कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे या पाच दारांतून जितक्या म्हणून गोष्टी ग्रहण करता येतील तितक्या गोष्टी मूल आपलं आपण ग्रहण करत असतं. परंतु कोणतंही एक इंद्रिय नसेल तर त्याद्वारे होणाऱ्या आकलनाची जबाबदारी उरलेल्या इंद्रियांवर येते आणि ती ते समर्थपणे पार पाडतातही याचा अनुभव मात्र आपल्याला सहज येत नाही, पण ते अनुभवणं, जाणून घेणं ही आमच्या शाळेत केलेल्या ज्ञानेंद्रिय जत्रा या उपक्रमामुळे लहानांबरोबर मोठय़ांनाही पर्वणीच ठरली. 

नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा; आपली पाच ज्ञानेंद्रिय. बाहेरच्या जगाशी आपल्याला जोडणारी, आपल्या जाणिवा समृद्ध करणारी. जन्मत:च मूल आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करत असतं. ऐकणं, स्पर्शाची जाणीव, दृष्टी, वास, चव या नैसर्गिक शक्ती पूर्ण विकसित झाल्या नसल्या तरी मुलं या क्रिया करत असतात. म्हणजेच त्यांची ज्ञानेंद्रिये पूर्ण विकसित झालेली नसली तरी त्यांचा वापर सुरू झालेला असतो. आपल्या आईचा स्पर्श, तिच्या दुधाचा वास मूल बरोबर ओळखतं. जसजसं ते मोठं होत जातं तसंतसं आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करत ते आजूबाजूच्या जगाविषयी जाणून घेत असतं. मायेचा स्पर्श, रागाचा स्पर्श त्याला बरोबर कळतो. आपल्या आईच्या डोळ्यातले भाव ते समजू शकतं. सगळ्या गोष्टी हाताळतं किंवा तोंडात घालत त्या वस्तूंच्या पोताविषयी किंवा त्याच्या चवींविषयी माहिती करून घेत असतं. डोळे इकडे तिकडे शोधक नजरेने सतत बघत असतात. कान सतत प्रत्येक आवाजाचा वेध घेत असतात. कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे या पाच दारांतून जितक्या म्हणून गोष्टी ग्रहण करता येतील तितक्या गोष्टी मूल आपलं आपण ग्रहण करत असतं. परंतु कोणतंही एक इंद्रिय नसेल तर त्याद्वारे होणाऱ्या आकलनाची जबाबदारी उरलेल्या इंद्रियावर येते आणि ती ते समर्थपणे पार पाडतातही याचा अनुभव मात्र आपल्याला सहज येत नाही. कारण प्रत्येक इंद्रियाचे काम काही वेगवेगळे अनुभवायचे असते असे आपल्या ध्यानातही येत नाही. प्रत्येक इंद्रियामार्फत आपल्याला काय कळू शकतं, कसं कळू शकतं याचाही आपण फारसा विचार करत नाही. पण ते अनुभवणं, जाणून घेणं ही आमच्या शाळेत केलेल्या ज्ञानेंद्रिय जत्रा या उपक्रमामुळे लहानांबरोबर मोठय़ांनाही पर्वणीच ठरली. त्या जत्रेमधला हा फेरफटका.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

पूर्व प्राथमिक वयोगटात ज्ञानेंद्रिय विकासावर विशेष भर दिला जातो. किंबहुना ज्ञानेंद्रिय विकास हा या वयोगटातील शिक्षणाचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येक बालशिक्षणतज्ज्ञांनी या वयोगटातील मुलांच्या ज्ञानेंद्रियविकासाचे महत्त्व विशद केलंच आहे. फ्रेड्रिक फ्रोबेल, फिजिशिअन खींल्ल Jean Itard and Edouard यांच्या विचारांचा पगडा असलेल्या मादाम माँटेसरी यांच्या बालशिक्षणपद्धतीत ज्ञानेंद्रिय विकासावर जाणीवपूर्वक विशेष भर दिलेला आहे. अर्थातच मुलांचा संज्ञानात्मक विकास (कॉगनिटिव्ह डेव्हलपमेंट) होण्यास अशा ज्ञानेंद्रिय विकासावर जाणीवपूर्वक भर देणे आवश्यक असते. या सगळ्याचा विचार करून या विभागात ज्ञानेंद्रिय विकासावर आधारित क्रियाकृती सगळीकडेच होत असतात.

आमच्या शाळेतही प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे ज्ञानेंद्रिय घेऊन आमचे त्यासाठीचे उपक्रम सुरू असायचे. त्याच दरम्यान माझ्या वाचनात एक बातमी आली, दिल्ली येथे ज्ञानेंद्रिय बाग आहे. पण नेमकं त्या बागेचं वर्णन काय होतं हे मात्र आता आठवत नाही. कल्पनाच खूप छान वाटली आणि शाळेत केलेल्या उपक्रमाचा उगम ती बातमी होती इतकीच आठवण शिल्लक राहिली आहे. आपल्या मुलांसाठी अशी ज्ञानेद्रियांची बाग फुलवावी, असं वाटू लागलं. पण जागेअभावी बाग फुलवणं शक्य नव्हतं. त्यामुळे ज्ञानेंद्रियांची जत्रा मात्र भरवावी असा विचार माझ्या मनात सुरू झाला. मग नेमकं काय स्वरूप द्यावं याचा विचार करताना वाटलं की त्या जत्रेत प्रत्येक ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण करण्याजोग्या जितक्या गोष्टी आहेत त्या तिथे मुलांना अनुभवायला ठेवल्या गेल्या पाहिजेत. तसंच ‘त्या गोष्टींचे ज्ञान त्या इंद्रियांमार्फत आपल्याला कसं होतं याचं काही प्रात्यक्षिक करता येऊ  शकेल का?’ असाही विचार आला. नेहमीप्रमाणे पालकसभा, पालक-शिक्षक चर्चा असं सगळं होऊन हां हां म्हणता सगळे वर्ग एकेका ज्ञानेंद्रियाचा अनुभव देण्यास सज्ज झाले. पाच ज्ञानेंद्रियांचे पाच वर्ग.

पहिल्या वर्गाच्या बाहेर मुलांची रांग केली होती. एक पालक आई मुलांना सांगत होती की तुम्ही सगळे आवाज (ध्वनिलहरी) आहात. तुम्ही आता कानाच्या आत जाणार आहात. वर्गाच्या दारावर एक मोठा कान लावला होता. मुलं त्यातून लहरींसारखी हात पसरून आत प्रवेश करून गेली तर आत झुळझुळीत ओढणीचा एक मार्ग तयार केला होता. त्यातून मुलं पुढे गेली आणि एका ओढणीच्या पडद्यावर आदळली. पडद्याच्या मागच्या बाजूला हातात हात घालून तीन हाडांची साखळी पालकांनी केली होती. मुलं पडद्यावर आदळल्याबरोबर हाडांमध्ये कंपने तयार झाल्यासारखी हाडांची साखळी केलेल्या पालकांनी एकमेकांच्या हातावर टाळी देऊन कंपनांचा आभास निर्माण केला. अर्धवर्तुळाकार नलिका आणि ध्वनिशंख दर्शविण्यासाठी ओढण्यांची चकली केली होती. मुलांना चकलीला हलवून मग पुढे जायचे असे सांगण्यात येत होते. त्यानंतर मेंदूची प्रतिकृती होती. तिथपर्यंत आवाजरूपी मुलं पोहोचली. कानात शिरलेला ध्वनी मेंदूपर्यंत कसा जातो आणि आपल्याला त्याचं आकलन कसं होतं याचं पालकांनी मुलांसाठी केलेलं प्रात्यक्षिक अचंबित करणारं होतं. त्याक्षणी मला वाटलं की लहान व मोठय़ा शिशूच्या वर्गासाठीच काय हे तर मेडिकलला गेलेल्या मुलांसाठी योग्य असं प्रात्यक्षिक आहे. कान या इंद्रियामार्फत आकलन होणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांचे अनुभव, इतक्याच मर्यादित विचारांपलीकडे कितीतरी वेगळं आणि सहज आकलन आणि माहिती मुलांना मिळाली होती. त्याच वेळी जाणवलं पालकांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला की मुलांचा किती फायदा होऊ  शकतो.

तिथे वेगवेगळे आवाजही अनुभवण्यासाठी ठेवले होते. स्वयंपाकघरात येणारे, देवघरातले, वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज, बागेतले आवाज, पाण्याचे वेगवेगळे आवाज, वाऱ्याचा, पावसाचा, वादळाचा, समुद्राचा, झाडांचे आवाज, प्राणी, पक्षी यांचे आवाज, जंगलाचा आवाज, शांततेचा आवाज अशा अनेक आवाजांचे अनुभव मुलांना दिले. काही प्रत्यक्ष तर काही अर्थातच तंत्रज्ञानाचा वापर करून हे अनुभव आम्ही पोहोचवू शकलो. तर मोठय़ा शिशूसाठी त्या आवाजांचा आपल्या मेंदूपर्यंतचा प्रवास, त्या इंद्रियाला हेडफोन्स, मोबाइल, डीजे वगैरे मुळे आताच्या काळात होणारी हानी, त्याचे परिणाम, ऐकू न येणं म्हणजे नेमकं काय, ते न आल्यामुळे काय होऊ  शकतं, कानांची घ्यावयाची काळजी, वेगवेगळ्या प्राण्यांना कशा प्रकारे ऐकू येतं, त्यांचे कान कसे असतात. या सगळ्याची माहिती चित्ररूपाने आणि प्रात्यक्षिकाने मांडली होती.

त्याच्या पुढच्या वर्गात मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आणि मग ती पालकांबरोबर वर्गात शिरली तर पायांना झाला वाळलेल्या पानांचा स्पर्श. पुढे गेल्यावर वाळूचा स्पर्श. तसंच पुढे गेल्यावर झाला लाल मातीचा मऊ मऊ  स्पर्श. मग झाला खडबडीत दगडाचा स्पर्श. मग चटईचा स्पर्श. त्याच्यापुढे सतरंजीचा स्पर्श. त्यापुढे गालिचाचा स्पर्श. चालण्याच्या वाटेवर अशा प्रकारे विविध स्पर्श पसरलेले. मग हातांना लागला एकदम गरम वाफेचा हलका चटका. त्यापाठोपाठ झाला गार गार पाण्याचा स्पर्श. मग वेगवेगळ्या प्रकारांच्या कापडाच्या स्पर्शाची जाणीव हाताला झाली. सिल्कपासून खरखरीत गोणपाटापर्यंत सगळे प्रकार मुलांना हाताळायला ठेवले होते. वेगवेगळ्या पदार्थाच्या स्पर्शामधे विविध डाळी, धान्य, विविध पिठं, खडे मीठ आणि बारीक मीठ, पिठीसाखर, साधी साखर, खडीसाखर, खोबरेल तेल, स्वयंपाकाची तेलं, तूप, साबणांचे स्पर्श. स्पर्श, स्पर्श आणि फक्त स्पर्श. सगळ्या वर्गभर स्पर्शाचे विविध अनुभव.

मुलांच्या डोळ्यावरची पट्टी तशीच ठेवून तिसऱ्या वर्गाच्या प्रवेशद्वाराशी स्वागत झाले ते अत्तर लावून. अत्तराचा सुवास घेत मुलं आत शिरली तर आतमध्ये विविध वासांचे वेगवेगळे कोपरे केले होते. एक कोपरा होता फुलांच्या वासांचा, एक कोपरा होता स्वयंपाकघरातील विविध वास – चहा, वेगवेगळे मसाले – वेलची, लवंग, दालचिनी वगैरे, एक कोपरा देवघरातील वास, एकीकडे औषधांचे वेगवेगळे वास, मग विविध प्रसाधनांचे वास, भाज्यांचे वास. फळांचे वास. सुवासांबरोबर दरुगधीसाठीही वर्गाच्या पलीकडे कचरा जमवला होता आणि तिथेही मुलांना फेरी मारून आणत होतो. उग्र वासासाठी कांदा, लसूण अशा वासांचे अनुभव दिले होते. या दोन्ही वर्गात मुद्दामच ज्या मुलांना शक्य होतं त्यांना डोळ्यांचा वापर न करता प्रवेश करायला सांगितलं होतं. वेगवेगळे आवाज, वास डोळे मिटूनसुद्धा कळू शकतात हा अनुभव मुलांना देण्याचा प्रयत्न केला होता.

त्या पुढच्या वर्गात होती चवींची जत्रा. त्या वर्गात सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जात होते. गोड, आंबट, तिखट, तुरट अशा चवींची नुसती रेलचेल होती. गोड कोपऱ्यात साध्या साखरेपासून सुरू करून निरनिराळ्या पक्वान्नांनी टेबल भरून गेलं होतं. मला आठवतं, एका हौशी आईने लहान लहान दोनशे रव्याचे लाडू केले होते. तिखटासाठीही अशाच गमतीजमती होत्या. छोटय़ा छोटय़ा दोनशे तिखट पुऱ्या करून आणल्या होत्या. खारट कोपराही स्वत:चे स्थान टिकवून होता. वर्गात मुलं शिरल्याबरोबर त्याचा होणारा आ वर्गातून बाहेर जाईपर्यंत वासलेलाच राहात होता. चवींच्या राज्यात मुलांनी खूपच मजा

लुटली होती.

डोळ्यांचा वर्ग मात्र आपला आपसूकच ‘आ’ होईल अशा रीतीने रंगांच्या विविध छटांनी फुललेला होता. प्रत्येक रंगाच्या इतक्या छटा ज्या केवळ डोळे असतील तरच आपण अनुभवू शकू याची जाणीव करून देणारा. तसेच वेगवेगळ्या सुंदर सुंदर देखाव्यातील, चित्रांमधील रंगसंगतींनी नटलेला. आपल्या डोळ्यांचं महत्त्व पटवून देणारा. बाकी सगळ्या गोष्टींचे आकलन आपण बाकीच्या ज्ञानेंद्रियांमार्फत करू शकतो, पण रंग समजणे, त्याच्या छटा समजणे, विविध चित्रांमधील रंगसंगतीचे आकलन, विविध चित्रांचे आकलन केवळ डोळे या एकाच ज्ञानेंद्रियामार्फत होते हे वर्गात आल्यावर प्रत्येकाला जाणवेल याची काळजी या वर्गात घेतली होती. त्याचबरोबर कानासारखीच या इंद्रियांचीही काळजी कशी घ्यायची, त्याला इजा कशामुळे होऊ  शकते, विविध प्राण्यांचे डोळे कसे असतात, ते कसे पाहू शकतात, कीटकांना डोळे असतात का या स्वरूपाचीही माहिती देण्याचा प्रयत्न केला होता.

जत्रेमध्ये जसे वेगवेगळे स्टॉल्स असतात. प्रत्येक ठिकाणच्या स्टॉलवर जाऊन आपण मौज मस्ती करत असतो. तसाच अनुभव ज्ञानेंद्रियांच्या जत्रेत येत होता. या जत्रेत लहानापासून थोरांपर्यंत सगळेच जण स्पर्शाची विविधता अनुभवत होती, कानाच्या वर्गात जाऊन वेगवेगळे आवाज करून बघत होती. डोळ्याच्या वर्गात जाऊन डोळे भरून रंगांची मजा लुटत होती. पुस्तकं वाचत होती. चित्रांमध्ये रंग भरत होती. या प्रत्येक क्रियेसाठी आपले डोळे आपण कसे वापरतो हे उमजून घेत होती. चवींमधे फेरफटका मारून तोबरा भरून बाहेर येत होता. कुठल्याही एका इंद्रियाचा वापर न करता आपल्याला बाकीच्या इंद्रियांच्या मदतीने ज्ञान होऊ  शकतं याचं आकलन करून घेत होती. ज्ञानेंद्रियांची ही जत्रा मुलांच्या ज्ञानेंद्रिय विकासास मोलाचा हातभार लावणारी ठरली एवढे मात्र निश्चित. खरं सांगायचं तर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर ज्ञानेंद्रिय जत्रा एकदाच शाळेत झाली, कारण दरवर्षी नवीन काहीतरी होत होतं. पण या वर्षी मात्र मादाम माँटेसरींच्या जन्मदिनानिमित्त शाळेत साजऱ्या होणाऱ्या जीवनव्यवहार दिनाला ज्ञानेंद्रिय जत्रा छोटय़ा प्रमाणात साजरी करून जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

रती भोसेकर

ratibhosekar@ymail.com