सुजाण पालकत्व
सुजाण पालकत्व हा आजकालचा परवलीचा शब्द, पण म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनेकदा अनुत्तरित राहतो. म्हणूनच मुलांच्या वयाच्या विविध टप्प्यांवर उपयोगी पडतील अशी चार सदरं दर आठवडय़ाला खास सुजाण पालकांसाठी. अगदी कोवळ्या आई-बाबांपासून दहावी-बारावीच्या अभ्यासाचं टेन्शन घेणाऱ्या चिंताग्रस्त पालकांपर्यंत सगळ्यांना मार्गदर्शक ठरणारी. याशिवाय खास सदर मुलांचं म्हणणं मांडणारे ‘कैफियत मुलांची’ आणि मुलांच्या विकासात मेंदूचं महत्त्व सांगणारा ‘मशागत मेंदूची’.
अर्णव आधी किती छान झोपायचा! आता दिवसा झोपा काढतो, रात्री उठून बसतो.’’
‘‘जुई मांडीवर गाढ झोपते. खाली ठेवली की टकटकीत..’’
‘‘शर्विनला तर वाईट सवय लागलीय. गाडीतून फिरवून आणल्याखेरीज झोपतच नाही.’’
छोटय़ा बाळासाठी सारं काही उत्साहानं, आनंदानं करणारे आईबाबा एका गोष्टीमुळे पार नामोहरम होतात, ती म्हणजे दिवसचे दिवस सलगपणे न मिळणारी झोप. कॉलेजमध्ये असताना, परीक्षेच्या आधी भलेही त्यांनी ‘नाइट आऊट’ मारला असेल. पण दिवसभर बाळासाठी एवढी धडपड केल्यावर रात्रीची किमान सात-आठ तास तरी झोप त्यांना मिळावी ना! पण ते काही शक्य नसतं. खूप लाडक्या अशा आपल्या बाळानं रात्रभर गाढ झोपावं अशी एखादी जादू किंवा मंत्र आपल्याला सापडला तर? बाळाला निजवण्याचंही एखादं तंत्र आहे का? याची अनेकांना प्रतीक्षा असते.
होय, त्या तंत्राचं नाव आहे ‘स्लीप ट्रेनिंग’ अर्थात झोपेचं प्रशिक्षण. शांत झोपावं कसं हे बाळाला शिकवणं. काही बाळं ही खरोखर अगदी शहाणी, गुणी असतात. दमली की आपोआप आपलं पांघरूण, एखादं आवडतं खेळणं किंवा आपलंच बोट तोंडात घालून झोपून जातात. अशा बाळांना म्हणतात ‘सेल्फ सूदर्स’. तर काही बाळं वेगवेगळय़ा संदेशांमधून आईबाबांना सांगत असतात, की ‘मला झोप आलीये.’ उदा., डोळे, नाक चोळणं, जांभया देणं, कुरकुर करणं, आईबाबांना चिकटणं.. आणि मग त्यांना हवं ते आईबाबांकडून मिळालं की झोपी जाणं.
मात्र काही मुलं अति उचापती, अ‍ॅक्टिव्ह असतात. खेळण्यात रमली की येणारी झोपही परतवून लावतात. त्यांच्यामधली ऊर्जा त्यांना स्वस्थ झोपू देत नाही. रात्री बारा वाजता खेळत बसणं किंवा मनसोक्त रडण्यामधून त्या ऊर्जेला वाट करून देणं असले प्रकार अशी मुलं करत राहतात. या झोपेच्या प्रशिक्षणामधून आईबाबांना काही युक्त्या समजतात, त्यामुळे हा प्रश्न सुटायला मदत होते.
अगदी नवजात बाळाला ठराविक वेळी झोपवायच्या फंदात पडू नये. असंही ते १६ ते १८ तास झोपतच असतं. पण एवढय़ा छोटय़ा बाळाचे अवयवही छोटेसे. त्याला लवकर लवकर भूक लागते, शू-शी होते, पुन्हा पोट रिकामं होतं. पुन्हा भूक.. असं चक्र सारखं चालू असतं. त्याची प्रत्येक गरज पुरवण्यासाठी आईला सावध राहावं लागतं. मग आईच्या झोपेचं काय? तर बाळ झोपलं की तिनं पण झोपावं, डोळा लागला नाहीतरी आडवं पडून विश्रांती घ्यावी. तो अमूल्य आणि अपुरा वेळ फोटो अपलोड करणं, ‘सेंड’ करणं यात घालवू नये.
बाळ साधारण दीड महिन्याचं झालं की दिवस आणि रात्र यांच्यातला फरक त्याला समजावून द्यायला पाहिजे. म्हणजे काय करायचं? दिवसा जरी ते झोपलं असलं तरी खोलीमध्ये पुरेसा उजेड हवा. दर दोन तासांनी त्याला उठवावं- कसं? पायाला गुदगुल्या करणं, कानामागे, केसात बोटं फिरवणं अशा पद्धतीनं. याचा उद्देश एवढाच, की डोळे उघडल्यावर त्याला दिवसाचा प्रकाश दिसायला हवा. त्या वेळी त्याच्याशी गप्पा माराव्यात, एकमेकांशी बोलावं. या वयात त्याला अजून स्पष्ट आकृती दिसत नसली तरी आजूबाजूला माणसं आहेत हे कळतं. याउलट रात्री वागायचं, म्हणजे खोलीत अगदी मंद प्रकाश, मंद संगीत किंवा अजिबात आवाज न करणं. बाळाचे कपडे बदलणं, दूध पाजणं या सगळय़ा गोष्टी करायच्याच, पण न बोलता. या सगळय़ाचा परिणाम म्हणजे बाळाला मिळणारा संदेश- दिवस हा खाण्यासाठी, खेळण्यासाठी असतो. रात्र झोपेसाठी असते.
आता बाळ अजून थोडं मोठं झालंय. आता त्याचं ठराविक वेळेला झोपवण्याचं तंत्र बसवायचंय. याची सुरुवात संध्याकाळीच करावी. (संध्याकाळच्या पाटर्य़ा, समारंभ टाळावेत.) बाळाला फिरवून आणणं, नंतर मसाज, शक्यतो छानपैकी अंघोळ, दूध पाजणं, थोडंसं खेळायचं. त्याच्या आवडीचं खेळणं दाखवायचं. त्याला ठराविक गोष्ट सांगायची किंवा ठराविक गाणं म्हणायचं (अंगाई). यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य, नियमितपणा. छोटय़ा मुलांना मोठे बदल आवडत नाहीत. या गोष्टी क्रमाक्रमानं झाल्या आणि दूध पाजलं. पोट भरलं की त्याला गुंगी यायला सुरुवात होते.
इतक्या लहान बाळांना वेगळय़ा खोलीत झोपवू नये. जवळ झोपवावं. शक्यतो आईच्याच बिछान्यात. फक्त त्याच्यावर आपले हातपाय पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूंनी छोटे लोड लावावेत. बाळाचा बिछाना (को-स्लीपर) ही पण उपयुक्त गोष्ट आहे. जेणेकरून बाळाचं डोकं पायांपेक्षा थोडं उंचावर राहतं. यामुळे पोटातलं दूध (दही) उलट तोंडात येण्याचा प्रकार घडत नाही. मात्र छोटय़ा मुलांना उशी वापरू नये. तर त्यांना मऊ मोठय़ाशा दुपटय़ात घट्ट गुंडाळावं. त्यांचे हातपाय आत राहावेत यासाठी. परदेशात यासाठी वेगळी दुपटी (स्वॉडल्स) मिळतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. पहिले तीन-चार महिने अकारण-सकारण मुलं दचकतात, त्यांचे हातपाय जोरात झटकले जातात. आणि त्यांची झोपमोड होते. मुलं आणखी मोठी झाली की आपणहूनच हातपाय बाहेर काढतात.
बाळ गाढ झोपलं की इच्छा असल्यास को-स्लीपरसकट त्याला उचलून पाळण्यात ठेवता येतं. झोपलेल्या बाळालासुद्धा आईबाबांचा श्वास किंवा शरीराचा गंध याची जाणीव होत राहते. त्यामुळे त्याला सुरक्षितता मिळते आणि ते जास्त चांगलं झोपतं.
झोपलेलं बाळ उठून चुळबूळ करायला लागलं तर त्याला एका सेकंदात उचलून घेण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा थोडी हालचाल करून, थोडे आवाज काढून ते पुन्हा झोपी जातं. मात्र दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेल्यास उठून बघावं, काय कारण आहे, त्याच्या अस्वस्थतेचं, भूक लागलीय? ओलं केलंय? उकडतंय? थंडी वाजतेय? खोलीत डास आहेत? त्याच्या गरजा भागवल्यावर ते जागंच राहिलं तर त्याला केवळ तुम्ही जवळ हवे असाल. तुमच्या मांडीवर, खांद्यावर त्याला बरं वाटेल. त्याच्या अगदी जवळ झोपून थोडं थोडं थोपटलं तरी ते पुन्हा झोपू शकतं. पुष्कळ बाळांना नीरव शांतता आवडत नाही. सातत्यानं चालणारा आवाजच त्यांना हवा असतो. (व्हाइट नॉईस) आईच्या पोटात त्यांना अनेक प्रकारचे आवाज ऐकू येतात- आईच्या हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण, आतडय़ाची हालचाल, श्वासोच्छ्वास वगैरे. आई बाळाला पोटात घेऊन चाले तेव्हा त्याला आपोआप झोका मिळायचा. काही वेळा हे सगळं बाळाला पाहिजे असतं. पंख्याचा आवाज, वातानुकूलित यंत्राचा आवाज, गाडीच्या इंजिनाचा आवाज, पाळण्यातले झोके, कडेवर घेऊन फिरवणं, गाडीतून फिरवणं ही सगळी याचीच रूपं आहेत.
पहिल्या काही महिन्यांत बाळांची वाढ झपाटय़ानं होत असते, त्यामुळे अन्नाची गरजही वाढते. रात्री नुसतं दूध दिलं तर तीन-चार तासांनी भुकेमुळे मुलं जागी होतात. यासाठी तज्ज्ञ लोक ‘क्लस्टर फीडिंग’ करायला सांगतात. म्हणजे संध्याकाळी एक-दीड तासांच्या अंतरानं तीन-चार वेळा दूध किंवा खाणं द्यायचं. पोटभर खाणं झालं की बाळ रात्रभर झोपू शकेल. बाळाला घेऊन रात्री प्रवास करायचाय किंवा रात्र दुसरीकडे घालवायचीय तर त्याच्या ओळखीच्या काही गोष्टी अवश्य जवळ ठेवा. उदा., त्याचं नेहमीचं पांघरूण, खेळणं, चित्रांचं पुस्तक वगैरे.
घरामध्ये खूप माणसांची वर्दळ, मोठे दिवे, मोठय़ा मुलांचा दंगा, गप्पागोष्टी, टीव्ही, रेडिओचे आवाज, पाहुण्यांनी बाळाला उचलून घेणं, हाताळणं या सगळय़ा गोष्टी बाळाला त्रासदायक वाटतात. हे सगळं टाळणं शक्य नसलं तरी अशा कार्यक्रमांचं नियोजन सकाळच्या वेळी करणं शक्य आहे. वर सांगितल्याप्रमाणे दिवसभर कितीही दंगा केला तरी संध्याकाळ आणि रात्र छोटं बाळ आणि आईबाबा यांचीच असली पाहिजे.
दिवस-रात्र बाळाची निगराणी करणारे आईबाबा, आजी-आजोबा किंवा त्याला सांभाळणाऱ्या बाई यांना बाळाची तब्येत बिघडली असेल तर लगेच समजतं. पोटदुखी, कानदुखी अशा कारणांनी बाळ झोपत नसेल तर त्याचं रडणं वेगळं असतं. नाक सर्दीनं चोंदलं असेल तरी बाळ झोपू शकत नाही. या सगळय़ांवर करण्याचे तातडीचे उपाय डॉक्टरांनी सांगितलेले असतात. पण ते करूनही बाळ झोपलंच नाही आणि रडत राहिलं तर मात्र डॉक्टरांची झोपमोड करण्यावाचून गत्यंतर नाही.
कधीकधी बाळांच्या अंगात ‘भूत’ शिरतं. छान रात्रभर झोपणारी बाळं अचानक झोपेनाशी होतात. अतिरेकी हसतात, अतिरेकी खेळतात. थोडक्यात, ‘चेकाळतात.’ झोपायचं नाव घेत नाहीत. हा प्रकार चांगला दोन-चार आठवडे चालू शकतो. याला म्हणतात, ‘स्लीप रिग्रेशन.’ याचं स्पष्टीकरण असं- मेंदूची झपाटय़ानं होणारी वाढ, प्रचंड मोठय़ा प्रमाणात ग्रहण होत असलेलं ज्ञान, सर्व पातळय़ांवर वेगानं घेतले जाणारे प्रगतीचे टप्पे, हे सगळं पचवायला आणि त्यातून शांत राहायला बाळाला जमत नाही. अति उत्तेजनेमुळे बाळ जागं राहतं. साधारण चौथ्या, नवव्या आणि बाराव्या महिन्याच्या सुमारास हे घडू शकतं. यावर उपाय? शांतपणे मंत्र जपणं. ‘हेही दिवस जातील.’

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती