डॉ. ताळा भवाळकर
श्रावणामध्ये अनेक प्रकारची व्रत-वैकल्ये किंवा सण असतात. बायकांचा ‘श्रावणी शुक्रवार’ म्हटलं की हळदीकुंकू ठरलेलं. मैत्रिणींना बोलवायचं, देवीची पूजा करायची आणि सवाष्णींचा हळदीकुंकू समारंभ करायचा, ही त्यावेळची पद्धत. दूध आणि चणे देणं हा महत्त्वाचा भाग असतो. त्यातही एखादी सवाष्णं जेवायला घालणं हे अनेक स्त्रिया आजतागायत करीत असतात. शनिवारचा उपास हा सगळ्या घरादाराला करायचा असतो. त्याला ‘संपत शनिवार’ असं म्हणतात.
संपत म्हणजे संपत्ती देणारा. त्या संपत शनिवारी शनीची पूजा केली, उपास केला की, आपल्या घरामध्ये संपत्ती येईल अशा प्रकारची धारणा असते. रविवारी आदित्य राणूबाईची पूजा आणि तिची कहाणी केली जाते. आदित्य राणूबाईच्या कहाणीचा मी पूर्वी उल्लेख केला होता. जुन्या काळच्या कहाण्या या लिहिलेल्या स्वरूपामध्ये सापडल्या. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी जेव्हा ऐतिहासिक संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जुन्या राजघराण्यातल्या किंवा श्रीमंत घराण्यातल्या लोकांच्या बळद्यावर म्हणजेच माळ्यावर रचून ठेवलेली जुनी बाडं, काही हस्तलिखितं सापडली. त्यात आदित्य राणूबाईची कहाणी राजवाडेंना पहिल्यांदा सापडली. त्यांनी या कहाण्यांचे बरंच संशोधन केलं.
तर आदित्य राणूबाईची कहाणी झाली, की पुन्हा सोमवारची शिवामूठ असायची. नागपंचमीनंतर महत्त्वाचा येणारा सण म्हणजे कृष्णाष्टमी. ‘कृष्ण जन्म झाला श्रावणातल्या अष्टमीला…’ अशी लोकांची श्रद्धा आजही आहे. कृष्णाष्टमी आणि त्यापाठोपाठ दहीहंडी. म्हणजे गोपालकाला करण्याची अष्टमी. कधी कधी हे दोन्ही एकाच दिवशी येतात, तर कधी दोन्ही दिवस वेगवेगळे, एकापाठोपाठ येतात. कृष्ण जन्माच्या वेळेला बहुधा मंदिरामध्ये कृष्णजन्माची प्रतीकात्मक पूजा केली जाते. ही लहानपणापासून मी पाहत आले आणि आजही ती होते. यावेळी काय करतात? एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन असतं ते. श्रीकृष्णाच्या जन्माचं आख्यान लावतात म्हणजे त्यांच्या शैलीमध्ये कथा सांगत असतात.
टांगलेला पाळणा फुलांनी सजवलेला असतो. घरात आपण बाळाच्या जन्मानंतर जसा नामकरण विधी करतो तसंच करतात. कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला अशी धारणा आहे. त्यामुळे रात्रीच ही पूजा केली जाते. यावेळी कथेकरी बुवा कथा सांगतात. त्यानंतर आरती होते. त्यावेळी कृष्णाचा पाळणा म्हटला जातो. एखाद्या बाळासाठी जसा ‘जो जो जो जो रे…’ पाळणा म्हणतात तसा कृष्णजन्मालाही म्हटला जातो. ही कृष्णाष्टमी. कालाष्टमी म्हणजे दहीहंडी. या दहीहंडीचं प्रचलन हे समुद्रकाठच्या प्रदेशामध्ये म्हणजे कोकणात मोठ्या प्रमाणावर असतं. पुढे ते मुंबईमध्ये आलं आणि आता तर सगळीकडे पसरलं. तर श्रीकृष्ण मोठा झालेला आहे, त्याचे सवंगडी, गोपाळ जमलेले आहेत. कारण गवळ्याचा व्यवसाय करणारा गोपालक समाज आहे. म्हणून गोपालन करणार्या समाजामध्ये दही, दूध वगैरे असं भरपूर असतं आणि त्याची उधळण करणं हे त्यांचं काम असतं. त्याप्रमाणे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
पाठोपाठ येते ते नारळीपौर्णिमा. या दिवशी मध्यमवर्गीय लोक नारळाचे वेगवेगळे गोड पदार्थ बनवतात. खांडवी, वड्या या नारळ, गूळ, तांदळाची कणी घालून करतात. नारळाची बर्फी, नारळाचा भात, नारळाच्या करंज्या वगैरे. घाटाकडच्या भागात नारळाचं महत्त्व कमी, पण कोकणात जास्त. कोळी समाजात नारळाचा उपयोग खूप केला जातो. चातुर्मासाच्या काळात मासेमारी बंद असते. कारण त्या काळात समुद्राला भरती-ओहोटी केव्हाही होते त्याकाळात होडी पाण्यामध्ये घालणं धोक्याचं असायचं. म्हणून नारळीपौर्णिमेपासून कोळी समाज आपल्या नावा पुन्हा पाण्यामध्ये घालून व्यवसाय सुरू करतात. त्याआधी ते समुद्राची पूजा करतात. त्याची गाणी आपल्याला माहीत आहेत, ‘‘वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा…’’
एकूणच श्रावणात आणि नारळी- पौर्णिमेच्या निमित्ताने नारळाच्या पदार्थांची विविधता ही स्त्रियांचे पाककौशल्य व्यक्त करण्याची संधी असते. त्या काळातली स्त्रियांची कल्पकता पाहण्याजोगी आहे. नागपंचमीला पदार्थ तव्यावर भाजणं वर्ज्य मानलं जातं. म्हणून बायका भाजण्याऐवजी उकडलेले पदार्थ करतात. आजच्यासारखा कुकर, मिक्सर अशा साधनांचा त्यावेळी शोध लागला नव्हता. अशा वेळी काठाच्या पातेल्यावर जुन्या धोतराचे पातळ फडके बांधीत. त्या पातेल्यात भरपूर पाणी घालीत. त्या बांधलेल्या कापडावर मोदक, करंज्या, पुरणाची दिंडे उकडीत, वर फुगीर तांब्या-पितळेचे झाकण दाबून बसवीत. झाला तयार त्यांचा कुकर!
एरव्ही पुरणाच्या पोळीऐवजी कणकेची जाडशी पारी (पुरीच्या आकाराची) थापून त्यात न वाटता घोटलेले पुरण भरून विशिष्ट घड्या घालून ते उकडले की झाले दिंड. ही खास बायकांची पाककौशल्याची युक्ती. अळूच्या, कोथिंबिरीच्या वड्या उकडल्या तर सुरीने न कापता जाड दोरा घेऊन काम भागवीत. एरव्ही पापड लाटण्यासाठी तसं करीत. त्याचे गोळे अर्थात लाट्या एका आकाराच्या याव्यात यासाठी भिजवलेल्या पिठाची गोल लांब लोळी वळून नंतर ती दोर्याने कापली जाई. त्यासाठी पायाच्या अंगठ्याला दोरा गुंडाळून त्याचा सुरीसारखा उपयोग केला जाई. त्यामुळे एकसारख्या आकाराच्या लाट्या कापल्या जातात.
भाजी चिरण्याचेही अनेक प्रकार आहेत, एकीकडे हस्तकौशल्य तर दुसरीकडे भाजीच्या चिरण्याच्या पद्धतीनेही बदलणारी चव. काही शेंगभाज्याच्या लांब शिरा काढून हाताने तुकडे करणे (गवार, घेवडा आदी) तर लाल भोपळ्याच्या थोड्या मोठ्या आणि दुधीच्या लहान फोडी करणे, पालेभाज्या मुठीत दाबून विळीवर एकसारखी बारीक चिरणे ही कौशल्याची कामे. कोशिंबिरीसाठी काकडी कोचणे हे असेच कौशल्याचे काम. ‘कोचणे’ हा शब्दही अनेकांना आता कदाचित कळणार नाही.
धान्य नीट स्वच्छ करण्यासाठी सुपातून पाखडणे, घोळणे, वेचणे ही क्रियाही आता चाळण्यांमुळे आणि नंतर कणीक, भाकरीची पिठे बाजारात तयार मिळू लागल्याने सूप आणि त्यासंबंधी क्रिया आणि शब्दही चलनातून बाद झाले आहेत. इंग्रजोत्तर काळात स्त्रिया शिकू लागल्या, बाजार संस्कृती वाढली तेव्हाच्या एका नाटकात एक सासूबाई म्हणते, ‘‘आता भाकरीची पिठं आणि भाजण्याही बाजारात मिळतील!’’ तेव्हा उपहासाने काढलेले हे उद्गार किती लवकर प्रत्यक्षात आले ते आपण पाहतोच आहोत. आता तर भाकरी, पोळीही तयार मिळते.
काळानुसार पाककौशल्याचे स्वरूप, खाद्यपदार्थ, साधने बदलली, आंतरदेशीय देवाणघेवाण झाली. पण अशा (दिंडे आदी.) चालीरीतीच्या तुरळक अस्तित्वातून क्षीण स्वरूपात का होईना काही टिकतात तर काही बदलतात. उकडीच्या मोदकाबरोबर ‘मोमो’ ही आले. हा प्रवाह पारंपरिक ‘पाककला’ नामक स्त्रीच्या खास प्रांतातला.
श्रावणीपौर्णिमा आणि रक्षाबंधन अनेकदा पाठोपाठच येतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीचं रक्षण करायला हवे यासाठी बहिणीने भावाला राखी बांधायची, अशा प्रकारचा आपल्याकडे समज आहे. त्याबद्दल आपण नंतर स्वतंत्रपणे बोलणार आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी एक ‘रक्षा मंत्र’ म्हटला जायचा आणि तो अजूनही काही ठिकाणी म्हटला जातो. हा रक्षा मंत्र कशासाठी? रक्षण करण्यासाठी. पण कोणी कोणाचं रक्षण आणि कोणापासून करायचं? तर हा जो मंत्र म्हटला जातो तो श्रावणीच्या पाक यज्ञाच्या वेळेला म्हटला जातो, ‘‘येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलीं। तेन त्वाम अनुबन्धानि, रक्षे मा चल मा चल।’ हा मंत्र रक्षाबंधनाचा.
मुळामध्ये हा मंत्र नागापासून रक्षण व्हावं याच्यासाठी आहे. कारण, पावसाळ्यामध्ये नाग वारुळाबाहेर येणं आणि इकडे-तिकडे हिंडणं हे मोठ्या प्रमाणावर होत असतं, म्हणून तिथे तो मंत्र म्हटला जातो. काही ठिकाणी जिवंत नाग पकडून त्याची पूजा केली जायची. आमच्या लहानपणी दारोदार गारुडी नाग टोपलीमध्ये घालून आणायचे आणि नागोबाला दो२२ध (दूध) द्या म्हणून हिंडायचे. बायका त्या नागाची पूजा करायच्या. तो नागाचा फणा काढून दाखवायचा. तो नाग विषारी असला तरी त्याचे विषारी दात आधी काढून घेतलेले असतात. नागोबा दूध पितो, म्हणून दूध, लाह्या वाहून पूजा केली जाते अशा प्रकारची धारणा आहे आहे, परंतु वैज्ञानिक दृष्टीने ती खरी नाही. मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून कायद्याने त्यावर बंदी आणलेली आहे. पण, अशा प्रकारची प्रत्यक्ष नागाची पूजा आत्तापर्यंत काही ठिकाणी चालू आहे. नाग बंधू आहे, रक्षणकर्ता आहे ही धारणा नागपूजेमागे आणि रक्षाबंधनामागे आहे. आता रांगोळीचा नाग, भिंतीवर नागाची चित्रं काढणं अशी प्रतीकात्मक पूजाही अजून चालूच आहे.
रांगोळी ही पारंपरिक कला आजही भारतभर विविध प्रकारे प्रचलित आहे. दारात विविध रांगोळ्या घातल्या जातात. महाराष्ट्रात बहुधा विशिष्ट शिरगोळ्याची पूड करून रांगोळ्या काढतात. शिरगोळा हा गारगोटीचाच ठिसूळ प्रकारचा दगड, त्याचे तुकडे फोडून एखाद्या बाद झालेल्या जात्यावर दळून आम्ही रांगोळी तयार करीत असू. मामाकडे/ गावाकडे गेलो की रानातून पारखी नजरेने शिरगोळे वेचून आणीत असू. वरवर सुंदर दिसणार्या कलाकृती निर्मितीमागे अक्षरश: असे शारीरिक श्रम असतात. देवाजवळची भिंत एकसारखी घोटून सारवून एकपरीने चित्रफलक तयार करून पांढरा चुना व काव (नैसर्गिक लाल माती) किंवा गेरूने रेखीव नाग रेखाटले जात.
भोवती नक्षीदार चित्रचौकट रेखली जाई. तर देवघर, ओसरीवर एखादी पणती ठेवण्यासाठी छोटा कोनाडा (देवळी) असे. तिच्याभोवती अशीच नक्षीदार लाल-पांढरी चित्राची वेलबुट्टी रेखाटली जाई. इतरही अनेक प्रसंगी भिंत घोटून सारवून चित्रे रेखाटली जात. लोक परंपरेतील रामकथेत कैकेयी कपटाने गोड बोलून सीतेला एक भिंत घोटवून रावणाचे चित्र काढायला लावते (आणि पुढे अनर्थ घडवते) असे वर्णन आहे. खूप वर्षांपूर्वी कल्याणजवळच्या टिटवाळा गावच्या गणपती मंदिरातल्या जमिनीवर रांगोळीसाठी अतिशय कलात्मक रीतीने शेणाने सारवण घातलेली जमीन मी पाहिली होती.
थोडक्यात,श्रावण महिना स्त्रियांच्या कलाकौशल्याला वाव देणारा महिना आहे.श्रावणामधले खेळ रंगत आहेत. श्रावणाने पावसाचा जोर कमी केलेला आहे, जलाशय भरलेले आहेत. माणसं आणि धरणी, निसर्ग याचं शांतवन झालेलं आहे. म्हणून श्रावणाचं महत्त्व हे ्त्रिरयांसाठी, सगळ्यांसाठीच फार मोठं आहे, असं वाटतं. एकूणच बायकांच्या कलात्मकतेला पारंपरिक सण-उत्सवाच्या निमित्ताने मोठा अवकाश दिला आहे.
chaturang@expressindia.com
