अनुरमा गोखले
‘ग्रँडमास्टर’ खिताब मिळवलेले जगातील एकमेव बहीण-भाऊ म्हणून बुद्धिबळातील प्रज्ञानंद आणि वैशाली यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा अनेक भावा-बहिणींच्या, बहिणी-बहिणींच्या, पालक-मुलांच्या, इतकेच नव्हे तर ‘विम्बल्डन’मधले जगप्रसिद्ध आंद्रे आगासी व स्टेफी ग्राफ या जोडप्यासारख्या कित्येक जोड्या क्रीडांगणांवर स्पर्धेत उतरतात आणि एकमेकांना पाठिंबा, प्रोत्साहन देत ‘कुटुंब रमलंय खेळात’ ही उक्ती सार्थ करतात.
असे मानले जाते, की नातेसंबंधांचे धागे विणण्यात स्त्रियांची नाजूक बोटे पुरुषांपेक्षा जास्त सफाईदार असतात. क्रीडा क्षेत्रात याचे विविध पदर आपल्याला बघायला मिळतात. कधी बहीण-भावाचे नाते क्रीडागणांवर पाहायला मिळते तर कधी क्रीडांगण त्यांना एकत्र आणते असेही घडते. नात्यांची वीण अनेकदा तिथे घट्ट होताना दिसते. ज्या बहीण-भावांबरोबर एकत्र सराव करतो, हरल्या-जिंकल्याची सुखदु:खे वाटून घेतो, त्यांच्याशीच स्पर्धा करायची वेळ आली की मात्र त्या खेळाडूंची मन:स्थिती विचित्र होते. कधी ही स्पर्धा म्हणजे प्रत्यक्ष मैदानात खेळलेला सामना असतो, तर कधी प्रसिद्धी आणि आर्थिक निकषांवर झालेली तुलना.
माय-लेकीच्या घट्ट नात्याचे उदाहरण घ्या ना. पिकलबॉल हा एक टेनिसशी साधर्म्य असणारा खेळ आहे. त्यात जागतिक स्तरावरील आघाडीची खेळाडू ली वॉटर्स हिने आपली मुलगी ॲना ली वॉटर्स हिला पिकलबॉल शिकविले आणि माय-लेकी एकत्र पिकलबॉलच्या स्पर्धा खेळू लागल्या. एका स्पर्धेत नवोदित ॲनाने आईला हरवून सर्वांना थक्क केले. मुलीवर अतिशय प्रेम करीत असली, तरी ली वॉटर्सला हा पराभव पचवणे काही काळ जड गेले. त्या सामन्यानंतर अस्वस्थ ली वॉटर्सने थोडा काळ अगदी मुलीपासूनसुद्धा दूर एकांतात राहून विचार केला. या काळात तिने प्रथम आपल्या मुलीच्या आपल्याशी तुल्यबळ झालेल्या दर्जाचा स्वीकार केला. मग स्वत:ची कारकीर्द दुय्यम समजून तिला प्रोत्साहन देण्यावर भर दिला. त्यानंतर त्या दोघींचे नाते अधिकच घट्ट झाले.
पालक जर स्वत: खेळाडू असतील किंवा क्रीडा क्षेत्राची माहिती असणारे असतील, तर ते आपल्या पाल्याला जास्त चांगल्या प्रकारे पाठिंबा देऊ शकतात. मात्र हिंदुस्तानी संगीतात ज्याप्रमाणे शब्दश: घराणे आढळून येते, किंवा सिनेक्षेत्रात पिढीजात कुटुंबे एकाच क्षेत्रात आढळतात, त्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रात घडताना फारसे दिसत नाही. आई-वडील खेळाडू असले तरी त्यांची मुले खेळाडू बनलेली क्वचितच दिसतात. अर्थात काही सन्माननीय अपवाद आढळतात. पूर्वीचे मान्यवर बॅडमिंटन खेळाडू गोपीचंद आणि लक्ष्मी यांची मुलगी गायत्री, उत्कृष्ट बुद्धिबळपटू कोनेरू अशोक आणि त्यांची दिग्विजयी मुलगी कोनेरू हम्पी हे काही ठळक अपवाद. लहानपणी सर्व जण मोठे भावंड काय करते आहे यावर लक्ष ठेवून असतात. मग बरेच वेळा धाकटी भावंडे त्यात कधी लुडबूड करताना तर कधी मोठ्या भावंडांचे अनुकरण करताना दिसतात. यामुळे जर मोठे भावंड एखादा खेळ शिकत असेल, तर बहुतेक वेळा धाकटे मूलसुद्धा तो खेळ शिकते. बरेच वेळा ‘कानामागून आली आणि तिखट झाली,’ या न्यायाने मोठ्यापेक्षा त्यात जास्त प्रगतीही करते.
बहिणींचे नाते बहुतांशी खूप अतूट असते. एकमेकींच्या अगदी खासगी गोष्टीही वाटून घेतल्या जातात. खेळाच्या मैदानात लहानपणापासून एकत्र वाढलेल्या, एकत्र सराव केलेल्या, एकत्र स्पर्धा खेळलेल्या अनेक बहिणी दिसून येतात. टेनिसमधील सेरेना व व्हिनस या विल्यम्स भगिनी, बुद्धिबळातील पोल्गार भगिनी या जगप्रसिद्ध आहेत. भारतातील कुस्तीगीर फोगट भगिनी, बास्केटबॉलमधील सिंग भगिनी, बुद्धिबळातील खाडिलकर भगिनी आपल्याला माहीत आहेतच. आपण बरेच वेळा पाहातो की भाऊ आणि बहीण यांच्या तुलनेत दोन बहिणींमध्ये सर्व बाबतीत जास्त तुलना होते. त्यांचा स्वभाव, रूप, आर्थिक स्थिती अशा अनेक बाबतीत.
खेळाच्या स्पर्धेत तर एकमेकींसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या ठाकलेल्या बहिणी आपण पाहतो. दोन बहिणींमध्ये एका बाजूला बक्षिसाचे चषक, प्रसिद्धी आणि त्यायोगे मिळणारे प्रायोजकत्व यासाठी स्पर्धा असते. तर दुसर्या बाजूला लहानपणापासून एकत्र सराव आणि स्पर्धांच्या असंख्य आठवणी, एकमेकींना कसोटीच्या निर्णायक वेळी दिलेला मानसिक आधार असतो. यामुळे बहुतेक वेळा बहिणीशी प्रतिस्पर्धी म्हणून सामना खेळणे स्त्री खेळाडूंना कात्रीत पकडल्याप्रमाणे वाटते. दोन बहिणींमधील सामन्याचा निकाल त्यांचे पालक सामन्याच्या आधीच ठरवतात असे आरोप अनेक वेळा केले गेले आहेत.
क्रीडा क्षेत्रात अनेक बहिणींनी एकमेकींचा आधार बनत वरची पातळी गाठली आहे. २००२मध्ये तर विल्यम्स भगिनींनी जागतिक क्रमवारीत पहिले-दुसरे क्रमांक मिळवून आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. व्हिनस पहिल्या क्रमांकावर होती, तर सेरेना दुसर्या क्रमांकावर. २०१० मध्ये पुन्हा या भगिनींनी जागतिक क्रमवारीत पहिले दोन क्रमांक मिळविण्याचा पराक्रम केला. यावेळी सेरेनाने पहिला क्रमांक पटकावला तर व्हिनसने दुसरा. दोघींनी जोडीने खेळून असंख्य दुहेरी सामन्यांमध्ये अजिंक्यपद प्राप्त केले आहे. या दोघींपैकी जर एक बहीण खेळत नसेल, तर हटकून ती सामना खेळणार्या आपल्या बहिणीला प्रोत्साहन देताना दिसत असे.
मी ग्रीसला १९८८ मध्ये झालेल्या ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिथे खेळणार्या हंगेरीच्या पोल्गार भागिनींमधील अतूट नाते मला जवळून पाहता आले. जरी या संघात राखीव खेळाडू म्हणून इल्डिको माडलचा समावेश होता, तरी हंगेरीचा संघ म्हणजे केवळ सुझन, सोफिया आणि ज्युडिथ या तिघी पोल्गार भगिनींचा संघ म्हणून ओळखला गेला. कोवळ्या वयातील या पोल्गार भगिनींनी तोपर्यंत अजिंक्य ठरलेल्या तेव्हाच्या बलाढ्य सोव्हिएत युनियन संघाला मागे टाकलं आणि स्त्रियांच्या गटातील सुवर्णपदक हंगेरीला मिळवून दिले. बुद्धिबळाच्या इतिहासात हे प्रथमच घडले.
भारतीय क्रीडा क्षेत्रसुद्धा अनेक बहिणींनी त्यांच्या अद्वितीय कामगिरीने गाजविले आहे. बुद्धिबळात चमकदार कामगिरी करत खाडिलकर भगिनींनी भारतीय स्त्री खेळाडूंसाठी एक नवीन दालनच उघडून दिले. वाराणसी येथील सिंग भगिनींनी बास्केटबॉलमध्ये भारतीय संघातून चमकदार कामगिरी केली आहे. या पाच बहिणींमधील चार बहिणींनी केव्हा ना केव्हा भारतीय बास्केटबॉल संघात आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी स्थान मिळवले आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे फोगट भगिनी आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी प्रकाशझोतात आली. परंतु कुस्तीच्या मैदानातील लाल मातीने बांधलेला त्यांच्या नात्यातील एकोपा राजकारणातील वितुष्टामुळे काहीसा दुभंगला आहे, असे बोलले जाते.
बरेच वेळा बहिणी इतकेच घट्ट नाते मैत्रिणीचे सुद्धा असते. जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींशी खेळताना चित्त एकाग्र करणे आणि विजिगीषू वृत्तीने आक्रमक खेळणे अनेक वेळा खेळाडूंना कठीण जाते. स्त्री खेळाडू पुरुषांपेक्षा काकणभर जास्त भावनिक असतात. त्यामुळे अशा सामन्यात नेहमीची स्पर्धात्मकता आणून खेळणे त्यांना जास्त जड जाते. स्त्री आणि पुरुषांच्या स्पर्धा वेगळ्या असल्यामुळे भावा-बहिणींची गाठ खेळाच्या मैदानात पडत नाही. मैदानाबाहेरही त्यांची तुलना केलेली जास्त दिसून येत नाही. भारतीय क्रीडा क्षेत्र सध्या गाजवत असलेली बुद्धिबळातील प्रज्ञानंद आणि वैशाली या भावंडांची जोडी एकमेकांच्या सोबतीने स्पर्धांसाठी जग हिंडताना दिसते. ‘ग्रँडमास्टर’ खिताब मिळवलेले जगातील एकमेव बहीण-भाऊ म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
क्रीडा क्षेत्रात स्त्री खेळाडूंनी फुलवलेले आणखी एक नाते मोठ्या प्रमाणात आढळते. ते म्हणजे आपला जीवनसाथी निवडण्याचे. स्पर्धांसाठी सततचा प्रवास, थकवणारा सराव, ताण-तणाव, बरेच वेळा संसारापेक्षा खेळाला दिलेले महत्त्व या सर्व गोष्टी एक खेळाडू समजून घेऊ शकेल या भूमिकेने स्त्री खेळाडू आपल्याच क्षेत्रातील जीवनसाथी निवडतात. खेळाशी संबंध नसलेले पतीसुद्धा स्त्री खेळाडूंना त्यांच्या खेळातील कारकीर्दीसाठी पाठिंबा देताना दिसतात. तर दुसर्या बाजूला दोघे पती-पत्नी खेळाडू असूनही त्यांच्यात विसंवाद होतो आणि दुर्दैवाने संसाराची इमारत कोसळते. माझे आवडते दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पत्नी जास्त प्रतिभावान असेल किंवा तिला जास्त पैसा अथवा प्रसिद्धी मिळत असेल तर पतीचा अहंकार दुखावला जाण्याचा संभव या क्षेत्रातही असतो.
एकाच खेळातील खेळाडूंनी लग्नगाठी बांधल्याची असंख्य उदाहरणे आहेत, पण काही वेळा भिन्न खेळातील खेळाडू देखील एकमेकांशी विवाहबद्ध होतात. असे विवाह जुळण्याचे योग बरेचदा स्पर्धांमधील भेट, वाढलेली ओळख, दोघांच्याही संपर्कातील माणसे यामुळे जुळून येतात. मी व माझे ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार विजेते पती रघुनंदन गोखले यांनी बुद्धिबळाच्या पटावरच संसाराचा डाव मांडला. बुद्धिबळात प्रवीण आणि भाग्यश्री ठिपसे, दिव्येंदु बरुआ आणि सहेली धर, आर. बी. रमेश आणि आरती, विसाख आणि आकांक्षा अशा अनेक जुन्या आणि नवीन पिढीतील राजा-राणीच्या जोड्या आहेत.
टेनिसमधील जगप्रसिद्ध जोडपे आंद्रे आगासी व स्टेफी ग्राफ १९९२ मध्ये ‘विम्बल्डन’ स्पर्धेचे विजेते म्हणून भेटले. आगासीच्या हृदयाचा कल ओळखलेल्या दोघांच्या प्रशिक्षकांनी त्यांचे संयुक्त सरावाचे सत्र ठेवले. या सत्रानंतर स्टेफीला आगासीकडून फुले आणि प्रेमपत्र अशी सुंदर भेट मिळाली. बहरत गेलेल्या या नात्याची परिणती अखेर २००१ मध्ये दोघे विवाहबद्ध होण्यात झाली.
भारतीय क्रीडा क्षेत्रात एकाच खेळातील खेळाडूंनी लग्नगाठी बांधल्याची अनेक उदाहरणे आहेत. बॅडमिंटनमध्ये गोपीचंद आणि लक्ष्मी, पारुपल्ली कश्यप आणि सायना नेहवाल, धनुर्विद्येत अतनू दास आणि दीपिका कुमारी, कॅरममध्ये अरुण आणि अनुपमा केदार, कुस्तीत बजरंग पुनिया आणि संगीता फोगट, सत्यवान काडियन व साक्षी मलिक, शूटिंगमध्ये रोनक पंडित आणि हीना सिधू, टेबल टेनिसमध्ये सुनील आणि सुजाता बाब्रस अशी ही यादी कितीतरी लांबत जाईल.
दोन भिन्न खेळातील खेळाडूंनी देखील एकमेकांना पसंती दिलेली दिसते. अगदी १९६२मध्ये अजरामर धावपटू मिल्खा सिंग यांनी पूर्वीची भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार निर्मल कौर यांच्याशी विवाह केला होता. बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंग हिने क्रिकेटपटू इशांत शर्माची ‘समाज माध्यमावरची मैत्रीची विनंती स्वीकारायला दोन वर्षे घेतली, पण अखेरीस जीवनसाथी म्हणून त्याचीच निवड केली. स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकल हिने आपले क्रिकेटपटूंविषयी असलेले पूर्वग्रह बाजूला केले आणि दिनेश कार्तिक याच्याशी लग्नगाठ बांधली.
काही वेळा खेळाचा उपयोग स्त्रिया कौटुंबिक संबंध दृढ आणि परिपूर्ण करण्यासाठी करून घेतात. भारताची ‘पॅरालिम्पिक गेम्स’मध्ये पदक मिळवणारी पहिली स्त्री खेळाडू दीपा मलिक हिने आपली दिव्यांग मुलगी देविका मलिक हिला पॅरा-ॲथलेटिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. शिवाय दोघी माय-लेकी दिव्यांग स्त्रियांना खेळात सक्रिय होण्यासाठी साहाय्य करणारी एक संस्था चालवितात.
आधुनिक काळात अमेरिकेत घडलेली एक सुप्रसिद्ध घटना अशी की, खेळातून आयुष्याविषयी आशादायी दृष्टिकोन मिळावा म्हणून ७५ वर्षांच्या इरमाने आपल्या १०१ वर्षांच्या आईला थाळीफेक आणि लांब उडी खेळण्यास प्रोत्साहित केले. २०२५च्या अमेरिकेच्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धांमध्ये दोघी माय-लेकी उत्साहाने सामील झाल्या होत्या. खेळाडूंची किंवा खेळात रुची ठेवणारी अशी कुटुंबे पाहिली की मनाचा कोपरा सुखावतो. gokhale.anupama@gmail.com
