आई – बाबा तुमच्यासाठी
लैंगिकतेशी संबंधित माध्यमांतून मिळणाऱ्या एक्स्पोझरमधून, एक प्रकारे लैंगिकतेविषयीची भीड चेपली जाते आहे. पण त्यातून योग्य प्रकारची किती माहिती लोकांपर्यंत, खास करून तरुणाईपर्यंत, पोहोचते आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे. तसेच चहूबाजूंनी होणाऱ्या या लैंगिकतेच्या (आणि जोडीनं हिंसाचाराच्या) माऱ्याला आई-वडील म्हणून तोंड कसं द्यायचं हा मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
गेल्या दोन-अडीच दशकांत आपल्या जीवनशैलीत खूप मूलभूत बदल घडले. आधी कॉम्प्युटर्स आणि मग पर्यायाने संपर्कमाध्यमातली क्रांती, यातून जग खूप जवळ आलं. ग्लोबलायझेशनने बसल्या जागी एका क्लिकवर जगभराची सगळी माहिती हाताशी आली. अनेक प्रकारच्या संपर्कमाध्यमांमधून जगाच्या कानाकोपऱ्यातल्या चांगल्या आणि वाईट सगळ्या गोष्टी सर्वदूर पसरल्या. माध्यमं (मीडिया) आणि कनेक्टिव्हीटी हे एकविसाव्या शतकाचे परवलीचे शब्द बनले.
माध्यमांना जेव्हा एकमेकांबरोबरच्या स्पर्धेत टिकून राहणं आवश्यक झालं, तसं ‘जे जास्त विकलं जातं ते विकायचं’ हे धोरण मोठय़ा प्रमाणावर राबवलं जायला लागलं. लैंगिकतेशी संबंधित गोष्टी आजवर कायम झाकल्या गेलेल्या, दडविल्या गेलेल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनमानसात कायमच अपार कुतूहल राहिलं आहे. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात वर्षांनुवर्षे हे चित्र दिसत आहे. खळबळजनक, विकाऊ गोष्टींमध्ये त्यांचा नंबर फार वरचा लागतो ते त्याच्यामुळेच. ‘सेक्स सेल्स’ हे वाक्य म्हणजे नेमका त्याचाच परिपाक. माध्यमांनी या घटकाची तळी उचलून धरली, ती यामुळेच.
लैंगिकतेविषयक गोष्टी आधीच्या पिढय़ांना उपलब्ध नव्हत्या असं नाही. आडबाजूला विकली जाणारी पिवळी पुस्तकं, काही विशिष्ट व्हिडीओ कॅसेट्सच्या लायब्ररीज, डब झालेले दाक्षिणात्य सिनेमे, या सगळ्या गोष्टी गेली अनेक वर्षे समाजात आहेतच. या गोष्टी मात्र कधी आपोआप हाती नाही पडल्या. या सगळ्यांच्या दिशेला एखाद्याला मुद्दाम वळायला लागायचं आणि हा सगळा प्रकार लपूनछपून चालायचा.
गेल्या काही वर्षांमधला वर्तमानपत्रं, टी.व्ही. आणि इंटरनेट- एकंदरच माध्यमांचा- प्रवास पाहिला तर लैंगिकतेशी संबंधित ‘चाळवणाऱ्या’ (टिटिलेटिंग) गोष्टींचा प्रचंड मारा होताना दिसतो आहे. पाहणाऱ्याची इच्छा आहे का, हा मुद्दाच यात नाही. इंटरनेटवर एखादा सर्च करीत असताना समोर ठाकलेल्या जाहिराती आणि चित्रं, वर्तमानपत्रातल्या चटकदार बातम्यांसोबतचे सेलिब्रेटी बायकांचे कमी कपडय़ांतले फोटोग्राफ्स, सिनेमासाठी आता आवश्यक ठरलेली आयटम साँग्ज.. यादी मोठी आहे आणि त्यातून सुटका नाही असंच आता चित्र आहे. जाहिरातींमधल्या उघड किंवा छुप्या लैंगिकतेच्या प्रवाहांबद्दल आपण याआधी या सदरातून बोललो आहोतच.
लैंगिकतेशी संबंधित माध्यमांतून मिळणाऱ्या या एक्स्पोझरमधून, एका प्रकारे लैंगिकतेविषयीची भीड चेपली जाते आहे, हे खरं आहे, पण त्यातून योग्य प्रकारची किती माहिती लोकांपर्यंत, खास करून तरुणाईपर्यंत, पोहोचते आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे. कोणत्याही कृतीला होणाऱ्या परिणामांचा एक पैलू असतो. लैंगिकतेच्या बाबतीत ही जाणीव असणं तर अतिशय महत्त्वाचं. सिनेमा आणि टी.व्ही.वरच्या मालिकांमधली पात्र मात्र याबाबतीत फारच कॅज्युअल असतात. त्यात हे परिणाम कुठेही दिसत नाहीत. दोन-चार भेटीगाठी किंवा एखाद्या  गाण्याचा स्पॅन यात रिलेशनशिप समागमापर्यंत पोहोचलेली दाखविणं खूपच कॉमन आहे, पण हेच सूत्र प्रत्यक्ष आयुष्याला लागू पडत नाही.
आज कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये समाधान मिळण्यासाठी नातेसंबंधांमध्ये काही काळ जावा लागतो, यात दोन्ही व्यक्तींचा सहभाग आवश्यक असतो. ‘इन्स्टण्ट प्लेझर’ असं काही नसतं. अगदी पती-पत्नींच्या लैंगिक नात्याची सुरुवातही अडखळत चुकतमाकत होऊ शकते आणि असं असणं नॉर्मल आहे, हे कुठं सांगितलं जातं?
लैंगिक संबंधांतून गर्भ राहण्याची शक्यता असू शकते. कोणतंही गर्भनिरोधनाचं (कॉण्ट्रासेप्शन) साधन पूर्णपणे खात्रीचं नसतं हे वास्तव आहे, पण सिनेमा आणि मालिकांमधल्या व्यक्तिरेखांना हे लागू पडताना दिसत नाही. खास करून फारसं परिचित नसणाऱ्या व्यक्तीबरोबरचे लैंगिक संबंध गुप्तरोगांना (एसटीडी- सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस) आमंत्रण देणारे असू शकतात. एड्स हा त्यापैकीच एक. याची भयावहता आता जगाला कळलेली आहे. ती माध्यमांद्वारे मात्र केवळ माहिती स्वरूपात समोर येते, पण याच माध्यमांच्या स्वप्निल, रंगीबेरंगी आणि सोयीस्कर दुनियेत इतक्या प्रखर वास्तवाला जागा नाही. या सगळ्यांतून सोयीस्कर अशी एक समाजभूमिका बनते आहे, दुर्दैव म्हणजे ती रंगविण्यात माध्यमांचाच मोठा हातभार आहे.
पाश्चात्त्य देशांत ही परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. अल्पवयीन आईची गर्भधारणा आणि गुप्तरोगांची लागण यांचं टीनएजर मुलांमधलं प्रमाण काळजी वाटण्याएवढं वाढलेलं आहे. मुलांची लैंगिक वर्तणूक (सेक्शुअल बिहेविअर) आणि माध्यमांमधून मिळणारं लैंगिकतेचं एक्पोझर यांच्यावर गेल्या दोन दशकांमध्ये खूप सर्वेक्षण आणि संशोधन होतं आहे. टीनएजर्सच्या बेजबाबदार आणि धोकादायक (रिस्की) लैंगिक (आणि हिंसाचारीही) वर्तणुकीमागची कारणं शोधायचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यात माध्यमांमधून मिळणाऱ्या एक्सपोझरकडे नक्कीच एक ठळक बोट दाखवलं जात आहे.
अशा परिस्थितीत पालकांच्या पिढीला काळजी आणि हतबलता, दोन्हींचा सामना करावा लागतो आहे. चहूबाजूंनी होणाऱ्या या लैंगिकतेच्या (आणि जोडीनं हिंसाचाराच्या) माऱ्याला आई-वडील म्हणून तोंड कसं द्यायचं हा मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
अशा परिस्थितीत ‘आमच्या वेळी’ आणि ‘काय ही आजकालची पिढी.’ अशा स्वरूपाची भाषा वापरून चालत नाही. यातून संवाद साधला जात नाही. ‘अनघड अवघड’मधून याआधी आपण या संदर्भात बोललो आहोत. अशा वेळी थोडक्यात आपली अस्वस्थता मुलांपर्यंत पोहोचविणं खूप महत्त्वाचं.
‘मला हा प्रोग्रॅम पाहताना कम्फर्टेबल नाही वाटत.’
‘अमुक बातमी केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी दिलेली वाटते.’
‘तमुक जाहिरातींमधून चुकीचा मेसेज जातो, असं मला वाटतं.’
‘याने अपलोड केलेली लिंक मला खटकली.’ अशा प्रतिक्रियांमधून या संवादाची सुरुवात होऊ शकते.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रचंड व्यक्तिगत माहिती, फोटोग्राफ्स अपलोड करण्याचा सध्याचा ट्रेण्ड, त्यावर आलेल्या कमेंट्स, एकंदरच सक्र्युलेट होणारे एसएमएसेस आणि एमएमएसेस- या सगळ्याचे विपरीत परिणाम, सायबर क्राइमबद्दल वेळोवेळी प्रसृत होणाऱ्या बातम्या- याबाबत मुलांशी बोलत राहणं खूप आवश्यक आहे.
सिनेमांमधल्या लैंगिक दृश्यांचं लहान वयात मिळणारं अवास्तव एक्स्पोझर आणि मुलांच्या पुढच्या आयुष्यातली धोकादायक लैंगिक वर्तणूक, यावरचा २०१२ चा डार्टमाऊथ युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट माझ्यासमोर आहे. या दोन्ही घटकांमधला संबंध हा रिपोर्ट अधोरेखित करतोच आहे. सहा वर्षांच्या दीर्घ सर्वेक्षणातून हा रिपोर्ट उभा राहिला आहे.
या सगळ्याच्या बाबतीत करायचं काय? मुळात मूल किती आणि कोणत्या प्रकारच्या लैंगिक मजकुराला सामोरं जात आहे, याचं काहीतरी भान पालकांना असणं आवश्यक आहे. त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणं शक्य नसलं तरी.
म्हणूनच एकंदरच खटकणाऱ्या, अनुचित वाटणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत राहण्याला पर्याय नाही आणि यावरची चर्चा, बोलणं एकदा होऊन पुरणारं नसतं. म्हणून अनेकदा संधी मिळेल तशी आणि गरज वाटेल तसं या विषयांवर बोलणं होत राहणं आवश्यक आहे.
गेलं वर्षभर ‘अनघड अवघड’ या सदरातून आपण बोलतो आहोत. हे सदर सुरू झाल्यावर अनेक आई-बाबांच्या प्रतिक्रिया कळत राहिल्या. एका आईनं सांगितलं- ‘याआधी काही वेळा मी विषय उघडायचा प्रयत्न केला आहे, पण मुलगा कोऱ्या चेहऱ्याने बसायचा तेव्हा मीच नाउमेद व्हायचे. आता हे नाउमेद होणं थोडं मागे टाकून पुन्हा नव्याने विषय उघडायचं बळ मिळतं आहे. हळूहळू छोटय़ा-छोटय़ा जागा सापडताहेत, कधी दारं किलकिली होताहेत, कधी कधी उघडताही येताहेत. विशेष म्हणजे संवाद चालू ठेवण्याचं महत्त्व डोक्यात अगदी पक्कं झालंय बघा.’
नवीन वर्षांत संवादाची नवी दारं उघडावीत आणि या ‘अनघड’ वयाचा प्रवास अवघड वाटू नये यासाठी आपणा सर्वाना मनापासून शुभेच्छा!    
(समाप्त)