आसनाच्या अंतिम स्थितीत स्थिरता व सुखमयता प्राप्त करण्यासाठी लागणारे प्रयत्न शैथिल्य हे सजगतेतूनच निर्माण होऊ शकतं. ही सजगता आणण्यासाठी लागणारी ऊर्जा आपण खाल्लेल्या अन्नातूनच आपल्याला मिळणार आहे. आपण प्राशन केलेल्या अन्नातील तमोगुणापासून मलरूप विसर्जन केलं जातं. तमोगुणापासून अंगप्रत्यांगाचे घटक तयार होण्यास मदत होते. अन्नातील रजोगुणातून आपल्याला क्रियाशक्ती प्राप्त होते आणि सत्त्वगुणापासून जाणिवेने युक्त असं अंत:करण बनतं. थोडक्यात प्रयत्न शैथिल्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती आपल्या शरीर व मनातील अस्थिरता दूर करून सजगता आणण्यास मदत करतात. म्हणून आसन साधना करताना सात्त्विक, सीमित, संतुलित आहाराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हठप्रदीपिका घेरंड संहिता, भगवद्गीता, उपनिषदे या सर्वानी आहाराला खूप महत्त्व दिलं आहे. छांदोग्य उपनिष्द तर ‘अन्नं न िनद्यात्’ म्हणजेच नावे ठेवून अन्न सेवन करू नका, असा इशारा देते. घरातील सर्वानाच व स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी गृहिणींनी मेहनतीने तयार केलेलं अन्न परब्रह्म मानून आनंदाने खाल्लं तर बाधणार नाही हे नक्की!
शलभासन
  आज आपण विपरीत शयन स्थितीतील शलभासनाचा सराव करू या. शलभ म्हणजे टोळ. या आसनाच्या अंतिम स्थितीतील आकृतीबंध टोळाप्रमाणे दिसतो. पोटावर पालथे पडा. दोन्ही पाय एकमेकांना जोडा. नखं जमिनीला टेकलेली व पावलं किंचित ताणलेली असतील. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. दोन्ही हातांच्या मुठी वळून हात शरीराखाली अथवा बाजूला ठेवा. हनुवटी जमिनीला टेकवा. आता पाय सरळ व जुळवून ठेवलेल्या स्थितीत गुडघ्यात न वाकविता जमिनीपासून वर उचला. अंतिम स्थितीत काही वेळ स्थिर राहून सावकाश पाय खाली आणा. पूर्वस्थितीत या. दोन्ही पाय एकामेकांपासून वेगळे करा. आणि मकरासनात विश्रांती घ्या.
   अल्सर, हíनया, पोटाचे काही विकार, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी शलभासनाचा सराव टाळावा. पाठदुखीचे विकार असणाऱ्यांना मात्र शलभासनाच्या सरावाने लाभ होतो.
खा आनंदाने! : अचपळ मन माझे, नावरे आवरिता
वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
बोलता बोलता अचानक काही शब्द / माणसांची/ जागांची नावं आठवतच नाहीत. आणि आपण म्हणतो, ‘‘अरे, नाव अगदी तोंडावरती आहे बघ पण आठवत नाहीये.’’ पूर्वी असं कोणी म्हटलं की चटकन म्हटलं जायचं- ‘वय झालं का?’ पण हल्ली ‘विसरणं’ खूप कॉमन झालंय. कधीही – कुठेही – काहीही विसरायला होतं. मग त्यासाठी ६०- ७० वय असायची गरज नाही. याच विस्मृतीला वैज्ञानिक भाषेमध्ये ‘अल्झायमर’ नाव दिलं गेलंय. मनाचा संबंध विचारांशी अतूट आहे. ज्याला ‘मन’ आहे त्याच्या मनात विचार येणारच! मग ते वाईट असोत अथवा चांगले असोत. जगामध्ये सर्वात गतिमान काय? विमान / प्रकाश की मन? बरोबर उत्तर – मन आहे ना? कारण आत्ता इथे ‘चतुरंग’ वाचत असलेले मन अमेरिका / लंडन किंवा चंद्रावरती कधी जाऊन पोहोचेल याचा काही नेम नाही. अन्नातील ‘प्राण’ आणि आपल्या मनातील विचार यांचा परस्परांशी संबंध कसा आणि काय आहे ते आपण या लेखमालेमध्ये बोलूच. आज विस्मृती आणि आहार याविषयी गप्पा मारूया.
‘अल्झायमर डिसीज’ लिहायला आणि वाचायला कठीण शब्द आहे, पण हल्ली खूप कॉमन झाला आहे. ‘विस्मृती’ कशी होते? तुम्हाला एक गम्मत माहितीये? वयाची ५० र्वष झाल्यावर (कधी कधी ४० सुद्धा) आपण म्हणतो, ‘‘आता वय झालं, म्हातारपण आलं!’’
पण सत्य हे आहे की वय होण्याची प्रक्रिया ही जन्मापासून सुरू होते. ज्याला ‘एजिंग प्रोसेस’ असं म्हणतात. जसं वय वाढतं तसं मेंदूमध्ये ‘इनफ्लेमेशन’ची क्रिया वाढते. तसंच मज्जारज्जूच्या प्रथिनांमध्ये बदल होत जातात; जेणेकरून संदेश वहनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात. आणि या दोन्ही क्रियांची गती चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढते.
विस्मृती वाढवणारे पदार्थ –
चरबीयुक्त पदार्थ  (कोलेस्टेरोल, ट्रान्स फेट्स), अतिगोड पदार्थ, प्रक्रिया केलेले (अनैसर्गिक) पदार्थ , सिगारेट, दारू, तंबाखूचे व्यसन, अतिखारट पदार्थ.    
स्मरणशक्ती वाढवणारे पदार्थ –
विटामिन अ, क, सेलेनिअम युक्त पदार्थ, तंतुमय पदार्थ, ओमेगा-३ युक्त पदार्थ, – शेंगदाणे / राईचं तेल  उदा. विविध रंगांच्या भाज्या आणि फळं, अक्रोड, बदाम, अळशीचे दाणे, शेंगदाणे, राजमा, टोमॅटो, फ्लॉवर, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, हळद, करवंद, जांभूळ, स्ट्रॉबेरी, भोपळी मिरची, मका, मनुका  थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला आहार असा असला पाहिजे जेणेकरून मधुमेह, हृदयरोग, लट्ठपणासारखे आजार होणार नाहीत व मेंदूला सतत पण योग्य प्रमाणात ग्लुकोजचा पुरवठा होत राहील – म्हणजेच संतुलित आहार, विविध पदार्थानी युक्त आहार जो नैसर्गिक आहे, प्रक्रिया न केलेला आहे. आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणात आणि नियमित चलन-वलन (मानसिक आणि शारीरिक व्यायाम) पण जरुरी आहे.
सांगितलेलं सगळं नीट लक्षात राहील ना? नक्कीच राहील! आपल्या राहणीमानामध्ये / आहारामध्ये योग्य ते बदल केले तर ‘विस्मृती’ हा आजार ‘विस्मृतीमध्ये’ जायला वेळ लागणार नाही. बदलाची सुरुवात कोणत्याही वयामध्ये करायला हरकत नाही. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जसे पालक लहान मुलांसाठी मेहनत घेतात, तसेच  ‘विस्मृती’शी सामना करण्यासाठी मेहनत घ्यायला काहीच हरकत नाही.
इंद्रधनुषी सलाड  –
वाफवलेले बीट, गाजर, भोपळी मिरची, राजमा, कोबी, डाळिंब, पनीर, वाफवलेली पालकाची पानं , लिंबू,  कोथिंबीर-पुदिना-आलं-मिरची पेस्ट – १ चमचा , शेंगदाणे-अक्रोड-अळशी दाणे कूट.
सर्व भाज्या बारीक चिरून सम प्रमाणात घ्याव्यात. सलाड मिक्स करून लगेच खावं.
संगणकाशी मत्री : ओळख ‘यू टय़ूब’ची
संकलन- गीतांजली राणे -rane.geet@gmail.com
आजी-आजोबांसाठी उपयोगी पडतील अशा संकेतस्थळांची माहिती आपण यापूर्वीही करून घेतली आहे. या भागात आपण आजी आजोबांना त्यांच्या मनोरंजनासाठी आणि ज्ञानवर्धनासाठी उपयुक्त अशा ‘यू टय़ूब’ या संकेतस्थळाची माहिती करून घेणार आहोत.
यू टय़ूबची थोडक्यात ओळख सांगायची झाली तर अशी सांगता येईल की, टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या मालिका, अनेक सिनेमे, गाणी, विविध टय़ूटोरियल्सचे (शिकवण्या) व्हिडीओ ‘यू टय़ूब’वर पाहता येतात. बरं हे सगळं भारतापुरतं मर्यादित नाही तर कोणत्याही देशातील या गोष्टी आपल्याला ‘यू टय़ूब’च्या माध्यमातून पाहता येतात. इतकंच नाही तर तुम्ही स्वत: तयार केलेले सिनेमे, व्हिडीओज ‘यू टय़ूब’वर अपलोड करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम आकारली जात नाही, गरज असते ती फक्त इंटरनेट कनेक्शनची.
  याशिवाय आपल्याला आवडलेले कोणतेही व्हिडीओ आपण ‘यू टय़ूब’ डाऊनलोडरच्या माध्यमातून  आपल्या संगणकात डाऊनलोड करून आपल्याला हवे तेव्हा पाहू शकतो. समजा आपल्याला एखाद्या व्हिडीओचा फॉरमॅट (व्हिडीओचा प्रकार -फॉरमॅटवरून संबंधित  ऑडिओ आहे की व्हिडीओ हे समजते) बदलायचा असेल तर ‘यू टय़ूब’ डाऊनलोडरवरून तो फॉरमॅटही बदलता येतो. अशा प्रकारे फॉरमॅट बदलून व्हिडीओची साइज कमी करून ते व्हिडीओ स्वत:च्या मोबाइलमध्ये सेव्ह करून तुम्हाला कधीही कुठेही बघता येऊ शकतात.
याशिवाय आजी, आजोबा तुम्हाला जर इत्थंभूत संगणक शिकायचा असेल तर ‘यू टय़ूब’च्या माध्यमातून तुमच्या समोर अलीबाबाची गुहाच उघडलीय असे म्हणता येईल. ‘यू टय़ूब’वर संगणकाविषयीचे प्रत्येक सॉफ्टवेअर कसे वापरावे याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते डाऊनलोड करून तुम्ही हवे ते सॉफ्टवेअर घरबसल्या मोफत शिकून त्यात प्रावीण्य मिळवू शकता.
पुढच्या लेखात आपण ‘यू टय़ूब’वर व्हिडीओ कसे बघावेत, अपलोड करावेत, ‘यू टय़ूब’डाऊनलोडरचा वापर कसा करावा याची माहिती घेऊ.   आनंदाची निवृत्ती : संस्कृताचे अध्यापन
सुमित्रा गुर्जर
माझे सध्याचे वय ८० वर्षे असून १९५५ ला विवाहोत्तर उच्च शिक्षणाला आरंभ करून मी १९६२ ला बी. एड.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ येथील या महात्मा गांधी विद्यालय व ऑर्डनन्स फॅक्टरी हायस्कूल येथे ८ वी ते ११च्या विद्यार्थ्यांना हिंदी व समाजशास्त्र विषयांचे अध्यायन करीत एम.ए.एम.एड् झाले. मी जवळजवळ ३० वर्षे अध्यापन करून १९९३ला सेवानिवृत्त झाले.
माझ्या जीवनात सेवानिवृत्तीनंतर टर्निग पॉइंट आला. माझ्या मैत्रिणीच्या डोळय़ाचे ऑपरेशन झाल्यावर तिला शिकवणी करणे जमेना, म्हणून तिने इंग्रजी माध्यमाच्या दक्षिणात्य विद्यार्थ्यांना इंग्रजीतून हिंदी व मराठी विषय शिकवण्याची विनंती केली ती मी मान्य केली. त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितले हे विषय तुम्ही चांगले शिकवता, मग संस्कृतपण शिकवा ना! त्या वेळी माझे पती डॉ. गुर्जर पोदार वैद्यक महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाने मी संस्कृतच्या  अध्यापनास प्रारंभ केला. मग एक-दोन वर्षे ११वी १२वीचे संस्कृत घेतले. दहा वर्षांपूर्वी मला अनुभवी महिला शिक्षकांनी चालविलेल्या घरगुती क्लासमध्ये ८वी ते १०वीला संस्कृत शिकवण्याची विनंती करण्यात आली ती मी मान्य केल्याने आज सेवानिवृत्तीनंतर मी संस्कृतचे अध्यापन करीत आहे.
सन २००५ला माझ्या वयाला ७० वर्षे पूर्ण झाल्यावर अध्यापन करतानाच मी वेगळी वाट निवडली. विद्यार्थीवर्गाला संस्कृत कठीण व क्लिष्ट न वाटता रोचक व सोपं वाटावं म्हणून मी संस्कृत भाषेतील विद्यार्थीवर्गाला उपयुक्त अशी अतिशय सोपी सुभाषिते निवडली. १३०० सुभाषितांचा मराठी अनुवाद केला. त्याचे दोन भाग केले- पहिला ८वी ते १०वी चा व दुसरा ११वी, १२वीसाठी. त्याचे नाव ‘सार्थ संस्कृत सुभाषित माला’.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती सहा महिन्यांत संपल्याने दुसरी काढली व तिसरी आवृत्ती दिवंगत डॉ. गुर्जर यांच्या स्मरणार्थ मराठी माध्यमांच्या ठाणे, मुंबई व कोकण परिसरातील शाळांना भेट म्हणून दिली. नंतर २०१२ला मी ‘सुलभ संस्कृत निबंध लेखनम्’ हे पुस्तक वरीलप्रमाणेच दोन भागांत लिहिले व संस्कृतचे अध्यापन करणाऱ्या आपल्या भागातील शाळांना भेट स्वरूपात दिले. अध्यापनाबरोबर लेखन चालू आहे. अध्यापनातील मानधनाचा काही भाग अंध, मूक-बधिर, अपंग अशांची सेवा करणाऱ्या संस्थांना मदत स्वरूपात देते. पूर्वी शाळेत एकावेळी ६० विद्यार्थ्यांना शिकवण्याची हातोटी होती, मात्र आता वयपरत्वे १० ते १५ विद्यार्थ्यांना शिकवू शकते. अध्यापनातील आनंद आजच्या माझ्या ऐंशी वयाला आजही तितकाच उत्साही ठेवतो.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो