scorecardresearch

Premium

दारू पिण्याचा आजार!

दारू पिणं आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी, पण त्यातून तुम्हाला होऊ शकतो दारूचा आजार.दारूच्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर माणसाचा निग्रह, नियमित औषधोपचार आणि कुटुंबीयांचं प्रेम गरजेचं असतं. ‘

दारू पिण्याचा आजार!

दारू पिणं आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी, पण त्यातून तुम्हाला होऊ शकतो दारूचा आजार.दारूच्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर माणसाचा निग्रह, नियमित औषधोपचार आणि कुटुंबीयांचं प्रेम गरजेचं असतं. ‘मुक्तांगण’सारखी संस्था हे काम करत असते. २२ हजारांहून अधिक व्यसनी रुग्णांना बरे केल्याचा अनुभव असलेल्या या स्व-मदत गटाविषयी.  
होय, मराठीत मद्यपाश आणि इंग्रजीमध्ये अल्कोहोल अब्युज किंवा दारूची गुलामी (Alcohol Dependency) म्हणतात, त्यापकी एक आजार, दारूची चव घेतलेल्या १२ ते १५ टक्के लोकांना होतोच. फक्त कोणती माणसे या १५ टक्के गटात मोडतात आणि कोणती माणसे या गटात बसत नाहीत हे ठरवण्याचे कोणतेही मापन उपलब्ध नाही. दारूची चव घेतलेल्या माणसाला हा आजार होण्याची १५ टक्के शक्यता असते. इतर मोठय़ा आजारांत काही प्रतिबंधात्मक साधने आहेत. परंतु दारूचे आजाराविषयी नेमके ज्ञान व गरसमजांचे निराकरण या व्यतिरिक्त काहीही प्रतिबंधात्मक साधन उपलब्ध नाही.
  संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने भारतीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीवरून भारतात दारूवरील अबकारी कर हे सर्वच राज्यांचे उत्पन्नाचे दुसऱ्या क्रमांकाचे साधन आहे. महाराष्ट्रात वैध दारूचे उत्पादन शुल्क दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु व्यसनमुक्ती कार्यासाठी १० कोटी रुपयेसुद्धा मिळणे अवघड असते. महाराष्ट्राचे सध्याचे दारूबंदी विभागाचे मंत्रीमहोदय शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र असे दारूविषयक धोरण आखून अमलात आणायला सुरुवात केली आहे. निवडणुकीनंतर त्या धोरणाचे काय होईल हे आता सांगणे कठीण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारताची लोकसंख्या जेव्हा ११५.१७ कोटी होती, तेव्हा ६७ टक्के प्रौढ व्यक्ती २.६ लिटर निव्वळ अल्कोहोल घेत होते तर त्याच वेळी पश्चिम दक्षिण आशियात हे प्रमाण २.२ लिटर होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दरडोई वर्षांला परदेशी दारूच्या ३६१ निप  (१८० एम.एल) नाश करीत होते. केरळ हे भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेल्या राज्यात तर हे प्रमाण ८ लिटरपेक्षा जास्त आहे. महिला मद्यपान करतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु उच्च-मध्यमवर्ग; नव्याने श्रीमंत होऊ घातलेला वर्ग आणि आदिवासी-कातकरी समाजात याचे प्रमाण जास्त आढळते. शहरी भागातील महिलांचा अद्याप सखोल अभ्यास झालेला नाही. याकरता सरकारकडे निधी नाही.
 घरातला एक माणूस दारूचा गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान वीस जणांचे तरी जीवन नासते. त्रासाला, िहसेला आणि निर्दयतेला बळी पडते. त्याच्या शरीराचे नुकसान होते ते वेगळेच. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही जिथे दारूचा विपरीत परिणाम होत नाही. मेंदूवर होणारे ताण तर महाभयंकर असतात. आठवण, वर्तमानाचे आणि भवतालचे भान, विवेकबुद्धी, समतोल ही मेंदूची महत्त्वाची काय्रे मंदावतात. भावनांचा प्रक्षोभ होतो. ज्या सर्व प्राणिमात्रांत आढळणाऱ्या राग, संताप, द्वेष, दु:ख या भावनांचे प्राबल्य वाढते; तर प्रेम, नम्रता, कृतज्ञता, आदर या नव्याने विकसित झालेल्या भावना मागे पडतात. दारू पिणे, अतिरिक्त दारू पिणे, मद्यपाश, दारूची गुलामगिरी, दारूडा होणे असे अनेक शब्द आपल्याला ऐकू येतात. पण त्याचा नेमकं अर्थ काय हे समजत नाही. हे समजण्याकरता आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ. माणूस दारू पिण्याच्या आजारात अडकला की काय होते? तो एका बाजूला मानसिक गुलामी आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक गुलामी या कात्रीत सापडतो. दोन्ही कात्रीची पती धारदार असतात. मानसिक ओढ इतकी अनावर असते की ती ओढ – आसक्ती त्याला ‘मला आत्ताच्या आत्ता, कोणत्याही परिस्थितीत, आणि कोणतीही किंमत मोजून दारू हवी म्हणजे हवी’ या विचारांच्या तो संपूर्णपणे आधीन होतो. इथे त्याला आपण करतोय ते चांगले का वाईट हे समजत नाही. आपण दारू घेतली तर शरीरावर, कुटुंबीयांवर काय परिणाम होतील याची फिकीर न करता माणूस दारू पितो. हीच ती मानसिक गुलामगिरी.
दुसऱ्या बाजूला दारू रिचवायची क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली. म्हणजेच पूर्वी जितकी दारू घेतल्यावर त्याला अपेक्षित अशी जी किक बसत होती तितकीच किक मिळवण्यासाठी त्याला जास्तीचे प्रमाणात दारू घ्यावी लागते. म्हणजेच शरीर काही कालावधीनंतर दारूला वेगळ्या प्रकाराने प्रतिसाद देऊ लागते. म्हणजेच त्याची दारूबद्दलची  सहन-वृत्ती (टॉलरन्स) त्याचबरोबर पहिली प्यायलेली उतरल्यावर शरीर पुन्हा दारूची मागणी करू लागते. हात-पायांची थरथर, अंग-दुखी, उलटय़ा, जुलाब असे शारीरिक बंडाचे विविध प्रकार दिसतात. त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात वियोग लक्षणे.(Withdrawal Symptoms)
   या दोन्ही बाजूने कात्रीत सापडलेल्या व्यक्तीला काय करावे हे सुचत नाही आणि त्याची (Spiritual Bankruptcy) नतिक अधोगती होते. म्हणजेच काय त्याच्या व्यक्तिमत्त्वातले काही दोष डोके वर काढतात तर काही दोष नव्याने सुरू होतात. खोटे बोलणारा माणूस हा दारूच्या काळात इतक्या जणांना फसवतो की त्याची त्याला गणतीच ठेवता येत नाही; तर दारू पिण्याच्या काळात बाई, मटका अशा सवयी लागतात. समाजात जगण्यासाठी जी सर्वसाधारण मूल्ये (सदाचार, शिष्टाचार-सभ्यता आणि संयम) ही एकसंध जीवनासाठी आवश्यक मानतो नेमकी तीच मूल्ये झाकोळून जातात.
इतर आजूबाजूच्या माणसांना वाटते दारू पिऊन शरीराचे नुकसान होते इतकी साधी गोष्ट कशी या माणसाला समजत नाही? कारण मानसिक ओढ आणि आता बनलेली शारीरिक गरज किती तीव्र असते हे त्यांना समजत नाही. विवेकबुद्धी निद्रिस्त आहे अशा वेळी माणूस समजूतदार माणसासारखे कसे वागणार? ज्याच्यातील संयम-संस्कृती- सदाचार आणि सभ्यता लोप पावली आहे तो नीट कसे वागणार? जो माणूस व्यसनाचा गुलाम झाला आहे त्याने चांगले वागायचे असे कितीही ठरवले तरी त्याला झालेला आजार त्याचे पाय पुन्हा पुन्हा दारूकडे वळत राहतात. या आजारात सर्वात जास्त होरपळून निघते ती त्याची पत्नी-सहचरी. मग आई आणि बिचारी मुले. घरात सतत अशांती, शारीरिक, मानसिक शाब्दिक िहसाचार, आरोप-प्रत्यारोप, संशय आणि भीती अशा वातावरणाने सबंध कुटुंब जीवन झाकोळून जाते.
 २७ वर्षांचा आणि २२ हजारांहून अधिक रुग्णांना बरे केल्याचा अनुभव असलेली ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासारखी संस्था सांगते, ‘होय व्यसनमुक्ती शक्य आहे.’ जेव्हा १४५ हून अधिक देशात लाखो मद्यपी व्यसनमुक्त जीवन जगत आहेत. त्यांचा म्हणजेच ‘अनामिक मद्यपी’ या संस्थेचा आशादायक संदेश सांगतो की तुम्हाला तुमच्या व्यसनापासून दूर राहणे निश्चित शक्य आहे. तेव्हा निराश होण्याचे कारण नाही.
व्यसनाच्या आजारातून माणूस नक्कीच बरा होऊ शकतो. त्याला दोन गोष्टींची गरज असते. कात्रीच्या ज्या दोन मुठी असतात, त्या विस्तारल्या की कात्रीत सापडलेला व्यसनी माणूस त्यातून बाहेर पडू शकतो. त्यात सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे दोन पात्यांना जोडून धरणारा स्क्रू. अर्थात उपचार. एक मूठ म्हणजे प्रामाणिक आणि डोळस इच्छाशक्ती आणि दुसरी मूठ म्हणजे कुटुंबीयांची साथ. हे तीन घटक एकत्र येणे म्हणजे व्यसनी व्यक्ती, त्याचे कुटुंबीय यांना उपचार केंद्रातील उपचारांनी बरे होण्यास प्रेरित करणे. प्रेरणेपाठोपाठ येतो स्वीकार. हा स्वीकार की मला व्यसनाचा आजार झाला आहे आणि मी कुणाच्या तरी मार्गदर्शनाने सातत्य राखीत उपचार घेईन. ‘मुक्तांगण’मधील उपचार हे संपूर्ण उपचार असतात. नशा बंद केल्यामुळे होणारा वियोग लक्षणांचा त्रास कमी व्हावा म्हणून औषधे दिली जातात. दारू बंद करण्यासाठी या क्षणापर्यंत कोणतेही औषध जगात कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे आयुर्वेदिक वगरे बाता मारून हजारो रुपये उकळण्याचे धंदे त्यांना प्रतिसाद देणे बंद केल्यास आपोआप बंद होतील. असो. मुक्तांगणांमध्ये शारीरिक शिक्षण, योगाभ्यास, वैयक्तिक समुपदेशन, गट-उपचार, संगीत-कला उपचार, दृकश्राव्य साधनांचा वापर, सर्जनशीलतेला, छंदांना प्रोत्साहन, कुटुंबीयांचा सहभाग आणि आश्रमरीतीने राहणे असे सारे घडत असते. त्याचबरोबर पाठपुराव्याचे महत्त्व लक्षात घेऊन २२ ठिकाणी ‘मुक्तांगण’ची पाठपुरावा केंद्रे आहेत. ‘आनंदयात्री’ नावाचे एक द्वि-मासिक आम्ही प्रकाशित करतो. ‘मुक्तांगण’ मध्ये ३००० पुस्तकांचे संग्रहालय आहे. मुक्तांगणचे संचालक डॉ. अनिल अवचट- यांचे मुक्तांगणची गोष्ट- मराठी/इंग्रजी, डॉ. आनंद नाडकर्णी यांचे मुक्तीपत्रे-मराठी/इंग्रजी आणि ‘माझे होय, व्यसनमुक्ती शक्य आहे’ ही पुस्तके व्यसनी मित्रांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वाचल्यास त्याचा त्यांना फायदा होतो. यासाठी अनेकांनी व्यक्तींनी मुक्तांगणला आíथक सहकार्य केले आहे. म्हणूनच केवळ ५० बेडसाठी अनुदान असताना आम्ही १८०-१९० व्यक्तींना उपचार देऊ शकतो. व्यसनमुक्ती केंद्राला दिलेली देणगी एकाच वेळी अनेक घरात आनंदाची बाग फुलवते.
अधिक माहितीसाठी : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र : दूरध्वनी ०२० २६६९ ७६०५ (वेळ ९.३०-४.३०) http://www.muktangan.org , muktangancorporate@gmail.com

Climatic changes in Sharad rutu autumn
Health Special: आल्हाददायक शरद ऋतू शरीरासाठी असतो तरी कसा?
why high blood sugar and blood pressure are a risky mix here what you need to check what doctor said read
उच्च रक्तदाबासह मधुमेह असल्यास सावधान! वेळीच काळजी घ्या अन् डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करा फॉलो
how to get rid of ants in the house quickly home remedies to get rid from ants
घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे ४ घरगुती उपाय; पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही
diy mosquito repellent refill at home
फक्त १० रुपयांत घरातील डासांपासून मिळवा कायमची सुटका; करा फक्त ‘हे’ सोपे उपाय

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sickness of drinking alcohol

First published on: 22-03-2014 at 12:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×