सुनीता टेंबे
‘मी सुंदर आहे का?’ हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे, कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तिलाही ते पटायला लागलं होतं, आरसा सांगू लागला होता, ती सुंदर नाही. अखेर तिनं आईला विचारलं, ‘‘मी सुंदर आहे?’’ आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, ‘‘ पण तुला काय वाटतं, स्वरा…?’’
‘‘आई… मी खरंच इतकी वाईट दिसते का गं?’’ मी आरशासमोर उभी होते. खोलीतला पिवळसर प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडत होता आणि आरशातली प्रतिमा मला जरा जास्तच स्पष्ट दिसत होती. सावळा रंग, मोठे, पण कायम प्रश्न विचारणारे डोळे, नाकावरचा थोडासा उठाव, केस थोडे कुरळे, कधीही नीट न बसणारे. ओठांवर पसरलेलं गोंधळलेलं, अपराधी हास्य या गोष्टी बघून जणू मी स्वत:चीच माफी मागत होते. आरशातली ती मुलगी मला ओळखीची होती, पण आपलीशी वाटत नव्हती. ती मला प्रश्न विचारत होती, आणि माझ्याकडे त्याची उत्तरं नव्हती.
आई आरशाच्या मागे उभी होती. ती माझे केस विंचरत होती. त्याचा आवाज खोलीत मंद घुमत होता. माझा प्रश्न ऐकून तिच्या हाताची हालचाल थांबली. कंगवा हवेतच अडकला. काही क्षण ती गप्प राहिली. त्या शांततेत मला माझ्या श्वासाचाही आवाज ऐकू येत होता. जणू तोही थरथरत होता. तिचा स्वर शांत होता, पण त्या शांततेखाली दडलेली काळजी मला स्पष्ट जाणवत होती. ती म्हणाली, ‘‘स्वरा, तू असा काही प्रश्न विचारलास की माझ्या काळजात चर्र झालं. असं का वाटायला लागलं तुला? कुणी काही बोललं का?’’ मी नजर खाली घातली. बोलायचं नव्हतं. शब्द गळ्यात अडकले होते, पण न बोलता राहणंही अशक्य होतं. ‘‘शाळेत सगळे हसतात मला, आई. कुणी म्हणतं मी काळी आहे, कुणी बुटकी, कुणी गुटगुटीत. मागच्या आठवड्यात पल्लवीने सगळ्यांसमोर विचारलं, ‘‘तू हिरॉईन होणार आहेस का?’’ आणि मग मोठ्याने हसली. तसे सगळे हसले आणि निघून गेले आणि मी तिथेच उभी होते, अगदी एकटी.’’ आईच्या चेहऱ्यावर दु:ख आणि राग एकत्र उमटले. पण तिनं तो भाव आवरला. माझ्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, ‘‘आणि तुला काय वाटतं, स्वरा?’’
‘‘कधी कधी मलाही तसंच वाटतं. आरशात पाहिलं की दिसतं मी सुंदर नाही.’’
आई काही क्षण काहीच बोलली नाही. मग ती पुढे आली. तिने माझा हात धरला आणि मला घट्ट मिठीत घेतलं. त्या कुशीत मी पुन्हा लहान झाले. कित्येक वर्षं मागे गेले. जणू मी पुन्हा तीच छोटी मुलगी झाले, जिला रात्री वाईट स्वप्न पडलं की ती आईच्या पदरात तोंड लपवायची. त्या क्षणी मला पहिल्यांदा सुरक्षित वाटलं.
‘‘स्वरा,’’ ती हळूच म्हणाली,
‘‘तू कधी स्वत:ला विचारलं आहेस का, सुंदर म्हणजे काय?’’ मी डोळे पुसत नकारार्थी मान हलवली. ‘‘समाजाने एक चौकट आखून ठेवली आहे. गोरी त्वचा, उंच बांधा, सरळ नाक, रेशमी केस. जो या चौकटीत बसत नाही, तो सुंदर नाही, असं आपण नकळत ठरवतो. पण खरंच सौंदर्य एवढंच असतं का?’’ ती बोलत होती आणि मला वाटत होतं, तिचे शब्द माझ्या मनावर अलगद मलम लावत आहेत. ‘‘सौंदर्य शरीरात नसतं गं. ते डोळ्यांत असतं, दयाळूपणाच्या नजरेत. ते मनात, संवेदनशील विचारांमध्ये असतं. आणि ते वागण्यात असतं, जेव्हा तू कुणाच्या वेदनेशी उभी राहतेस, कुणाला न बोलता समजून घेतेस. त्या क्षणी तू सुंदर असतेस.’’ आईने मला तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. तिच्याबाबतीतही कशी तुलना केली जायची, कसं तिलाही स्वत:बद्दल शंका वाटायची. त्या गोष्टी ऐकताना मला जाणवलं, ही वेदना फक्त माझी नव्हती.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. सगळं काही तसंच होतं. वर्गात बसले असताना कुजबुजणारे शब्द, खिदळणारे हसू, टोमणे ते सगळं थांबत नव्हतं. सुट्टीत आरशासमोर मिळालेलं धैर्य इथे पुन्हा कमी पडत होतं. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात आईचे शब्द रुजत होते. वक्तृत्व स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा नेहमीचीच नावं पुढे आली, समृद्धी, पल्लवी, आदित्य. मी गप्प होते. वहीत नखं रुतवत बसले होते. मराठीच्या बाईंनी माझ्याकडे पाहिलं. ‘‘स्वरा, तू नाव का नाही देत?’’ मी घाबरून म्हणाले, ‘‘मी नाही बाई माझ्यापेक्षा चांगले वक्ते इथे खूप आहेत.’’ ‘‘स्वत:वर विश्वास ठेव,’’ त्या ठामपणे म्हणाल्या. ‘‘तुझा आवाज, तुझे शब्द, तुझं विचारविश्व हाच तुझा खरा चेहरा आहे. मी वाचलंय तू लिहिलेलं.’’ त्या दिवशी पहिल्यांदा मनात विचार चमकून गेला. कदाचित माझं वेगळेपणच हीच माझी ओळख असेल. पण घरी आल्यावर पल्लवीचे शब्द आठवत होते, ‘‘तू बोललीस तर सगळे हसतील.’’ त्या शब्दांनी माझ्या मनात परत अंधार पसरला होता. त्या रात्री मी खूप वेळ आरशासमोर उभी होते. पण आज मी फक्त चेहरा पाहत नव्हते; मी स्वत:ला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.
‘‘स्वरा,’’ मी स्वत:शी म्हणाले, ‘‘तुला शब्दांची भीती नाही. तुला वाचायला आवडतं. तुला प्रश्न विचारता येतात. तुझं मन जिवंत आहे. तुझी संवेदना ही तुझी ताकद आहे.’’ त्या क्षणी पहिल्यांदा स्वत:शी प्रामाणिक झाले. दुसऱ्या दिवशी मी बाईंना सांगितलं,‘‘मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार आहे.’’ ‘‘विषय?’’ त्यांनी विचारलं. ‘‘मी सुंदर आहे का?’’ स्पर्धेचा दिवस उजाडला. स्टेजवर उभी राहिल्यावर पाय थरथरत होते. समोर अपरिचित चेहरे होते. माइक हातात घेतल्यावर हात थरथरत होता, पण आवाज हळूहळू स्थिर होत गेला. ‘‘मी सुंदर आहे का? हा प्रश्न मी आज तुम्हालाच विचारत आहे. खरं तर सुंदरता हे केवळ आरशात दिसणारं प्रतिबिंब नाही, ते आपल्या मनात, नजरेत आणि वागण्यात असतं. जेव्हा मन नितळ असतं, विचार स्पष्ट असतात आणि कृती प्रेमळ असते तेव्हा ते व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा नक्कीच वेगळं असतं. कधी कधी साधा चेहरा असलेली व्यक्ती इतकी मोहक वाटते की त्या व्यक्तीचं आकर्षण शब्दांत मांडता येत नाही. का? कारण तिच्या डोळ्यांत सहवेदना असते. शब्दांत आदर असतो. हसण्यात सच्चेपणा असतो. खरं सांगायचं तर, सौंदर्य म्हणजे स्वत:वर विश्वास असणं. स्वत:ला जसं आहे तसं स्वीकारणं, आणि तरीही अधिकाधिक चांगलं होत जाण्याची तयारी ठेवणं. ते कृत्रिमतेत नाही, खरेपणात असतं. म्हणूनच, सौंदर्य हे चेहऱ्याचं मोजमाप नाही, तर विचारांची, कृतींची आणि मनाच्या छायांची एक सोज्वळ झलक असते.’’
स्वरा थांबली. सभागृहाकडे नजर टाकली आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासानं हलकंसं स्मित आलं. तिला जाणवलं, की आता कुणाच्या परवानगीची गरज नव्हती. कारण तिने स्वत:लाच परवानगी दिली होती ‘स्वत:ला पूर्णपणे स्वीकारण्याची’. एक क्षण शांतता होती. पण तो क्षण खूप काही सांगून गेला. आणि मग टाळ्यांचा एकच गजर झाला. अगदी भिंतींच्या आतपर्यंत गुंजणारा होता. स्वरा त्या प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे किंचित गोंधळली खरी. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. पण ते गोंधळाचे नव्हते तर ते अश्रू स्वीकृतीचे होते, आनंदाचे होते. तिच्या स्वाभिमानाचे, तिच्या स्वत:च्या असण्याच्या जाणिवेचे. सभागृहात शांतता पसरली होती. कोणीही हसत नव्हतं. काही चेहरे खाली पाहत होते. ‘‘आज मला एक गोष्ट कळली आहे,’’ मी शेवटी म्हणाले. ‘‘आपण स्वत:ला स्वीकारतो त्या दिवशी आपलं सौंदर्य जन्म घेतं. आणि ते सौंदर्य कोणालाही कमी लेखत नाही, उलट इतरांनाही मोकळं करतं.’’ मी भाषण संपवलं. टाळ्या वाजल्या. पण त्या टाळ्यांपेक्षा महत्त्वाचं काहीतरी माझ्या आत घडत होतं, एक शांत समाधान…
स्पर्धेनंतर मी निकाल ऐकायला थांबले नाही. थेट घरी आले. आरशासमोर उभी राहिले. आज पहिल्यांदा मला आरशात माझी कमजोरी दिसली नाही. मला एक प्रयत्न करणारी, शिकणारी मुलगी दिसली. त्या संध्याकाळी मी आईजवळ बसले. म्हणाले, ‘‘आई, मी बक्षीस जिंकलं नाही तरी चालेल. आज मी स्वत:ला जिंकलं आहे.’’ आई हसली. तिच्या डोळ्यांत अभिमान आणि समाधान दाटून आलं होतं. काही दिवसांनी शाळेच्या नोटीस बोर्डावर एक नवीन कोपरा तयार झाला, ‘स्वरा बोलते…’ मी लिहायला सुरुवात केली. माझ्यासारख्या अनेक मुलींच्या, मुलांच्या कथा मी शब्दांत मांडू लागले. टोमण्यांपेक्षा शब्द मोठे असू शकतात, हे मला उमगत गेलं.
एक दिवस पल्लवी माझ्याजवळ आली. डोळे खाली घालून म्हणाली, ‘‘स्वरा तू वक्तृत्व स्पर्धेत बोललीस ते मला लागलं. मला कधीच जाणवलं नव्हतं की शब्द इतके खोल जखम करू शकतात. मला माफ करशील का?’’ त्या क्षणी मला कळलं, सौंदर्य म्हणजे जिंकणं नाही. सौंदर्य म्हणजे बदल घडवणं. स्वत:मध्येही आणि इतरांमध्येही. त्या रात्री मी डायरीत लिहिलं, ‘‘आज मी आरशात पाहिलं आणि मला माझी भीती दिसली नाही. मला माझी ताकद दिसली. आणि ती ताकद म्हणजे मी स्वत:ला दिलेली स्वीकृती…..’’
● sunita.tembey@gmail.com

