– स्मिता शिंदे

तेरा दिवस पाहुणे आणि घरच्या कामाने करवदलेल्या नभाच्या जखमेवर एका पाहुण्याने, नीलने हलकेच फुंकर घातली आणि अशी अनपेक्षित प्रेमाने काळजी घेणार्‍या अनोळखी स्वभावाची तिलाही भूल पडली. हरखून गेली ती, पण क्षणभरच. थांबवलंच तिने मनाला… पण त्याने दिलेल्या वाळ्याच्या सुगंधानं तिला काही सांगितलं. काय होतं ते…?

घरामध्ये सतत लोकांचा वावर चालू होता. पाहुण्यांची ये-जा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. नभाच्या आजेसासर्‍यांचं नुकतंच निधन झालं होतं. भेटायला येणार्‍यांची आणि तेरवीचं कार्य करण्यासाठी थांबलेल्या लोकांची सोय बघताना नभाची फारच धावपळ होत होती. वरुण, नभाचा नवरा, तोही पाहुण्यांमध्ये मग्न होता. भेटायला आलेल्या लोकांना भेटणंदेखील महत्त्वाचं होतं. नभा मात्र पार थकून गेली होती. सगळ्या कामांचा बोजा उचलावा लागणार हे समजण्याइतकी ती नक्कीच सुज्ञ होती, पण ती हताश झाली होती ते वेगळ्याच कारणासाठी!

आजेसासर्‍यांचं निधन झालं ते जवळपास नव्वद वर्षांचे होते. वयोमानाप्रमाणे हे अपेक्षितच होतं. त्यामुळे भेटायला येणारे आणि त्याहीपेक्षा मुक्कामी आलेले पाहुणे अजिबात सुतकाच्या मूडमध्ये नव्हते. त्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. थट्टामस्करीही चालू होती. तेरवीचं कार्य होण्याच्या अगोदर मधले काही दिवस कोणत्या जवळच्या प्रेक्षणीय स्थळी जायचं या गोष्टीचं नियोजनही सुरू झालं होतं. कहर म्हणजे वरुणही या सगळ्यात उत्साहाने सामील झाला होता. तेरवीच्या जबाबदारीचं त्याला भान राहिलं नव्हतं. ‘स्वत: आपल्या कारने फिरवून आणेन’, असं वचनही देऊन झालं होतं. भरीस गोष्ट म्हणजे बसल्या जागेवरून चहा, पाणी, जेवण अशा मागण्या चालूच होत्या. त्या पूर्ण करण्यात थोडा जरी उशीर झाला की तो नभावर करवादत होता. वर सुनावत होता, की ‘तुला परिस्थितीचं जराही गांभीर्य नाही.’

नभा त्याच्या या बोलण्याने खूपच दुखावली होती. ‘मला गांभीर्य नाही की जमलेल्या पाहुण्यांना आणि वरुणला?’ असा प्रश्न तिला पडला होता. त्याच्या या दुटप्पीपणाचा तिला खूपच मनस्ताप होत होता. त्याचं असं बेजबाबदार वागणं आणि कसलीही मदत न करणं हे तिच्यासाठी नवीन नव्हतं, पण आज तिची तब्येतही बरी नसल्यानं ती अगदी त्रासून गेली होती. त्यात तिची वयात आलेली लेक रिया, हिची भुणभुण तिच्यामागे सुरू होती. तिच्या वयाचं कुणी नसल्यामुळे उगीचच ‘वड्याचं तेल वांग्यावर’ निघत होतं. अशा विचित्र मन:स्थितीत नभा चिडचिडी झाली होती.

त्यातच आणखी एका पाहुण्याची भर पडली. नीलची… नील हा नात्याने वरुणचा दूरचा भाऊ होता. तो नोकरीनिमित्त कॅनडाला राहत होता, पण सुट्टीवर भारतात आलेला असताना, आजोबांच्या निधनाची बातमी कळल्यावर भेटायला आला होता. नभा रीतीप्रमाणे पाण्याचा ग्लास ट्रेमध्ये घेऊन आली. वरुणने औपचारिकपणे ओळख करून दिली, ‘‘ही माझी बायको, नभा.’’

खेळकरपणे नील म्हणाला, ‘‘नभा? वेगळं नाव आहे… मी काही वहिनी बिहिनी म्हणणार नाही. नभाच म्हणेन.’’ नभाला अशा मोकळ्या वागण्याची सवय नसल्याने ती कसनुसं हसून आत गेली. नील वरुणला म्हणाला, ‘‘मी भारतात आहे तोपर्यंत रोज तुझ्याकडे कार्याच्या मदतीला येईन. संकोच करू नकोस.’’

दुसर्‍या दिवशी, नभाचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. एकच वेगळी गोष्ट झाली होती ती म्हणजे सकाळीच नील घरी आला होता. बोलल्याप्रमाणे तो खरंच प्रत्येक गोष्टीत मदत करत होता. सगळ्यांशी त्याचं बोलणं नम्र होतं. बर्‍याचशा कामाची सूत्रं त्याने हातात घेतली होती. नभाच्या नजरेतून ते सुटलं नव्हतं.

नभाने त्याच्यापुढे चहाचा कप धरला. तो त्याने मोठ्या आभारपूर्वक स्वीकारला. कामांमध्ये दिवस भराभर पुढे जात होता. नील उत्साहानं नभाला मदत करत होता. त्यामुळे तिचाही मूड सूधारला होता. एकदा दुपारची सगळ्यांची जेवणं आटोपली होती. आवराआवर करून तीही जेवायला बसली. तेव्हा नीलने तिला आग्रहानं भात वाढला. जेवण झाल्यानंतर ती ताट घेऊन उठणार तोच नीलने ते ताट त्याच्या हातात घेतलं. ती अगदी संकोचून गेली. अशा प्रकारच्या कोणाच्या काळजी घेण्याची तिला अजिबात सवय नव्हती. तिनं खूप प्रकारे सांगून पाहिलं. पण त्याने अजिबात ऐकलं नाही. आपल्या हातात ते ताट घट्ट धरून तो म्हणाला, ‘‘नभा तू खूप थकली आहेस. ऊठ आणि हात धुऊन घे. मी ताट नेऊन ठेवीन.’’ त्याच्या आग्रहापुढे आणि ताटावरच्या घट्ट पकडीपुढे तिचं काहीच चाललं नाही.

दुपारची सगळ्यांची वामकुक्षी झाली. नभा संध्याकाळच्या चहासाठी स्वयंपाकघरात शिरली. तोपर्यंत अंगणात खुच्र्या टाकून सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. ती चहा बनवत असताना, कसलासा आवाज झाला म्हणून नभाने मागं वळून पाहिलं तर नील ट्रे आणि कपांची जमवाजमव करत होता. हे बघून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण अशा प्रकारे स्वयंपाकघरात येऊन तिला कधी कोणीच मदत केली नव्हती. ती नीलला म्हणाली, ‘‘मी घेऊन आले असते चहा, तू गप्पा मारत बस बाहेर …’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘बाहेर गप्पा मारायला खूप जण आहेत. त्यापेक्षा मला तुझी मदत करू दे.’’ पुन्हा एकदा ती त्याची मदत नाकारू शकली नाही.

या वेळी तिला संकोचापेक्षा थोडासा आनंदच वाटला. तिच्यावर पडणार्‍या कामाच्या ताणाची कोणाला तरी जाणीव आहे या कल्पनेनंच तिला हलकं हलकं वाटू लागलं. एक हलकीशी आनंदाची झुळूक तिने अनुभवली. नील चहाचा ट्रे घेऊन बाहेर गेला. नेमकी त्याच वेळी रिया किचनमध्ये आली आणि म्हणाली, ‘‘अगं मम्मी, नील काकाच का सारखा तुझ्या मदतीला येतो?’’ या प्रश्नाने नभा एकदम गडबडून गेली. तिच्यातली तर्कबुद्धी जागी झाली. आणि ती हिरमुसली.

खरं तर तिलाही काही तरी वेगळ्या भावनेचा ओलावा जाणवत होता. या सगळ्या रूक्ष वातावरणात मायेचा, काळजीचा ओलावा केवळ नीलमुळेच तर ती अनुभवत आहे, हे सत्य न उमजण्याइतकी ती पाषाणहृदयी नव्हती. आणि नील ‘फ्लर्ट’ करत असेल, असं म्हणावं तर …नीलने त्या पद्धतीने एकही शब्द तिच्यापाशी उच्चारला नव्हता. तो जे वागत होता ते सर्वांसमक्ष वागत होता, त्यात कोणतीही लपवाछपवी नव्हती. फक्त मनाच्या लहरी जुळत होत्या इतकंच. पण त्यामुळे ती गोंधळून गेली होती आणि मनात उमटणारे आनंद तरंग स्वत:शीच मान्य करत नव्हती.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड उकाडा होत होता. रात्रीच्या वेळी सगळेच पाहुणे बाहेर बसले होते. उभे पंखे भाड्यानं मागवले होते. नभाने आवर्जून आपल्या आवडीचं वाळ्याचं अत्तर अंगणभर पसरेल अशी मांडणी केली होती. पुन्हा एकदा गप्पा रंगात आल्या होत्या. नभा घरातली कामं आवरून अंगणात आली. तिला पाहताच नील एका खुर्चीकडे निर्देश करून म्हणाला, ‘‘इकडे बस म्हणजे तुला छान वारा लागेल.’’ पण का कोण जाणे, अचानक तिला रियाचं संध्याकाळचं बोलणं आठवलं. तिने नीलकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं आणि अशा खुर्चीवर जाऊन बसली जिकडे तिचा चेहरा झाकला जाईल आणि ती नीलच्या नजरेस पडणार नाही. खरं तर नीलच्या या काळजी घेण्याच्या स्वभावानं तिच्या दुखर्‍या मनावर फुंकरीचं काम केलं होतं. पण ही नाजूक आनंदाची पालवी तिने वास्तविकतेच्या तलवारीनं स्वत:च सपासप कापून टाकली.

नीलही अचानक शांत झाला. त्याचं गप्पांमधलं लक्ष उडालं. थोड्याच वेळात नभाने पाहिलं की नीलने उठून तो फॅन अशा रीतीने ठेवला की तिला त्याचा वारा पुरेपूर लागेल. आता मात्र तिच्या डोळ्यात ट्चकन पाणी आलं. तिने ते निकरानं लपवलं. या प्रसंगानंतर तिनं नीलसमोर येण्याचं कटाक्षानं टाळलं.
तेरवीचा कार्यक्रम आटोपला. सगळे आपापल्या वाटेने परत गेले. नीलसुद्धा कॅनडाला निघून गेला. नभा आपल्या दिनक्रमात मग्न झाली. सगळ्या गोष्टी विस्मरणात गेल्या. पुढे असेच बरेच महिने होऊन गेले. एकदा घरात नीलचा विषय निघाला. नभाच्या आजेसासुबाई सांगत होत्या, ‘‘नीलचं लग्न झालं. त्याने कॅनडाला स्थायिक असलेल्या मुलीशीच लग्न केलं. तू माहेरी गेली होतीस तेव्हा तो तिला घेऊन आशीर्वाद घ्यायला आपल्याकडे आला होता.’’
‘‘हे वाळ्याचं अत्तर खास भेट म्हणून ठेवून गेला आहे तो…’’

नभानेही उत्सुकतेनं विचारलं, ‘‘अरे वा!! छान झालं… कशी आहे मुलगी?’’.

आजेसासुबाई म्हणाल्या, ‘‘अगं छानच आहे… पण विशेष म्हणजे एक विदेशी गोरापान रंग सोडला तर तुझ्यासारखीच दिसते अगदी.’’

पुढचे शब्द नभाच्या कानांपर्यंत पोहोचलेच नाहीत. क्षणभरासाठी सारं जगच तिच्यासाठी स्तब्ध झालं… केवळ कृष्ण – द्रौपदीच्या हळुवार नात्याचं चित्र तिच्या मन:चक्षूपुढे तळरत राहिलं… जाणवत राहिला… मोरपिसाचा अलगद सुखावणारा स्पर्श… आणि सोबत वाळ्याचा पसरत राहिलेला सुगंध…

smitashinde291175@gmail.com