|| सरिता आवाड

भारतीय प्रादेशिक चित्रपटांच्या समांतर प्रवाहात ज्यांना रस आहे, त्यांना तेलुगू चित्रपटांमधील अक्किनेनी कु टुंबराव आणि पी. ललिता कु मारी ही नावं परिचित असतील. समांतर फळीतील तेलुगू चित्रपट बनवणारे कु टुंबराव हे निर्माते आणि दिग्दर्शक, तर            पी. ललिता कु मारी (वोल्गा ) या नावाजलेल्या लेखिका व पटकथा लेखिका. दोघंही आपापल्या क्षेत्रात नामांकित असल्यानं त्यांचं लग्न न करता सहजीवनात राहाणं अधिक चर्चिलं गेलं. यातही अधिक टीका झाली ती स्त्री म्हणून वोल्गा यांच्यावरच. या सर्व चर्चा व टीके ला पुरून उरत, तावूनसुलाखून हे नातं तेजाळलं,  एकमेकांच्या साथीनं कलानिर्मिती करताना ते अधिकच घट्ट झालं…

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

कुटुंबराव आणि वोल्गा यांच्या पस्तीस वर्षांच्या सघन आणि सुंदर सहजीवनाची ही गोष्ट आहे.

अक्किनेनी कुटुंबराव हे लेखक आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतले निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीतल्या ‘समांतर’ चित्रपटांचे निर्माते अशी त्यांची विशेष ओळख आहे. वोल्गा या सुप्रसिद्ध तेलुगू स्त्रीवादी लेखिका, विचारवंत आणि कार्यकत्र्या आहेत. त्यांच्या ‘विमुक्ता’ या कादंबरीला २०१५ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

वोल्गा यांचं मूळ नाव पी. ललिता कुमारी. त्यांच्या ‘वोल्गा’ या लेखन नामामागे एक कहाणी आहे. वोल्गा यांचे वडील पक्के समाजवादी विचारांचे. दुसरं महायुद्ध संपलं त्या दरम्यान त्यांना मुलगी झाली. या महायुद्धात शर्थीनं लढलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या वोल्गा या रशियन वीरांगनेचं स्मरण म्हणून त्यांनी आपल्या पहिल्यावहिल्या अपत्याचं नाव वोल्गा ठेवलं. ललितांची ही थोरली बहीण. पण दुर्दैवानं लहान वयातच तिचा अपघाती मृत्यू झाला. म्हणून ललितांनी आपलं लेखन वोल्गा या नावानं करायला सुरुवात केली. आपली वोल्गा लेखनरूपात तरी जिवंत असल्याचा दिलासा आई-वडिलांना मिळावा, हा त्यामागचा हेतू होता. आंध्र प्रदेशातल्या गुंटूर या गावी वोल्गा यांचं बालपण गेलं. घरातलं वातावरण मोकळं-ढाकळं, प्रत्येकाला स्वत:चा अवकाश देणारं, परस्परांच्या मतांचा आदर करणारं होतं. घरात भरपूर पुस्तकं होती. त्यामुळे लहान वयापासून तेलुगूमधली निवडक पुस्तकं, गोर्की-टॉलस्टॉय प्रभृतींचं रशियन साहित्य, इत्यादींनी वोल्गा यांच्या अभिरुचीचं भरणपोषण केलं. कॉलेजमध्ये असल्यापासून विद्यार्थी चळवळीत त्यांचा सहभाग होता. ‘रिव्होल्युशनरी रायटर्स असोसिएशन’मध्ये त्या सहभागी झाल्या. कविता करू लागल्या. अतिशय मनापासून हे काम करताना त्यांना आपल्या स्त्रीत्वाची आणि त्यामुळे येणाऱ्या अपरिहार्य बंधनांची जाणीव झाली. त्यांच्या संवेदनशील मनाला सभोवतालच्या परिस्थितीतून स्त्रीचं दुय्यम स्थान भिडायला लागलं. असोसिएशनमध्ये

हा प्रश्न त्यांनी मांडल्यावर या प्रश्नालाच बहुमतानं दुय्यम स्थान मिळालं. तिथून बाहेर पडून त्यांनी समविचारींचा ‘जनसाहिती’ हा नवा गट स्थापन केला.

या घडामोडींच्या काळात त्यांचा १९७४ मध्ये विवाह झाला. तेलुगू साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या तेनाली येथे महाविद्यालयात शिकवू लागल्या. त्यांना दोन मुलगे झाले. पण त्यांच्यामधला लेखक आणि कार्यकर्ता अस्वस्थ होता. चेलम या स्त्रीवादी लेखकाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता. ‘चेलम यांचं साहित्य घरंदाज स्त्रियांनी वाचू नये,’ असा अलिखित नियम असूनही वोल्गांनी त्यांचं साहित्य वाचलं आणि पचवलं. १९७९ मध्ये चेलम यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहाण्यालासुद्धा ‘जनसाहिती’मध्ये विरोध झाल्यावर याही संघटनेचा वोल्गा यांनी निरोप घेतला आणि स्वतंत्रपणे तेनाली-गुंटूर परिसरात स्त्रियांमध्ये कामाला सुरुवात केली. लेखन हीच आपली अभिव्यक्ती, अशी मनाशी खूणगाठ बांधली.

याच प्रवासाच्या दरम्यान चळवळीमधले स्त्रीवादी विचारांचे जुने सहकारी कुटुंबराव यांच्याशी त्यांचे भावनिक अनुबंध जुळून आले. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुटुंबराव यांनी कष्टानं वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. ते खासगी कंपनीत नोकरी करीत होते. १९६९ मध्ये त्यांचा विवाह होऊन त्यांना दोन मुलगे झाले. संघटनेत वोल्गा यांच्याबरोबर सात-आठ वर्षं ते दिलोजानसे काम करत होते. दोघांच्याही मनात अंकुरलेल्या प्रेमाची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या मुलांना वसतीगृहात शिकायला पाठवलं. आपल्या पत्नीसाठी आर्थिक तरतूद करून घटस्फोट घेतला. राहातं घर पत्नीला देऊन त्यांनी स्वतंत्र राहायला सुरुवात केली.

वोल्गा यांना मात्र इतक्या तडकाफडकी निर्णय घेता आले नाहीत. चार वर्षं त्या तेनालीलाच होत्या. त्यांच्या जवळच्या मैत्रिणीच्या वसतीगृहात त्यांनी आपल्या मुलांना ठेवलं. हे सगळं करताना त्यांना स्वत:शी, कुटुंबाशी खूप संघर्ष करावा लागला. पण शेवटी घटस्फोट घेऊन १९८५ मध्ये त्या हैदराबादला कुटुंबराव यांच्यासोबत राहू लागल्या. अंगभूत उतरंड असलेल्या विवाहव्यवस्थेतली कुचंबणा दोघांनीही अनुभवली होती. म्हणून या चौकटीत न जाता, एकमेकांना अवकाश देणारं, मैत्रभाव जोपासणारं, मुख्य म्हणजे एकत्र कामाची संधी देणारं नातं त्यांनी लग्न न करता जोपासायचं ठरवलं. सिनेसृष्टीत जाऊन काम करण्याची कुटुंबराव यांची इच्छा होती. हे लक्षात घेऊन, कुटुंबरावांना कामात सहकार्य करता यावं म्हणून १९८६ मध्ये पुण्यात ‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये वोल्गा यांनी चित्रपट रसग्रहणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. देशोदेशीचे चित्रपट बघून या माध्यमाची त्यांनी व्यवस्थित ओळख करून घेतली. एका बाजूस त्यांचं स्वतंत्र लेखनही चालूच होतं.

‘स्वेच्छा’ ही त्यांची बहुचर्चित कादंबरी १९८७ मध्ये प्रसिद्ध झाली. मुलगी, पत्नी, बहीण, आई या सगळ्या सामाजिक नात्यांच्या पलीकडे असलेल्या स्त्रीच्या इच्छेचा पुरुषप्रधान व्यवस्थेशी असलेला संघर्ष म्हणजे ही कादंबरी. वाचकांनी या कादंबरीला अक्षरश: डोक्यावर घेतलं. पण त्याचबरोबर प्रस्थापित समीक्षेनं मात्र टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे या         टीके मध्ये कादंबरीला नाही, तर स्वत: वोल्गा यांना वैयक्तिकरीत्या लक्ष्य केलं होतं. त्यांचं नवऱ्याशी घटस्फोट घेणं, दुसऱ्या व्यक्तीबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहाणं, यावर जोरदार हल्ला झाला. त्यांच्याविरोधात लेख, परिपत्रकं काढणं असे सगळे मार्ग चोखाळले गेले. एका बाजूनं रूढ समीक्षेनं चढवलेला हल्ला, तर दुसरीकडून स्त्रियांच्या विस्तारित अवकाशानं केलेलं स्वागत, असा विलक्षण अनुभव त्यांना आला. एखादी लेखिका जेव्हा स्त्रीवादी विचार लेखनातून मांडते, तेव्हा प्रस्थापित समाज तिच्यावर वैयक्तिक हल्ला करून तिला नेस्तनाबूत करायला पाहातो या ऐतिहासिक नियमाची त्यांना प्रचीती आली. या हल्ल्याला वोल्गा आणि कुटुंबराव या दोघांनी धैर्यानं तोंड दिलं. त्यामुळे दोघांमधलं नातं अधिकच दृढ झालं. या अग्निपरीक्षेतून वोल्गांमधली लेखिका तावूनसुलाखून पार पडली, तेजाळली. नंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. कादंबऱ्या, कथा, नृत्यनाटिका, भाषांतरित साहित्य असा त्यांच्या लेखनकर्तृत्वाचा आलेख सतत चढत राहिला.

या अनुभवानंतर  वोल्गा यांना स्त्रीवादी विचारधारा वैचारिक विश्वात रुजवण्याची आवश्यकता लक्षात आली. १९८८ मध्ये ‘अस्मिता’ या स्त्रीवादी अभ्यास मंडळाची त्यांनी स्थापना केली. राजकीय कथांची मालिका लिहिली, इतरही कथा लिहिल्या. या साहित्याच्या माध्यमातून कुटुंबसंस्थेची दमनकारी वर्तमान स्थिती त्यांनी प्रकाशात आणली. त्यांच्या नायिका परिस्थितीच्या गुलाम नव्हत्या, तर स्वत: कठोर निर्णय घेऊन उद्भवलेल्या संकटाशी सामना करणाऱ्या होत्या. कौटुंबिक संबंधातल्या लोकशाहीकरणाचा आपल्या लेखनातून त्यांनी सातत्यानं पुरस्कार केला आहे.

कुटुंबराव यांनीही चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली. त्यांच्या ‘भद्रं कोडुको’ या चित्रपटाचा खूप बोलबाला झाला. १९९० मध्ये प्रकाशित झालेल्या या चित्रपटाला १९९१ मध्ये उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आंध्र प्रदेश सरकारनं  ‘नंदी पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला. सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात समांतर तेलुगू सिनेमाच्या प्रवाहाचे ते प्रतिनिधी झाले. त्यांच्या ‘पथ नगराले पासिवाडु’ या चित्रपटाला अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रशस्तीपत्र मिळालं, तर ‘गुलाबिलु’ या वोल्गा यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटालाही गौरवण्यात आलं. १९९० पासून कुटुंबराव सिनेनिर्मिती आणि ‘दूरदर्शन’वरील मालिका निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. १९९५ पासून वोल्गा या ‘उषाकिरण पिक्चर्स’च्या माध्यमातून पटकथा-संवाद लिहायला लागल्या. कुटुंबराव यांच्या बरोबरीनं त्या काम करू लागल्या आणि एकत्र काम करायला लागल्यावर दोघांचीही सर्जनशीलता बहरून आली.

‘अस्मिता संसाधन केंद्रा’ची औपचारिक स्थापना झाल्यापासून त्या केंद्रात कार्यरत होत्याच. स्त्रीवादी विचारांना रुजवण्याचं काम या केंद्रानं केलं. प्रस्थापित समीक्षा स्त्रियांच्या लेखनाची दखल घेत नव्हती. वोल्गा यांच्या पुढाकारानं स्त्री कवयित्रींच्या १०० कवितांचा ‘नीलमेघा’ हा संग्रह प्रकाशित झाला. समीक्षकांना त्याची दखल घ्यावीच लागली. आता तिथले काही लेखक आम्ही स्त्रीवादी आहोत,असं सांगतात, अनेक स्त्रिया निर्भयपणे लिहायला लागल्या आहेत. हे वोल्गा यांच्या प्रयत्नांचं फलित आहे.

वोल्गा स्वत: जरी बंडखोर विचारांच्या असल्या, तरी त्याचं लेखन काहीसं सौम्य आणि ललित असतं. वैचारिकता आणि वाचनीयता हे दोन्ही गुण त्यांच्या लेखनात आहेत. त्यांच्या ‘यशोधरा’ कादंबरीत यशोधरा ही सिद्धार्थाची पत्नी, शिष्याच नाही तर सत्याच्या शोधयात्रेतली सहप्रवासिनी आहे. ‘विमुक्ता’ची नायिका सीता आहे. या लेखनाच्या आधी वोल्गा यांनी अनेक रामायणांचा अभ्यास केला. सीता आणि शूर्पणखा, ऊर्मिला,अहिल्या, रेणुका आणि पुढे  द्रौपदी अशा संबंधातून ही कादंबरी उलगडत जाते. पुराणकथांकडे त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहिलं आहे. या कथांना          धर्म-अधर्माच्या चौकटीतून न्याय-अन्यायाच्या चौकटीत आणलं आहे. ‘विमुक्ता’चं तमिळ, कन्नड, नेपाळी, हिंदी भाषेत भाषांतर झालं. त्यातल्या तमिळ भाषांतराला २०१५ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळून त्यांच्या लेखनकर्तृत्वावर मान्यतेची मोहोर उमटली.

आज वोल्गा या ७० वर्षांच्या आहेत, तर कुटुंबराव ७५ वर्षांचे आहेत. सहजीवनाला सुरुवात केल्यानंतर चारही मुलांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. प्रेमानं त्यांचं संगोपन केलं. मुलांनी आपापल्या आवडीची क्षेत्रं निवडली. आपले सहचर निवडले. कुटुंबराव आणि वोल्गा यांच्या सहजीवनाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. त्यामुळे सर्व मुलांनी डामडौल न करता फक्त फुलांचे हार घालून समारंभ पार पाडला. चारही मुलांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. दोघांना असलेल्या मुलींच्या आवडीची उणीव आता त्यांच्या सुनांनी भरून काढली आहे. त्यांना तीन नाती आहेत. ही दुधावरची दाट साय दोघांना अतिशय प्रिय आहे. कुटुंबराव यांचा घरकामात, घराबाहेरच्या कामात सहभाग असतो. एकमेकांमध्ये खुला संवाद असतो.

‘करोना’च्या संकटामुळे मला हैदराबादला जाऊन या दोघांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही. पण फोनवर आमचं संभाषण झालं. मी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मेलवर सविस्तर उत्तरं पाठवली.  व्हिडीओ कॉलवर मी जेव्हा वोल्गाजींशी बोलले तेव्हा आपले अनुभव मराठी वाचकांपर्यंत नेण्याचं त्यांनी उत्साहानं स्वागत केलं. छायाचित्र मागताच पुढच्या पाच मिनिटांत त्यांनी पाठवलं.  या संभाषणात त्यांनी लग्नात किंवा ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये उभयतांचा घरकामाव्यतिरिक्तच्या कामातही सहभाग असायलाच हवा, असं अतिशय आग्रहपूर्वक सांगितलं. एकत्रित कामातूनच एकमेकांची खरी ओळख पटते, अनुबंध खऱ्याखुऱ्या अर्थानं बळकट होतात. असं करताना दुरावाही निर्माण होऊ शकतो, नातं मोडूनही जाऊ शकतं, पण ती जोखीम घ्यायलाच हवी. प्रत्यक्ष काम दोघं मिळून जेव्हा परिपूर्ण करतात तेव्हाच ‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे प्राण तुझे प्राण, उरले ना वेगळाले’ असा अनुभव येतो. स्वत: वोल्गा अशा अनुभवानं समृद्ध झाल्या आहेत. त्यांच्याशी बोलताना या अनुभवाचा मुलायम स्पर्श मला जाणवला.

sarita.awad1@gmail.com