अनुबंध

सचिन आणि प्रतिमाच्या आयुष्याला निवृत्तीनंतर एक संथ लय आली होती.

‘‘स्वत:ची मुलं आणि नातवंडं यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक असतो. त्यामुळे आईवडिलांमध्ये ज्या कारणांवरून वादविवाद होत असतात त्याच गोष्टीवर आजी-आजोबा झाल्यावर संवाद निर्माण होतो. हे वरपांगी जरी विसंगत वाटलं तरी ते स्वाभाविक असतं. कारण मुलं वाढविताना जबाबदारीची जाणीव अधिक टोकदार असते. त्यात दोघांनी मिळून मुलांचं मूलपण अनुभवायचं कैक वेळा राहून गेलं असतं.’’ आजी आजोबांच्या ताणतणावांविषयीचा हा भाग १

सचिन दिवसभर कागदपत्रांचा पसारा मांडून बसला होता. पेन्शनच्या फाइलमधील हवा तो कागद न सापडल्यामुळे तो कावला होता. ‘‘मी येऊ का मदतीला?’’ असं प्रतिमानं दोनदा विचारल्यावर त्यानं हवेत हात उडवले होते. इतक्या वर्षांच्या सहवासामुळे याचा अर्थ ‘तुला काय कळतंय’ असाच होऊ  शकतो हे तिला माहीत होतं. ती कंटाळून स्वयंपाकघरात गेली. संध्याकाळचा स्वयंपाक करणं तिच्या जिवावर आलं. बाहेर जेवायला जायचा उत्साह अलीकडे राहिला नव्हता. ती नुसतीच बसून राहिली. इतक्यात फोन वाजला. ‘‘अज्जू, तू काय करतीय.’’ जितूचा आवाज ऐकून ती हरकली.

‘‘काही नाही राजा. तू काय करतो आहेस?’’

‘‘काहीच नाही. आईबाबांनी राजू अंकलकडे जायचं ठरवलंय. पण मला खूप कंटाळा येतो तिथं.’’

‘‘हो ना! मग येतो आहेस का आमच्याकडे?’’

‘‘मी बाबाला तसं म्हणलेलं, पण बाबा म्हणतो..’’

‘‘त्याला काय कळतंय. तू फोन दे बाबाला.’’

सचिन आतून आजी-नातवाचा संवाद ऐकत होता. तो लगबगीनं बाहेर येऊन म्हणाला, ‘‘जितूचा फोन ना? शशीला सांग, त्याला राहायला पाठव आणि ईशाला यायचं असेल तर तिलाही येऊ  दे. तो फोन दे इकडे. तू नीट सांगणार नाहीस मीच बोलतो.’’ असं म्हणत त्यानं प्रतिमाच्या हातचा फोन जवळजवळ हिसकावून घेतला. एरवी प्रतिमानं त्याची ही अरेरावी चालवून घेतली नसती. पण शशीला तो नीट पटवून देईल आणि त्यामुळे जितू आणि ईशा राहायला येतील याची तिला खात्री होती. ‘‘तासाभरात येताहेत दोघं. मला माझा पसारा आधी आवरायला हवा. पोरटी एक कागद जागेवर ठेवणार नाहीत.’’ सचिन विजयी मुद्रेनं म्हणाला. तशी लगबगीनं उठत प्रतिमा म्हणाली, ‘‘मीही केक करायला घेते. जितू गेल्या वेळीच मागे लागला होता.’’ मघाची चिडचिड आणि मरगळ एका क्षणात नाहीशी झाली असल्याचं दोघांना जाणवलं.

सचिन आणि प्रतिमाच्या आयुष्याला निवृत्तीनंतर एक संथ लय आली होती. दोघंच्या दोघंच राहात असल्यामुळे दिनक्रम ठरून गेला होता. रोज उठून एकमेकांसाठी नवीन काही करण्याचा उत्साह उरला नव्हता. अशा वेळी नातवंडं आली, भेटली की घरातलं निरस वातावरण एकदम बदलून जायचं. आपलं वय विसरून नातवंडांच्या मागे धावण्यात, कितीही कष्ट पडले तरी त्यांच्यासाठी म्हणून करण्यात एक सुखसमाधान दडलेलं असायचं. हाच अनुभव नीता आणि सुजयचा होता. नातवंडांना भेटायला दोघं उत्सुक असायचे. पण कधी कधी भेटल्यावर काय करायचं या विषयी मात्र दोघांच्यात एकमत व्हायचं नाही, उलट वादाला नवीन विषय मिळायचा पण शेवटी सगळं पेल्यातील वादळ ठरायचं ते असं.

नीता- आज आपल्याला रमाकडे जायचं आहे. महिना अखेरमुळे आदित्य आणि अंकितच्या शाळेला सुट्टी आहे. नेमकी तिची बाई येणार नाही आणि तिलाही सुट्टी घेणं शक्य होणार नाही.

सुजय- एवढंच ना! मग जाऊ या की दिवसभर तिच्याकडे.

नीता- पण आज चार ते सहा आमच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे.

सुजय- काही हरकत नाही. मी एकटा बघू शकतो मुलांकडे. पण काय गं, मुलांच्या परीक्षा वगैरे जवळ आलेल्या नाहीत ना?

नीता- आहेत ना. पुढच्याच आठवडय़ात आहेत. त्यांचा काय अभ्यास घ्यायचा ते रमानं सांगून ठेवलं आहे.

सुजय- बाप रे! हे अभ्यास वगैरे घेणं मला जमणार नाही. आपल्या मुलांचा घेतला तेवढा पुरे. ही पोरं तर इतकी वाभरट आहेत नं.

नीता- कमाल करतोस तू. तीस र्वष एम.बी.ए. कॉलेजमध्ये प्राध्यापकी केलीस आणि पाचवी नि नववीतल्या मुलांचा अभ्यास मॅनेज करता येत नाही. लोक तुला मॅनेजमेंट गुरू म्हणतात. त्या अजयचं माहीत आहे नं. तो रोज त्याच्या नातवाला गणित शिकवायचा. ऑलिम्पियाडमध्ये त्यानं सुवर्णपदक मिळवलं.

सुजय- उगाच मला दुसऱ्यांची उदाहरणं देऊन शहाणपणा शिकवू नकोस. मला अभ्यास घेणं जमणार नाही. आदित्य किती हुशार आहे ते माहितीय नं तुला.

नीता- तेच सांगायचं आहे मला. पण रमा त्याला गणितासाठी दोन क्लास लावणार आहे. आत्तापासून त्याची ऑलिम्पियाडची तयारी करण्यासाठी.

सुजय- काय वेड का खूळ हे. वय काय त्याचं. आधीच अभ्यासाच्या ओझ्याखाली वाकला आहे तो. त्याला अजून टेन्शन द्यायचं म्हणजे काय. भेटू दे रमा, तिला हे फॅड डोक्यातून काढायला सांगतो.

नीता- नुसतं सांगू नकोस. चांगलं खडसावून सांग. फक्त रमाला नाही तर तुझ्या जावयालाही. उगाच रागावतात पोरांना. तुला अंकितचा किस्सा सांगायचाच राहिला. गेल्या परीक्षेत त्याला म्हणे गणितात वीसपैकी सहा मार्क्‍स पडले. किती आजारी होता परीक्षेआधी. तर त्याचे सर म्हणे म्हणाले की तुझा भाऊ  नेहमी पुढून पहिला येतो; तर तू नापासात पहिला. इतकं भाबडं आहे पोरं. घरी येऊन सर काय म्हणाले ते संकेत आणि रमाला सांगितलं. तर रागावले रे त्याला.

सुजय- काय सांगतेस? या आजकालच्या आईवडिलांना मुलांची सायकॉलॉजी कळत नाही. अंकित चित्र किती छान काढतो ते लक्षात नाही येत यांच्या आणि गणितावरून रागवतात.

असं म्हणून मघाशी अभ्यास घेण्यावरून झालेला वाद विसरून लहान वयात त्यांना अभ्यासासाठी वेठीला धरणं कसं चुकीचं आहे यावर सुजय आणि नीताचं एकदम एकमत झालं. पण त्या वेळी त्यांच्या मुलांना त्यांनी किती क्लासेस लावले होते हे ते आपसूक विसरून गेले. दहावीच्या प्रीलिममध्ये त्यांच्या अमितला मिळालेले मार्क बघून दोघं हबकून गेले होते. त्यापायी त्याचं फुटबॉल खेळणं बंद केलं होतं. बारावीनंतर त्यानं इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यावा का आर्किटेक्टला यावर सुजय आणि नीतामध्ये कडाक्याचे वाद झाले होते. पण नातवाला क्लास लावणार म्हणल्यावर ते हळवे झाले होते. स्वत:ची मुलं आणि नातवंडं यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक असतो तो असा. त्यामुळे आईबाप असलेल्या पती-पत्नींमध्ये ज्या कारणांवरून वादविवाद होत असतात त्याच गोष्टीवर आजी-आजोबा झाल्यावर संवाद निर्माण होतो. हे वरपांगी जरी विसंगत वाटलं तरी ते स्वाभाविक असतं. कारण मुलं वाढविताना जबाबदारीची जाणीव अधिक टोकदार असते. आपल्याला त्यांना घडवायचं आहे, बिघडली तर बोट धरून वळणावर आणायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे हे नीटपणे उमगलेलं नसतं. या धावपळीत दोघांनी मिळून मुलांचं मूलपण अनुभवायाचं कैक वेळा राहून गेलं असतं. सुजय आणि नीताला त्यांच्या अमितनं ‘मी नापासात पहिला आलो,’ असं सांगितलं असतं तर त्याच्या सांगण्यातला निरागसपणा त्यांच्याहीपर्यंत पोचला नसता. तेही संकेत आणि रमासारखे धास्तावले असते. नातवंडाच्या बाबत मात्र यशापयशाची सारी कोष्टकं बदलतात. त्यांचं यश मिरवता येतं आणि अपयश झटकताही येतं. त्यांचा सहवास नेहमीच ‘फिल गुड’ची भावना देत राहतो. सहा वाजता नीता तिचा कार्यक्रम संपल्यावर घरी आली तेव्हा सुजय आदित्यशेजारी जमिनीवर बसून त्याला गणितातील प्रॉब्लेम्स सोडवायला मदत करत होता. हे अनुबंध काही वेगळेच असल्याचं तिला जाणवलं. त्या क्षणी तिला सुजयविषयी प्रेम दाटून आलं आणि अभिमानही. नातवंडांमुळे आजी-आजोबांचं परस्परांमधील नातं दृढ होतं ते असं.

हा अनुभव सगळ्या आजी-आजोबांना येत असेल? ज्यांना नातवंडांची जबाबदारी नाइलाज म्हणून दिवसभर उचलावी लागते, त्यापायी आपली हौसमौज बाजूला ठेवावी लागते त्या आजी-आजोबांचं परस्परांमधील नातं ताजंतवानं राहात असेल का जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जात असेल? परत ही जबाबदारी दोघांनी एकमतानं स्वीकारली असेल तर त्याचे परिणाम वेगळे आणि स्वीकारावी का नाही याबद्दल दोघांमध्ये मतभेद असतील तर त्याचे परिणाम वेगळे आणि नातवंडं परदेशात वाढत असेल तर अजूनच वेगळे. ज्या घरात तीन पिढय़ा एकत्र राहात असतात त्या घरात लहान मुलांचे लाड किती करावेत आणि शिस्त कशी लावावी याविषयी तरुण आईवडील आणि नववृद्ध आजी-आजोबा यांच्या मतांमध्ये अंतर पडणं अपरिहार्य असतं. त्यामुळे एकंदरच कुटुंबातील नातेसंबंधात ताणतणाव निर्माण झाले तर त्याचा परिणाम आजी-आजोबांच्यावर काय होत असेल? यावरची चर्चा पुढच्या भागात.

(क्रमश:)

मृणालिनी चितळे – chitale.mrinalini@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about grandparents stress

ताज्या बातम्या