद शून्य. चाळिशीच्या मुलीने पंचाहत्तरीच्या आई-बापाविरोधात तक्रार केली. आपण कर्करोगपीडित असल्याचा अहवाल दिला. पोलिसांनी तिचा खोटेपणा उघडकीला आणला.
मुलीला घराबाहेर केलं गेलं. तोवर अमेरिकेतला मुलगा शहाणा झाला. त्याने आई-बापाला महिन्याला दहा हजार रुपये पाठवायला सुरुवात केली. दरम्यान, जोडप्यामधले आजोबा वारले. मुलगा आईला अमेरिकेला घेऊन गेला. एके काळी त्या इतक्या हतबलपणे समुपदेशकांना सांगत की, ‘‘माझं घर तुमच्या नावावर करते, मला तुमच्याकडे न्या, मी तुमचं घरकाम करेन…’’ त्या आजी आता सुरक्षित जगतायत.
वृद्धांसाठी केंद्र सरकारचा हेल्पलाइन क्रमांक आहे, १४५६७. इथं तक्रार नोंदवली की आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याला निरोप जातो आणि पोलीस लगेच त्यांच्या कामाला लागतात. ‘माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७’ हा दोन-तीन कारणांनी उपयुक्त समजला जातो. यात न्यायालयात जायची गरज नाही. प्रत्येक जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयातल्या निर्वाह न्यायाधिकरणात अर्ज देता येतो.
वृद्धांना तेही जमण्यासारखं नसेल, तर त्यांच्या वतीने अन्य कोणतीही व्यक्ती किंवा नोंदणीकृत संस्था हा अर्ज करू शकते. किंवा न्यायाधिकरण स्वत:हूनही ‘सुओ मोटो’ (र४ः टः३४) दाखल घेऊ शकतं. ९० दिवसांच्या आत निवाडा केला जावा, असं कायदा सांगतो. दरमहा देखभालीची रक्कम ठरवली जाऊ शकते. मुलांनी हडप केलेली मालमत्ता परत मिळू शकते. मुलांनी सांभाळण्यास नकार दिला असेल, छळ केला असेल, पालकांना सोडून दिलं असल्यास मुलांना दंड, तुरुंगवास या शिक्षा आहेत. न्यायाधिकरणाचा निर्णय न पटल्यास जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालच्या ‘अपील न्यायाधिकरणा’कडे ६० दिवसांच्या आत दाद मागता येते.
अर्थात कायद्याच्याअंमलबजावणीत कमतरता आहेत. ९० दिवसांत निवाडा क्वचितच होतो. निवाडा लांबल्याने वृद्ध अधांतरी राहतात. शारीरिक हिंसेच्या प्रकरणात ‘अज्ञात’ व्यक्ती- कडून इजा, असं नोंदलं गेल्यास आरोपी असलेल्या मुलांना पकडणं अवघड होऊन जातं. अनेकदा छळ करणार्या मुलाला समज देऊन वृद्धांनी पुन्हा त्याच मुलाकडे राहायला जाण्याचे आदेश दिले जातात. हे फारच चुकीचं, वृद्धांना धोक्यात टाकणारं ठरतं. सध्या विवाह समुपदेशक किंवा कौटुंबिक हिंसेची प्रकरणं हाताळणारेच वृद्धांनाही मदत करतात. दिवसेंदिवस वृद्धांच्या छळाच्या प्रकरणांची संख्या वाढत चालल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र समुपदेशकांचीही गरज आहे.
वृद्धांच्या छळाची ही प्रकरणं, ३५ टक्के धरली तरी ती नात्यांबद्दल, कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल काही तरी तीव्रपणे सांगतायत. ‘मातृ-पितृ देवो भव’ संस्कृतीत जन्मदात्यांवर मुलं-मुली इतका बेधडक हिंसाचार कसा करू शकतात? सुप्रसिद्ध लेखिका, एक आदरणीय व्यक्ती, वयानेही ज्येष्ठ वीणा गवाणकर यांना हे विचारलं.
त्या म्हणाल्या, ‘‘स्त्रीच्या जिवावर चालणारी एकत्र कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ लागली, तेव्हा स्त्री पेलत असलेली जबाबदारी पुरुषांनी, कुटुंबातल्या अन्य सदस्यांनी वाटून घेणं अपेक्षित होतं. मूल वाढवणं ही कुटुंबाभोवतालच्या समुदायाचीदेखील जबाबदारी आहे, हे भान निसटल्याने मुलांशी योग्य संवाद होणं थांबत गेलं. मुलांबरोबरची वागणूक त्यांना स्वार्थी करणारी होत गेली. गोष्टी आनंदासाठी करण्यापेक्षा इतरांना दाखवण्यासाठी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी होऊ लागल्या. सुखी जीवनाऐवजी सामाजिक प्रतिष्ठेचं महत्त्व वाढत गेलं. ‘ठहराव’ गेला, मानसिक असुरक्षितता आली. त्यातून नाती विस्कटली. हे कसं सुधारता येईल, याचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे.’’
तरीही, पालक-पाल्य नातं कसं बरं सुखाचं करता येईल, याबद्दल पुढच्या (२५ एप्रिल) लेखात.
वृद्धांसाठी केंद्र सरकारचा हेल्पलाइन क्रमांक आहे, १४५६७. इथं तक्रार नोंदवली की जवळच्या पोलीस ठाण्याला निरोप जातो आणि पोलीस लगेच त्यांच्या कामाला लागतात. ‘माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७’ अंतर्गत न्यायालयात जायची गरज नाही.
प्रत्येक जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयातल्या निर्वाह न्यायाधिकरणात अर्ज देता येतो. तेही जमण्यासारखं नसेल, तर कोणतीही व्यक्ती किंवा नोंदणीकृत संस्था हा अर्ज करू शकते. दरमहा देखभालीची रक्कम ठरवली जाऊ शकते. मुलांनी हडप केलेली मालमत्ता परत मिळू शकते. मुलांनी सांभाळण्यास नकार दिला असेल, छळ केला असेल, पालकांना सोडून दिलं असल्यास मुलांना दंड, तुरुंगवास या शिक्षा आहेत.
ukulmedha@gmail.com
