शंकर आत्माराम आपटे

‘‘आजतागायत ३२ जणांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अपंग कल्याण पुरस्कारांनी सन्मानित करण्यासाठीचे माध्यम बनून त्यांच्या जीवनात आनंद आणि आत्मभान फुलवण्याचं काम मी करू शकलो. आज मी सहस्रचंद्रदर्शनाच्या उंबरठय़ावर उभा आहे. पण या कामाचं, यज्ञाचं होमकुंड तेवढंच प्रज्वलित आहे. त्यातून मिळणारं समाधान माझं आनंदधन आहे, तीच माझी जगण्याची प्रेरणा आहे.’’

राष्ट्रपती भवनाच्या भव्यदिव्य, मनोवेधक बागेमध्ये राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या माया डोंगरेला घेऊन मी पोहोचलो. डोळ्याचं पारणं फिटेल असा शामियाना तेथे उभारला होता. सर्वदूर लालचुटूक रंगाच्या गालिच्याने शामियान्याची शान वाढवली होती. विविध प्रकारच्या दिव्यांच्या रोषणाईचा लपंडाव सुरू होता, थुईथुई नाचणाऱ्या कारंज्यांनी मन उल्हसित होत होतं तरी आमचा जीव मात्र हबकून गेला होता. माया तर त्या गालिच्याकडे आणि स्वत:च्या पायातील चपलेकडे प्रश्नांकित नजरेने पाहात होती. एरवी अनवाणी चालणारी ही मुलगी गोंधळली होती. मात्र पादत्राणांसहित वावरणाऱ्या लोकांकडे मी तिचं लक्ष वेधलं तेव्हा मात्र निखळ हसत ती झपाझप चालू लागली. माया डोंगरेचं नाव पुकारलं गेलं आणि तुतारीच्या ललकारीने आम्ही हरखून गेलो. त्या वेळचे राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या उपस्थितीत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक कॅमेरे पुढे सरसावले. स्वप्नवत वाटेल असा तो प्रसंग होता. माझ्या कष्टाचं चीज झालं. हा माझा पुरस्कार होता.

हो, खरंच हा मला मिळालेलाच पुरस्कार होता. माया, ठाणे जिल्ह्य़ातील, शहापूर तालुक्यातील ‘मू’ या अगदी छोटय़ा गावातली मुलगी. खेळता खेळता तिचा चुलतभाऊ विहिरीत पडला. क्षणाचाही विलंब न लावता स्वत:चा जीव धोक्यात घालून तिने त्याला वाचवलं. ही बातमी मी वर्तमानपत्रात वाचली. आणि तिची सर्व कागदपत्रं दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा माझा सिलसिला सुरू झाला. आणि आज त्याची सांगता झाली. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हता. ती एक तीन पायांची अडथळा शर्यतच म्हणा ना! १९८२ ला महेश पद्माकर खारकर या कल्याणच्या दहा वर्षांच्या मुलालाही हा शौर्य पुरस्कार मिळवून देता आला. त्याने पतंग उडवताना इलेक्ट्रिक तारेला चिकटलेल्या मुलाला प्रसंगावधान राखून वाचवलं होतं. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. त्याला यश मिळाल्याने त्याची झिंग चढली म्हणा ना. आजतागायत ३२ जणांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अपंग कल्याण पुरस्कारांनी सन्मानित करण्यासाठीचे माध्यम बनून त्यांच्या जीवनात आनंद आणि आत्मभान फुलवण्याचं काम मी करू शकलोय.

हे कसं करू शकतो? तर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली अशी एखादी बातमी वाचली की ते कात्रण मी कापून ठेवतो आणि त्या संबंधातील सर्व कागपत्रं मी मिळवतोच. जेव्हा वर्तमानपत्रात या पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची बातमी येते तेव्हा म्हणजे अगदी आठ दिवसांत या कागदपत्रांवर अनेक सरकारी विभागांची मोहोर उमटवून ते सर्व दिल्लीला पाठवतो. त्यासाठी खूप धावपळ आणि पाठपुरावा करावा लागतो. पण त्यानंतर त्यांना जेव्हा शासकीय मानात पुरस्कार मिळतो तेव्हाचं समाधान म्हणजे माझं आनंदधन आहे.

मी या गोष्टीकडे कसा वळलो, कधी वळलो, हे मला पक्कं आठवत नाही, पण महाविद्यालयीन काळात मला नेहमी प्रश्न पडायचे, ‘या मानवी दुनियेचा कारभार कोण आणि कसा बरं चालवतं?’, ‘त्या त्या देशाची राज्यघटना आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाला मिळालेले अधिकार यातून प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य सांभाळत, समाजाची बांधिलकी जोपासत, स्वत:चा आणि समाजाचा विकास सन्मार्गाने कसा करता येईल?’ त्यावर मला मिळालेलं उत्तर होतं, समाजासाठीचे नियम, उपलब्ध तरतुदी यांच्या साहाय्यानेच ते करता येतं. त्यामुळेच तरुण वयातच जिल्हा पातळीपासून थेट केंद्र सरकापर्यंतचा, लाभार्थीना मिळणाऱ्या तरतुदींचा अभ्यास करायला सुरुवात केली. शिवाय खेडय़ातील रानवाटा ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास मुखोद्गत केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत

खेडय़ातील असो वा शहरातील, लोकांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची, बक्षिसांची, मोबदल्याची माहितीच नसते. त्यासाठी निधींची तरतूद केलेली असते याची सुतराम कल्पना नसते. म्हणूनच समाजमन जागृत करण्यासाठी त्यातील योग्य व्यक्तीच्या शौर्याचा, कर्तृत्वाचा गौरव झालाच पाहिजे. तसंच वन्य प्राण्यांमुळे जीव गमवावा लागलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, या सद्हेतूनेच मी ही वाट निवडली. हाली रघुनाथ बरफ ही तबेल्यात शेण गोळा करणारी मुलगी. तिच्यावर वाघाने अचानक झडप घातली. हालीने प्राणपणानं प्रतिकार केला आणि स्वत:चं संरक्षण केलं. तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देताना खूप धावपळ करावी लागली. वाशीच्या विकास दत्ताराम साटम या मुलाने बैलाच्या झुंजीत सापडलेल्या एका लहान मुलाला स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं. त्यालाही शौर्य पुरस्कार मिळवून देऊ शकलो यापेक्षा जास्त आनंद कोणता? आणखी काही धाडसी मुलांची माहिती मी पाठवली आहे. त्याचा पाठपुरावा करतो आहेच.

वन खात्यांच्या तरतुदींचा, अनुदानांचा, त्यातील शासकीय अध्यादेशांचाही मी अभ्यास केला. वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात माणूस दगावला तर त्याच्या कुटुंबीयांना सध्या १५ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. हे अभ्यासत असतानाच एक आदिवासी स्त्री सर्पदंशाने दगावली असल्याचं कळलं. तिच्या कुटुंबीयांना शासकीय अध्यादेशाअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी खूप खटपट केली, पण तिला अनुदान मिळालं नाही. जेव्हा मी अध्यादेश पुन्हा अभ्यासला तेव्हा त्यात सर्पदंशाने झालेला मृत्यू समाविष्ट केलेला नाही हे लक्षात आलं. त्यासाठी मी वनमंत्रींना पत्र लिहिलंय.

सर्प, नाग हासुद्धा वन्य जीवच आहे आणि त्याचाही समावेश मृत्यूच्या कारणांमध्ये करावा ही आग्रही भूमिका घेत त्या पत्राच्या प्रती अनेक ठिकाणी पाठवल्या आहेत. त्यावर लवकर निर्णय व्हावा ही अपेक्षा.

माया डोंगरेला पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात तिच्याशी हस्तांदोलन करताना तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण. सोबत शंकर आपटे

एखाद्या व्यक्तीचे प्राण जर कोणी वाचवले असतील तर त्या व्यक्तीने केलेले धाडस, समयसूचकता, प्रसंगावधान याप्रमाणे ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम देऊन राज्य सरकारकडूनही गौरव करण्याची तरतूद आहे. या सर्व नियमांचा अभ्यास करताना लक्षात आलं, की विशेष शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनाही ‘अपंग कल्याण पुरस्कार’ राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. सीमा गोखले या डोंबिवलीच्या मुलीने आपल्या अपंगत्वावर मात करून योग्य शिक्षण घेत शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. ही गोष्ट मला समजताच दोन दिवसांत तिची सर्व कागदपत्रं तयार करून पाठवली. तिला राष्ट्रपती पदक मिळालं तेव्हाही मी तिच्याबरोबर दिल्लीला गेलो होतो. समाधानाची गोष्ट म्हणजे तिथे आलेल्या एका समदु:खी तरुणाला तिच्याबरोबर लग्न करण्याचं सुचवलं. त्याने ते मान्य केलं. आज ती दोघंही सुखात आहेत. ओंकार निरगुडकर हा साताऱ्याचा कमरेखाली अपंग असलेला मुलगा. तोही एका कंपनी सचिव पदापर्यंत पोहोचला. त्यालाही योग्य ते सर्व मार्गदर्शन केलं. तो आज राष्ट्रपती पदकाचा मानकरी आहे. आता त्याला ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’मध्ये नोकरी लागली आहे.

नोकरी करत असताना ही धुरा मी स्वेच्छेने सांभाळली. तेव्हापासून सुरू झालेल्या या यज्ञाचं होमकुंड आजही तेवढंच प्रज्वलित आहे. आज मी वयाची ७९ वर्षे पूर्ण केली आहेत. सहस्रचंद्रदर्शनाच्या उंबरठय़ावर उभा आहे. आई-वडिलांनी प्रामाणिकता आणि सचोटी हे गुण मनावर बिंबवलेत. त्यामुळेच नोकरीतलंही माझं लक्ष मी कधी ढळू दिलं नाही. त्याचा मोबदला म्हणजे १९६४-६५ ला कंपनीने मला ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित केलं, पण त्या वेळी आनंदाबरोबर माझी जबाबदारी वाढली आहे याचीही जाणीव मला झाली. माझ्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. ‘अण्णा भाऊ साठे पुरस्कार’, ‘महात्मा फुले पुरस्कार’ असे १६ पुरस्कार मिळाले. यातून प्रोत्साहनच मिळालं. मात्र दोन वेळा माजी राष्ट्रपती झैलसिंग, राष्ट्रपती व्यंकटरमण, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर जे काही सुवर्णक्षण अनुभवले ते खरे पुरस्कार. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी स्वत:च्या दुर्मीळ फोटोंचं कॅलेंडर मला स्वहस्ते भेट दिलं. हा अविस्मरणीय ठेवा मी प्राणापलीकडे जपतो.

याशिवाय कविता करणे, पौरोहित्य करणे हे छंदही मी जोपासतो. ‘अंधारातील फुले’ हा माझा ९६ गीतांचा संग्रह शासनाने प्रकाशित केलाय. लहानपणापासून मी ज्ञानेश्वरी वाचत आलोय. त्यामुळे दुसऱ्याच्या भल्यासाठी लढणं, मेहनत घेणं, हीच माझी गुरुमाउलींची पूजा.

मला नेहमीच वाटतं,

‘इन्सानकी दुवा सुखी जिंदगीकी दवा है।

अंधेरे मे चलते समय वही तो दिया है

वे दोनो मिल गये तो खुदा उसको दया देता है।’

शब्दांकन – सुलभा आरोसकर

sulabha.aroskar@gmail.com

chaturang@expressindia.com