स्मृती आख्यान : मेंदूला ताप ताणाचा

ताणरहित जीवन कोणाचंच नसतं. फक्त ताणाची कारणं वेगळी आणि तीव्रता कमी अधिक असते इतकंच.

|| मंगला जोगळेकर
रोजच्या आयुष्यातही आपल्यातील प्रत्येकाला वेगवेगळे ताण असतात. त्यासाठी व्यक्तीची नोकरी वा व्यवसायच तणावपूर्ण असावा लागतो असं नाही. अनेकदा ताणांचा निचरा न होता तो नेहमीचा होतो आणि मग ताणाशी सामना करण्यासाठी शरीरात असलेली यंत्रणा गोंधळून जाते. याचे शरीराबरोबरच मेंदू आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होत असल्यामुळे ताणांना तोंड देण्यासाठी प्रत्येकानं स्वत:चा पर्याय शोधायलाच हवा.         

सकाळी कामवाली बाई यायला उशीर होणं, ही घटना तशी अगदी छोटी. परंतु बहुसंख्य स्त्रियांना ती मनस्ताप देणारी ठरते. दूधवाला, पेपरवाला वेळेवर न येणं, घरातल्या मंडळींनी ठरावीक वेळेला न उठणं किंवा ठरवून दिलेली कामं वेळेवर न करणं, अशा विविध लहानमोठ्या गोष्टींमधून रोज जी मानसिक त्रासाची सुरुवात होते, ती यांसारख्या अनेक घटनांमधून दिवसभर वाढतच जाते.

ताणरहित जीवन कोणाचंच नसतं. फक्त ताणाची कारणं वेगळी आणि तीव्रता कमी अधिक असते इतकंच. यातील काही कारणांचा त्रास थोड्या कालावधीसाठी असतो, तर काही कारणं बराच काळ, असह्य पीडा देणारी असतात. तणावाबाबतीत आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट (जिच्याकडे आपण एरवी डोळेझाक करू) नियमानं घडायला लागली, तर ती पीडा देणारी ठरू शकते. ज्या गोष्टीमुळे सातत्यानं मानसिक त्रास होतो, त्या गोष्टीला ‘क्रॉनिक स्ट्रेस’ म्हटलं जातं. अशा त्रासाचा मनावर आणि मनामुळे शरीरावर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमकुवत होते. तणावाचं रूपांतर नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांमध्येही होऊ शकतं. म्हणूनच तणावाचा आणि मेंदूच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे.

तसं पाहिलं तर थोडा ताण चांगलाही असतो. तुमच्या ऑफिसमधल्या काही कामांचं उदाहरण डोळ्यांसमोर आणा. बघा बरं, एखादं काम पूर्ण करायला हवंच अशी जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा आपण ते बरोबर पूर्ण करतो. वेळ कितीही कमी असला तरी प्रसंगी अव्याहत काम करून नावाजण्याजोगी कामगिरी आपल्या हातून घडते. कित्येक वेळेला अशा कामाची प्रशंसा होते. दर वेळी अशी प्रशंसा झाली नाही, तरी आपल्या स्वत:च्या मनाला त्यातून खूप समाधान मिळतं. आपल्या कर्तृत्वाच्या खुणांनी आपण सुखावून जातो.

काही जणांच्या नोकरीमध्ये मात्र अती ताण असतो. रोजच कामाची टांगती तलवार डोक्यावर असते. अलीकडे ‘आयटी’ क्षेत्रात काम करणाऱ्यांची जमात तर जबाबदारीच्या ओझ्याखाली इतकी सापडली आहे, की त्यांना कामाशिवाय दुसरं आयुष्यच उरलेलं नाही. कित्येकदा सहकाऱ्यांशी, बॉसशी चांगले संबंध नसणं हे ताणाचं कारण बनतं. आपलं काम चोख होत आहे का?, ते वेळेवर होत आहे का?, अपेक्षित ‘रिझल्ट’ आपल्या कामातून मिळत आहेत का?, अशा काळज्यांमधूनही तणाव वाढत जातो. काही जणांची घरची परिस्थिती युद्धसदृश असते. पैशांची काळजी, सासू-सुनांमधले ताण, नवरा-बायकोंची भांडणं, मुलांचे अभ्यास, शेजाऱ्यांचे तंटे, अशी अनेकविध कारणं तणाव बनून आपलं मन पोखरत राहतात. तर काही जणांचा स्वभाव ताण उत्पन्न करणारा असतो. वर्षानुवर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांच्या आठवणी पुन:पुन्हा उकरून काढणं, समोर नसलेल्या व्यक्तींनी आपल्याला कसा त्रास दिला याची वर्णनं इतरांना ऐकवणं, लोकांनी आपल्याशी कसं वागायला हवं हे स्वत: ठरवणं किंवा भविष्य़काळात काय घडू शकतं याचा विचार करण्यातून तणावाच्या तलावात डुंबायचा मोह त्यांना आवरणं कठीण जातं. काही जण अगदी क्षुल्लक कारणास्तव आपल्याभोवती ताणाचं जाळं विणत राहतात. त्यामुळे आपल्याच मेंदूला अकारण शिक्षा देण्याची चूक त्यांच्या हातून घडत राहते. ताणाचं कारण काही का असेना, ताण असा आपल्या जीवनात हात पाय पसरून बसला, तर त्याचा त्रास होणारच.

तणावाशी मुकाबला

आपले पूर्वज दोन प्रकारे तणावाचा मुकाबला करायचे. लढाई करून अथवा पलायन करून. शत्रूवर विजय मिळवणं शक्य असेल तेव्हा लढाई करायची आणि जिंकणं शक्य नसेल तेव्हा पलायन करायचं, अशी दोन तंत्रं त्यांच्यापाशी होती. तणावाचा कालावधीही थोडा असायचा. एकदा तणावाचा प्रसंग संपला, की आपल्या गुहेत येऊन ते विश्रांती घ्यायचे. तणावाशी दोन हात करण्याचं त्यांचं तंत्र अगदी बाळबोध असलं तरी त्यामुळे तणावाच्या परिस्थितीचा त्यांच्या आरोग्यावर फार परिणाम होत नसे. शास्त्रीयदृष्ट्या विचार केला, तर पिढ्यान्पिढ्या उलटून गेल्या तरी तणावाशी सामना करण्याची एवढी दोनच तंत्रं आपल्या शरीराला मान्य आहेत. परंतु सद्य परिस्थितीतले ताण हे दीर्घकालीन असतात. नोकरीवर आणि घरी असलेले तणावाचे प्रसंग हे लढाई करून किंवा पळून जाऊन सोडवण्यासारखे नसतात. त्यामुळे ताण आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम करताना आढळून येतात.

 तणावाचे परिणाम

जेव्हा आपल्याला मानसिक ताण होतो, तेव्हा मेंदू क्षणाचीही उसंत न घेता विचार करत राहतो. एकसारखं काम केल्यामुळे मेंदूतील पेशींना अती श्रम पडतात आणि त्यामुळे त्या शिणतात. तसं पाहिलं तर बारीकसारीक हालचाली करतानासुद्धा पेशींवर भार पडतो. परंतु मानसिक प्रश्नांमुळे पडणारा सततचा ताण, सततचा ‘ओव्हरटाइम’ करणं पेशींच्या सहनशीलतेच्या पलीकडे जातं आणि आपल्या शरीराचा समतोल ढळतो.

तणावाखाली असताना आपलं शरीर ‘कॉर्टिकोस्टीरॉइड’ नावाच्या हॉर्मोनची (संप्रेरकाची) निर्मिती करते. लढाई किंवा पलायन हे तणावाशी दोन हात करणारं आद्य मानवाचं जे तंत्र आपण पाहिलं, त्या तंत्रासाठी शरीराची तयारी करणं हे या हॉर्मोनचं काम. समजा एका अंधाऱ्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी तुम्ही सावधतेनं चालला असताना तुम्हाला कुणाच्या पावलांचा आवाज आला, तर तुम्हाला प्रथम पाठीमागे वळून पाहण्याचंसुद्धा धैर्य होणार नाही, छातीतील धडधड वाढेल, शरीराला कापरं भरेल, पण नंतर काही क्षणातच पळायची वेळ आली, तर तुम्ही आयुष्यात कधी धावू शकला नाहीत इतक्या वेगानं धावू शकाल किंवा दोन हात करायची वेळ आली तर जे हातात असेल त्याचा आयुध म्हणून वापर करून जीवानिशी आलेल्या संकटाचा प्रतिकार करायला सिद्ध व्हाल. हिरकणीनं दाखवलं तसं अतुलनीय धैर्य दाखवण्याची ताकद ही या कॉर्टिकोस्टीरॉइड हॉर्मोनची देणगी आहे.

अशा रीतीनं शत्रूवर आक्रमणास सज्ज झालेलं आपलं शरीर आधीच्या पूर्वस्थितीला येण्यासही तेवढंच उत्सुक असतं, कारण आक्रमक पवित्र्यात राहण्यासाठी संपूर्ण शरीरानं आपली नित्याची कामं बाजूला टाकलेली असतात. तणावाच्या आदर्श परिस्थितीत कॉर्टिकोस्टीरॉइड या अतिथी हॉर्मोनचं उत्पादन तणाव संपताक्षणीच थांबवलं जातं आणि त्याचा शरीरावर झालेला परिणाम विरून जातो. परंतु नैसर्गिकरीत्या केलेली ही योजना सध्याच्या धकाधकीच्या वातावरणात बारगळण्याचेच प्रसंग घडून येतात. क्रॉनिक ताणाखाली असणारं शरीर हॉर्मोनचं उत्पादन गरज संपताक्षणी बंद न करता चालूच ठेवतं, कारण युद्ध चालूच असल्याचा चुकीचा अलार्म शरीरामध्ये वाजत असतो. समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या पतीशी किंवा पत्नीशी पटत नसल्यामुळे एकसारखा तणाव जाणवत आहे, त्यातच मुलांच्या आणि इतर विवंचनासुद्धा आहेत, एकसारखे तेच विचार डोक्यात आहेत, डोकं सुन्न होत आहे, कुठे लक्ष देणं अवघड जात आहे, यासदृश परिस्थितीतून जाताना कॉर्टिकोस्टीरॉइडचं उत्पादन तीव्र प्रमाणात होतं, किंबहुना त्याचा नको तेवढा मारा मेंदूच्या पेशींवर सातत्यानं होत राहतो. त्यातूनच मेंदूसाठी घातक अशा घटकांची निर्मिती होत राहते.

ताणामुळे अ‍ॅड्रिनल ग्रंथीचं कार्यही सामान्यपणे होत नाही. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतो. मद्यपान, धूम्रपानासारख्या नको त्या सवयी लागतात, हाताखालच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींवर राग काढून ताणाला वाट करून देण्याचा चुकीचा मार्गही कित्येक जण स्वीकारतात. परंतु त्यामुळे ताण कमी न होता वाढीस लागतो. तणावाच्या परिस्थितीत फरक न पडता ती अधिकच गंभीर होऊ लागते.

मेंदूच्या आरोग्यावर या सगळ्याचा खूप परिणाम होतो. कॉर्टिकोस्टीरॉइड मेंदूच्या नाजूक ‘हिप्पोकॅम्पस’ भागासाठी विशेष घातक असतं. हिप्पोकॅम्पसचा स्मरणशक्ती प्रक्रियेमध्ये खूप मोलाचा सहयोग असतो. एकसारख्या तणावांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. (काही संशोधकांना तर असं वाटतं, की आयुष्यभराच्या ताणामुळेही पुढे जाऊन स्मरणशक्ती गमावण्याचे आजार होत असावेत.) सततच्या ताणामुळे सेरोटोनिन, अ‍ॅसिटिलकोलिन, डोपामिन, अशा न्यूरोट्रान्समिटर्सच्या उत्पादनात अडथळे येतात. ज्यामुळे आपल्या जगण्यासाठीच्या जाणिवाच बोथट होऊ शकतात. मेंदूमधील काही द्रव्यांचा समतोल ढळतो. त्यामुळे मेंदूच्या अन्नपुरवठ्यावर परिणाम होतो. काळजीमुळे वार्धक्यही लवकर येऊ शकतं. मेंदूतील डेन्ड्राइट आणि अ‍ॅक्झानची, तसंच सिनॅप्सेसची (सिनॅप्सेस म्हणजे दोन मज्जातंतूंच्या पेशींमधील ‘जंक्शन’- येथे डेन्ड्राइट व अ‍ॅक्झानमधील) संख्या कमी होते. अती तणावात असलेल्यांमध्ये निराशा, चिडचिड, विस्मरण, अशी चिन्हं दिसायला लागतात, कामात लक्ष लागत नाही, नवीन शिकणं अवघड वाटू लागतं, एकाग्रचित्तता ढळते, कामातील सुसूत्रता कमी होते, आपल्यामधील वैगुण्यं दृश्यमान होतात आणि त्यातून आत्मविश्वास ढळायला लागतो. यातून अधिक निराशा, अधिक ताणाचं चक्र चालू राहतं. हा परिणाम केवळ मेंदूपुरता न थांबता शरीरावरही दिसायला लागतो. उदा. शरीरातील होमोसीस्टीनचं (एक प्रकारचं अमिनो अ‍ॅसिड) प्रमाण वाढतं. ज्यामुळे पुन्हा मेंदूवर परिणाम होतो, त्याचे आजार होण्याची शक्यता वाढते.

तणावाबरोबर वाटचाल

तणावाकडे सामोपचारानं बघण्याची दृष्टी असणाऱ्यांच्या तब्येतीवर तणावाचा परिणाम कमी प्रमाणात होतो असं संशोधन आपल्याला सांगतं. तणाव असूनही आनंदी कसं राहता येईल, याचा विचार त्यासाठी करायला हवा. तणावावर नियंत्रण ठेवण्याचं तंत्र विकसित करता येतं. या ठिकाणी व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा (मेडिटेशन), छंद, वगैरेंचा फायदा खूप होऊ शकतो. त्यातून शांततेची प्राप्ती होऊ शकते. विचारांमध्ये प्रगल्भता येऊन काय महत्त्वाचं आणि काय बिनमहत्त्वाचं, याचं उत्तर आपलं मन देऊ लागतं. छोट्या, तरीही मन जाळणाऱ्या गोष्टींचं अवास्तव महत्त्व कमी होतं. ताण कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे एकप्रकारे मेंदूतील अवाजवी विचारांचं तांडव कमी करण्याचा प्रयत्न. नको त्या विचारांतून मुक्तता हा मेंदूसाठी एक आनंदानुभव ठरतो. आकाशात उंच भरारी घेऊन मुक्तपणे विहार करणाऱ्या मनाची झेप अनुभवायची, तर त्याला तणावांमधून बंधमुक्त करायलाच हवं. विस्मृतीपासून बचाव करण्यासाठी तणावांचे बांध तोडून टाकायलाच हवेत.

तणाव हा मेंदूचा बलाढ्य शत्रू आहे. आयुष्य आहे तोपर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपानं तणाव येतच राहणार आहे. कारण आपल्या मनाविरुद्ध घटना सदोदित घडतच राहणार आहेत. तसंच त्या थांबवणं आपल्या हातात नाही. त्यामुळे ताण न टाळता येणारा असणार आहे, तो पदोपदी जाणवणार आहे. याशिवाय एकविसाव्या शतकातील तणाव हा गत कालापेक्षा वेगळा आहे, ही स्थिती आपल्याला मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. परंतु ताणानं आपल्याला चारी बाजूंनी वेढून आपल्या जीवनाचं असं शोषण करायचं की नाही, हे ठरवणं आपल्या हातात आहे.

आपलं तन, मन, आरोग्य, आपलं संपूर्ण जीवनच असं ताणाकडे गहाण टाकायचं, की त्यापासून बचाव करणाऱ्या कवचकुंडलांचा स्वीकार करायचा, हा आपला स्वत:चा निर्णय असणार आहे.

mangal.joglekar@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Smruti akhyan author mangal joglekar article fever strains the brain akp