– रुचिरा सावंत

‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या भारताच्या पहिल्या बहुतरंगलांबी असणाऱ्या अवकाश दुर्बिणीच्या निर्मितीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. विनिता नवलकर. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे त्यांचे आवडते विषय. परंतु विज्ञानातील प्रयोग करण्यासाठी आधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा असायलाच हवी असं काही बंधन नाही, प्रयोग कुठेही करता येतात असं मानणाऱ्या आणि विज्ञान प्रसाराला महत्त्व देणाऱ्या डॉ. विनिता यांच्याबद्दल..

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र

शाळेत आपल्या वेळापत्रकात फारशा गांभीर्यानं घेतल्या न जाणाऱ्या आणि बऱ्याचदा अभ्यासाच्या इतर विषयांमुळे न होणाऱ्या काही तासिका असतात. हे वाचल्याक्षणीच खेळाचा तास, कलेचे वर्ग आठवू लागले असतील ना! पण याबरोबरच आणखी एक तासिका असते- अवांतर वाचनासाठीची ‘ग्रंथालय तासिका’. काही विद्यार्थी या तासाची चातकासारखी वाट पाहात असतात, तर काहींना ही डोकेदुखी वाटते. काही शाळांमध्ये मात्र ही तासिका केवळ वेळापत्रकापुरतीच अस्तित्वात असते. ‘त्या’ मुलीच्या शाळेत मात्र हा तास नियमित व्हायचा. घरी पुस्तकं नेण्याची परवानगी नसली, तरी वाचनाच्या तासाला पाहिजे ती पुस्तकं वाचता यायची. आपण वाचन केव्हा आणि कसं सुरू केलं, याची तिला आठवणसुद्धा नाही. पण तिला आठवतंय तेव्हापासून ती वाचतेय. अगदी आवडीनं. इंग्रजी कादंबऱ्या, कथा यांमध्ये रमणाऱ्या तिला विज्ञानविषयक पुस्तकं, कथा वाचण्याची तशी सवय नव्हती. अशातच साधारण आठवी-नववीमध्ये असताना ‘विश्व’ या विषयावरील पुस्तकांची एक मालिका तिला गवसली आणि त्या मालिकेतील तिसरं-चौथं पुस्तक वाचत असतानाच तिला तिचं कार्यक्षेत्र गवसलं. ‘हो, याच क्षेत्रात काम करायचं आहे मला. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र.’ तिनं स्वत:शीच ठरवलं आणि एक दिवस ते अर्थशास्त्र आणि कलेची पार्श्वभूमी असणाऱ्या आपल्या कुटुंबात जाहीर केलं. भविष्याविषयक या निर्णयाचा सहज स्वीकार झालेली, पालकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे अवकाशाला गवसणी घालण्यासाठी पंखांना बळ मिळालेली आणि नंतर भारतासाठी अभिमानास्पद ठरलेल्या संशोधन प्रकल्पामध्ये योगदान देणारी ती तरुणी म्हणजे वैज्ञानिका डॉ. विनिता नवलकर. मुळात जीवशास्त्र आणि भाषा या विषयांची फार ओढ नसल्यामुळे शालेय शिक्षण संपल्यावर इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडल्यावर या विषयांपासून आपल्याला सुटका मिळवता येऊ शकते, हे समजल्यावर इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची निवड त्यांनी केली. इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्र या विषयांचा एकमेकांशी असलेला संबंध पाहता विषयांची ही जोडी त्यांना आवडली. जीवशास्त्र आणि भाषा विषयांपासून पळ काढत असताना भेटलेल्या या नव्या दोस्तांनी अनेक बदल त्यांच्या आयुष्यात आणले. त्यांच्या पुढील भविष्याचा पाया रचला असंच म्हणू या. त्यांची आणि भौतिकशास्त्राची मैत्री आणखी घट्ट होण्यात या विषयानं योगदान दिलं आणि इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे अभियांत्रिकी विषयांचा अभ्यास न करता आपण भौतिकशास्त्र विषयात पुढील शिक्षण घ्यायचं, हे त्यांनी बारावीमध्ये असतानाच ठरवलं. रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेत असताना खगोल मंडळाशी त्यांचा संपर्क झाला आणि विहार करण्यासाठी एका नव्या जगाची ओळख झाली. तिथे अवकाशाविषयी, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली आणि अवकाश दर्शन करता करताच ताऱ्यांचं विश्व उलगडण्याविषयीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. तिथे भेटलेल्या अनेक सुहृदांच्या मदतीनं या क्षेत्रात त्या अधिकाधिक मुक्त विहार करू लागल्या.

भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ‘टाटा मूलभूत संशोधन केंद्रा’मध्ये (टी.आय.एफ.आर.) ‘एक्सरे अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या विषयात एका संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ही संधी त्यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करणारी होती. खरं तर हा त्यांचा पहिला संशोधन प्रकल्प नव्हता. यापूर्वी पदवी शिक्षणादरम्यान अनेक लहान लहान संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केलं होतं. नागरिकांसाठीचं विज्ञान (सायन्स आउटरीच) या विषयाबरोबरच काही प्राचीन ग्रंथांमधील खगोलीय घटनांचा अभ्यास करणं, असे काही प्रकल्प त्यांनी केले होते. मात्र २०११ ते २०१७ या ‘टी.आय.एफ.आर.’मधील वास्तव्यादरम्यानच्या काळात त्यांना भारतीय अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. तो प्रकल्प होता- ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’. ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या भारताच्या पहिल्या बहुतरंगलांबी असणाऱ्या अवकाश दुर्बिणीच्या निर्मितीमध्ये त्यांच्या समूहानं उल्लेखनीय योगदान दिलं आहे. विश्वाचा आणखी गांभीर्यानं अभ्यास करता यावा, यासाठी या वैज्ञानिक उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्याचं यश पाहता आता ‘अ‍ॅस्ट्रोसॅट-२’साठीची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. तर आता आपण अ‍ॅस्ट्रोसॅटकडे पुन्हा येऊ या. अ‍ॅस्ट्रोसॅटबरोबर पाठवण्यात आलेल्या ५ पे लोड्सपैकी ३ पे लोड्सवरील काम ‘टी.आय.एफ.आर.’मध्ये विविध प्रयोगशाळेत सुरू होतं. त्यापैकी ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’च्या निर्मितीमध्ये विनिता यांच्या संघाचं मोलाचं कार्य आहे. ते जाणून घ्यायलाच हवं.

प्रोफेसर के. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली संशोधन होत असणारा हा विषय विनिता यांच्यासाठी तसा नवा होता. पण विषयात निर्माण झालेल्या कुतूहलामुळे खूप वाचन आणि अभ्यासांती त्यांनी ही फेलोशिप मिळवली. आपण शाळेत असताना प्रकाशाच्या परिवर्तनाचा अभ्यास केला आहेच. आपल्या नुसत्या डोळय़ांनी दिसणारी किरणं (व्हिजिबल रेज्) परावर्तित होत असताना चमकदार पृष्ठभागावरून काटकोनात परावर्तित होतात हे आपण जाणतोच. त्यास नियमित परावर्तन असंही म्हणतात. तर ‘एक्स-रे’ हे ऊर्जाप्रभारी किरण असतात. प्रचंड ऊर्जेसह जेव्हा ही किरणं एखाद्या पृष्ठभागावर आदळतात, तेव्हा पृष्ठभागात ती शोषली जातात. अशा वेळी त्यांच्या परावर्तनाचा कोन खूप कमी करून ही किरणं एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना पृष्ठभागावर शोषली न जाता पूर्णत: परावर्तित केली जातात. त्यास वैज्ञानिक भाषेत पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हणतात. भारतातल्या या पहिल्या ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’मध्ये एकूण ३२० आरसे होते. या अवकाश दुर्बिणीमध्ये सोन्याचा एक थर वापरला असून कमी ऊर्जा असणाऱ्या एक्स रे किरणांसाठी त्याचा वापर केला गेला. विनिता आणि त्यांच्या टीमनं या ३२० आरशांचं कॅलिब्रेशन केलं. म्हणजे एकाच ठरावीक बिंदूवर हे सगळे ३२० आरसे एक्स रे केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. हे काम अजिबात सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांना तब्बल दोन वर्ष लागली.

या दुर्बिणीनंतर विनिता यांनी आपला मोर्चा ‘हार्ड एक्स रे टेलिस्कोप’कडे वळवला. त्यामध्येसुद्धा आरशांच्या निर्मितीवर त्यांनी काम केलं. सोन्याचा एक थर देण्याऐवजी आरशांची परावर्तन क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘हार्ड एक्स रे टेलिस्कोप’ म्हणजे जास्त ऊर्जा असणाऱ्या एक्स रे किरणांसाठी वापरला जाणारा टेलिस्कोप. वैश्विक एक्स रे स्रोतांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या प्रकारच्या टेलिस्कोपमध्ये शुद्ध टंगस्टन आणि सिलिकॉनचे थर वापरून आरसे बनवले जातात. फक्त सोन्याच्या एका थरामुळे १० keV पेक्षा जास्त ऊर्जा असलेले एक्स रे परावर्तित होऊ शकत नाहीत. त्यासाठी एकापेक्षा जास्त थर असणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त थर द्यायचे, तर दोन थरांमध्ये एक अपारदर्शक पदार्थ असणं गरजेचं असतं. यासाठी शुद्ध टंगस्टन आणि सिलिकॉनची निवड करण्यात आली. टंगस्टन हा परावर्तित गुणधर्म असणारा पदार्थ, तर सिलिकॉन हा अपारदर्शक पदार्थ. या प्रयत्नांची परिणती म्हणून एकूण ८० द्विस्तरीय थर देण्यात त्यांना यश आलं. त्यासाठीचं कॅलिब्रेशन शोधण्यात त्यांची जवळपास २ वर्ष गेली. या अशा प्रकारच्या अवकाश दुर्बिणीवर काम करणारी ही भारतातली पहिली टीम आहे. डॉ. विनिता आणि त्यांच्या टीमनं संशोधन करून मांडलेल्या या पद्धतीला अनुसरून अवकाश दुर्बिणीची निर्मिती अजून झालेली नसली, तरी या संदर्भातला शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. पुढे ही संपूर्ण प्रयोगशाळा ‘टी.आय.एफ.आर.’मधून अहमदाबाद येथील ‘फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी’ (पी.आर.एल.) येथे हलवण्यात आली. काही काळ या प्रकल्पावर तिथून काम केल्यानंतर काही वैयक्तिक कारणांमुळे विनिता यांना मुंबईस परतावं लागलं. आणि इथून एका नव्या, वेगळय़ा प्रवासाची सुरुवात झाली. 

 मुंबईत परतल्यावर विनिता यांनी अध्ययन क्षेत्राचा रस्ता निवडला. मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस’मध्ये खगोलशास्त्र विषयाची संपूर्ण प्रयोगशाळा उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जवळपास १२ नवे प्रयोग त्यांनी तिथे विकसित केले. हे सगळं ‘ऑप्टिकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी’संदर्भात होतं. यादरम्यान या प्रयोगशाळेत प्रयोग विकसित करण्यासारख्या विषयांवर त्यांनी शोधप्रबंध लिहिले. याच काळात त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी एक कमी खर्चीक स्पेक्ट्रोमीटर विकसित केला. आपल्या नेहमीच्या वापरातल्या साधारण अवकाशदुर्बिणीला स्पेक्ट्रोमीटर जोडून त्याचा वापर करण्याविषयीचं संशोधन त्यांनी केलं. याविषयी त्यांनी लिहिलेला शोधप्रबंध त्यांनी प्रस्तुत केला असून तो प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे.

या काळातल्या अनुभवांदरम्यान त्यांना आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. वर उल्लेख केलेल्या स्पेक्ट्रोमीटर संदर्भातला शोधप्रबंध किंवा ‘सेंटल फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस’मधील त्यांच्या अनुभवामुळे संशोधन, शोध आणि प्रयोग हे केवळ महागडय़ा प्रयोगशाळेत, जगापासून अलिप्त राहून, दडवूनच होत नसतं, तर ते सामान्य जीवन जगत असताना, समाजाचा भाग होऊन, समाजात राहूनही करता येतं, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. सगळेच प्रयोग करण्यासाठी आधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा असायलाच हवी हे बंधन नाही. प्रयोग कुठेही करता येतात. त्यातूनच प्रयोगशाळेतल्या गुप्त संशोधनासमोर दैनंदिन जीवनातल्या विज्ञानाचा पुरस्कार आणि विज्ञान प्रसार याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. सध्या त्या ‘जर्नल ऑफ व्हिज्युअलाइज्ड एक्सपेरिमेंट’ या अमेरिकास्थित संशोधन जर्नलमध्ये भौतिकशास्त्र विषयासाठी वरिष्ठ विज्ञान लेखक म्हणून काम पाहतात. भौतिकशास्त्रातील विविध संकल्पना सोप्या करून समजावून सांगण्यासाठी लेखन आणि प्रयोगनिर्मिती त्या करतात. याव्यतिरिक्त झुनझुनवाला महाविद्यालयात त्या ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ म्हणून वर्ग घेतात.

  अ‍ॅस्ट्रोसॅटसाठी विद्यार्थिदशेत असल्यापासूनच सलग तीन संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळालेल्या डॉ. विनिता यांनी सात शोधनिबंध प्रकाशित केले असून एक शोधप्रबंध प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’त मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या त्यांच्या संघाचं संशोधनकार्य उलगडून सांगणारा ‘इंडियन स्पेस ड्रीम’ हा माहितीपट ‘बीबीसी’नं बनवला होता. २०१२ मध्ये तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे झालेल्या तिसऱ्या ‘अझारक्वेल स्कूल ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी’मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. याव्यतिरिक्त इतर अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

विज्ञान आणि संशोधनाचं आपल्या आयुष्यातलं स्थान अधोरेखित करताना आपण या क्षेत्राकडून काय शिकलो, हे त्या भरभरून सांगतात. त्यांच्या मते विज्ञान आणि संशोधन ही क्षेत्रं आपल्याला संयम शिकवतात. एखादी गोष्ट करत असताना पूर्ण तयारीनं, कशासाठीही कुणावरही विसंबून न राहता काम करण्याचं धाडस देतात. विषय कोणताही असो, त्याच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची स्फूर्ती देतात. या सगळय़ाबरोबरच अनोळखी माणसांशी सहज गप्पा करण्याचा विश्वास देतात. आपल्या परिघाबाहेरील जगात विहार करण्यासाठीचं स्वातंत्र्य आणि हिंमत देतात. संशोधनानं त्यांना दिलेली आणखी एक भेट म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक देशात असणारे मित्र. जगात अस्तित्वात असणारे वेगवेगळे विचार, मतप्रवाह आणि याचा स्वीकार करण्याची वृत्ती.

हे क्षेत्र माणूस म्हणून विज्ञानाविषयीच्या ज्ञानापलीकडे व्यक्तिमत्त्वाला आकार देतं. डॉ. विनिता यांनी हा अनुभव घेतला. विज्ञानाच्या जोडीनं कलेचं महत्त्वही त्यांनी जाणलं आणि त्यामुळे दिवसाला थोडा वेळ का होईना, पण त्या कलेच्या सान्निध्यात घालवतात. कला माणसाला केवळ आनंद देत नाही, तर विचारांना मुक्त करते, प्रवाही करते, असा त्यांना विश्वास आहे. संशोधनाकडे कलेच्या नजरेतून पाहणाऱ्या, त्या दोहोंमध्ये साम्य सापडलेल्या आणि पुस्तकं व प्रयोगशाळेपलीकडच्या प्रयोगांना प्रोत्साहन देणाऱ्या, जनमानसात ते रुजवू पाहणाऱ्या, तरुण वयात बरंच संशोधन कार्य केलेल्या आणि आता प्रयोगशाळेबाहेरील एक वेगळी वाट धुंडाळू पाहणाऱ्या डॉ. विनिता ‘संशोधन’ या शब्दाची आपल्याला नव्यानं ओळख करून देताहेत.  हे सारेच संशोधक माझ्यासहित तुमच्यासमोर  विज्ञानाचा इतक्या वेगवेगळय़ा पद्धतीनं करत असलेला उलगडा समृद्ध करणारा आहे.

postcardsfromruchira@gmail.com