scorecardresearch

दातृत्वाच्या समाधानाचा ढेकर?

शिक्षण सर्वासाठी

(संग्रहित छायाचित्र)

रजनी परांजपे

दुसऱ्याला मदत करणे केव्हाही चांगलेच, पण ते दान सत्पात्री असावे. ते दान आपली गरज म्हणून दिलेले नसावे.  मागणे ही ‘यांची’ गरज असते की देणे आपली गरज असते ही एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. वाया जाणाऱ्या अन्नाच्या वेळी ‘गरजू’ वस्तीत जाऊन एकदा त्या अन्नाची सोय लावली की हायसे वाटते. आपली गरजवंताची भूमिका आपण तत्क्षणीच विसरतो आणि दातृत्वाच्या समाधानाचा ढेकरही देतो. पण या सर्वाचा परिणाम एकच होतो. देणारे देतात, म्हणूनच मागणारे मागतात.

त्या वेळेस आम्ही आमच्या कामाची नुकतीच सुरुवात केली होती. आमच्या ऑफिससमोर एक बॅण्ड स्टँड होता. तेथे रोज सकाळी बरीच मुले गोळा होत. या मुलांना शिकवण्यासाठी आम्ही तेथे वर्ग घेत असू. त्याचवेळी या मुलांना केळी, पाव वगरे वाटायला काही मंडळी येत. आमचं शिकवणं सोडून त्या लोकांभोवती मुलांची होणारी गर्दी, आपल्याला दुसऱ्यापेक्षा जास्त मिळावे म्हणून चाललेली धडपड, डोळ्यातली लाचारीची भावना ही अतिशय जवळून बघायला मिळाली. तशी ही मुले मूळ भीक मागणाऱ्यातली नव्हती. त्यांचे आईवडील त्यांना भीक मागायला पाठवत नव्हते. पण फुकट मिळणारे घेऊ नये, असे सांगतही नव्हते. या मुलांना एक प्रकारे भीक मागण्याचे, फुकटात मिळणाऱ्या वस्तूंमागे धावण्याचे प्रशिक्षणच मिळत होते.

हा झाला सुरुवातीचा अनुभव. पण असाच अनुभव वारंवार येतो. लोकांना मोफत वस्तू वाटण्याची आपल्याला फार हौस. पुण्याच्या ससून कोर्टासमोर एक वस्ती होती. आता रस्ता रुंदीकरणामध्ये ती वस्ती उठवली. पण त्यापूर्वी आम्ही या वस्तीत बरीच वर्षे काम केले, तेव्हा बघितलेली गोष्ट. एक गाडी येऊन या वस्तीतील लोकांना बऱ्यापैकी नियमितपणे जेवण आणि लहान मुलांसाठी दुधाच्या पिशव्यांचे वाटप करीत असे. मागून आणून खायचे नाही तर असे कोणी आणून देईल ते खायचे ही यांची सवय. दुधाच्या पिशव्या मुलांसाठी असत, पण दूध मुलांपर्यंत पोहचणे कठीण. ते रस्त्यावरच्या चहावाल्याला विकायचे आणि त्या पशांनी दारू प्यायची असा शिरस्ता.

इथल्या मुलांना आम्ही शाळेत घातले. त्या वेळेस शाळेत जेवण मिळत नसे, इतर मुले डबा घेऊन येत. या वस्तीतील मुलांजवळ डबा नसे, कारण घरात रोज काही शिजलेलेच नसे. मधल्या सुट्टीत मुले बिचारी इतर मुलांची तोंडे बघत उपाशीच बसत. हे लक्षात आल्यावर आम्ही त्यांना जवळच्या झुणका-भाकर केंद्रात नेऊन जेवायला घालत असू. आता झुणका-भाकर केंद्रे कुठे दिसत नाहीत आणि शाळेतही माध्यान्ह भोजन मिळते. मात्र रोजच्या रोज ज्यांच्या घरी चूल पेटत नाही, फक्त कारणाकारणानेच स्वयंपाक बनतो अशी कुटुंबे आजही आहेत. हे शहरात जास्त चालते. खेडय़ात असे चालत नाही, कारण देणाऱ्यांची संख्या कमी.

काही स्वयंसेवी संस्थादेखील अशा देण्या-घेण्याच्या संस्कृतीचा कळत नकळत प्रसार करतात. एका खासगी संस्थेने चालवलेल्या वसतिगृहातील मुलांना लिहिणे, वाचणे शिकवण्यासाठी आम्ही जातो. म्हणजे ही मुले शाळेत जात नाहीत असे नाही. पण शाळेत गेली म्हणजे लिहायला, वाचायला शिकली असे नसते. किती तरी सरकारी शाळांतून मुलांच्या शिक्षणाचा दर्जा फार खालचा असतो. जवळजवळ तीस एक टक्के मुले पहिलीतून दुसरीत जाताना पूर्ण मुळाक्षरेही शिकलेली नसतात. कारण घरात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणारे कोणी नाही, शिकवणारे कोणी नाही. जवळ बसवून शिकवणे दूरच, पण रोजच्या रोज मुले शाळेत गेली हे बघणारेही कोणी नाही. म्हणजे घरात आईवडील नसतात असे नाही. पण ते अशिक्षित किंवा अर्धशिक्षित, मोलमजुरी करणारे आणि रोजच्या रोज कामाच्या विवंचनेत असणारे, कामाला जाण्यासाठी लवकर घर सोडणारे- म्हणजे मुलांना शाळेत पाठवेपर्यंत घरात असतीलच असे नाही. त्यातून मुले जर दुपारच्या शाळेत जात असतील तर आनंदीआनंदच. घरात मोठे कोणी नाही, मुलांना शाळेत जा म्हणणारे, तयार करणारे, त्यांना बूट-मोजे चढवून, त्यांचे दप्तर भरून देऊन, त्यांचे बोट धरून त्यांना शाळेत पोहचवणारे किंवा त्यांना रिक्षा, बसमध्ये बसवून टाऽऽटा करणारे कोणी नाही.

तसं तर सरकारी शाळाही खूप ‘समजूतदार’! मुलांनी रोजच्या रोज शाळेत आले पाहिजे अशी सक्ती तर नाहीच, पण अपेक्षाही नाही. अपेक्षा आहे ८० टक्के दिवस हजर असण्याची. पण शंभरातली ५० मुलेदेखील ८० टक्के दिवस हजर नसतात ही बऱ्याच शाळांची वस्तुस्थिती. शिवाय एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी परीक्षा नाही. एकदा मुलाला शाळेत घातले की ते वर्षांवर्षांला पुढील इयत्तेत जाणारच हे ठरलेले. एवढेच नाही कधीही शाळेत न गेलेले मूलही जेव्हा पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेईल तेव्हा त्याला त्याच्या वयानुसार असेल त्याच इयत्तेत बसवणार. म्हणजे मूल ६ वर्षांचे असेल तर पहिलीत, आठ वर्षांचे असेल एकदम तिसरीत आणि दहा वर्षांचे असेल तर एकदम पाचवीत प्रवेश मिळणार. एकदा त्याने शाळेत प्रवेश घेतला की सहा महिन्यात त्याच्या शिक्षकांनी त्याला शाळेच्या वेळाव्यतिरिक्त शिकवून त्या त्या इयत्तेच्या पातळीवर आणून सोडायचे अशी अपेक्षा. कायदाच आहे तसा!

तर सांगायची गोष्ट अशी की अशा निरनिराळ्या कारणांनी मुले अभ्यासात मागे राहतात. त्यांची इयत्ता आणि त्यांची क्षमता यांचा मेळ बसत नाही. मघाशी उल्लेख केलेल्या खासगी संस्थेतील मुलांना आम्ही शिकवायला जाण्याचे हेच कारण.

स्वयंसेवी संस्था म्हटली की ती अर्थातच लोकांच्या अनुदानावर चालते. गावातील प्रतिष्ठित मंडळींना मुलांविषयी कणव वाटते. प्रत्येक जण आपापल्या परीने मुलांना मदत करतात. कोणाला आपल्या मुलाचा वाढदिवस संस्थेत साजरा करावासा वाटतो तर कोणी आपल्या आईवडिलांचा स्मृतिदिन मुलांबरोबर साजरा करतात, त्यांना जेवण देतात, मिठाई वाटतात, कपडे देतात. एकूणच संस्थेत खाण्यापिण्याची आबाळ नसते. या सर्व कार्यक्रमात शिकवण्याचे वेळापत्रक बिघडते. आज हे तर उद्या ते. यामध्ये वर्गाचा वेळ जातो. नियमित वर्ग भरत नाही, नियोजनानुसार अभ्यास पुढे जात नाही, मुलांचे लक्ष विचलित होते, अभ्यासाचे वातावरण राहत नाही. हे तर दृश्य परिणाम. पण त्याहूनही गंभीर परंतु सहज लक्षात न येणारे, न दिसणारे, दूरगामी परिणाम मुलांच्या मनावर होतात. त्यांच्या मनातली आत्मसन्मानाची भावना फुलत जाण्याऐवजी मालवत जाते. हळूहळू सर्वानी आपल्यावर दयाच केली पाहिजे, आपला तो हक्कच आहे असे वाटू लागते.

दुसऱ्याला मदत करणे केव्हाही चांगलेच, पण ते दान सत्पात्री असावे. ते दान आपली गरज म्हणून दिलेले नसावे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना दिलेली भीक ही त्यांच्या तोटय़ाचीच ठरते. कारण त्यामुळेच त्यांचे आईवडील त्यांना भीक मागायला पाठवतात. आमचे काही वर्ग अशा वस्त्यांत लागतात. ठरावीक वेळ झाली की आईवडील मुलांना वर्गातून बोलावून नेतात आणि ‘आता मागायला जा’, असे सांगतात. कुठे मागायला जायचे, कुठल्या वस्तीत आणि कुठल्या वेळेला जायचे हे ठरलेले असते.

मागणे ही यांची गरज असते की देणे आपली गरज असते ही एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. अन्नाच्या बाबतीत तर पुष्कळदा जास्त झालेले अन्नपदार्थ टाकवतही नाहीत आणि ठेववतही नाहीत अशी वेळ येते. आणि मग आपल्याला अशा मागणाऱ्यांच्या वस्त्यांची आठवण येते. अशा वस्तीत जाऊन एकदा त्या अन्नाची सोय लावली की हायसे वाटते. आपली गरजवंताची भूमिका आपण तत्क्षणीच विसरतो आणि दातृत्वाच्या समाधानाचा ढेकरही देतो. आपण सिग्नलजवळ किंवा देवळासमोर किंवा तत्सम जागांवर बसलेल्या मागणाऱ्यांच्या झोळीत चार पैसे टाकतो ते कधी कीव आल्यामुळे तर कधी कटकट नको म्हणून. पण या सर्वाचा परिणाम एकच होतो. देणारे देतात, म्हणूनच मागणारे मागतात. कधीही, कुठेही, कोणत्याही कारणाशिवाय, स्वत:च्या समाधानासाठी किंवा कटकट नको म्हणून देण्याने आपले दान सत्पात्री लागत नाही एवढे नक्की.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shikshan sarvansathi article about rajni paranjape

ताज्या बातम्या