मुलांच्या गोष्टी जर मी लिहून काढल्या आणि त्याच त्यांना वाचायला दिल्या तर ती त्या गोष्टी नक्कीच न कंटाळता वाचतील. आता हे कसं बरं साधायचं, असा विचार करताना एकदम माधुरी पुरंदरेंच्या ‘राधाचं घर’ मधलं एक पुस्तक माझ्या हातात आलं आणि मळभ दूर होऊन एकदम लख्ख प्रकाश पडावा तसं झालं..
शिशुगटातील मुलांचं वाचन कौशल्य विकसित करणं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि विचारपूर्वक काम करण्याचा विषय आहे. वाचन कौशल्य विकसित करण्याआधी त्यांची वाचनपूर्व कौशल्य विकसित करावी लागतात. त्याची एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. ती लहान शिशूपासून सुरू होते. हा मोठा प्रवास आहे आणि हा प्रवास मुलांबरोबर अनुभवणं, त्या प्रवासात त्यांच्या सोबत असणं यासारखं भाग्य नाही. आपण मुलाचे दोन्ही हात धरून त्याला चालायला शिकवत असतो, धरून उभं राहायला शिकवत असतो आणि एक दिवस अचानक ते सुट्टं उभं राहातं, पहिलं पाऊल टाकतं हे पाहताना कृतार्थ वाटतं, मन आनंदाने भरून जातं, तसाच आनंद वाचनाच्या वाटेवर मुलांना घेऊन जाताना, त्यांना चालताना पाहून होतो. आमच्या शाळेत या वाटेवरचा त्यांचा प्रवास दोन सारखी चित्रं ओळखीपासून सुरू होऊन लहान शिशूमध्ये अक्षरओळख, कानामात्राविरहित सोप्या शब्द वाचनापर्यंत थांबतो तर तोच पुढे मोठय़ा शिशूमध्ये लहान लहान गोष्टी वाचनापर्यंत जातो.
माझं ते वर्ष मोठय़ा शिशूचं होतं. मुलांच्या गोष्ट वाचनासाठी मोठी मोठी चित्रं असलेली आणि मोठ्ठय़ा अक्षरातील अनेक पुस्तकं शाळेत होतीच. सुरुवातीला मुलं ती पुस्तकं मनसोक्त हाताळतात. पण थोडय़ाच दिवसांत त्यांची उत्सुकता संपून जाते. पुस्तकांचा ट्रे आणला आणि पुस्तकं वाटायला सुरुवात केली की शेवटच्या मुलाने पुस्तक घेईपर्यंत, पहिलं मूल, ‘बाई झालं’, ‘बाई झालं’ असं ओरडायला लागलेलं असतं. म्हणजे आव्हान दोन पातळ्यांवर होतं, वाचता येणं आणि वाचनाची उत्सुकता टिकून राहणं. त्यासाठी असं काही त्यांच्या समोर ठेवावंसं वाटलं की जे त्यांना सहज वाचता येईल आणि न कंटाळता पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटेल.
मनात आलं, आपलं स्वत:चंच लिखाण असेल तर ते पुन:पुन्हा वाचावंसं वाटेल आणि वाचताना कंटाळाही येणार नाही किंवा आपल्याविषयी जर कोणी छान छान लिहिलेलं असेल तर ते वाचताना कंटाळा तर येणार नाहीच, उलट प्रत्येक वेळी मजाच येईल. या मुलांच्या गोष्टी जर मी लिहून काढल्या आणि त्याच त्यांना वाचायला दिल्या तर ती त्या गोष्टी नक्कीच न कंटाळता वाचतील. आता हे कसं बरं साधायचं, डोक्यात विचारचक्र फिरू लागलं. ‘‘तुम्ही मला तुमची गोष्ट सांगा, मी ती लिहून काढीन, त्याचं तुम्ही चित्रही काढा, मग मी ती गोष्ट तुम्हाला वाचायला देईन,’’ असं काही बोजड सांगून उपयोगाचं नव्हतं. कारण त्यामुळे ‘तुम करना क्या चाहते हो और तुम कर क्या रहे हो,’ एवढेच भाव माझ्या दोस्तांच्या चेहऱ्यावर उमटले असते. मुलांना सहज उमगेल असं काही सांगणं आवश्यक होतं. पुस्तकांच्या ट्रेमधली चळत नुस्तीच वरखाली करत, मी विचार करत होते, यांना कसं बरं समजवायचं की त्यांनी स्वत:ची गोष्ट सांगायची आणि मी ती लिहून काढायची असा उद्योग आपल्याला करायचा आहे! तर एकदम माधुरी पुरंदरेंच्या ‘राधाचं घर’मधलं एक पुस्तक माझ्या हातात आलं आणि मळभ दूर होऊन एकदम लख्ख प्रकाश पडावा तसं झालं. त्या क्षणी त्या योगायोगाचं मला स्वत:लाच आश्चर्य वाटलं. मी एकदम उत्साहाने ते पुस्तक हातात घेऊन मुलांना म्हटलं, ‘ही गोष्ट माहीत आहे नं तुम्हाला?’ त्या गोष्टींचं वर्गात पारायण झालेलं असल्याने मुलांना त्या गोष्टी तोंडपाठ होत्या. सगळ्यांनी एकच कालवा करून, ‘‘बाई ती नानांची गोष्ट आहे’’, अशी माझ्या ज्ञानात भर टाकली. मी म्हटलं कोणाचे नाना. एकमुखाने उत्तर आलं, ‘‘राधाचे’’. अशा प्रकारे राधाचे बाबा, राधाची आई, राधाच्या घरातल्या सगळ्यांबद्दलच्या पुस्तकांविषयी बोलून झालं. मग म्हटलं, ‘‘राधाने कशा तिच्या घरातल्या सगळ्यांबद्दल आपल्याला गोष्टी सांगितल्या आहेत तशाच गोष्टी आपण आपल्या सांगू या का? या जशा राधाच्या गोष्टी आहेत तशा आपण पण लिहू या का आपल्या गोष्टी? म्हणजे लक्षची गोष्ट, रियाची गोष्ट, ऋजुताची गोष्ट. राधा कसं तिच्या घरात कोण कोण आहे, ते काय काय करतात सगळं आपल्याला सांगते तसं तुम्ही पण मला सांगा तुमच्या घरात कोण कोण आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त घरातलं कोण आवडतं. ते तुमच्यासाठी काय करतात. मी ते सगळं लिहीन आणि मग राधाच्या घराच्या या गोष्टींसारखी आपल्या प्रत्येकाची गोष्ट तयार होईल आणि त्या गोष्टी आपण रोज वाचू या.’’
राधाच्या गोष्टींसारखी आपली पण गोष्ट तयार करायची ही कल्पना सगळ्यांना कळली हे त्यांच्या डोळ्यातून दिसलं. या वयोगटातले डोळे आपल्याला आपल्या कामाची पावती लगेच देतात. आपलं म्हणणं त्यांना नाही समजलं किंवा आपलं काम कंटाळवाणं वाटलं तर चक्क ते आपल्यासाठी बंद होऊन जातात. मग त्याच्यापलीकडे आपण पोहचूच शकत नाही आणि आपल्याला आपली वाट बदलावी लागते. पण जर आपलं म्हणणं त्यांना आवडलं आणि समजलं तर त्याच डोळ्यात उत्सुकता आणि अंगात उत्साह ओतप्रोत भरलेला जाणवतो आणि आपल्याबरोबर वाट चालायला ही मंडळी उडय़ा मारत येतात. तीच उत्सुकता मला त्यांच्या डोळ्यात जाणवली.
आपली गोष्ट बाईंना सांगायची म्हटल्यावर, मी मी सुरू होण्यापूर्वीच म्हटलं, आपल्या वर्गातल्या नंबराप्रमाणे रोज फक्त दोघांचीच गोष्ट लिहिणार आहे. गोष्ट कुणाबद्दल लिहायची याचा आजच विचार करून ठेवा. ज्याच्याबद्दल लिहायची त्याचं चित्रही तुम्हालाच काढायचं आहे. राधाच्या गोष्टीत नाही का सगळ्यांची चित्र आहेत. दुसरा दिवस उजाडला तो माझीही उत्सुकता ताणलेली होतीच. खरंच का ही मंडळी आपल्याला गोष्टी लिहायला साथ देतील? त्यांची चित्रं ते काढू शकतील? कोणाबद्दल सांगायचंय ते खरंच ते ठरवू शकतील? किती तरी प्रश्न मला स्वत:लाच पडले होते. पण या सगळ्यांची उत्तरं वर्गात नक्की मिळणार होती. माझी तयारी म्हणून माझ्याजवळ चाळीस एक बाजू कोरे असलेले कागदाचे आयताकृती तुकडे घेतले (आम्ही कधीच आमच्यासाठी नवीन कोरे कागद वापरत नाही. एक बाजू कोरे असलेले माध्यमिकच्या ताईदादांचे चित्रकलेचे कागद आमच्या चित्रांसाठी येतात.). प्रत्येक कागदावर एका कोपऱ्यात एक छोटा चौकोन मुलांना चित्र काढण्यासाठी आखला. उरलेल्या जागेत त्यांनी सांगितलेला मजकूर लिहायचा ठरवलं.
माझे कागद घेऊन मी त्यांच्यात बसले आणि ते दाखवून म्हटलं, ‘‘या कागदावर आपण गोष्टी लिहिणार आहोत. चला, गोष्ट सांगणार आहात नं मला.’’
‘‘बाई, मी आजीची गोष्ट सांगणार आहे.’’ एक अगदी गंभीर उत्तर आलं, मला हायसं वाटलं की चला लक्षात आहे. तेवढय़ात गाडी घसरली, ‘‘बाई, मी माकडाची गोष्ट सांगू’’, ‘‘बाई, मी पोपटाची सांगू.’’
‘‘अरे, अरे विसरलात का, राधाच्या घराच्या गोष्टींप्रमाणे तुमची गोष्ट सांगणार आहात नं मला. तुमचीच गोष्ट मी लिहिणार आहे. तुम्ही जर माकड किंवा पोपट असाल तर सांगा माकडाची आणि पोपटाची गोष्ट.’’ माझ्या या विनोदावर माकड, पोपटवाल्याला आणि इतरांना अगदी छान हसू आलं आणि आपल्याला आपलीच गोष्ट सांगायची आहे हेही त्यांना जाणवलं.
गोष्टीसाठी तयार केलेले कागद परत दाखवून म्हटलं राधाने कसं तिच्या गोष्टीमध्ये तिचं आणि त्या गोष्टीत असणाऱ्या सगळ्यांची चित्रं काढली आहेत तशी तुम्हालाही चित्र काढायची आहेत. त्यासाठी हा चौकोन ठेवलाय त्याच्यामध्ये आज सगळ्यांनी स्वत:चं आणि तुमच्या गोष्टीत अजून कोणी असेल तर त्याचं चित्र काढा. सिद्धार्थनं स्वत:चं चित्र काढलं आणि त्याच्या शेजारी एका उंच मुलाचं चित्र म्हणजे त्याच्या दादाचं चित्र काढलं. लक्षने त्याच्याबरोबर लहान भावाचं चित्र काढलं, प्रणवने त्याच्या अगदी नुकत्याच जन्मलेल्या नवीन बहिणीचं चित्र काढलं. मंदारनं स्वत:बरोबर कुत्र्याचं चित्र काढलं. अशी स्वत:बरोबरची अनेक वेगवेगळी पात्र गोष्टींसाठी जमा झाली. प्रत्येकाचं चित्र वेगळं अर्थातच त्यामुळे प्रत्येकाची गोष्ट वेगळी होणार याबद्दल माझी खात्री पटली. तो दिवस आमचा चित्र काढण्यात गेला.
वर्गात एकूण चाळीस मुलं आणि मी एक, असे आम्ही अलिबाबा आणि चाळीस जणं मिळून गोष्टींचा खजिना लुटायला तयार झालो. रोज त्यातले दोन कागद घेऊन दोघांची गोष्ट मी लिहीत असे. स्वत:बद्दलची काही वाक्य, चित्रात त्यांच्याबरोबर ज्याचं चित्र काढलं आहे त्याच्याबद्दल काही, असा लेखनप्रपंच चालला होता. चाळीस जणांच्या गोष्टी पूर्ण व्हायला शाळेचे वीस दिवस गेले. रोजच्या गोष्टी पूर्ण झाल्या की त्या वर्गात वाचायच्या आणि मग बोर्डवर लावायच्या असा आमचा शिरस्ता सुरू झाला. त्यांची गोष्ट त्यांच्या चित्रासहित वर्गातल्या बोर्डवर लावलेली असल्यामुळे रोज आल्याबरोबर, मधल्या सुट्टीत, जाता येता मुलं गोष्टी वाचायला लागली. आपली नसेल तेव्हा मित्र-मैत्रिणीची गोष्ट असायची. गोष्टीतली वाक्यं त्यांच्या स्वत:च्याच तोंडची असल्याने ती वाचायला एक-दोनदा मदत लागली पण नंतर मात्र त्यांची त्यांना छान वाचता यायला लागलं. बोर्डवर एका वेळी दहा गोष्टी असायच्या कारण एक तर तेवढय़ाच त्यांच्या नजरेच्या टप्प्यात यायच्या आणि दर आठवडय़ाला बदल केल्यामुळे त्यातलं नावीन्यही टिकलं.
सर्व चाळीसच्या चाळी गोष्टी लिहून झाल्यावर आणि आलटून पालटून बऱ्याच वेळा बोर्डवर लावून झाल्यावर, सगळ्या गोष्टी काढल्या आणि एका ट्रेमध्ये ठेवल्या. आता हा झाला आमच्या स्वत:च्या गोष्टींचा वर्गाचा वाचन ट्रे. मग रोज वीस मिनिटं या ट्रेचा उपयोग करायचा ठरवलं. एकदा पाटीवर लेखन आणि इतर अभ्यास झाला की मी ट्रे घेऊन बसायचे. सुरुवातीला प्रत्येकाला त्यांचीच गोष्ट वाचायला दिली. प्रत्येकानं उभं राहून मोठय़ानं स्वत:ची गोष्ट वाचायची असं ठरलं. खूप वेळा बोर्डवर वाचलेली असल्यानं साइट रीडिंगने आणि स्वत:ची वाक्य लक्षात असल्याने बहुतेक जणांना वाचन जमत होतं. एकदा आपापल्या गोष्टींचे वाचन झाल्यावर पुढच्या आठवडय़ात त्यांना म्हटलं, ‘‘आता आपल्या ज्या मित्राची गोष्ट वाचायची आहे. त्याच्याकडून ती मागून घ्या आणि ती वाचून दाखवा.’’ सगळ्यांच्याच गोष्टी खूप वेळा कानावरून गेल्यामुळे आपल्या मित्राचीही गोष्ट बऱ्यापैकी वाचायला जमली. अगदी निवड करून आपल्या मित्राची गोष्ट मुलं वाचत होती. तसंच आपल्या मित्रमैत्रिणीला आवर्जून आपली गोष्ट वाचायला देत होती. म्हणजे, ‘‘सिद्धेश आज तू माझी गोष्ट वाच हं’’ किंवा ‘‘अनन्या आज मी तुझी गोष्ट वाचणार आहे हं’’, अशा चर्चा गोष्टीचा ट्रे काढला की सुरू होत होत्या. जवळ जवळ अडीच महिने या गोष्टी वाचण्यात कसे गेले ते कळलं नाही. जानेवारीच्या मध्यात कधी तरी सुरू केलेले गोष्ट लेखन आणि वाचन मार्चपर्यंत आम्हाला पुरलं. शाळा संपण्याच्या वेळी मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात सगळ्यांना त्यांच्या गोष्टी घरी घेऊन जाण्यासाठी दिल्या आणि सगळे जण आपापल्या गोष्टी घेऊन वाचनाच्या पुढच्या टप्प्याकडे निघाले.
मी दूरवरून पाहात होते, ती मुले एका लांब पल्ल्याच्या, समृद्ध करणाऱ्या प्रवासाला निघाली होती.
ratibhosekar@ymail.com