स्लोवाकियामधील रिनोव्हा या गावामधील दुसर्या महायुद्धाच्या सावलीतली ती नेहमीसारखी एक सकाळ होती. जेमतेम २३ वर्षांच्या तरुण शिक्षिका मारिया गुलोविच शाळेत पोहोचल्या. पाठोपाठ त्यांची बहीण मार्था आणि एक तरुण शाळेत आले. बहिणीने तरुणाची ओळख करून दिली. तो एक ज्यू गिरणीवाला होता. त्याची अवस्था फारच केविलवाणी होती. ‘‘मॅडम, सगळीकडे ज्यूंची कत्तल सुरू आहे. मला मदत करा. माझी बहीण आणि तिचा छोटा मुलगा यांना शाळेत लपायला जागा द्या. माझी लाकडाची गिरणी जोपर्यंत जर्मन सैन्याच्या कामाची आहे तोपर्यंत तरी मी जिवंत असेन, पण माझ्या बहिणीला हे लोक गोळ्या घालतील. मी हात जोडतो, मला मदत करा,’’ तो कळवळून म्हणाला. याला मदत करणं म्हणजे जर्मन गेस्टापो (नाझी जर्मनीची गुप्तचर पोलीस यंत्रणा)च्या विरोधात जाणं. थोडक्यात मरण हे मारिया यांना ठाऊक होतं, पण बहीण मार्थाची विनंती आणि माणुसकी यामुळे मारिया यांनी त्यांना मदत करण्याचं ठरवलं.
मारिया यांना स्वत:ला राहायला शाळेकडून एक खोली मिळालेली होती. मारिया यांनी त्या तरुणाची बहीण आणि छोटा मुलगा यांना स्वत:च्या लपवलं आणि त्या स्वत: लपून छपून शाळेच्या वर्गातच राहू लागल्या. संपूर्ण गावच जर्मनीच्या प्रभावाखाली असल्याने ज्यूंच्या आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या जिवाला मोठा धोका होता. ज्यूंची धरपकड करून सरळ गोळ्या घालणं सुरू होतं. शाळेच्या शिक्षिकेनं तिच्या घरात कुणाला तरी आसरा दिला ही बाब फार दिवस लपून राहणं शक्य नव्हतं. साधारण अडीच-तीन महिन्यांनी स्लोव्हाक अधिकार्यांना ही खबर लागली आणि स्लोव्हाक सैन्यातील एक कॅप्टन शाळेत चौकशीसाठी आले. मारिया यांना मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाली, पण पुढे घडलेल्या घटनेने त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. मारिया यांचं नशीब चांगलं म्हणावं लागेल. कारण चौकशीला आलेला कॅप्टन स्वत:च जर्मनांविरुद्ध काम करणार्या भूमिगत चळवळीला गुपचूप मदत करत होता. तो अधिकारी म्हणाला, ‘‘मी तुला आत्ता या क्षणी जर्मनांच्या हवाली करू शकतो. सोबत ही मायलेकाची जोडीही छळछावणीत जाईल, पण तू माझं म्हणणं ऐकलं तर या दोघांना लपण्यासाठी मी दुसरी सुरक्षित जागा सुचवेन.’’ मारिया यांनी होकारार्थी मान हलवली.
कॅप्टनचा प्रस्ताव असा होता : मारिया यांना जर्मन, स्लोव्हाक, रशियन, हंगेरियन आणि इंग्रजी अशा पाच भाषा उत्तम अवगत असल्याने त्यांनी प्रतिकार चळवळीत एक संदेशवाहक गुप्तहेर म्हणून काम करायचं. बदल्यात तीन जीव वाचवण्याची जबाबदारी कॅप्टनची. मारिया यांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि पुढे एका साध्या तरुण शिक्षिकेचं एका झुंजार गुप्तहेरात रूपांतर झालं. मारिया यांची कहाणी म्हणजे धाडस, चातुर्य आणि थरार यांचा संगम आहे. १९ ऑक्टोबर १९२१ रोजी स्लोवाकियामधील जाकुबानी इथं त्यांचा जन्म झाला तेव्हा स्लोवाकिया चेकोस्लोव्हाकियाचा एक भाग होता. आई शिक्षिका आणि वडील धर्मगुरू होते. एका सुसंस्कारित कुटुंबात जन्म झालेल्या मारिया बालपणापासूनच संवेदनशील मनाच्या होत्या. प्रोसोव्ह इथल्या ग्रीक कॅथोलिक शिक्षक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन त्या १९४० मध्ये रिनोव्हा इथल्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतर काही वर्षांतच, १९४४ च्या सुरुवातीलाच त्यांना वर उल्लेख केलेला अनुभव आला.
प्रतिकार चळवळीत वेगवेगळ्या भाषा असणारे कार्यकर्ते होते. त्या वेगवेगळ्या गटांमधील संवाद एकमेकांना समजावून सांगणं, भूमिगत संपर्क व्यवस्था सांभाळणं अशी कामं त्या करू लागल्या. नाझीविरोधी स्लोव्हाक कार्यकर्त्यांना गेस्टापोंची माहिती, नकाशे जर्मन भाषेत मिळत. त्या माहितीचे भाषांतर करून एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पोहोचवणं हे सोपं काम नव्हतं. पण मारिया यांनी ते अत्यंत धिरानं केलं. त्यांची चपळता बघून त्यांच्यावर पुढील मोठी कामगिरी सोपवण्यात आली. त्यांना ६५ मैलांवर असलेल्या एका गावात जाऊन एक सुटकेस ताब्यात घेऊन ब्राटिस्लावा (स्लोवाकियाची राजधानी) पर्यंत आणायची होती. त्यात काय असणार याची त्यांना कल्पना नव्हती. रात्रीचा प्रवास करून त्या ठरलेल्या जागी पोहोचल्या. परवलीचा शब्द सांगितल्यावर त्यांच्याकडे ती सुटकेस देण्यात आली. कुठेही न थांबता त्या माघारी निघाल्या. जीव मुठीत धरून त्या रेल्वेच्या डब्यामध्ये बसलेल्या असतानाच काही गेस्टापो अधिकारी त्या डब्यात आले. त्यांनी प्रवाशांच्या सामानाची तपासणी करायला सुरुवात केली. ते पाहून मारिया यांनी एका गेस्टापो अधिकार्यांशी सलगी दाखवत गोड बोलायला सुरुवात केली. अधिकारी पाघळला. मारिया यांनी सफाईदार जर्मन भाषेत आपणही त्यांच्यातीलच आहोत असं भासवलं. उतरताना त्या अधिकार्याने स्वत: ती सुटकेस उचलून देऊन मारिया यांना मदत केली आणि अत्यंत कठीण प्रसंगातून मारिया बचावल्या. त्या सुटकेसमध्ये संदेशवाहक रेडिओ सेट होता. पकडल्या गेल्या असत्या तर कदाचित त्यांना तिथंच गोळ्या घातल्या गेल्या असत्या.
जर्मनांना हुसकावून लावण्यासाठी २९ ऑगस्ट १९४४ रोजी स्लोव्हाक राष्ट्रीय उठाव झाला. त्या काळात मारिया यांनी बंडखोरांच्या मुख्यालयात काम केलं. तिथल्या सोविएत लष्करी गुप्तचर विभागासाठी त्यांनी अनेक स्लोव्हाक भाषेतील फाइल्स रशियाच्या भाषेत भाषांतरित करून दिल्या होत्या. जर्मन सैन्यानं उठाव चिरडून टाकण्यासाठी मोठी फौज उभी केली. ऑक्टोबर १९४४ पर्यंत चळवळीची ताकद जर्मन सैन्यापुढे कमी पडू लागली होती. त्या वेळी अमेरिकेच्या ‘ओ.एस.एस.’(ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक स्व्हिहस) अधिकार्यांनी मारिया यांना भाषांतरकार आणि मार्गदर्शक म्हणून तिथून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
मारिया आणि चळवळीच्या इतर कार्यकर्त्यांनाही ताबडतोब कुठं तरी दूर जाणं आवश्यक होतं. म्हणून ते सगळेच डोंगराळ भागात आसरा शोधू लागले. तिथं त्यांना एक अमेरिकी अधिकारी भेटले. ते अमेरिकेच्या ‘ओ.एस.एस.’ या युद्धकालीन गुप्तचर संस्थेचे पदाधिकारी होते. स्लोव्हाक उठावात अमेरिकेच्या या संस्थेने उठावाला भरपूर मदत केली होती. जर्मन सैन्याने पाडलेल्या विमानातील अमेरिकी वैमानिकांची सुटका करण्यासाठी या संस्थेचे एजंट्स गुप्तपणे मदत करत असत. युद्धात क्षतिग्रस्त झालेल्या विमानांतून उड्या घेऊन ते आणि त्यांचे हवाई सैनिक तिकडेच डोंगराळ भागात लपलेले होते. (त्यांनी मारिया यांना ‘ओ.एस.एस.’च्या ऊअहएर या मोहिमेबद्दल माहिती सांगितली.) सर्वांनाच सुरक्षित आश्रय हवा होता. मारिया खरं तर खूप थकल्या होत्या, पण त्यांनी पूर्ण जबाबदारी घेण्याचं ठरवलं. तिथून रोमानियामध्ये बुखारेस्ट इथं जाण्यासाठी त्यांना अंदाजे सातशे किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. सुरुवातीला जर्मनीच्या बाजूने असणारा रोमानिया नंतर मात्र जर्मनविरोधात गेलेला होता.
(त्याची कारणं बरीच होती, पण तो आपल्या आजच्या लेखाचा विषय नाही) त्यांची राजकीय भूमिका माहिती असल्याने मारिया यांना रोमानियात आश्रय घेणं हा सुरक्षित पर्याय वाटला. इतके मैल अंतर कापायचं तर जवळपासच्या छोट्या गावातील गावकर्यांची मदत घेतल्याशिवाय पुढे जाणं अशक्य होतं. त्यासाठी त्यांनी सामान्य शेतकरी स्त्रीचा वेश घेतला. गावात जाऊन तिथल्या गरीब शेतकर्यांशी स्थानिक भाषेत संवाद साधायचा, खाण्यासाठी अन्न मिळवायचं आणि गेस्टापोंची नजर चुकवून खाण्यासाठी काही तरी घेऊन परत यायचं हे काम त्या करू लागल्या. हे सुरू असताना अमेरिकी पथकाचा शोध घेण्यासाठी जर्मनीने खास गुप्तचर त्यांच्या मागावर पाठवले होते. प्रतिकार चळवळीला, मारियाला किंवा अमेरिकी पथकास गावकर्यांनी मदत केली असा संशय जरी आला तरी त्या नागरिकांची हत्या केली जात होती. ज्यूंना आश्रय देणार्यांचेही हाल केले जात. अशा अवस्थेतही मारिया आणि सगळा चमू अति उंच ड्यूम्बीयर पर्वतराजी मार्गे पुढे पुढे रोमानियाच्या दिशेने सरकत होते.
मारिया यांना तिकडच्या भागाची बर्यापैकी माहिती असल्याने हे काम त्यांनी धाडसाने केलं. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. कडाक्याची थंडी पडली होती. सगळीकडे बर्फाचं साम्राज्य. वादळ, खायला पुरेसं अन्न नाही आणि अंगावर उबदार कपडे नाहीत. अशा बिकट अवस्थेत जवळपास नव्वद दिवस मारिया यांनी संपूर्ण चमूसाठी मार्गदर्शक वाटाड्या म्हणून जोखीम उचलली. सैनिकांजवळ दिशादर्शक यंत्र नसल्याने सगळ्यांची भिस्त मारिया यांच्यावर होती. रात्रीचा अंधार, झोंबणारं वारं, आतपर्यंत चिरत जाणारा बर्फाचा मारा यामुळे खचून न जाता त्या सगळ्यांना मार्गदर्शन करत राहिल्या. सतत बर्फाळ डोंगरातून जवळच्या छोट्या गावात ये-जा करताना त्यांचे बूट फाटले, बर्फाने दुखापत झाली, पण त्यांनी माघार घेतली नाही. मध्ये एका पडक्या घरात त्यांनी आसरा घेतला होता. कुणी तरी बर्फातील शिकारीसाठी ते छोटंसं घर बाधलं असणार. काही तरी खाण्यासाठी आणावं म्हणून मारिया आणि चार साथीदार बाहेर पडले. नेमका त्याच वेळेला जर्मन सैनिकांनी त्या घरावर हल्ला केला आणि तिथं थांबलेल्या अमेरिकी अधिकार्यांची हत्या केली. केवळ नशिबानं मारिया आणि चार साथीदार तेवढे वाचले. इतर ठिकाणी लपलेले स्लोव्हाक प्रतिरोध कार्यकर्ते आणि अमेरिकी हवाई सैनिक यांना तब्बल तीन महिन्यांच्या संघर्षपूर्ण पायपिटीनंतर जेव्हा बुखारेस्टची सीमा दिसली, तेव्हा सगळ्यांच्या शरीरात त्राण आलं. तो दिवस होता १ मार्च १९४५. एका सामान्य समजल्या जाणार्या शिक्षिकेनं असामान्य कामगिरी करून दाखवली होती. बुखारेस्टवरून त्यांना विमानानं इटलीतील ‘ओ.एस.एस.’च्या मुख्यालयात नेण्यात आलं. त्यांना त्यांच्या कामाचा आर्थिक मोबदला मिळावा यासाठी त्यांचं नाव लष्करात नोंदवण्यात आलं आणि प्राग या देशात भाषांतरकार म्हणून भरती करण्यात आलं. नंतर अमेरिकन मिलिटरी अकादमी, (युनायटेड स्टेट मिलिटरी अकादमी (यूएसएमए) न्यूयॉर्क इथं ओ.एस.एस.तर्फे त्यांना ‘ब्राँझ स्टार’ पदकाने सन्मानित केलं गेलं. १९५२ मध्ये त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यात आलं. पुढील आयुष्य त्यांनी कॅलिफोर्निया इथं ‘एक इस्टेट एजंट’ म्हणून व्यतीत केलं. ‘वॉशिंग्टन पोस्ट’साठी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. अमेरिकी सैनिकांना बर्फाळ डोंगरातून सुखरूप आणताना त्यांच्या पायांना गंभीर हिमदंश झाला होता. त्यांनी पकडल्या जाण्याच्या भीतीने वेदना सहन केल्या, पण रुग्णालयामध्ये जाण्याचं टाळलं.
‘‘माझ्यावर इतर कार्यकर्ते, अमेरिकी सैनिकांची आणि ओ.एस.एस. गुप्तहेर यांची जबाबदारी होती. मी त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नव्हते,’’ असं त्या म्हणाल्या. ‘मारिया गुलोविच, ओ.एस.एस. हिरोईन ऑफ वर्ल्ड वॉर २ : द स्कूल टीचर हू सेव्हड अमेरिकन लाइव्स इन स्लोवाकिया’ या पुस्तकात (२००८ मध्ये प्रकाशित) लेखिका सोन्या जेसन यांनी मारिया यांच्या कामगिरीवर विस्तृतपणे लिहिलं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी २५ सप्टेंबर २००९ रोजी कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी मारिया यांनी अखेरचा श्वास घेतला. एका सामान्य शिक्षिकेचा असामान्य धाडसी गुप्तहेर होण्यापर्यंतचा हा विलक्षण प्रवास प्रचंड अचंबित करणारा.
uadaparnadeshpande@gmail.com
